गावातल्या पिंपळाच्या पारावर बसून लोक वाद घालताहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दत्तक घेतल्यानंतर डोमरी गावाचा किती विकास झालाय? सेवालाल यादव सांगताहेत, “मोदीनी आधी ‘अच्छे दिन’चा वादा केला आणि आता पोकळ गॅरंट्या देत आहे. खूप झालं आता. या मोदींच्या मागे धावणं बंद करा. यांनी लोकांना स्वप्नं दाखवली पण मिळालं काय? दुर्भाग्य, बेकारी, सरकारी कर्ज!”
मोदींनी 2018 मध्ये वाराणसी येथील डोमरी गाव दत्तक घेण्याची घोषणा केली. नंतर आणखी चार गावं दत्तक घेतली होती. दरम्यान डोमरीवासी खुष झाले. सरकारी अधिकारी आले, तपासण्या करून गेले. काही योजना आल्या पण भ्रष्टाचाराने पोखरलेल्या. डोमरी होती तशीच राहिली आहे. विकास शोधूनही कुठे दिसत नाही. डोमरी वाराणसीपासून 12 किमी दूर आहे. पाचेक हजार लोकवस्तीचं शेतीप्रधान गाव. पटेल, राजभर, मल्लाह आणि दलित सारे एकसारखेच गरिबीत पिचलेले. वाराणसी आणि चंदौलीची सीमा पार करताना राजघाट पुलावरून खालचं डोमरी गाव दिसतं. हा पुल ब्रिटीशांनी बांधलाय जो अजूनही मजबूत आहे. मोदींनी डोमरीच्या लोकांना दिलेली त्यांच्या विकासाची आश्वासनं मात्र तितकी मजबूत निघाली नाहीत.

दहा वर्षांपूर्वी डोमरीच्या भागात प्लॉटर्स शिरले. ज्या जमिनी काही हजारांत विकल्या जात होत्या त्या मग लाखांमध्ये विकल्या जाऊ लागल्या. पण डोमरीच्या लोकांना त्याचा फारसा फायदा झाला नाही. मोदींच्या घोषणेनंतर लोकांच्या स्वप्नांना पंख फुटले. पण आता त्यांना वाटतंय की मोदींनी त्यांना फक्त चिडवलं. सेवालाल यादव म्हणतात, “काही दिवस आम्ही सारेच हवेत होतो. सरकारी अधिकारी रोज आमची विचारपूस करायला यायचे. आता तो भूतकाळ आहे. आम्हाला वाटलं होतं की आमचा विकास आता नक्की होईल. पण आमची अवस्था आता ‘धोबी का कुत्ता, ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. तेव्हा लोक म्हणायचे की डोमरी पण आता वाराणसीप्रमाणे चमकू लागेल. पण अंधारच दाटला. इथं पाण्याची निट व्यवस्था नाही. बेकारी खूप वाढलीय. महागाई सोबतीला होतीच. रस्ते नाहीत, उद्योग नाही. विजेचे खांब आहेत पण वीज नाही. रोज आम्ही शहरात मजूरीच्या शोधात जातो. अशानं कसला विकास होणार आहे?”
इथं ना वीज आहे ना रस्ता…
डोमरीतून वाहणाऱ्या गंगेच्या काठावर तिथली मुलं गाई-म्हशी आणि बकऱ्या चारतांना दिसतात तर बायका गवऱ्या थापताना. वाराणसी शहराच्या कोणत्याही खाणाखुणा इथं दिसत नाही. बिहार, झारखंड, इथल्या लोकांनीही इथं जमिनी विकत घेतल्या आहेत. इथं काहींनी दुकानंही थाटलं आहे. अंगद प्रसाद मौर्य उदासपणे सांगतात, “आम्ही खूप आशा घेऊन आलो होतो इथं. आता पस्तावतोय. पण इथं ना वीज आहे ना रस्ता. गावात गटाराची सोय नाही. सगळीकडे बकाली आणि भकासपणा वावरतोय.” डोमरी गावातल्या बायका रुद्राक्ष माळा तयार करतात किंवा टिकल्या बनवतात. पुरुष हातमागावर साड्या विणतात.
इथं पंख्याच्या जाळ्या तयार करण्याचा उद्योग जोरात सुरू होता. पण राम किशन म्हणतात, “चायनामेड पंख्यांनी आमचा हा धंदा पार बसवला. थोडेच लोक आहेत आता हे काम करणारे. हातमागाचीही हीच अवस्था आहे. आमच्याकडे कौशल्य आहे पण काम नाही. माहिती नाही मोदी नक्की कशाची गॅरंटी देत आहे ते.” डोमरीच्याच संतोष पटेल तक्रार करतात की, “डोमरीत आधी शेतजमीन खूप होती. आता अर्धीही राहिली नाही. सारी शेतजमीन भूमाफीयांनी गिळली. गावात पाण्याची सोय नाही. नाल्या नाही. पावसाळ्यात पाणी घरात घुसतं. साथीचे रोग वाढतात. अनेकदा सांगितलं अधिकाऱ्यांना पण कोणी काहीच केलं नाही.” बाकीचे गावकरीही याला दुजोरा देतात.

