- संजना खंडारे, नंदुरबार
तारीख 14 फेब्रुवारी 2025... दुपारचे बारा वाजलेत. सूर्य आग ओकतोय मात्र, रेवा नगरच्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर बांबूचे कुंपण करून वेगवेगळ्या खेळासाठी चार ते पाच मैदान बनवलेले आहे. त्यात एकीकडे खो खोची स्पर्धा सुरू आहे, एकीकडे कबड्डी, एकीकडे लिंबू चमचा, तर एका मैदानात काही विद्यार्थी पुढच्या स्पर्धेसाठी तयारी करत आहेत.
त्याच मैदानावर एक स्टेज आणि पाचशे विद्यार्थी बसू शकतील एवढ्या आवारात मंडप टाकलेला आहे. मंडपाच्या आजूबाजूला काही बॅनर लावले आहेत. त्यावर 'रहने दो हमे जीने दो, माँ नर्मदा को बहने दो' अशा प्रकारचा मजकूर आहे. याच मंडपात एक वैद्यकीय पथक बसलेलं असून त्यांच्या समोर 30 ते 40 मुलं आरोग्य तपासणीसाठी उभी आहे.
स्टेजच्या बाजूला उभ्या असलेल्या एक ताई माईक मधून बोलतात, "डनेल,खाऱ्या बादल, सावऱ्या दिगर, जीवननगरच्या शिक्षकांनी मंडपात यावं. पुढच्या स्पर्धेला सुरुवात होत आहे. चित्रकला स्पर्धेला सुरुवात होत असून ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे. त्यांना मंडपात आणावं." 
(बालमेळाव्यातील वक्तृत्च स्पर्धा)
हे दृश्य आहे नंदुरबार जिल्ह्याच्या सातपुडा पर्वतरांगेत असलेल्या तळोदा तालुक्यातील रेवानगर मधील. या रेवानगर मध्ये नर्मदा जीवनशाळांचा 28 वा बालमेळावा सुरू आहे. या बाल मेळाव्यासाठी नर्मदा जीवन शाळांमधील पाचशे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. हा बाल मेळावा 13 ते 16 फेब्रुवारी पर्यंत होता.
या बाल मेळाव्यात फक्त विद्यार्थीच नाही तर त्यांचे शिक्षक,जीवन शाळांची देखरेख करणारे गावातील कर्मचारी, नर्मदा आंदोलनाशी जोडलेले कार्यकर्ते, महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले सामाजिक क्षेत्रात काम करणारे, विचारवंत, कलाकार, अशी ही काही मंडळी होती.
या सगळ्या लोकांचं, या सगळ्या विद्यार्थ्यांचं, या गावकऱ्यांचं, बाल मेळाव्याशी नातं जोडलं ते मेधा पाटकर यांनी. सत्तरी पार असलेल्या मेधा पाटकर जेव्हा भर उन्हात मैदानात पडलेल्या पाण्याच्या बॉटल उचलतात, कचरा गोळा करतात तेव्हा खेळ बघत उभे असलेले 30 ते 40 विद्यार्थी, मैदानातील तरुण लगेच पळत येतात आणि कचरा उचलायला लागतात.
'मे कचरा नही करूँगा देश स्वच्छ रखुंगा' असं मेधाताई पुढे आणि विद्यार्थी त्यांच्या मागे म्हणत म्हणत पूर्ण मैदान साफ करतात.. मेधाताईंची हीच ऊर्जा बाल मेळाव्याच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत होती.
