26 वर्षीय अमीन दीपलाल कुमार विभूतीपूर ब्लॉकमधील समस्तीपूर येथे हजार वर्ष जुनी कैथी लिपी शिकण्यासाठी आले आहेत. कैथी लिपीतच राज्यातले जमिनीचे बहुतेक दस्तावेज आहेत. बिहारमधील भूमिमापनाचं काम 2025 पर्यंत संपवण्यासाठी अनेक सिव्हील इंजिनियर्स आता कैथी लिपी शिकू लागले आहेत. भूमि अभिलेख आणि सर्वेक्षण संचलनालयाने आयोजित केलेल्या कैथी प्रशिक्षण शिबिरात सामिल झालेले दीपलाल सांगतात की, जमिनीच्या जुन्या नोंदी कैथी लिपीतच आहेत.
ती शिकल्याशिवाय जमीन सर्वेचं काम होऊ शकत नाही. कुमार त्या दहा हजार सर्वेक्षकांपैकी एक आहेत ज्यांना बिहार सरकारने 45 हजार गावांना नकाशाबद्ध करून राज्यातील गुंतागूंतीचे जमीन अभिलेख ठीक करण्यासाठी नियुक्त केलं आहे. यांचं संगणकीकरून संपत्ती विवाद कम करण्याचा सरकारचा उद्देश आहे ज्यामुळे राज्यातील 60 टक्के अपराध घडत असतात. पुढील वर्षाच्या विधानसभा निवडणूकीआधी नितीश कुमार सरकारला हे काम जुलै 2025 पर्यंत संपवायचं आहे. पण ऑगस्टमध्ये जमीन सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा सुरू होताच कैथीचं भूत बाहेर आलं. ही प्राचीन आणि विस्मृतीत गेलेली लिपी आता अधिकारी, जमीन मालकांची डोकेदुखी बनली आहे आणि सरकार यावर उपाय शोधण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. 
पुरातन कैथी लिपी ठरली डोकेदुखी
कैथीविषयी माहिती नसल्याने जिल्हा राजस्व कार्यालयांमध्ये निराशा आहे. अधिकाऱ्यांच्या टेबलांवर कागदांचे गठ्ठे आहेत आणि समोर लोकांच्या रांगा. सर्वजण कैथी लिपीवाचकाची प्रतिक्षा करत आहेत. जमीन सर्वेक्षणाच्या या कामाची गती मंदावल्यामुळे लोक ओरडत आहेत तर दुसरीकडे कैथीच्या रुपाने एक प्राचीन वारसा जीवंत करता येईल याचा उत्साहही त्यांच्यात दिसून येतोय. यावर उपाय म्हणून सरकारने सप्टेंबर महिन्यात कैथी प्रशिक्षण शिबिर सुरू केले. राज्यात प्रथमच असा प्रयत्न करण्यात आला. पण तज्ञांचं म्हणणं आहे की काही दिवसांच्या प्रशिक्षणानं गोष्ट जमणार नाही.
20 वर्ष कैथी प्रशिक्षक असलेले प्रीतम कुमार म्हणतात की, तीन दिवसांच्या प्रशिक्षणात कैथी फक्त थोडीफार वाचता येऊ शकते, लिहिताही येऊ शकेल. पण त्याची खात्री देता येत नाही. कुमार यांच्या सोबत वकार अहमदही प्रशिक्षणात आहेत. कुमार कैथीचे अक्षर आणि शब्द, वाक्य शिकवतात तर अहमद जमिनीच्या नोंदी कशा वाचायच्या ते शिकवतात. त्यांचं म्हणणं आहे की कैथी येऊनच नोंदी वाचता येणार नाहीत कारण त्यात उर्दू आणि फारसी शब्दही आहेत. त्यांनाही समजण्याची गरज आहे. तरच सर्वेचं काम गती पकडेल.