डोमरीत एक नजर फिरवली तरी समजतं की इथली परिस्थिती चांगली नाही. रस्ते खराब आहेत. स्वस्त बांधकामामुळं शौचालयं पडली आहेत. काहींनी त्याचा गोदाम म्हणून उपयोग केलाय. भाजपचा झेंडा घेऊन फिरणाऱ्या एकाला विचारलं तर तो म्हणाला, “मोदीजींमुळे लोकांना शौचालयं मिळाली. त्यांनी देखभाल केली नाही तर आम्ही काय करायचं? सरकार तर हे काम करणार नाही ना?” विनोद पांडेयही सांगतात, “डोमरीत खूप काम झालंय. कोणाची उपेक्षा होत नाहीये. साठ टक्के लोकांना रेशन मिळतं. पूर्वीतर इथं वीजेचे खंबेही नव्हते. आता खंबे आहेत, वीजही आहे. रस्ते आणि स्वच्छताही आहे. काही रस्त्यांचं काम थांबवलंय. पण त्याचं कारण माहिती नाही. मोदीजींनाही नसेल. नाहीतर असं झालं नसतं. मोदीजींमुळे इथं रस्ते आहेत, वीज आहे, पाणी आहे, शौचालयं आहेत. रोजची स्वच्छता आहे. शिक्षणाची व्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक चांगली आहे.”
सिलिंडरची टाकी दिली पण गॅस घ्यायला पैसा नाही दिला
आम्ही पत्रकार आहोत म्हणून रस्त्याच्या कडेला रुद्राक्षमाळा बनवणाऱ्या काही बायकांनी आम्हाला आवाज दिला. त्यांतल्या फुलपत्ती सांगू लागल्या, “पाच-सा वर्षामागं मीडियाचे लोक आलते इथं. डोमरीची रोजच चर्चा व्हायची तवा. आता तर कोणालेच खबर नाही. दोन मिंटं आमच्या घरी चाला की. हीतंतितं फिराल तर तुम्हालेच मालूम पडंल सारं. आमी तसंच राहतोय अजूनबी. पयल्यासारखेच. महागायीनं जीव तरासलाय. मोदीनं सिलिंडरची टाकी देल्ली पण गॅस घ्यायले पैसा नाही दिल्ला. गावातल्या बायका चुल्यावरच जेवन बनीवतात. जीव नकोनकोसा हुतो मग.”

फुलपत्तीच्या सोबत असलेल्या ममता, कलावती, मुन्नी सांगतात, “अच्छे दिन येतील म्हणून आम्ही बीजेपीला वोट दिले. पण अच्छे दिन नाही आले. आता मोदीच्या गॅरंटीवर वोट देऊ. बघू काय फायदा झाला तर.” राधा म्हणतात, “हातमाग बंद झाले तसे डोमरीची पोरं शहरात मजूरीसाठी भटकू लागले. कोणी खडी फोडतं, कोणी टोटो चालवतो. फुकटचं रेशन मिळतं म्हणून दिवस ढकलतोय आम्ही. पण किती दिवस असंच चालणार माहीत नाही. मोदीजींनी गाव दत्तक घेतलं तेव्हा वाटलं की हे सारं बदलेल. पण परिस्थिती अधिकच बिघडलीय. या माळा बांधतो आम्ही त्यातून रोजचे पन्नाससाठ रुपये मिळतात तेवढेच.”
नावाला गाव दत्तक घेतलंय मोदींनी, पण विकास पळून गेलाय
डोमरीच्या पटेल वस्तीतला रस्ता तुटला होता. लोक तिथं तावातावानं बोलत होते. एकानं तक्रार केली की, ज्यांच्याकडे आधीच चांगली शेतजमीन आणि घरं होती त्यांनाच सरकारनं पुन्हा नवीन घरं बांधून दिली. आम्ही तसेच राहिलो. असाच असतो का सबका साथ सबका विकास? मानसा देवी म्हणतात, “डोमरीत विकास हे फक्त स्वप्न आहे. इथं अडचणीच आहेत. पोरांपाशी काम नाही. आमची मुलं पार महाराष्ट्रात कोल्हापूरात जाताहेत कामासाठी. डोमरी तसंच आहे. नावाला गाव दत्तक घेतलंय मोदींनी पण विकास पळून गेलाय.” डोमरीतलेच गिरीशचंद्र उपाध्याय म्हणतात, “गावात स्ट्रिट लाईट आहेत पण घराच्या जवळ नाहीत. वीज विभागाचे लोक काहीच ऐकत नाहीत. वाराणसीचे लोकही आमचं ऐकत नाहीत.
