- दीपक अधिकारी
काचेच्या खिडकीवरील जोरदार धक्क्याचा आवाज ऐकताच कृष्ण बहादूर रसैलीची छाती धडधडायला लागली. त्यानं बाहेर येऊन पाहिलं की त्याचं धान्याचं कोठार उध्वस्त झालं आहे. हत्ती तिथं ठेवलेलं धान खात होते.
भारत-नेपाळच्या पूर्वी सीमेवरील मेची नदीच्या काठावरील बहुनडांगी गावात अशा गोष्टी नव्या नव्हत्या. जंगली हत्ती आपल्या नेहमीच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यावरून येता-जाता शेतावर हल्ला चढवायचे. पिकांचं नुकसान करायचे. रसैली व इतर लोक हत्तींना पिटाळून लावण्यासाठी ड्रम वाजवायचे, मशाली पेटवायचे.
8 डिसेंबर 2021 रोजी त्यांनी याच पद्धतीचा वापर करण्याचं ठरवलं. पण त्यांच्या घरच्यांना आठवलं की स्थानिक प्रचारकांनी त्यांनी हत्तींविषयी काय सांगितलं होतं. त्यांनी मग वेगळं काहीतरी केलं. हत्तींना पिटाळण्याऐवजी किंवा त्यांच्यावर हल्ला करण्याऐवजी ते घरातच बसले. हत्तींनी धान्य खाल्लं आणि निघून गेले.
रसैली म्हणतात, “आता आम्ही हत्तींना घाबरत नाही की त्यांच्यावर रागही धरत नाही. ते आले की आम्ही घराच्या आतच थांबतो. आम्ही त्यांना त्रास दिला नाही तर ते पुढे निघून जातात. आम्ही ओरडलो तर तेही बिथरतात.” 
पर्यावरणवादी म्हणतात की मनुष्य-हत्ती यांच्यातील संघर्षाचे केंद्र राहिलेल्या या गावातील ही नवी रणनीति शांतिपूर्ण मनुष्य-वन्यप्राणी सह-अस्तित्त्वाचे नवे प्रारुप बनले आहे. मागील दशकात शेतकऱ्यांनी अशी पिकं घेतली जी हत्तींना आवडत नव्हती. शिवाय सरकारी मदतीने त्यांनी हत्तींविषयीचा आपला दृष्टिकोनही बदलला.
हत्ती संशोधक व चितवन राष्ट्रीय उद्यानाचे माजी संरक्षक नरेंद्र मान बाबू प्रधान यांनी सांगितलं, “बहुनडांगीने सिद्ध केलंय की जंगली हत्तींसोबत सह-अस्तित्व शक्य आहे. यातून दिसतं की फक्त जागरूकता वाढवणं पुरेसं नाही. वन्य प्राण्यांच्या विषयी आम्हाला लोकांचा दृष्टीकोन बदलणंही गरजेचं आहे.”
संघर्षापासून सह-अस्तित्वापर्यंत…
नेपाळच्या दक्षिणी-पूर्वी मैदानातून हत्ती येणंजाणं करायचे. पूर्वीचे त्यांचे आकडे आता माहिती नाहीत. पण नदींच्या खोऱ्यात त्यांच्यासाठी मुबलक अन्न होतं आणि मानवी वस्ती नव्हती. त्यामुळे ते मुक्तपणे हिंडू शकायचे. पण मानवी वस्ती वाढत गेली, विकास होत गेला त्यामुळे त्यांच्या मुक्तपणावर बंधनं येत गेली. बहुनडांगी गावात 23 हजार लोक राहतात.
सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात हत्ती भारतातून नेपाळला जातात. जाताना शेतं मोडतात, घरं तोडतात, काही वेळेस लोकांवर हल्लाही करतात. प्रधान सांगतात, “हत्ती हे फिरस्ते असतात. दिवसाला ते कित्येक किलोमीटर चालून जातात. जंगलातून त्यांना खायला-प्यायला मिळतंय तोवर ते मानवी वस्तीत येत नाहीत. पण मानवी वस्ती आता वाढत आहे, जंगलभाग कमी होत आहे त्यामुळे अन्नासाठी ते शेतात, घरात शिरतात.”