या बाल मेळाव्यात सहभागी झालेले हे विद्यार्थी कुठून येतात? त्यांचा मेधाताईंशी संबंध कसा? हा बाल मेळावा आणि नर्मदा जीवन शाळांचं नातं काय? 28 वर्ष खंड न पडता सुरू असलेला हा बाल मेळावा नेमका कसा असतो? ज्या ठिकाणी शासनाच्या सुविधाही पोहोचलेल्या नाही आहेत त्या ठिकाणी याचं नियोजन इतक्या चोख पद्धतीने कसं होतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी बाईमाणूसची टीम पोहचली नंदुरबारला…
नर्मदा आंदोलनाची नेमकी पार्श्वभूमी
नर्मदा नदीवर बांधलेल्या धरणात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश 193 पैकी 178 गावं बुडिताखाली आली, कमीअधिक बाधित झाली. या नदीकाठच्या गावातील शेतकरी, मच्छिमार, नावाडी, कुंभार, कष्टकरी या साऱ्यांसाठी त्या अजूनही लढा देत आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरातेतील आदिवासींचे उर्वरित हक्क मिळवण्यासाठी अजूनही संघर्ष सुरू आहे. न्यायालयात खटले केसेस सुरू आहेत.
जवळपास 90 ते 95 टक्के लोकांना पर्यायी जमिनी अथवा जमिनीसाठी पैसे मिळाले असले, तरी ते सहजासहजी झालेलं नाही. त्यासाठी सरकारशी सातत्यानं झगडावं लागलं, न्यायालयात जावं लागलं. जे लोक धरणाचं काम सुरू होण्यापूर्वी एकत्र राहत होते, गावातील सणउत्सव आनंदानं साजरे करीत होते; तेच लोक आता विस्थापित होऊन विखुरले आहेत.
(आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिराचेही आयोजन...)
अशी सुरु झाली नर्मदा जीवन शाळा...
नर्मदा बचाव आंदोलनामुळे सर्वांसमोर आलेल्या मेधा पाटकर या आजही तिथल्या आदिवासींसाठी काम करतात. नर्मदा बचाव आंदोलनातूनच नर्मदा जीवन शाळांचा निर्माण झाला. त्याबद्दल ‘बाईमाणूस’शी बोलताना मेधा पाटकर म्हणतात,
"नर्मदेच्या किनारी पहाडी पट्टीमध्ये येणारा जो नंदुरबार जिल्हा आहे. या जिल्ह्यातल्या गावागावातील सगळी वस्तुस्थिती 1985 ला जेव्हा जवळून पहिली, त्यावेळी असं लक्षात आलं की, या लोकांना भूमी अधिकार देखील मिळालेला नाही. त्याचबरोबर एकाही गावामध्ये शाळा नाही, रेशन दुकान नाही, 13 शाळा फक्त कागदावरच दाखवल्या गेल्या आहेत हे डोळ्यासमोर आलं. परंतु, त्या वास्तवात निर्जीव आणि कागदावर जिवंत होत्या.
त्यानंतर सरदार सरोवर धरणाबद्दल, नर्मदेच्या काठी असलेल्या आदिवासींच्या पुनर्वसनाबाबत सरकार दरबारी प्रश्न मांडत गेलो. धरणात पाणी भरलं जाणार आहे हे जेव्हा सरकारकडून कळलं तेव्हा उठाठेव होऊ नये म्हणून आम्ही संघटन करून सत्याग्रह सुरु केला. या सत्याग्रहातून लोकांना ही प्रेरणा मिळाली. सत्याग्रह करणाऱ्यांमध्ये जे शिक्षित तरुण होते त्यांच्या मार्फत आदिवासी मुलांच्या हातात पाट्या देऊन शिक्षण देण्यास सुरवात केली."
मेधाताई पुढे सांगतात, "विस्थापित झालेल्या आदिवासींनाही वाटायला लागलं की समाजाशी जुळवून घेण्यासाठी मुलांना शिकवणं गरजेचं आहे. पहिली शाळा चिमलखेड येथे सुरु झाली. त्या आधी आम्ही सरकारला इशारा दिला की, एकही शाळा सुरू नाही.. सरकारने त्याची चौकशी केली. सगळ्या शाळांमधील सगळ्या शिक्षकांची नोकरीवरून हकालपट्टी झाली. मत्र त्यानंतर पुन्हा नव्याने शाळा काही सुरू झाल्या नाहीत.
