उत्तर महाराष्ट्र-गुजरातच्या सीमा भागात राहणाऱ्या कलासक्त वारली आदिवासी लोकांच्या भाषेत Climate Change म्हणजे हवामान बदलासाठी कोणता शब्द आहे? नागावे, सोनावे आणि दारशेत या पालघर जिल्ह्याच्या सफाळे तालुक्यातील खेड्यांमध्ये एका ‘गाव संवाद’ कार्यक्रमांत हा प्रश्न उपस्थित झाला होता. वारली चित्रकला आणि तारपा नृत्यासाठी प्रसिद्ध असलेला हा वारली समुदाय धान शेती आणि वनउपज यावर जगतो.
हवामान बदल आणि त्याचे पर्यावरण आणि वातावरणीय बदलाशी असेलले संबंध याविषयी अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न झाल्यावर, 62 वर्षीय सुरेखा कारेळा यांना ‘युरेका युरेका’ म्हणायची संधी आली. “जेव्हा ‘जौळ’ पडते तेव्हा सगला खराब होते. शेतीला कीड पडते. भाजी करपून जाते,” कारेळा म्हणतात. हवामान बदलांचा त्यांच्या भवतालातील गोष्टींशी त्या संबंध जोडतात ज्याचा वारलींच्या रोजच्या जगण्याशी संबंध येतो. त्यांच्यानंतर शांताराम महाद्या घटाळ देखील म्हणतात, “जेव्हा ‘जौळ’ पडते, तेव्हा आम्ही बाहेर जात नाही, लहान पोरांना पण पाठवत नाही.”

“जेव्हा ‘जौळ’ पडते तेव्हा सगला खराब होते’’
महिला लोकप्रतिनिधींची सक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने, ‘असर’ ही सामाजिक संघटना जी हवामान बदलावर काम करते आणि ‘रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट’ या संस्थेने एकत्र येऊन राबवलेल्या गाव संवादातील उपक्रमात गावकरी हवामान बदलाचा संबंध अतिउष्णता व कोरडेपणाच्या लाटेशी जोडून बघत होते ज्यामुळे लोक आजारी पडतात आणि पिकं नष्ट होतात. वृद्ध गावकरी अशा विषम वातावरणाला ‘जौळ’ म्हणून संबोधतात.
हवामान बदलासाठी वारली भाषेत कोणताही योग्य अथवा पर्यायी शब्द नाही. पण तरीही वारली जमातीला हवामान बदलाचे परिणाम माहिती आहेत, त्याचा अनुभव त्यांनी निसर्गातील बदलांमधून अनुभवला आहे. पूर्वी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या शेवटास, मान्सून संपत असताना ‘जौळ’ येत होता. ज्याला आपण शहरी लोक, ‘ऑक्टोबर हीट’ म्हणून संबोधतो. पण हे अती कोरड्या हवामानाचे दिवस आता नोव्हेंबरमध्येही येऊ लागले आहेत. हिवाळा कमी होत आहे, तापमानात गारठा नसतो, पाऊस कधीही पडतो, त्यामुळे बोर वर्गीय फळांच्या अनेक जाती, औषधी वनस्पती, लाकूड यात नष्ट होत आहे.
असर आणि RSCD चा गाव संवाद…
वारली आणि कातकरी आदिवासी ज्या कारवी बांबूचा वापर करून झोपड्या उभारतात तो ही आता दुर्मिळ होऊ लागला आहे, असं गावकरी सांगतात. गाव संवादातून वारली आदिवासी त्यांच्या रोजच्या जगण्याचे जे अनुभव सांगतात, त्यांतून जे शब्द मिळतात त्यांची नोंद आता हवामान बदलावरील एका शब्दकोशात केली जात आहे. महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण भागांत राहणाऱ्या अशा अनेक समुहांच्या दैनंदिन वापरातील हवामान बदल दर्शवणारे शब्द यात संग्रहीत केले जात आहेत.
मुंबईत बसून हवामान बदलावर धोरणं तयार करणारे लोक आणि हवामान बदलाचा प्रत्यक्ष अनुभव घेणारे परीघावरील समुदाय यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या शब्दकोशात लोकांच्या रोजच्या वापरातील अनेक शब्द जसे हवामान, वारापोई, पर्यावरण, गेडा, गुत्ता, दुष्काळ, भूम मुदादा, पेरणी, पेरेराच, जेवळ, कुंदा तागणे, वन उत्पन्न, जंगलोई माल इत्यादींचा या तयार होत असलेल्या शब्दकोशात समावेश करण्यात येत आहे.