समस्तीपूर येथे 270 राजस्व अधिकाऱ्यांना शिकवताना कुमार सांगतात की कैथी ही अभिजनांची भाषा नव्हती. ती सामान्य लोकांची भाषा होती, त्यामुळे तिला जनलिपी म्हणतात. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी अनेक लोक कैथीवाचक होते. बिहारमधील मागचं मोठं जमीन सर्वेक्षण शंभर वर्षांपूर्वी झालं होतं. ते पूर्णपणे कैथीमध्ये होतं आणि त्यानंतर काही वर्ष या लिपीचा वापर होत राहिला. कैथीत व्याकरणाला फार महत्त्व नसतं. यात जोडाक्षरंही नसतात. पण तरीही फक्त आठ तासांच्या सत्रात ही लिपी शिकणं अवघड आहे यावर अनेक प्रशिक्षणार्थ्यांचं एकमत होतं.
एकानं नाव न सांगता म्हटलं, “अनेक वर्ष अभ्यास केल्यानंतर मला ही नोकरी मिळाली आणि आता वाटतंय की मी पुन्हा प्राथमिक शाळेत शिकतोय म्हणून. मला कधी वाटलं नव्हतं की इतकी जुनी लिपी मला शिकावी लागेल. आमच्या नेहमीच्या कामात हे आणखी एक काम वाढलंय.” तरीही कैथीपासून कोणी वाचू शकत नाही. बिहारमधील जवळपास प्रत्येक घरातले दस्तावेज कैथीतच लिहिलेले असतात. प्रशिक्षणार्थी आनंद कुमार सांगतात की, कैथी शिकणं एक मजेशीर आणि विलक्षण अनुभव आहे. यात असे दस्तावेज वाचायला मिळतात जे यापूर्वी कधीच वाचले गेले नव्हते.
भूमि सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर संपत्तीचे वाढलेले वाद सोडवण्यासाठी बिहार सरकारने कैथी प्रशिक्षण शिबीराचा घाट घातला. पटनाचे वरिष्ठ आयएएस अधिकारी जय सिंह यांनी ‘दी प्रिंट’ला सांगितलं, “सर्वेमुळे जमिनीशी निगडीत मुद्द्यांविषयी जागरूकता वाढली आहे, पण यात कैथीचा अडसर येत आहे. त्यामुळे सारा गोंधळ सुरू आहे. मात्र दीर्घकालीन विचार करता कैथीचं प्रशिक्षण आमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अभिलेख विभागाकडे कैथीशी संबंधीत साधनं असतील. सध्या अडचण ही आहे की जमीन हा संवेदनशील मुद्दा आहे. लोक इंचभर जमिनीसाठी मरायला-मारायला तयार होतात. पण एकदा या नोंदी ऑनलाईन झाल्यावर बहुतेक वाद संपुष्टात येऊ शकतील.” 
काय आहे कैथी लिपी?
कैथी फक्त जमिनीचे कागद नोंदवण्यासाठी नव्हती तर यातून लोकगीतं, मंदिर शिल्पलेख लिहिले गेले इतकंच नाहीतर बिहारमधील स्वातंत्र्य सैनिकांचीही ती भाषा होती. पण एकूणविसाव्या शतकाच्या मध्यास तिचं पतन सुरू झालं. तिच्याऐवजी देवनागरी लिपी वापरात आली. बिहार विधान परिषदेचे परियोजना अधिकारी आणि 2007 च्या ‘कैथी लिपी का इतिहास’ या पुस्तकाचे लेखक भैरवलाल दास म्हणतात, “कैथी बिहारी संस्कृतिची आत्मा होती. इतिहासात तिच्याविषयी बरंच काही लिहिलं गेलंय.