ते जेव्हा येतात तेव्हा खूप नुकसान करतात. हत्तींना धान व मका जास्त आवडतो. त्यावरच शेतकरीही जगतात. त्यामुळे संघर्ष अटळ होता. केंद्र सरकारने विश्व बँकेच्या मदतीने 2015 मध्ये 18 किमी विजेचे कुंपण बसवले ज्यामुळे हत्ती व मानवी वस्ती-शेती यांच्यात अंतर राहील. पण हुशार हत्तींनी यावर लवकरच मात केली. संरक्षणवादी शंकर लुइटेल सांगतात की, हत्तींनी आपल्या दातांनी वरच्या तारा तोडल्या आणि कुंपण बेकार केले. तरीही यामुळे होणारे नुकसान कमी झाले होते. 
2018 च्या अभ्यासानुसार पिकांच्या हानीत 93 टक्के व संपत्तीच्या हानीत 96 टक्के घट झाली होती. पण हत्ती अजूनही येतजात होते त्यामुळे लोकांनीच यावर वेगळा विचार करणं सुरू केलं. 2009 मध्ये नेपाळ सरकारने वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानासाठी भरपाई देणं सुरू केलं. काळानुसार त्यात सुधारणा करण्यात आल्या. स्थानिक अधिकारी अर्जुन कार्की सांगतात, “पूर्वी हत्ती जेव्हा पिक नष्ट करायचे किंवा कोणाला मारायचे तेव्हा मदत मिळत नव्हती. आता काही प्रमाणात तरी घरच्यांना आर्थिक मदत मिळते त्यामुळे लोकांचा रोष कमी झाला आहे.”
पण केवळ आर्थिक मदतीने लोकांच्या मनातील हत्तींविषयीचा राग जाणार नव्हता. इथेच लुइटेल यांनी पुढाकार घेतला. प्रत्येकाला नुकसान भरपाई मिळावी हे त्यांनी निश्चित केलं. अशिक्षित शेतकऱ्यांसाठी त्यांनी सोपे फॉर्म तयार केले जे त्यांना समजतील. नुकसान भरपाईसाठी स्थानिक वॉर्ड कार्यालय किंवा पोलिसांची शिफारस घ्यावी लागते. कोणी मेलं असेल तर वन अधिकारी यावर निर्णय देतात. धान्याच्या नुकसानीसाठी जिल्हा कृषि कार्यालय निर्णय करतात.
हत्तींना जी पिकं आवडत नाहीत ती घ्यायला सुरूवात
लुइटेल सांगतात, “मी वर्षभरात 80 लोकांपर्यंत मदत पोहचवली आहे. यापैकी एक रसैली आहेत. “त्यांच्यावर आमचा विश्वास आहे की ते आम्हाला नुकसान भरपाई मिळवून देतील,” असं रसैली सांगतात. पण हत्ती येतच होते. शेती नष्ट होत होतीच. नुकसान भरपाई मिळायला वेळ लागायचा. त्यामुळे संघर्ष सुरूच राहिला.
शेतकऱ्यांना हत्तींसोबत संघर्ष न करता आपल्याला वाचवण्याचा उपाय शोधणं गरजेचं होतं. पिकांमधील बदल यात पहिलं पाऊल ठरलं. धान व मक्या ऐवजी शेतकऱ्यांनी चहा, लिंबू, तेजपत्ता अशी पिकं घ्यायला सुरूवात केली जी हत्तींना आवडत नाहीत. अर्जुन कार्की यांनी यासाठी शेतकऱ्यांना तयार केलं. धान उत्पादक शेतकरी आधी साशंक होते. पण त्यांनी चहा विकून आपल्या आवडीचे तांदूळ विकत घेतले. 
शेतकरी आधी सायकलवरून चहा विकायला न्यायचे. मग बैलगाडी व आता ट्रॅक्टरचा ते उपयोग करत आहेत. 65 वर्षीय दिवाकर नेउपाने यांना चहा उगवण्याविषयी आधी शंका होती. पण लवकरच त्यांना यातून फायदा मिळू लागला. ते म्हणतात, “आधी आम्हाला अडचणी आल्या. पण आता आम्हाला स्थिर उत्पन्न मिळतं. हत्ती आमचं पिक खातील ही चिंताही नाही.” शेतकरी या बदलाला तयार झाले कारण धानाला जास्त पाणी लागतं ते आता मिळत नव्हतं. शेतमजूरही मिळत नव्हते. हळूहळू बहुनडांगीच्या शेतकऱ्यांची शेतं हत्तींपासून सुरक्षित राहू लागली.
