- अंतरा बरुआ
55 वर्षीय कौशल्या देवी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी रामजी जयमल यांनी चांगला व्हिडीयो तयार करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना थोडं दूर केलं. पण ही चिता केवळ प्रदर्शनासाठी होती. त्यांचे खरे अंत्यसंस्कार दुसरीकडेच होणार होते. हरियाणातील सिरसा जिल्हयातील मलेवाला गावात जयमल यांनी पर्यावरणपुरक अंत्यसंस्कारांची प्रथा सुरू केली आहे. कौशल्या देवी यांचे शरीर अशाच एका हरित शवदाहिनीत नंतर जाळण्यात आले. त्यांनी घराघरात जाऊन लाकडं जाळण्यानं होणाऱ्या प्रदूषणाविषयी सांगितलं.
आयुर्वेदीक डॉक्टर आणि पर्यावरणतज्ञ असलेले जयमल यांच्यावर ‘एगिस’ या संस्थेने ‘बिफोर आय डाय’ या नावाचा लघुपटही तयार केला आहे. हरियाणा व पंजाबमध्ये सध्या हरित अंत्यसंस्कारांची प्रथा सुरू झाली आहे. लाकडांची वाढती किंमत, प्रदूषणाची चिंता यामुळे याचा प्रसार वाढत चालला आहे. ‘देहरादूनच्या फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या संशोधनानुसार एका पारंपरिक अंत्यसंस्कारासाठी 500 ते 600 किलो लाकडे जाळली जातात. जयमल यांनी तयार केलेल्या ग्रामीण स्मशानगृहात केवळ 60 किलो लाकडं लागतात. 
मृत्युला पर्यावरण अनुकूल बनवण्याचा एक स्तुत्य उपक्रम
मृत्युला पर्यावरण अनुकूल बनवण्याच्या व्यापक प्रयत्नांचा हा एक हिस्सा आहे. दिल्लीत आता 21 सीएनजी व विद्युत शवदाहिन्या आहेत. 9 टक्के अंत्यसंस्कार हरित पद्धतीने होत आहेत. वाराणसी इथेही मणिकर्णिका घाटावर 18 हरित चिता तयार करण्याची योजना आहे. पण ग्रामीण पंजाब व हरियाणा यात पुढे आहेत, जिथे मागील दशकात 300 हून जास्त हरित स्मशानगृह तयार झाली आहेत. जयमल यांच्या सिरसा जिल्ह्यात प्रत्येक गावात एक असे स्मशान आहे. पंजाबमध्ये जाटांनी आधी हरित चितेचा उपयोग करणं सुरू केलं. मग इतर समाजही त्यात उतरले.
कौशल्या देवी यांचे जावई गुरदेव सिंह सांगतात की, लाकडं महाग झाल्यामुळे आता सारे याच पद्धतीने अंत्यसंस्कार करत आहेत. जयमल यांच्यासोबत एका एनजीओत काम करणारे माजी मुख्य सचिव गुलाटी सांगतात की हरियाणात जंगलांच्या बाहेर 4.1 कोटी झाडं आहेत आणि इथली लोकसंख्या आहे 3.1 कोटी. म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला दीड झाडं येतात. त्यांचा वापर झाला तर काहीच शिल्लक राहणार नाही.
जयमल यांना सध्या परिसरात सेलिब्रिटीसारखा मान आहे. त्यांच्यामुळे अनेक घरांचा अंत्यसंस्काराचा खर्च वाचलाय आणि प्रदूषणातही भर पडली नाही, लाकडाचीही बचत झाली. जयमल हे शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत. देशभरात झाडं लावण्यासाठी त्यांना ‘फुलवाले’ म्हणून ओळखतात. त्यांनी आपल्या शिष्यांचा एक समूह तयार केला. यातील एक आहेत नेजादेला कलां गावाचे इकबाल सिंह ज्यांनी हरित शवदाहिनीची जबाबदारी स्विकारली आहे. त्यांच्या कामामुळे एरव्ही त्यांना समाजात मान मिळणं कठीण असतं पण आता तसं नाही. 
