हैदराबादचा निवासी असलेला सॉफ्टवेअर इंजिनियर, खालिद सैफुल्लाह यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतात, मुस्लिमांच्या प्रत्येक अडचणीवर तांत्रिक उपाय आहे. ‘एनआरसी’ला हरवण्यापासून ते मतदार यादीत नावं नसलेल्या मुस्लिम मतदात्यांची ओळख करण्यापर्यंत, तसंच ‘तीन तलाकवर बंदी’ आणण्याला विरोध करणाऱ्यांपर्यंत जवळपास प्रत्येक ज्वलंत प्रश्नावर या 45 वर्षीय माणसाने एक ॲप तयार केले आहे.
सैफुल्लाह सांगतात, “शेकडो वर्ष जुन्या पद्धतीने आजच्या प्रश्नांवर उत्तरं शोधता येऊ शकत नाहीत. मी लोकांना पटवून देतो की तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही तुमची लढाई स्वतःच लढू शकता.” ते स्वतःला ‘वन मॅन टेक्नोलॉजी मुव्हमेंट’ म्हणवतात. ते सह्यांची मोहिम सुरू करतात, मुस्लिमांना सरकारी योजनांसोबत जोडून घेतात, भारतीय स्वातंत्र्य संग्रामात मुस्लिमांच्या योगदानावर प्रकाश टाकतात. ते एक डिजीटल फिनिक्स आहेत. राजकारण बदलताच, नवे वाद येताच, ते जुन्या ॲपमधून नवीन ॲप तयार करतात. त्यांनी आजपर्यंत 20 संकेतस्थळं आणि ॲप्स तयार केले आहेत. शाहीन बाग ॲप, फ्री राशन ॲप, मेरा लीडर ॲप तसेच आतासाठी उपयुक्त असं मिसिंग वोटर्स ॲप, ज्यात लोकांना घरातील सदस्य, विधानसभा क्षेत्र, पत्ता इत्यादी माहिती अपलोड करता येते, नोंदणी नसलेल्या मतांची ओळख करता येते आणि नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज करता येतो.

खालिद सैफुल्लाहच्या अनेक ॲप्सचा मुस्लिमांना फायदा
मतदार यादीत आपलं नाव यावं म्हणून लोक त्यांच्याकडे फोन करत असतात. पण प्रत्येकाची अशी नोंदणी करणं किंवा त्यांचं नाव आधीच मतदार यादीत आहे की नाही हे तपासणं एका माणसाच्या शक्तीबाहेरचं काम आहे. त्यामुळे ते आता हे वोटिंग ॲप, एनजीओशी किंवा लोकांच्या व्यासपीठांशी जोडण्याच्या प्रयत्नात आहेत. ज्यांची नावं मतदार यादीत नाही किंवा ज्यांना नव्यानं ती टाकायची आहेत त्यांच्यासाठी हा ॲप आहे. 2019 ते 2021 मध्ये जवळपास 1.18 लाख लोकांनी मतदार ओळख पत्रासाठी त्यांच्याकडे अर्ज केले होते. त्याआधी नियमपालन न केल्यामुळे मिसिंग वोटर्स ॲप गुगल प्लेस्टोरवरून काढण्यात आलं होतं. 2019 च्या निवडणूकीत हे ॲप ट्रेंडिंग ॲप म्हणून प्रसिद्ध झालं होतं. एंड्राईडवर 80 हजार आणि आयओएसवर 5 हजार लोकांनी ते डाऊनलोड केलं. ज्यामुळे 40 हजार लोकांना मतदार यादीत आपलं नाव नोंदवता आलं, असं सैफुल्लाह सांगतात. त्यांना ते पुन्हा सुरू करायचंय. कारण नोंदणी झालेल्या लोकांची संख्या फारच कमी आहे. मागच्या निवडणूकीत उत्तराखंड मध्येच 2 लाख मतदार गायब झाले होते आणि पूर्ण भारतात त्यांची संख्या 30 कोटी होती. यात शहरी भागातील लोक, तरुण मतदार, प्रवासी, महिला आणि मुस्लिमांचा समावेश होता. त्यामुळेच सैफुल्लाह नुक्तेच ‘भारत जोडो अभियाना’च्या लोकांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते, जो ‘घटनात्मक मूल्ये आणि लोकशाही संस्थांचं रक्षण आणि प्रचार’ करण्यासाठी निर्माण केलेला नागरिक संघ आहे. अभियानाच्या सदस्य कविता कुरुगांती सांगतात, “लोकांची नोंदणी करण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाच्या ॲपचा उपयोग केला पण ते निट काम करत नाही. पण या ॲपचा उपयोग होऊ शकतो. आम्ही यावर अजून चर्चा करतोय पण आम्ही योग्य दिशेने चाललोय आणि कोणीतरी पुढाकार घेणं गरजेचंही आहे.”