कार्की सांगतात की आता इथून 2.2 कोटी नेपाळी रुपयांचा चहा विकला जातो. तेजपत्ता व लिंबूच्या विक्रीतूनही शेतकऱ्यांना पैसे मिळतात. अशोक राम व त्यांच्या सहकाऱ्यांनी 2021 मध्ये केलेल्या संशोधनानुसार हत्तींच्या हल्ल्यात पुरुष जास्त बळी पडतात. त्यांचं शिक्षणही कमी असतं. जेव्हा लोक दारू पिऊन हत्तींचा पाठलाग करतात, फटाके उडवतात, मशाली लावतात तेव्हा ते जास्त बळी पडतात.
जंगलाजवळ राहणाऱ्या लोकांवर हल्ले जास्त होत होते. प्रधान सांगतात, “हत्तींना त्रास दिला जात नाही तोवर ते हल्ला करत नाहीत. त्यांच्याकडे दूर्लक्ष केलं तर ते आपल्या रस्त्याने चालत राहतात. पण लोक जर त्यांच्यामागे लागले, त्यांच्यावर हल्ले करू लागले तर हत्ती त्यांना लक्षात ठेवतात व त्यांच्यावर आक्रमण करतात.”
2022 मध्ये कार्की यांनी मेचीनगर नगरपालिकेत अध्यक्षपदाची निवडणूक लढवताना लोकांना हत्तींपासून वाचवण्याचं आश्वासन देत विजय मिळवला. वर्षभरापूर्वी त्यांनी कोशी प्रांताचे मुख्यमंत्री केदार कार्की यांना मनुष्य-हत्ती संघर्षाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी आपल्या भागात फिरायला बोलावलं होतं. शेतकऱ्यांनी हत्तींना न आवडणारी पिकं घ्यायला सुरूवात केल्यापासून हत्ती शेतीत फिरेनासे झाले.
…आता हत्ती पिकं उद्धवस्त करत नाहीत
आता तर इथल्या शेतकऱ्यांनी मधुमाशीपालनही सुरू केलं आहे. कारण त्या हत्तींना दूर ठेवतात. कार्की सांगतात, “आम्ही आता शेतकऱ्यांना मोहरीची शेती करण्यास सांगतोय. त्यामुळे मधमाशा येतात. यातूनच मधुमाशीपालनही सुरू झालं आहे.
यामुळे हत्तींपासून पिकं वाचत आहेत शिवाय शेतकऱ्यांना उत्पन्नाचं नवं साधनही मिळत आहे.” हत्तींवर नजर ठेवण्यासाठी एक गस्तीदलही तयार करण्यात आलं आहे, तात्कार प्रतिक्रिया दळ. यातील एक सदस्य सदाश पौडेल सांगतो, “काही लोक रात्री दारू पिऊन रस्त्यावर फिरत असतात. हत्ती त्यांच्यावर हल्ले करू शकतात. जेव्हा हत्ती येतात तेव्हा फक्त आम्हीच रस्त्यांवर पहारे ठेवतो.”
गैर-सरकारी संघटन-उज्यालो नेपाळ आणि काठमांडू स्थित आंतर-सरकारी विभाग, इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटीग्रेटेड माऊंटेन डेव्हलपमेंट यांच्याकडून प्रशिक्षित झालेले स्वयंसेवकच गस्तीदलात काम करतात. त्यांचा विमाही काढला जातो. पिकांच्या कापणीच्या वेळी, हत्ती गावात आल्यानंतर स्वयंसेवक आपलं काम सुरू करतात. याचे परिणामही दिसू लागले.
बुहनडांगीत हत्तींचा शेवटचा हल्ला 2015 मध्ये झाला होता ज्यात 65 वर्षीय मनहारी धुंगेल मारले गेले होते. त्यांची पत्नी माया सांगतात, “पोलिस हत्तींचा पाठलाग करत होते आणि लोकांना सावध करायला जोराचे आवाज करत होते. माझ्या नवऱ्याने थंडीपासून वाचण्यासाठी डोक्यावर टोपी गुंडाळली होती त्यामुळे त्यांना हे आवाज ऐकू आले नाहीत. हत्तींनी तोवर त्यांना ठार केलं होतं.” त्यानंतर सह-अस्तित्त्वाच्या धोरणामुळे हत्तींकडून एकाचीही हत्या झालेली नाही.
(सौजन्य - mongabay.com)
अनुवाद - प्रतिक पुरी