आम्ही अजूनही अंधारातच राहतो. इथला बेकार हेलीपॅड पाहिलाच असेल तुम्ही? वोट मागायला सारेच येतात पण नंतर आमचे घाव भरायला कोणी येत नाही.” डोमरीचे सजग नागरीक छेदी बाबा डोमरीच्या विकासावर प्रश्न विचारतात, “आम्हाला वाटत नाही की मोदींनी आमचं गाव दत्तक घेतलंय म्हणून. गावात त्यांच्या नावाचा कुठेच काही उल्लेख नाही तसा. कागदावर असेलही तसं पण प्रत्यक्षात काही दिसत नाही. गावातल्या कोणाला सरकारी नोकरी मिळाल्याचं आम्ही पाहिलं नाही. आम्हाला रामनगर ते राजघाट पूल हवा होता. पण तो झाला नाही. रामनगरला जाण्यासाठी दुसरा रस्ताही नाही. गावात जमीन रजिस्ट्री बंद आहे. बाहेरची माणसं इथली जमीन घशात घालतील बहुतेक अशानं.”

डोमरीच्या माजी सरपंच चंपा देवी यांचे पती राजेंद्र पटेल हेही मोदी सरकारवर नाराज आहेत. “डोमरीच्या विकासावर जितका पैसा खर्च झाला तो सारा अधिकारी व नेत्यांनीच खाल्ला. इथं फक्त बेकारी, भ्रष्टाचार आणि खोटारडेपणाचा विकास झालाय. माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी डोमरीला लोहिया ग्राम म्हणून घोषित केलं होतं तेव्हा थोडातरी विकास झाला होता. मोदीनं त्यावरच आपला शिक्का ठोकलाय. आम्हाला तर सांगायलाही लाज वाटते की आम्ही मोदींच्या डोमरी गावात राहतोय म्हणून. चार वर्षांमागे योगी आले होते इथं. तेव्हा गावात रस्ते बांधण्यात आले, वीजेचे खंबे आले. डोमरी आणि सूजाबादची एक नगर परिषद झाली. सरकारी कामंही सुरू झाली होती.
तेव्हा वाटलं की आता सारं ठीकठाक होईल. पण नंतर अचानक सरकारनं हा दर्जा रद्द केला आणि त्याला वार्ड नंबर 48 म्हणून घोषित केलं. मोदी सरकारनं सारी विकासकामंच थांबवली मग. इथं जमीनीच्या नोंदी होऊ शकत नाही. शेतकरी जमीन विकू शकत नाही की विकत घेऊही शकत नाही. मोदीनं साऱ्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घातलीय बहुतेक. अडानी-अंबानीची नजर लागलीय बहुतेक या जमिनींना. शेतकरी वणवण फिरतोय. जे गाव मोदी दत्तक घेतो तिथल्या जमिनींची रजिस्ट्री बंद होते आणि शेती चौपट होते.” रामलालही याला दुजोरा देतात. ते म्हणतात, “वाराणसीच्या पिंडरा भागात अमूल डेयरीच्या कोनशिला समारंभासाठी मोदी आले तर तिथल्या शेतकऱ्यांच्या जमिनींची रजिस्ट्री बंद झाली. काशीद्वार हायटेक सोसायटीसाठी दहा गावांतील ९५७ एकर जमीन, सारनाथच्या वैदिक सिटीसाठी 269 एकर जमीन सरकारने ताब्यात घेतली आहे.”
कबीर मठाचे ज्ञानेश्वर स्वामी वेगळंच रडगाणं गातात, “आम्ही मठासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या होत्या. त्याच्या नोंदीही आहेत. पण 2007 च्या बसपाच्या शासनकाळात सरकारने आमच्या सर्वांची नावं त्यातून काढून घेतली. त्या सरकारी जमिनी आहेत आणि कासव संरक्षित क्षेत्रात येतात म्हणून. या भागात कबीर मठच नाही तर सतुआ बाबा आश्रम, जनार्दन स्वामी आणि स्वामी रामानंद महाराज यांचे मठ आहेत. पण सरकारने 32 मठ-मंदिरांची नावच काढून टाकली आहेत जमिनींच्या नोंदींतून. सरकार शेतकरी, साधुसंत, मल्लाह यांना उध्वस्त करत आहे. शेतकरी शेती करू शकत नाही आणि मल्लाह गंगेत मासेमारी. सारं काही थांबवलंय सरकारनं. याच्या विरोधात डोमरीच्या लोकांनी आंदोलन केलं तर पोलिसांनी त्यांना फोडून काढलं. साधूसंतांना तुरूंगात टाकलं. आठ लोकांवर गुन्हे दाखल केले. आम्ही या जमिनींवर करोडो रुपये खर्च केले आहेत. त्या आम्ही विकत घेतल्या आहेत, बळकावल्या नाहीत. तरीही आमच्या नोंदी तहसिलीतून गायब आहेत. सरकारनं आम्हाला योग्य मोबदला द्यावा म्हणजे आम्ही डोमरीतून निघून जाऊ. इतकीच आमची इच्छा आहे.”