स्वतंत्रता सेनानी ॲप पासून रेशन ॲप पर्यंत
सैफुल्लाह ॲप डेव्हलपर आहेत, कार्यकर्ता आहेत आणि राजकीय नेता देखील. कुठे काही विपरीत घडलं की ते मैदानात उतरतात. ज्वलंत प्रश्नांची ओळख ते तात्काळ करतात आणि त्यानंतर त्याच्याशी संबंधीत लोक आणि त्यावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी एक ॲप तयार करतात. 2007 साली त्यांची ही ॲप यात्रा सुरू झाली. तेव्हा ते गुगल इंडियात काम करत होते. ते म्हणतात, “मी स्टडी मटेरीयल ॲप तयार केलं. कारण मी विद्यार्थ्यांना लेक्चरला घेऊन जाऊ शकत नाही पण त्यांच्यासाठी ते ॲपवर आणू शकतो.” आंध्र प्रदेशच्या इंजिनियरींग, मेडिकल, ॲग्रिकल्चर कॉमन एन्ट्रेन्स टेस्टसाठी हे ॲप होतं जे आता बंद करण्यात आलं आहे. 15 ऑगस्ट 2016 साली सैफुल्लाह यांनी मुस्लिम स्वतंत्रता सेनानी ॲप आणलं. यात 155 स्वातंत्र्य सैनिकांची माहिती देण्यात आली आहे. तेही आता बंद आहे. नंतर तीन तलाकच्या वेळी कायदेशीर लढाई लढण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डसाठी त्यांनी ॲप तयार केलं. तेही आता बंद आहे. 2019 मध्ये गृहमंत्री अमीत शाहनं सीएए म्हणजे नागरिकता संशोधन कायद्याचं विधेयक आणलं (याचं आता कायद्यात रुपांतर झालंय) तेव्हा मुस्लिमांना लक्ष्य केलं जाईल या भीतिने अनेकांनी सैफुल्लाहला फोन करणं सुरू केलं. सैफुल्लाह सांगतात, “शाहांनी लोकांना खूपच घाबरवलं होतं. मी विचार केला चला आता अमित शाहांना हरवू या. माझं ॲप देशाला वाचवेल आणि म्हणून डिफीट एनआरसी ॲप तयार केलं.” तेही आता बंद आहे. वापरकर्त्यांना फॅमिली ट्री तयार करणं, नागरिकता दस्तावेज व्हेरीफाय करणं आणि आपल्या भागातील विरोध प्रदर्शनांची माहिती देण्यासाठी हे ॲप होतं. 72 हजार लोकांनी ते डाऊनलोड केलं होतं. शाहीन बाग आंदोलनाच्या वेळीही याच नावाने त्यांनी एक ॲप तयार केलं. त्यांत 100 हून जास्त लेख होते. जे सैफल्लाह यांनी लिहिले होते. कोरोनाच्या काळात लोकांपर्यंत रेशन धान्य पोहचवण्यासाठी रेशन ॲप तयार केलं ज्यात जवळपासच्या स्वस्त धान्य दुकानांची माहिती दिली होती.

मिसिंग वोटर्स ॲपची दखल
सोशल डेटा इनिशिएटिव्स फोरम (एसआईडीएफ) अंतर्गत ते अनेक आव्हानं देखील करत असतात. यात मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून, पुरग्रस्त भागात मदतकार्य व्हावं म्हणून आव्हानं आहेत. शिवाय त्यावर काही रिपोर्ट्स देखील प्रकाशित होतात. उदा. मागच्या वर्षीच्या एका रिपोर्टनुसार हैदराबाद येथे 12 वीच्या बोर्डाच्या परिक्षेत 40 टक्के मुस्लिम मुलं नापास झाली होती. पण ज्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले तो रिपोर्ट होता, 12.7 कोटी बेपत्ता मतदारांमध्ये 3 कोटी मुस्लिम आणि 4 कोटी दलित आहेत. 2019 च्या निवडणूकीच्या आधीची ही गोष्ट आहे. त्यामुळे देशातील तसेच बाहेरील मीडियानेही याला प्रसिद्धी दिली. हा डाटा तयार करण्याआधी सैफुल्लाह आणि त्यांच्या टीमने निवडणूक आयोगाच्या मतदार यादीच्या विरोधात, जनगणनेतील एकट्या मतदारांच्या कुटुंबाची पाहणी केली. त्यांना आढळलं की मुस्लिम आणि दलितांमध्ये 17 टक्के लोकांच्या कुटुंबात एकच मतदार आहे.