ही लिपी सहाव्या शतकात गुप्त साम्राज्याच्या विघटनकाळात विकसीत झाली होती. स्थानिक राजे उदयाला आले तेव्हा स्थानिक लिपीचा वापर वाढू लागला. यातूनच कैथी विकसीत झाली. मंदिरातील शिलालेख, लोकगीतं, भूमि अभिलेखातून याच्या नोंदी आढळतात. मगध, भोजपूर, तिरहूत, मिथिला भागात ही लिपी काहीशी बदलली. राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातही कैथीचे शिलालेख आढळतात.” पण यावर अधिक संशोधन होणं बाकी आहे.
बेगुसराय संग्रहालयाचे संचालक आणि ‘मिथिला भारती’ पत्रिकेचे संपादक शिवकुमार मिश्रा सांगतात की कोणाही पुरातत्वतज्ञाने याविषयी ठामपणे काही लिहिलेलं नाही आणि यावर सखोल संशोधनाची आवश्यकता आहे. तज्ञांचं याविषयी एकमत आहे की 16 व्या शतकातील शेर शाह सूरीचा शासनकाळ कैथीचं सुवर्ण युग होतं. तेव्हा ती दरबारी लिपी होती. शिक्यांवरही तिचा उपयोग व्हायचा. मुघल काळातही तिचा उपयोग सुरू राहिला. पण ब्रिटीश सत्ता आल्यानंतर तिचा वापर कमी झाला. स्वातंत्र्यानंतर ती गायबच झाली.
कैथी लिपी वाचू शकणारा एकही व्यक्ती सापडत नाही
प्रा. आलोक राय यांनी आपल्या ‘हिंदी नॅशनलिजम’ या पुस्तकात म्हटलंय, फक्त एक शतकापूर्वी कैथी लिपी देवनागरीपेक्षा जास्त प्रचलित व ओळखीची होती. पण आता कैथी लिपी वाचू शकणारा सामान्य माणूसच काय तज्ञ व्यक्तीही शोधूनही सापडणं कठीणच आहे. दास म्हणतात की, हे आपलं ऐतिहासिक आणि साहित्यिक नुकसान आहे. कैथीवर काम करताना त्यांना राजकुमार शुक्ल यांची डायरी मिळाली. यांनीच 1917 मध्ये गांधीजींना चंपारणमध्ये आणलं होतं. त्यानंतर गांधीजींनी इथला नीळ शेतकऱ्यांचा सत्याग्रह केला होता.
दास म्हणतात की, गांधीचे चरित्रकार लुई फिशर यांनी राजकुमार शुक्ल यांना निरक्षर म्हटलं होतं. पण शुक्ल यांना कैथी वाचता, लिहिता येत होती. गांधीजींनी स्वतःच 14 एप्रिल 1917 च्या आपल्या नोंदीत कैथीचा उल्लेख करत लिहिलंय की, मला हिंदी बोलता येत नाही. भोजपूरी मला समजत नाही. आणि कैथीत लिहिलेली कागदपत्रं वाचता येत नाहीत. दास सांगतात की, बिहर आणि उत्तर प्रदेश येथील अनेक गिरमिटीया मजूर मॉरीशस, त्रिनिदाद, सुरीनाम आणि फिजीसारख्या ठिकाणी जी पत्रं पाठवली होती ती कैथीत लिहिलेली होती. पण ही फक्त सामान्य लोकांची लिपी नव्हती. भारताचे प्रथम राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनीही आपल्या बायकोला याच लिपीत पत्रं लिहिली आहेत. प्रसिद्ध भोजपूरी नाटककार भिखारी ठाकूर यांनीही या लिपीचा उपयोग केला आहे.
एकीकडे भूमि सर्वेक्षणामुळे कैथी पुन्हा चर्चेत आली आहे तर दुसरीकडे दास यांच्यासारखे लोक अनेक वर्षांपासून कैथीला पुनर्जीवन देण्यासाठी शांतपणे काम करत आहेत. 2011 मध्ये दास यांनी बिहारमध्ये एक डझन कार्यशाळा आयोजित केल्या ज्यात 1500 हून जास्त लोकांना कैथीचं प्रशिक्षण देण्यात आलं. 2022 मध्ये त्यांनी भागलपूर येथे सात दिवसीय कार्यशाळा चालवली. त्यानंतर तिलका मांझी भागलपूर विश्वविद्यालयाच्या कुलगुरूंनी मैथिली विभागात कैथीचा सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचे निर्देश दिले होते. पहिल्या तुकडीत 22 विद्यार्थी होते. 2024 च्या तुकडीत 40 लोक आले.