एकही खासदार आपल्या दत्तक गावाच्या विकासाची जाहिरात करत नाही
वाराणसीचे वरिष्ठ पत्रकार राजीव मौर्य सांगतात, “2014 मध्ये मोदींनी राष्ट्रनिर्माण योजनेअंतर्गत सांसद आदर्श ग्राम योजनेची घोषणा केली होती. त्यात लोकसभा खासदारांना 2016 पर्यंत आपल्या लोकसभा क्षेत्रांत एक आदर्श गाव आणि 2019 पर्यंत तीन व 2024 पर्यंत पाच आदर्श गावांचं निर्माण करायचं होतं. प्रत्येक जिल्ह्यात एक असं आदर्श गाव असावं ज्याचा आसपासची बाकीची गावं आदर्श घेतील आणि आपला विकास करतील असा यामागचा उद्देश होता.
पण मोदीच्या गावांचीच अवस्था दयनीय झाली आहे.” पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं की, गावं स्वच्छ करायची आहेत, रोजगार द्यायचे आहेत, पर्यावरण, आरोग्य, शिक्षणाची उत्तम व्यवस्था आणायची आहे. पण काही महिन्यातच खासदारांचा यातला उत्साह कमी कमी होत गेला. एकही खासदार आपल्या कामाच्या बळावर इथं वोट मांगण्याच्या अवस्थेत नाही. खासदारांना त्यांच्या कामाच्या आधारावर वोट मिळाले असते तर कदाचित या गावांची अवस्था अशी राहिली नसती. केवळ योजना आणण्यात काही अर्थ नसतो जोवर त्यांची योग्य अंमलबजावनी होत नाही. मोदीचं म्हणायचं तर अच्छे दिनच्या नाऱ्याप्रमाणे दत्तक गावांचाही नारा फसवा निघाला आणि त्यांची गॅरंटीही, असंही मोर्य सांगतात.

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विश्वविजय सिंह सांगतात, “पीएमने दत्तक घेतलेल्या गावांचाच विकास न होणं ही सर्वांत मोठी फसवणूक आहे. सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत कोणत्याही गावाचा कसलाही विकास झाला नाही. त्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती पूर्वीसारखीच राहिली. इतर गावांपेक्षा ते वेगळे आहेत असं काहीही दिसत नाही. ही केवळ ब्रँडींग होती. ज्याचा विकासाशी काही संबंध नव्हता. लोकांना वाटतं की काम झालं असेल. पण एकही खासदार आपल्या दत्तक गावाच्या विकासाची जाहिरात करत नाही. कारण तो झालेलाच नाही. यावरून अंदाज येईल की बीजेपी देशात राज्यात किती काम करत आहे आणि त्यांची कार्यसंस्कृती कशी आहे ते.
मोदी काम कमी करतात आणि नारेबाजी जास्त करतात. त्यांचं काम कुठेच दिसत नाही. त्यांचे अच्छे दिन अजूनही आलेले नाहीत. आता मोदी गॅरंटीची गोष्ट करत आहेत. मोदी वाराणसीचं क्योटो करणार होते. ते गंगेचा जप करतात पण गंगाही ठीक झाली नाही. वाराणसीच्या गल्ल्याही तशाच आहेत. जे डोमरीचं आहे तेच त्यांनी दत्तक घेतलेल्या बाकी गावांचंही आहे.” खरंही आहे. डोमरीकडे जाताना आणि परत येतानाही रस्ते चांगले नसल्यामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागला. आता तर निवडणूका आहेत. भाजपवाले सांगत आहेत की मोदी डोमरी गावाला मोठी ‘सौगात’ देणार आहेत. ही भेट काय असेल ते डोमरीच्या लोकांना माहिती नाही. हे मात्र खरंय की गावातली विकासकामं ठप्प आहेत. गावच्या विकासाच्या जेवढ्या गोष्टी केल्या गेल्या होत्या त्या केवळ फेकाफेकी होत्या हेच खरं.
अनुवाद – प्रतिक पुरी
(सौजन्य – जनचौक)