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड येथे त्यांनी एनजीओंसोबत सर्व्हे केला त्यातही आढळलं की ज्यांच्याकडे वोटींग कार्ड आहे त्यांचीही नावं निवडणूक आयोगाच्या यादीत नाही. सैफुल्लाह यांनी 2019 मध्ये ‘फॉरेन पॉलिसी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, “या (मुस्लिम व दलित) समुहांमध्ये शिक्षण आणि सक्रियता तशीही कमी आहे. त्यामुळे कोणी हे जाणून घेण्याचा त्रास घेतला नाही की त्यांची नावं निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत आहे की नाही.” 2023 मध्ये यात थोडा बदल झाला असला तरी यात खूप काम करणं बाकी आहे असं त्यांचं निरिक्षण आहे. मिसिंग वोटर्स ॲप सर्वांसाठीच फार उपयुक्त ठरलं आहे. मुंबईच्या काँग्रेस नेत्या स्मिता चौधरी यांनी 2019 मध्ये त्यांच्या शिवडी विधानसभा क्षेत्रातील 3 हजार लोकांची नावं या ॲपद्वारे मतदार यादीत चढवली होती. त्या सांगतात, “अनेकांची नावं अजूनही मतदार यादीतून बेपत्ता आहेत, त्यामुळे नोंदणीसाठी ते माझ्याकडे येत असतात.” त्यांची इच्छा आहे की येत्या निवडणूकीच्या आधी ते या ॲपच्या एका वर्किंग एडिशनचा उपयोग करू शकतील. ॲपचा वापर करणं त्यांना तसं सोपं वाटलं होतं. यात ‘मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करा’, ‘मतदान केंद्रात नोंदणी नसलेले मतदार’, ‘मतदार ओळखपत्र सुधारणा’ असे टॅब्स होते. नोंदणी पूर्ण होताच ॲपवर स्वयंसेवकांची यादीही दिसते ज्यात सामिल होऊन तुम्ही इतरांनाही नोंदणीसाठी मदत करू शकता. चौधरी सांगतात, “यामुळे मी झोपडपट्टीत राहणाऱ्या अनेक महिला मतदारांची नोंदणी करू शकले ज्यांची नावं तोवर यादीत नव्हती. लोकशाहीत सर्वांच्या आवाजाला महत्व आहे आणि कोणी यातून बाहेर राहायला नको.”
मिसिंग वोटर्स ऐपमुळे सैफुल्लाह यांना प्रसिद्धी मिळाली असली तरी प्रत्येकजण त्यावर समाधानी नाही. अनेक ॲप्स सध्या बंद आहेत. अनेक सॉफ्टवेअर इंजिनियर्स आता राजकीय पक्षांत काम करत आहेत. कार्यकर्ते बनत आहेत. बँगलोरचे एक शिक्षणतज्ञ जे पूर्वी मनमोहन सिंग यांच्या शासनकाळात सल्लागार म्हणून जोडलेले होते, ते सैफ्फुलाह यांच्याविषयी सांगतात, “ते अजेंडा आधारीत काम करतात.” सैफ्फुलाह यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर ते प्रश्न करतात आणि त्याला ‘अनैतिक’ ठरवतात. सैफुल्लाह ॲप्स तयार करू शकतात पण मोठा डाटा विकसीत करण्याची त्यांची क्षमता नाही असं त्यांचं निरिक्षण आहे. ते सांगतात, “सैफुल्लाह फक्त एका डेटामधून काही भाग काढतोय.” त्यातून काही निष्कर्ष काढणं चुकीचं किंवा दिशाभूल ठरणारं होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. हे शिक्षणतज्ञांचं किंवा शोधकर्त्यांचं काम आहे असं ते सांगतात. विरोधी पक्षांसोबत काम केलं म्हणून सैफुल्लाह यांच्यावर टिकाही झालेली आहे. पण ते म्हणतात की त्यांना कळून चुकलंय की “त्यांच्या मदतीशिवाय या प्रश्नांची उत्तरं शोधणं अशक्य आहे.”

नकारात्मक गोष्टींना सैफुल्लाह फार महत्त्व देत नाहीत. ते श्रेयासाठी किंवा टिकेसाठी हे सारं करत नाहीयेत. त्यांच्या कामातून त्यांना लाखो रुपये कमवता आले असते पण त्यांनी आपल्या समाजासाठी काम करण्याचा निर्णय घेतला असं ते सांगतात. त्यांना आयटी क्षेत्रांत मुस्लिमांची संख्या वाढलेली बघायची आहे. ते म्हणतात, “मुस्लिमांना आयटीमध्ये नोकरी मिळणं कठीण आहे.” आंध्र प्रदेशातील कुर्नूल भागात वाढलेले सैफुल्लाह त्यांचे आजोबा सैयद मजहर हुसैन जे एक प्रतिष्ठीत वकील होते, त्यांच्यामुळे प्रभावित होते. त्यांचे आजोबा सामाजिक न्यायाच्या खटल्यांना जास्त महत्त्व द्यायचे ही गोष्ट त्यांना भावली होती. सैफुल्लाह सांगतात, “माझ्या आजोबांनी मला एकदा सांगितलं होतं की, तुमच्या जवळ जर एखादं कौशल्य असेल तर त्याचा समाजाला उन्नत करण्यासाठी उपयोग करायला हवा. नाहीतर तेच कौशल्य कयामतच्या दिवशी तुमच्या गळ्याचा फास बनेल.” ते शब्द सैफुल्लाह यांच्यासाठी आजही प्रेरणास्त्रोत आहेत. ते म्हणतात, “माझ्या कामातून मला माझ्या आजोबांना जीवंत ठेवायचं आहे.” सैफुल्लाह यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि दोन मुली आहेत. ते ठामपणे आव्हान देण्याच्या सुरात म्हणतात, “तुमचा खेळ सुरू ठेवा. मी इथं अल्पसंख्यक समाजाला वाचवण्यासाठी तयार बसलोय आणि तुमच्या विरोधी पक्षात आहे.”