अजूनही उघड्यावर अंत्यसंस्कार
“मी रोज दुसऱ्या दिवशी शवदाहिनीची स्वच्छता करतो जेणेकरून तिथं कोणतंही हाड शिल्लक राहू नये,” ते सहजपणे सांगतात, “मी बाकीच्या लोकांनाही सांगतो की त्यांनी पण इथं यावं. हीच आमची बंधूभावाची व्यवस्था आहे.” त्यांच्या म्हणण्यानुसार गावातील ४० टक्के लोक आता हरित शवदाहिनीचा उपयोग करत आहेत. याचे फायदे बघून अनेक लोक याकडे वळत आहेत. अजूनही लोक शेतात उघड्यावर अंत्यसंस्कार करतात पण त्यामुळे उन्हाळ्यात आग लागण्याचा धोका असतो. पंचायतीकडून तेव्हा आग विझवण्याची गाडी उभी असते. पण सरपंच होशियार सिंह म्हणतात की, एकाहून जास्त अंत्यसंस्कार असल्यास ते काही लोकांना शहरात अंत्यसंस्कार करण्यासाठी पाठवतात.
कारण उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आगीचा धोका कायम असतो. इकबाल सिंह सांगतात की आम्ही प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टीने बघतो. तुम्ही जीवंत असाल तर प्रार्थना करा. मेल्यावर नको, ते सांगतात. जयमल सांगतात की पंजाबी संस्कृतीतच ही विचारसरणी रुजलेली आहे. आम्ही विचार करतो, आम्ही वैज्ञानिक समाज आहोत. आमच्या आंतरराष्ट्रीय विचारांसाठी आमची ओळख आहे, आमच्याकडे खरं व खोट्याची समज आहे, ते सांगतात.
पण सारेच यासाठी तयार नाहीत. नेजादेला कलां गावात प्रजापति जातीचे लोकही राहतात. त्यांना या हरित अंत्यसंस्काराविषयी अढी आहे. या समाजाचे मदन सांगतात की, आम्ही आता जरी काही करत नसलो तरीही मी सर्वांना सांगतोय की आपल्याला बदल करणं गरजेचं का आहे म्हणून. कदाचित पुढची पिढी याकडे वळू लागेल. 
…आणि अशाप्रकारे हरित शवदाहिनीची कल्पना सुचली
सिरसामध्ये जयमल सोशल मीडियापेक्षा जमिनीवर जास्त लोकप्रिय आहेत. अनेक वर्षं त्यांनी जमीन आणि राख यांच्यासोबत काम केलं आहे. त्यांच्या या कामासाठी मिळालेल्या पुरस्कारांनी त्यांच्या घरात गर्दी केली आहे. 2022 मध्ये त्यांना असम रायफल्स कडून ‘गुड सिटीझन अवॉर्ड’ मिळाला. असम रायफल्स व डोगरा रेजिमेंटने पुरवलेल्या जमिनीवर ते नर्सरी चालवण्यासाठी मदत करतात. तिथली फुलं सैन्यात वापरली जातात. जयमल शेतकरी कुटुंबातले आहेत.
जो माणूस जमिनीशी जोडलेला असतो तो स्वाभाविकपणेच पर्यावरणाला समर्पित असतो. ते आमच्या रक्तातच असतं, ते सांगतात. पण हा वारसा रक्तात असला तरी मागील दोन दशकात त्यांनी त्याला योग्य दिशा दिली. अंत्यसंस्कारात लाकडांचा उपयोग कमी व्हावा म्हणून ते प्रयत्न करत होते. फरीदाबाद येथे त्यांनी एका मित्राच्या फॅक्टरीत अग्निरोधक विटांच्या भट्टीत लोखंड वितळण्याचे दृश्य पाहिले आणि त्यांचा शोध थांबला. याच पद्धतीने प्रेत जाळता येईल असं त्यांना वाटलं.