सरकारकडे मदत मागण्यात आणि शाळा कधी सुरु होतील याची वाट पाहण्यात काही अर्थ नाही हे आम्हाला जाणवलं. चिमलखडीच्या एका वृद्ध व्यक्तीने शाळा उघडण्यासाठी त्यांची जमीन दिली. त्याच गावातील एका वृद्ध माणसाने त्या शाळेच्या दरवाजाजवळ बसून सांगितलं की जर ही शाळा बुडाली तर मी श्वास सोडेन. शेवटी तसंच झालं. संघर्ष चालूच होता पण यातून नवीन पिढी आम्हाला तयार करायची होती. त्यांचे जे अधिकार आहेत त्याबद्दल यांची दूरदृष्टी निर्माण झाली तर त्यांची एक व्यक्तिमत्व विकासाची दिशा निश्चित होईल. त्यामुळे नर्मदा जीवनशाळा सुरु करण्यात आल्या."
जीवनाचं दर्शन व्हावं हाच जीवन शाळेचा उद्देश....
जीवनशाळा हे नाव देखील पहिल्या शाळेचं उदघाटन करण्यासाठी जेव्हा आम्ही डोंगर चढत होतो तेव्हा सुचलं, असं मेधाताई सांगतात. जीवनशाळेचा उद्देश हा आहे की, जीवनाचं दर्शन या पिढीला झालं पाहिजे. आदिवासींची संस्कृती, आदिवासींचं निसर्गाशी नातं, आदिवासींचे अधिकार याबद्दलच त्यांना जाणीव झाली पाहिजे. ती जाणीव जशी नृत्यातून,गीतातून होते तशीच प्रबोधनातूनही होते.
अश्या एकेक करत मेधाताईंनी जीवनशाळा सुरु केल्या. गावकऱ्यांनीही पुढाकार घेतला. काही महिने गावकऱ्यांनी नर्मदा जीवन शाळा चालवल्या. गावकऱ्यांची बांधिलकी त्यातून दिसून आली. त्यानंतर आधी नर्मदा अभियानातर्फे नंतर नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे नर्मदा जीवन शाळा सुरु झाल्या.
बालमेळाव्याचे उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य…
जीवनशाळांमध्ये शिकवण्याची जी माध्यमं वापरली जातात ती अतिशय वेगळी आहेत. जीवन शाळेतील सर्व शिक्षक हे आदिवासीच आहेत. या जीवन शाळेत शिकवण्यासाठी भाषाही पावरी आणि मराठी अशी वापरली जाते.
"मध्यप्रदेशच्या खारिया बदल इथेही एक जीवनशाळा आहे . तिथे हिंदी आणि भिलाली भाषा वापरली जाते. या शिक्षकांच्या माध्यमातून जे शिक्षण आम्ही देऊ इच्छितो जे प्रबोधन आम्ही करू इच्छितो ते केवळ आम्ही पुस्तक पठणातून नाही करू शकत. सरकारी पुस्तकात जो अभ्यास दिलेला असतो तो ही टाळला जात नाही कारण समोर जाऊन त्यांना इथल्या व्यापक समाजाशी नातं जोडावे लागतं.
त्यांच्याशी संवाद करावा लागतो. मणिबेलीच्या शाळेची जेव्हा सुरवात झाली तेव्हा अनिल संगोपालन, कृष्णकुमार जी. हे NCRT चे प्रमुख होते. त्यांना बोलावून त्यांची बैठक घेऊन भाषा म्हणून काय शिकवावं? इतिहास म्हणून गावाच्या इतिहासापासून आदिवासींच्या इतिहासापर्यंत कसं शिकवावं यावर चर्चा केली.
या सर्व माध्यमांमध्ये कला-क्रीडा देखील आले. हे सगळं मुलांना वर्षभर शिकवल्यानंतर त्याचं दर्शन विद्यार्थ्यांना आपपसामध्ये होणं आवश्यक असतं. अश्या विचारातून बाळमेळाव्याची सुरवात झाली. पहिल्या बालमेळाव्यापासून खेळ,नृत्य, गीत नाटक याचबरोबर चित्रकला,वक्तृत्व, निबंध अशा अनेक प्रकारांचा या बाल मेळाव्यात समावेश करण्यात आला.
(सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आलेले विद्यार्थी आणि गावकरी..)
या बालमेळाव्यात जनजागृती करण्यात आली....
नर्मदा जीवन शाळेच्या 28 व्या बालमेळाव्यात पाचशे विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या. दिवसभर खेळ, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा तर रात्री सांस्कृतिक कार्यक्रम झाले. वक्तृत्व स्पर्धेचे विषय आदिवासी मुलांना विचार करायला भाग पाडणारे होते. व्यसनामुळे आदिवासींचे काय नुकसान होते? शेतकरीच उपाशी राहिला तर?, मला मोठे होऊन काय बनायचे?, या सगळ्या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा झाली.
अनेक विद्यार्थ्यांनी पावरी भाषेत त्यांचा विषय मांडला. रात्री असणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात फक्त नृत्य नाही तर, नाटक, गायन याचाही समावेश होता. या नाटकांचे विषयही 'लाडकी बहीण योजना घातक आहे', 'धर्मसमभाव' , असे होते. नृत्यही चित्रपटांच्या गाण्यावर नसून आदिवासींच्या जीवनावर होते.
बालमेळाव्यामधून अनेकांना प्रेरणा मिळते..
हा बालमेळावा एकाच ठिकाणी होत नाही तर वेगवेगळ्या गावात हा बालमेळावा होतो. त्या त्या गावातील लोकांमध्ये यामुळे उत्साह संचारतो. जो सांस्कृतिक कार्यक्रम होतो तो पाहण्यासाठी गावातील सगळी लोकं येतात. बायका-तरुण मुलं हजेरी लावतात. त्यांच्यामध्येही उत्साह संचारतो आणि त्यांना एक प्रेरणा मिळते. त्यातीलच काही तरुण पुढे कार्यकर्ते बनतात, काही शिक्षक बनतात.
या शिक्षकांना जातीधर्माबाहेर आपली एकता आहे याच दर्शन घडतं. गांधी,आंबेडकर, साने गुरुजी, यांची विचारधारा काय आहे? बिरसा मुंडा, तंट्या मामा, उमाजी नाईक यांना का आठवावं? हे सगळं या बालमेळाव्यानिमिताने बोललं जातं. बालमेळाव्यांतून नारीशक्ती समोर झळकते. त्यामुळे वयोवृद्ध, युवक, महिला, युवती जी लहान मुलं अजूनही शाळांमध्ये जात नाही ती सगळी एकत्र येतात. यांच्या मनात शिक्षणाचं महत्व बालमेळाव्यात रुजवलं जातं.
या मेळाव्यात मुलगा–मुलगी भेद नाही...