यात जामिया मिलिया इस्लामियाचे पीएच.डी. अभ्यासक आणि स्थानिक वृत्तपत्राचे संपादकही होते. प्रीतम कुमार याच विश्ववविद्यालयात शिकवतात आणि अहमद त्यांचे विद्यार्थी आहेत. सुरूवातीला भूमि विभागाने दास आणि मिश्रा यांच्याशी प्रशिक्षणासाठी संपर्क केला होता. पण त्यांना आपल्या नोकरीमुळे वेळ देता येत नसल्याने त्यांनी कुमार आणि अहमद यांचं नाव सुचवलं. भागलपूर विश्वविद्यालय हे सध्या बिहारमधील कैथी शिकवणारं एकमेव ठिकाण आहे. सोबतच मुंगेर आणि पटणा विश्वविद्यालयातही कैथी अभ्यासक्रम सुरू करण्याची योजना आहे.
भागलपूर विश्वविद्यालयाचे मैथिली विभाग प्रमुख प्रा. रामसेवक सिंह सांगतात की, कैथीचे व्यावहारीक उपयोग आता समोर आले आहेत. ज्यांना कैथी वाचता यायची ते आता म्हातारे झाले आहेत. त्यामुळे नवीन लोकांना तयार करणं गरजेचं आहे. त्यामुळे या लिपीशी संबंधीत विवाद सोडवता येतील.
सगळ्या जमिनींच्या नोंदी कैथी भाषेत कशासाठी?
बिहार भूमि सर्वेक्षणामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयं, न्यायालयं आणि अभिलेखागारांमध्ये लोकांची गर्दी जमत आहे. सर्वजण जमिनीवरील आपला हक्क साबित करण्यासाठी उत्सुक आहेत. कैथी अनुवादकांचे अचानक ‘अच्छे दिन’ आले आहेत. त्यासाठी ते पैसेही वाजवून घेत आहेत. समस्तीपूर जिल्हा न्यायालय परिसरात 54 वर्षीय रोजंदार मजूर प्रेमचंद चौधरी त्यांच्या 5 बिघे जमिनीचे दस्तावेज वाचून घेण्यासाठी एका कैथी अनुवादकाच्या शोधात आहेत.
बिहार भूमि सर्वेक्षणामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयं, न्यायालयं आणि अभिलेखागारांमध्ये लोकांची गर्दी जमत आहे. सर्वजण जमिनीवरील आपला हक्क साबित करण्यासाठी उत्सुक आहेत. कैथी अनुवादकांचे अचानक ‘अच्छे दिन’ आले आहेत. त्यासाठी ते पैसेही वाजवून घेत आहेत. समस्तीपूर जिल्हा न्यायालय परिसरात 54 वर्षीय रोजंदार मजूर प्रेमचंद चौधरी त्यांच्या 5 बिघे जमिनीचे दस्तावेज वाचून घेण्यासाठी एका कैथी अनुवादकाच्या शोधात आहेत.