यातून लाकडं वाचू शकतील हे मला तेव्हाच जाणवलं, ते सांगतात. त्यानंतर त्यांनी यावर अधिक संशोधन सुरू केलं. दिल्लीच्या अशोक हॉटेलमध्य जाऊन तिथले तंदूर आणि ओवन यांची तपासणी केली. त्यानंतर त्यांनी मानवी आकाराच्या शवदाहिनींचा आराखडा तयार केला. आधी डर्बी गावातले लोक साशंक होते. पण जयमल यांनी घराघरात जाऊन लोकांची समजूत काढली. मग काही लोक तयार झाले.
यातून लाकडं वाचू शकतील हे मला तेव्हाच जाणवलं, ते सांगतात. त्यानंतर त्यांनी यावर अधिक संशोधन सुरू केलं. दिल्लीच्या अशोक हॉटेलमध्य जाऊन तिथले तंदूर आणि ओवन यांची तपासणी केली. त्यानंतर त्यांनी मानवी आकाराच्या शवदाहिनींचा आराखडा तयार केला. आधी डर्बी गावातले लोक साशंक होते. पण जयमल यांनी घराघरात जाऊन लोकांची समजूत काढली. मग काही लोक तयार झाले.
यातून लाकडं वाचू शकतील हे मला तेव्हाच जाणवलं, ते सांगतात. त्यानंतर त्यांनी यावर अधिक संशोधन सुरू केलं. दिल्लीच्या अशोक हॉटेलमध्य जाऊन तिथले तंदूर आणि ओवन यांची तपासणी केली. त्यानंतर त्यांनी मानवी आकाराच्या शवदाहिनींचा आराखडा तयार केला. आधी डर्बी गावातले लोक साशंक होते. पण जयमल यांनी घराघरात जाऊन लोकांची समजूत काढली. मग काही लोक तयार झाले.
दोन वर्षांनी गावकऱ्यांनीच वर्गणी काढून दोन हरित शवदाहिन्या बांधल्या. सुरूवात झाली ती जयमल यांच्या आजोबांचे एक मित्र आणि गावातील प्रतिष्ठीत माजी सरपंच यांच्या अंत्यसंस्कारापासून. त्यानंतर इतरांनाही यातून प्रेरणा मिळाली. आपलं काम वाढवण्यासाठी जयमल हरियाणाचे माजी अतिरीक्त मुख्य सचिव सुनील गुलाटी यांच्या ‘आपसी’ या एनजीओ सोबत काम करत आहेत. ते त्यांना मदतनिधी आणि व्यवस्थेतील अडचणी सोडवण्यात मदत करतात.
गुलाटी म्हणतात, “जयमल है नैतिकदृष्ट्या कटीबद्ध आहेत. त्यांच्यात काम करण्याची अपार क्षमता आहे. अशा माणसाला मदत करायची नाही तर कोणाला करायची? सिरसामध्ये लोकांना समजलंय की इथं झाडं कमी आहेत. हा त्यांच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न आहे. प्रशासनाला काही फर्क पडत नाही. असं वाटतं की जसे ते अमर आहेत.”
हरित अंत्यसंस्कारात वायू प्रदूषणाचे प्रमाण अत्यल्प
जयमल यांना अंत्यसंस्कार अधिक हरित करायचे आहेत. पण ते आता थकले आहेत आणि त्यांच्यासमोर प्रशासनाचा ढिम्मपणा, पंचायतचा हस्तक्षेप किंवा सरकारी उदासीनता ही मोठी आव्हाने नाही आहेत- तर वेळ आहे. ते दुःखाने सांगतात की मी आता साठ वर्षांचा झालोय. मी एकटाच आहे. मी काय काय करणार? पण सिरसामध्ये आता बदलाची हवा वाहत आहे. अलिकडेच ‘देहरादुनच्या फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट’ने सिरसामधील तीन गावांचा दौरा करून हरित शवदाहिन्या कशा काम करतात याचा अभ्यास केला.
त्यांच्या अहवालात म्हटलंय की, हरित अंत्यसंस्कारात वायू प्रदूषण कमी होते, राख कमी निघते तसेच मिथेनचं उत्सर्जनही कमी असते. धूर कमी निघतो आणि एकूणातच झाडांची कापणी यातून वाचेल. पारंपरिक अंत्यसंस्कारातून मोठं प्रदूषण होतं. 2016 च्या आयआयटी कानपूर यांच्या अभ्यासानुसार, दिल्लीतील ४ टक्के कॉर्बन मोनोक्साईडच्या उत्सर्जनासाठी अंत्यसंस्कार जबाबदार असतात. भारतात दरवर्षी 110 लाख लोक मरतात. 2022 मध्ये दिल्लीतच 1.28 लाख लोक मेले होते.