कोकणात म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी गेली 35 वर्ष राजन इंदुलकर काम करतात. ते देखील या बाल मेळाव्यासाठी आले होते. अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत ते या मेळाव्यात सहभागी होते. त्यांच्याशी बाईमाणूसने संवाद साधल्यावर त्यांनी सांगितले,
"हा बालमेळावा म्हणजे उत्साहाने भरलेला आहे. कोणत्याही कोपऱ्यात बघितलं तरी सगळी लोकं आनंद घेत आहेत. विद्यार्थी, पालक, शिक्षक, गावकरी अश्या किमान 1000-1200 लोकांनी हा परिसर गेले चार दिवस गजबजलेला आहे. सकाळी सूर्य उजाडल्यापासून ते रात्री अंधार होण्याच्या नंतर पर्यंत सगळी लोकं इथे असतात. या बाळमेळाव्यात महत्वाचं निरीक्षण जर केलं तर लक्षात येईल की, यामध्ये ज्या मुली आहेत त्या मुली आहेत की नाही हे लक्षात येत नाही. बॉय कट केलेल्या मुली आहेत. हाफपॅण्ट वर त्या बेधुंद होऊन खेळात सहभागी होतात. या ठिकाणी मुलगा-मुलगी असा फरक अजिबातच नाही. मुलगा असो मुलगी असो दोघेही तितक्याच ताकदीने तितक्याच उत्साहाने खेळतात. कोणत्याही मुलीच्या मनात संकोच नाही, भय नाही, निर्भय वातावरण या ठिकाणी आहे. असं वातावरण निर्माण करणं हे जीवनशाळेचं वैशिष्ट्य आहे. "
राजन इंदुलकर पुढे म्हणतात, "या जीवनशाळा सरकारी शाळांसारख्या चाकोरीतल्या शाळा नसून या विशेष शाळा आहेत. विशेष यासाठी की, या शाळांमध्ये जे आदिवासी मुलं आहेत त्यांच्यात जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा वेध घेतला जातो. मुलांच्या मानसिक,बौद्धिक शैक्षणिक क्षमतेला या ठिकाणी उठाव देण्याचं काम करण्यात येतं. जीवन शाळेचं शिक्षण हे एकूणच मुलांना समृद्ध करतं. इथे जो कोणी येईल तो प्रेरणा घेऊनच जाणार. "
(आदिवासी नृत्य सादर करताना विद्यार्थी)
क्रीडा, कला, चळवळ, आंदोलन हे आदिवासींमध्ये मिसळण्याचं माध्यम...
अकोला जिल्ह्यातील कोरकू आदिवासी समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम 'उन्नती संस्था' करते. त्या संस्थेच्या आठ ते दहा जणांच्या टीमने बाल मेळाव्याला हजेरी लावली होती. त्यातील रुपाली पेठेकर यांच्याशी बाईमाणूसने संवाद साधल्यावर त्यांनी सांगितले, "अकोल्यात कोरकू आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. कोरकू मुलांना शिक्षणात ज्या अडचणी येत होत्या त्या कमी करण्यासाठी आम्ही त्या आदिवासी मुलांना कोरक मधून शिक्षण देण्यास सुरवात केली. तीन-चार वर्ष त्याचा अभ्याक्रम सेट करून शिक्षणशास्त्र समजून घेऊन त्या लोकांना आता आम्ही सोप्या पद्धतीने शिकवत आहोत. याच प्रकारचं काम आम्ही शहापूर मध्येही करत आहोत. आदिवासी मुलांमध्ये मेधाताईंचं काम खूप मोठं आहे. हे काम समजून घेऊन आमच्या कामामध्ये त्याचा कसा उपयोग करता येईल त्यासाठी आम्ही बालमेळाव्यात आलो. इथे आम्हाला समजलं की आदिवासी मुलांसोबत मिसळणं सोपं नाहीये. पण कला,क्रीडा, चळवळ आंदोलन हे मिसळण्याचे माध्यम आहे हे बालमेळाव्यात कळलं."
या बालमेळाव्यात 'एमजीएम" तर्फे विद्यार्थ्यांना खादीचे प्रशिक्षण
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या माध्यमातून नर्मदा जीवनशाळेच्या विद्यार्थ्यांना सामूहिक सुतकाताईचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून स्वावलंबन आणि आत्मनिर्भरतेचा संदेश देण्यात आला. दिवसभर सुतकाताई साठी 50 टकळी, 5 पेटीचरखा आणि दोन टू स्पिंडल अंबर चरखा इ. चरख्यांचा समावेश होता. "
नर्मदा जीवनशाळेच्या विद्यार्थ्यांना सुतकाताईची आवड निर्माण व्हावी म्हणून एमजीएम विद्यापीठाच्या खादी विभागातून भाऊसाहेब भजारे आणि गांधी अध्यासन विभागातून भागवत वाघ या मेळाव्यासाठी उपस्थित होते. त्यांनी कापूस ते कापड याचे प्रात्यक्षिक मुलांना दाखवले.
