‘तनिषा बाजिया’च्या सीकर जिल्ह्यातील अगलोई गावातील शाळेनं तिच्या लहानपणीच्या एका रहस्यावरून पडदा उचलला. ते होतं तिचं शारिरीक व्यंग ज्याला तिनं तब्बल 12 वर्ष लपवून ठेवलं होतं. तिनं जुलै मध्ये बेंगळूरू इथल्या 13 व्या राष्ट्रीय सब-ज्युनियर पॅरा-एथलेटिक्समध्ये 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं तेव्हा सर्वांना त्याविषयी समजलं.
मोठी झाल्यावरही तनिषा नेहमी आपल्या घरीच राहायची कारण बाकी मुलं तिला तिच्या व्यंगावरून चिडवायचे. त्यामुळे तिनं जेव्हा गावापासून ५ किमी दूर असलेल्या शाळेत प्रवेश घेतला तेव्हा तिथल्या मुलांपासून आणि शिक्षकांपासून तिनं आपलं व्यंग लपवण्याचा निर्णय घेतला. पण हे सोपं नव्हतं. याचा अर्थ होता एकांतात एकट्यानं जगणं.
तनिषा सार्वजनिक कार्यक्रमापासून, घरातील कामांपासूनही दूर राहायची. तिचे मित्र खेळायचे तेव्हा ती त्यात नसायची. शाळेत कोणालाच माहिती नव्हती की तनीषाचा डावा हात अर्धाच आहे. तिनं आपल्या स्कर्टमध्ये एक जास्तीचा खिसा तयार केला आणि आपल्या ओढणीनं हात बांधून त्यातच ठेवू लागली.

‘’माझा डाव हात नेहमीच स्कर्टच्या खिशात असायचा, कारण मला..’’?
राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील अगलोई गावातील आपल्या घरात बसलेली 18 वर्षांची तनिषा सांगते, “माझा डावा हात नेहमीच स्कर्टच्या खिशात राहायचा. माझं व्यंग मी असंच लपवून ठेवलं जेणेकरून कोणी मला चिडवू नये. माझ्यावर हसू नये.” तिचं गाव अरावली पर्वतांनी वेढलेलं आहे. बेंगळूरूमधील विजयानं तिचं जगणं बदललं आहे. तिचा हात आता बाहेरच असतो आणि तिचा आत्मविश्वासही. तनिषा थोडी लाजत म्हणते, “पूर्वी मी पूर्णपणे कोणत्याही गोष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हती. पण आता मी मुक्तपणे जगते आणि कोणी माझ्यावर टिकाही करत नाही. मी माझा हात आता लपवतही नाही.”
मागील वर्षभरात तिने राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये एकूण 5 पदकं जिंकली आहेत. त्यातली दोन सुवर्ण पदकं मार्च 2023 च्या राज्यस्तरीय ज्युनियर आणि सब-ज्युनियर पॅराएथलेटिक्सच्या 1500 व 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत मिळाली आहेत. आपला हात दाखवत ती म्हणते, “यानं माझं आयुष्यच बदललं आहे. मी आता माझा आहे तसा स्वीकार केला आहे आणि मला याची लाज वाटत नाही की मी अशी का आहे.”

जन्मत: डावा हात अर्धाच होता…
2006 मध्ये तनिषाचा जन्म झाला तेव्हा तिचा डावा हात अर्धाच होता. तिचे वडील तिला सीकरच्या एका डॉक्टरांकडे घेऊन गेले. 43 वर्षीय जाट शेतकरी इंद्राज बाजिया सांगतात, “डॉक्टरांनी मला फक्त इतकचं म्हटलं की ही देवाची देणगी आहे. तिला खूप प्रेम द्या.
त्यानंतर मी तिला खूप प्रेमानं पाळलं. कधी तिच्यासोबत भेदभाव केला नाही.” बाजिया आपल्या मुलीला नेहमी आठवण करून देतात की ती एकटी नाही. जगात तिच्यासारखी अनेक मुलंमुली आहेत. तनीषाला ही गोष्ट समजेपर्यंत बरीच वर्षं जावी लागली. त्यानंतर खेळांमुळे ती आपल्या या संकुचित, एकट्या जगातून बाहेर पडली.
मागील वर्षी तनिषाने बँगलोरच्या राष्ट्रीय पॅरा एथलेटीक्स स्पर्धेत टेन-पिन बॉलिंग स्पर्धेत भाग घेतला आणि सुवर्ण पदक जिंकलं. तो एक योगायोग होता. त्यानंतर तिनं धावण्याच्या स्पर्धेत करियर करण्याचा निर्णय घेतला. एका नातेवाईकाच्या मदतीने ती महाराणा प्रताप पुरस्कार विजेता कोच महेश नेहरा आणि त्यांची पत्नी सरिता बावरिया यांना भेटली.
ते राज्यातील दिव्यांग मुलांना प्रशिक्षण देत असतात. विविध खेळातील 4 हजाराहून जास्त मुलांना त्यांनी प्रशिक्षण दिलं आहे. त्यातील ३०० जणांना स्पेशली एबल्ड स्पोर्ट्स कोट्यामध्ये सरकारी नोकऱ्याही मिळाल्या आहेत.