देशात वर्षाला 5-6 कोटी झाडं जाळली जातात ज्यातून आठ दशलक्ष टन ग्रीनहाऊस गॅसेस बाहेर पडतात. सिरसाची ही हरित शवदाहिनी पूर्णपणे निर्दोष नाही. काही वेळेस बंद दरवाजातून धूर बाहेर येतो. जयमल म्हणतात की थंडीच्या दिवसात हवेत ओल असते त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त लाकडं जळणासाठी लागतात. एरव्ही धुर येत नाही असा त्यांचा दावा होता.
लाकडांचा उपयोग न करता शेणाचा वापर करण्याची योजना
यापुढे त्यांना लाकडांचा उपयोग न करता त्या जागी शेणाच्या कांड्या वापरायच्या आहेत. त्यांना एका अमेरिकी कंपनीकडून मदत मिळाली आहेत. त्यातून त्यांनी आपल्या 48 एकर शेतात दोन यंत्रणा उभारल्या आहेत ज्यात शेणातील घाण काढली जाते व राहिलेल्या भागाचे कांड्यात रुपांतर होते. या वाळलेल्या कांड्यातून सीएनजी प्रमाणेच निळी ज्योत निघते. सध्या जयमल त्यांच्या घरच्या म्हशींच्या शेणाचा वापर करत आहे. पण लवकरच स्थानिक गोशाळेतील शेण ते वापरणार आहेत.
जयमल सध्या गावातील पुढच्या मृत्युची वाट बघत आहेत ज्यात या नव्या पद्धतीचा उपयोग करता येईल. लोकांचा माझ्यावर विश्वास आहे, ते ही पद्धती नक्कीच वापरतील, जयमल सांगतात. पण जयमल यांना आता प्राण्यांसाठीही अशा शवदाहिन्या तयार करायच्या आहेत ज्यामुळे रस्त्यावर सडणाऱ्या प्रेतांची समस्या सोडवता येईल. त्यांचा सौंदर्यीकरणावरही विश्वास आहे. त्यांनी एका स्थानिक शाळेजवळील रस्त्याचे फोटो दाखवले ज्यावर आता फुलांची झाडे लावली आहेत. आधी ती नव्हती.
मात्र त्यांना आपल्या आजवरच्या यशासाठी अनेक बलिदानं द्यावी लागली आहेत. त्याचा थेट परिणाम त्यांच्या बायकोवर जास्त पडला आहे. “तिला वाटलं की तिचं लग्न एका डॉक्टरशी झालं आहे. पण तो समाजसेवक निघाला. ती दिवसभर शेतात काम करते. त्यामुळे तिचे हातावर घट्टे पडले आहेत. ती आपल्या माहेरी जाते तेव्हा त्यांना त्याचं नवल वाटतं,” जयमल हसत सांगतात.
त्यांची 95 वर्षीय आई त्यांच्यासोबत बसून त्यांच्याकडे प्रेमानं बघते आहे. त्यांची आई मृत्युच्या दारात आहे पण त्यांच्या इच्छा साध्या आहेत. “तो आपल्या समाजाच्या सेवेत खूप वेळ देतो. त्याला आपल्या घरासाठीही वेळ द्यायला पाहिजे,” त्या सांगतात. पण एका आईचं प्रेम हे बिनशर्त असतं आणि ते नेहमीच माफ करतं. त्यांच्या लाडक्या मुलानं त्यांनाही आपल्या या मिशनमध्ये सामिल केलं आहे. “तिनं मला आधीच परवानगी दिली आहे. तिचे अंत्यसंस्कार हरित शवदाहिनीतच होणार आहेत,” जयमल गर्वाने सांगतात.
(सौजन्य - द प्रिंट)
अनुवाद - प्रतिक पुरी