बोली भाषांचा हवामान बदलविषयक शब्दकोश
पर्यावरण आणि हवामान बदलाविषयी वारली, माडीया, भिल आदिवासी जे शब्द वापरतात ते शालेय पुस्तकात तसेच सरकारी दस्तावेजांमध्ये दिसत नाहीत. पण आता या शब्दांना जे गाव संवादादरम्यान ठळकपणे बाहेर आले आहेत त्यांना या हवामान बदलविषयक शब्दकोशात जागा दिली जात आहे. असर संस्थेच्या संचालक, (लिंग आणि हवामान) नेहा सैगल सांगतात, “हवामान बदलावर धोरणकर्त्यांमध्ये जेव्हा चर्चा होते त्यात या जमिनीवरील शब्दांना कोणतंही स्थान नसतं.
हवामान अहवाल हे लिंगभेद लक्षात घेत नाहीत आणि त्यातून स्त्रिया तसेच परीघावरील समुह नेहमीच वगळले जातात असं त्या सांगतात. हवामान आणि हवामान बदलाची भाषा आणि अनुभव हे पाश्चात्य नजरेतून आलेले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल शब्दकोशातही परीघावरील समुहांच्या जगण्यातील हवामान बदलाविषयीचे शब्द समाविष्ट करण्यात आलेले नाहीत. आपल्या रोजच्या जगण्यात जमिनीवर हवामान बदलाचे संकट अनुभवणाऱ्या स्त्रियांच्या अनुभवांनाही यात स्थान देण्यात आले नाही.
पण आमच्या या नवीन उपक्रमांत, आम्ही जवळपास ५ हजार गाव संवादातून एकत्र केलेले काही निवडक शब्द जमा केले आहेत ज्यामुळे सरकारी धोरणकर्त्यांना तसेच सार्वजनिक क्षेत्रातील लोकांना आपली धोरणं तयार करताना जमिनीवरील वास्तविकता त्यात प्रतिबिंबीत करता येईल.”
या भाषिक उपक्रमांत आठ मुद्द्यांवरील गावकऱ्यांचे अनुभव जमा केले आहेत. ज्यात पाणी, जंगल, जमीन, जैववैविध्य, प्राणी, उर्जा, गावजत्रा, वारसा आणि अपघात यांचा समावेश होतो. असर संस्थेच्या अंकीता भातखंडे सांगतात की, या मुद्द्यांमधून गावकरी हवामान बदलाविषयी सहजपणे बोलू शकतात. विशेषतः वृद्ध गावकरी, वाढती उष्णता, अवकाळी पाऊस, प्राणी आणि वनस्पती यांची घटती संख्या याविषयी त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून मोठी माहिती देतात.
महाराष्ट्र शब्दकोशात हवामान बदलाचे परिणामही नोंदलेले आहेत. महाराष्ट्राच्या कोंकण, विदर्भ, मराठवाडा आणि नाशिक विभागातील दहा जिल्ह्यातील 250 खेड्यांमधील स्त्री, पुरुष, तरुण, मुलं, आदिवासी समुदाय यांच्याशी केलेला संवाद यात आहे. 50 प्रशिक्षक आणि पर्यावरण सखी यांच्या सहाय्याने गावकऱ्यांचे स्थानिक अनुभव, दृष्टिकोन, हवामान बदलाविषयीचे त्यांचे पारिभाषिक शब्द यांचा संग्रह यात केला गेला आहे.

पाणीटंचाईवर बोलताना बायका सांगतात, “डोक्यावर हंडा, धोक्याची घंटा!”
पालघर आणि नंदुरबार या आदिवासी भागांमध्ये वनउपज आणि पारंपरिक जीवनशैली यात घट होत गेली तशी त्यांचं रिटेल मार्केटवरील अवलंबित्व वाढू लागलं आहे. गडचिरोलीमध्ये गावकरी सांगतात की, जमिनीची धूप होत आहे, पाऊस कधीही पडतो, विकासाची कामं होत नाहीत. वारंवार येणाऱ्या पाण्याच्या कमतरतेविषयी बोलताना नागपूरच्या बायका सांगतात, “डोक्यावर हंडा, धोक्याची घंटा!” मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील बायकांनी तिथल्या चिघळत्या हवामान परिस्थितीची, नष्ट होणाऱ्या तलावांची, विहिरींची, आणि उसाच्या भरमसाठ पाण्यावर होणाऱ्या लागवडीची चिंता व्यक्त केली ज्यामुळे भूजल पातळी कमी होत आहे आणि जमिनीचा कसही.