… आता मात्र धावपटू झाल्याने जगच बदललं
तनिषा म्हणते, “मला माहिती नव्हतं की कुठे आणि कसं खेळायचं आहे ते. त्यांनीच मला प्रोत्साहन दिलं आणि धावपटू व्हायला सांगितलं.” नेहरा आणि बावरिया तनिषाला आठवड्यातून दोनदा प्रशिक्षण देतात. बावरिया सांगतात, “तनिषात काहीतरी करण्याची जिद्द आहे आणि एकाच वर्षात तिनं स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे.
ती खूपच चांगली धावते आणि प्रगती करण्याची क्षमता तिच्यात आहे. त्यामुळे तिला ट्रेनिंग द्यायला आम्ही दर आठवड्याला तिच्या गावी जातो.” बावरिया स्वतः राष्ट्रीय स्तराच्या खेळाडू होत्या. दिव्यांग मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी त्या आता आपला वेळ देतात. त्या म्हणतात, “ही सर्व मुलं गरीब घरातली आहेत आणि वर्षानुवर्ष निराशेत जगत आलेली असतात.”
तनिषाकडे मार्गदर्शनासाठी कोच होतेच पण तिच्या वडिलांनी तिच्या आयुष्यातील आजवरच्या सर्वांत मोठ्या आव्हानासाठी तिला तयार केलं. आपल्या पहिल्याच स्पर्धेत तनीषाला 1500 मीटर स्पर्धेत सक्षम मुलांसोबत स्पर्धा करायची होती. त्या दिवसाविषयी तनिषा सांगते, “बाकीचे स्पर्धक माझ्याकडे बघून हसत होते. मला स्पर्धेत घ्यायलाही त्यांचा नकार होता. माझ्या वडिलांनी आग्रह करून मला स्पर्धेत भाग घ्यायला सांगितलं. मी घाबरले होते कारण मी चांगली कामगिरी केली नसती तर सर्वांनीच मला आणखिच चिडवलं असतं. पण मी जेव्हा चौथ्या क्रमांकावर आली तेव्हा अनेकांनी माझ्याशी हात मिळवला. तेव्हाच मला वाटलं की मी देखील काही करू शकते.”
वडिलांनी ओबडधोबड जमिनीवर धावण्याचा ट्रॅक तयार केला
यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला. जुलै महिन्यात ती बेंगळूरूच्या के. श्री. कांतीरवा स्टेडियमध्ये स्पर्धेत उतरली तेव्हा तिथली गर्दी पाहून ती घाबरली. ती म्हणते, “माझ्या डोक्यात फक्त एकच गोष्ट होती. वर्षभर मी घेतलेली मेहनत मला एकाच दिवशी लावायची होती.” तनिषानं तिथं 400 मीटर धावण्यात 1 मिनिट 15 सेकंदात रौप्य पदक जिंकलं. तनीषाची आई भँवरी देवी सांगतात, “मी आपल्या मुलीला इतकं आनंदात कधीच पाहिलं नव्हतं जेवढी ती आता असते. खेळामुळे तिचं जगणंच बदललं आहे.

आता ती अभिमानानं जगते. तिचा संकोच संपला आहे.” बाजिया यांनी जोहड (सामुदायिक जागा) मध्ये एक रनिंग ट्रॅक तयार केलाय कारण गावात तनिषाच्या सरावासाठी कोणतीही जागा नाही. अरावली पर्वताची ही जागा खाचखळग्यांनी भरलेली आहे, पण एका बापाच्या मायेनं आणि दृढ संकल्पानं या ओबडधोबड जमिनीवर त्यांनी आपल्या दिव्यांग मुलीसाठी 200 मीटरचा रनिंग ट्रॅक तयार केला. बाजिया यांनी त्यासाठी 9 हजार रुपये खर्च केले.
पावसामुळे ट्रॅक खराब झाल्यानंतर त्याच्या दुरूस्तीसाठी पुन्हा 9 हजार रुपये खर्च केले. ते म्हणतात, “आमच्या गावात खेळासाठी कोणत्याही सुविधा नाहीत. त्यामुळे मीच मागच्या वर्षी जोहडवर रनिंग ट्रॅक तयार करण्याचं ठरवलं. आधी गावकऱ्यांनी विरोध केला कारण त्यांना वाटलं की मी खासगी उपयोगासाठी ही जागा वापरतोय.
पण मी त्यांना म्हटलं की गावातील कोणीही इथं येऊन प्रॅक्टीस करू शकतो.” तनीषामुळे गावातील मुलांनाही प्रेरणा मिळत आहे. तिचे वडील सांगतात, “तनिषामुळे हे सारं सुरू झालंय. आता १० मुलंमुली इथं सरावासाठी येत असतात.
ते पुढे सांगतात की त्यांच्या मुलीच्या यशानंतरही स्थानिक प्रशासन आणि पॅरास्पोर्ट्स फेडरेशनकडून त्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही. इतकंच नाही तर बँगलोरमध्ये तर तनिषाकडे रनिंग शूजही नव्हते. साधे स्पोर्ट्स शूज घालून ती धावली. तिच्याकडे कोणतीही किट देखील नाही आहे.
राजस्थानच्या दिव्यांग पॅरास्पोर्ट्स एसोसिएशन सोबत काम करणारे द्रोणाचार्य पुरस्कार विजेता कोच महावीर सैनी म्हणतात, “तनिषा चांगली धावते पण ती अजून लहान आहे. तिला स्वतःला अजून सिद्ध करावं लागेल तरंच आम्ही तिची काही मदत करू शकू.” तनिषाचं पुढचं लक्ष्य याहून मोठं आहे. आपलं पदक दाखवत ती सांगते, “मी पुढच्या वर्षी होणाऱ्या एशियन गेम्सची तयारी करत आहे.”
(सौजन्य - द प्रिंट)
अनुवाद - प्रतिक पुरी