हे दस्तावेज त्यांच्या घरात एका पेटीत ठेवलेले होते. त्याची आठवणही त्यांना नव्हती. सर्वे सुरू झाल्यानंतर त्यांनी ते काढल्यावर त्यांना ते वाचता आले नाहीत. पण न्यायालयात फक्त दोनच अनुवादक आहेत आणि अतिव्यस्त आहेत. एक अनुवादक घरून काम करतात. दुसरे, इंद्रदेव प्रसाद यांनी चौधरींना पुढच्या महिन्याची वेळ दिली आहे. ते मागील 20 वर्षांपासून कैथी अनुवादक म्हणून काम करत आहेत. ते याआधी कधीच इतके कामात गुंतलेले नव्हते. ते सांगतात की, पूर्वी कैथी अनुवादक फक्त न्यायालयीन कामातच लागायचे. पण आता सर्वेमुळे अनुवादाची मागणी वाढली आहे. मी एकटा हे काम करू शकत नाही. मागणी वाढल्यामुळे अनुवादाचं शुल्कही वाढलं आहे.
न्यायालयीन परिसरात फोटोकॉपी दुकान चालवणारे अरविंद कुमार सांगतात की, कैथी अनुवादक आधी प्रती कागद 200-300 रुपये घ्यायचे. आता ते 1000-1500 रुपये आकारत आहेत. त्यामुळे काही लोकांनी ऑनलाईन कैथी शिकणं सुरू केलंय. युट्यूब ट्युटोरीयल मोठ्या संख्येने प्रदर्शित होत आहेत. अनुवादकांच्या मुलाखती सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण त्यामुळे मूळ प्रश्न सुटलेला नाही. जिल्हा अभिलेखागार अजूनही व्यस्त आहे. सर्वेच्या आधी दस्तावेजासाठी इथे आठवड्याला साधारण 400-500 अर्ज यायचे. त्यांची संख्या आता 2500-3000 इतकी वाढली आहे.
कामाच्या संथ गतीमुळे लोकांमधला असंतोष वाढतोय आणि विरोधी पक्ष सरकारवर सर्वेक्षणात अफरातफर आणि भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप करत आहेत. निवडणूक सर्वेक्षण तज्ञ ते पुढारी असा प्रवास केलेले प्रशांत कुमार यांनी ट्रीपल एसचा नारा दिलाय – शराबबंदी, सर्वेक्षण आणि स्मार्ट मीटर. त्यांना वाटतंय की भूमि सर्वेक्षण ही नितीश कुमार यांच्या राजकीय आयुष्याच्या अंताची सुरूवात आहे. दुसरीकडे राजस्व आणि भूमिसुधार मंत्री दिलीप अग्रवाल यांनी लोकांना न घाबरण्याविषयी आवाहन केलंय.
मागील महिन्यात सरकारने लोकांना आपले दस्तावेज तयार करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला होता. विभागाचे सचिव जय सिंह सांगतात की, जिल्हाधिकाऱ्यांना भ्रष्टाचार आणि फसवणूकीवर एक्शन घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारी कैथी प्रशिक्षण कार्यक्रमाकडे आता सारे एक चमत्कारी उपाय म्हणून बघत आहेत. समस्तीपूरचे बंदोबस्त अधिकारी दिनेश कुमार म्हणाले की, माहिती नसल्यामुळे खतियान (जमिनीच्या नोंदी) विषयी स्पष्टता नाही. कैथी ट्रेनिंगमुळे ही अडचण दूर होऊ शकते. पण भैरवलाल दास इशारा देत आहेत की, कैथीकडे केवळ जमिनीचे वाद सोडवण्याचं एक साधन म्हणून बघणं चुकीचं आहे.
ते म्हणतात, “लोक जर फक्त जमिनीचे कागद वाचण्यासाठीच कैथी शिकत असतील तर तो या लिपीवर अन्याय आहे. याच्या सांस्कृतिक पैलूकडेही आपण लक्ष द्यायला हवं. त्यातून इतिहासातील अनेक गोष्टी समजतील. इतिहासात कुठेही जा, तुम्हाला कैथी मिळेलच. जेव्हा एक लिपी मरते तेव्हा एक संस्कृतिही नष्ट होते, त्यामुळे कैथीचं जतन आवश्यक आहे.”
(सौजन्य - द प्रिंट)
अनुवाद - प्रतिक पुरी