डबघाईला आलेली शेती, पाण्याची कमतरता आणि अनिश्चित हवामानाविषयी या सर्वच लोकांनी चिंता व्यक्त केली ज्यामुळे त्यांना स्थलांतर करण्याची पाळी येते. या लहरी हवामानामुळे गावजत्राही प्रभावित झाल्या आहेत, ज्या पारंपरिक पद्धतीने पेरणी आणि कापणीच्या हंगामात भरवल्या जायच्या.
हवामान बदलांचा सांस्कृतिक प्रभाव नेहा सैगल यांना फार त्रासदायक वाटला आणि हा असा मुद्दा होता जो कोणत्याही चर्चेत चर्चिला जात नाही. त्या सांगतात, “जेव्हा आम्ही पाहिलं की अनेक गावकरी गावजत्रा, रितीरिवाज, वन उत्पादनांशी जोडलेल्या परंपरा याविषयी सांगत आहेत तेव्हा आमच्या लक्षात आलं की हवामान बदलामुळे त्यांची संस्कृतीही प्रभावित होत आहे. काही समुहांची तर संपूर्ण संस्कृतीच यामुळे बदलत आहे. त्यामुळे ते आपल्या पारंपरिक सणउत्सवाच्या तारखाही बदलू लागले आहेत. हे फारच धक्कादायक होतं.”
हवामान विषयक धोरण तयार करताना बोली भाषांचा शब्दकोष महत्वाचा ठरेल
पालघर जिल्ह्यात पर्यावरण सखी उज्ज्वला जाधव आणि प्रशिक्षक तृप्ती पाटील यांनी वारली लोकांच्या खाण्यापिण्यामध्येही बदल होत असलेले पाहिले आहेत. दिवाळीत वारली लोक चायची पान म्हणजेच गवती चहात वाफवलेली काकडीची गोड भाकरी तयार करतात. पावसाळ्यात वारली लोक जलसमृद्ध भाज्या खाणं टाळतात. मान्सून ओसरला की ते या भाज्या खाऊ लागतात. सोनावे गावातील यमुना गोविंद धोधाडी सांगतात, “पूर्वी आम्ही जंगलात जायचो गवताची पाती शोधायला पण आता ती फारशी मिळत नाहीत.
मग आम्ही रुई चाई पान वापरून भाकरी करू लागलो पण त्याला ती चव येत नाही.” हवामान बदल, शहरीकरण आणि वन उपज कमी होत असल्यामुळे वारलींचं खाणपाण आणि जीवनशैलीही बदलत आहे. गाव संवादातून याविषयीची जी काही माहिती मिळाली आहे ती एका हस्तपुस्तिकेत संकलित केली जाणार आहे, जी महाराष्ट्र सरकारला सोपवण्यात येईल.

सैगल सांगतात, आमचा उद्देश आहे की धोरणकर्त्यांना हवामान विषयक धोरणं आणि बजेट तयार करताना ते स्थानिक गरजांशी जोडून घेता यावा. हा सर्व डाटा जैववैविध्य समित्या सशक्त करण्यासाठी, सरकारी यंत्रणांना प्रशिक्षित करण्यासाठी तसेच स्थानिक पर्यावरण सखींसोबत हवामान-विषयक उपक्रम राबवण्यासाठी वापरण्यात येईल.
हवामान बदल मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यामुळे उज्ज्वला जाधव म्हणतात की, याचा परिणाम होत असलेल्या वारली आदिवासींसारख्या समुहांना भविष्यातील या बदलांशी सामना करण्यासाठी प्रशिक्षित करावं लागेल. जाधव आणि पाटील या लाजाळू आणि शहरी भागातून आलेल्या लोकांशी संवाद साधण्यास तयार नसलेल्या आदिवासींसोबत तासनतास भेटून, बोलून ही माहिती गोळा करत आहेत. यातून त्यांना आता जवळपास नष्ट झालेला पारंपरिक ज्ञानाचा खजिना, नैसर्गिक साधनं, परंपरा, प्रथा, यांची माहिती मिळत आहे, त्याचं महत्त्वही कळत आहे, ज्याचा भविष्यासाठी उपयोग होईल.
जाधव सांगतात, “वारलींचं जगणं निसर्गावर अवलंबून आहे आणि त्यांच्यासारख्या समुदायांना हवामान बदलाचा सर्वांच्या आधी व थेट फटका बसत आहे. नव्या आणि नष्ट होणाऱ्या जुन्या जगाला जोडणारा ते अखेरचा दुवा आहेत. त्यांच्याकडून आम्ही निसर्गाविषयी जाणून घेत आहोत जेणेकरून कशाचं संवर्धन करायला प्राधान्य द्यायचं हे आम्हाला समजेल.”
(साभार - आऊटलुक जुलै 2024)
(अनुवाद - प्रतिक पुरी)