नर्मदा जीवनशाळेचे धडे
नर्मदा आंदोलनात मेधा ताई सोबत सुरवातीपासून पिंजारीबाई पावरा सोबत होत्या. त्यांचं वय आता 80 पार आहे तरी त्या आजही चळवळीत जोडलेल्या आहेत. बालमेळाव्यात आलेल्या पाहुण्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय त्यांनी त्यांच्या घरी केली होती. त्या नर्मदा आंदोलनात कशा सहभागी झाल्या त्यांच्याशी बोलल्यावर त्यांनी सांगितले, "आपल्या भारतातील सर्व आदिवासी शिकलेले नाही. धरण बांधल्यावर त्यांना जागा मिळवण्यासाठी कागदोपत्री व्यवहार करता येणार नाही. त्यात त्यांचे नुकसान होणार म्हणून मेधा पाटकर नर्मदेच्या घाटीत आल्या. त्यांनी गावातील लोकांना जागृत केले. तेव्हा प्रत्येक गावातील शंभर–दोनशे तर, काही गावातून हजार लोकांनी सोबत भाकरी बांधून, हातात काठ्या घेऊन जाब विचारायला सरकार दरबारी गेलो. मुंबई–दिल्ली ही गाठली. धरण तर त्यांनी बांधलं, पण या आंदोलनामुळे आदिवासी लोकांना त्यांचे हक्क आणि अधिकारांची जाणीव झाली."
शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक वंदना भागवत यांच्या मते, आपण सहसा देणग्या देतो ते त्यातून कुठेतरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाच्या मानेभोवती मेडल लटकेल यासाठी. मात्र नर्मदा परिसरातील या आदिवासी मुलांच्या क्षमतांचा विचार व्यापक सामाजिक आणि पर्यावरणीय आरोग्याच्या संदर्भात करायला हवा. या समूहांची ठामपणे उभे राहात नवनिर्माण करण्याची जिद्द ही आपली मान उंचावणारी गोष्ट वाटायला हवी.
आज मुलांच्या क्षमतांचा जो व्यक्तिकेंद्रित विचार होतो आहे तो खरेतर विनाशाकडे नेणारा आहे. कारण खूप खर्च करून आपण मुलाला एखाद्या क्षमतेत पारंगत करतो; पण ते मूल जर प्रदूषित हवेतून प्रवास करत असेल, प्रदूषित पाणी पिणार असेल, विषारी रसायनांनी माखलेले अन्न खाणार असेल, स्पर्धात्मकतेत त्याच्या आत्मसन्मानाचा बळी जाणार असेल तर ते मूल कोणत्या अर्थाने जिवंत राहील?
याउलट नर्मदा जीवनशाळांमधली मुले जल- जंगल-जमीन निरामय राहण्यासाठी, त्यांच्या जमिनींवर त्यांचा अधिकार शाबूत राहण्यासाठी लढत असतील तर ते शिक्षण अंतिमत: निसर्गशक्तींच्या संवर्धनाचे, शाश्वत विकासाचे शिक्षण आहे. त्यातून केवळ त्यांचाच नव्हे तर आपलाही अधिवास, आपलेही पर्यावरण निरामय राहणार असेल तर लाखो लोकांच्या आयुष्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणारे हे जीवनशिक्षण अधिक मोलाचे आहे. फक्त त्यांच्या जगण्यासाठीच नव्हे, तर आपल्याही जगण्यासाठी त्यांचे अधिवास जिवंत राहिले पाहिजेत, निरोगी राहिले पाहिजेत.
यासाठी त्यांचे शिक्षण त्यांच्या परिसरात कसे होईल, ते अधिकाधिक अर्थपूर्ण कसे होत जाईल आणि आपल्या जगण्याशी त्याची नाळ कशी जुळेल, कशी देवाणघेवाण होईल हे बघणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना अर्थसहाय्य करणे आपले कर्तव्य आहे आणि ती आजच्या काळाची गरजही आहे. नर्मदा आंदोलन हे विनाशाची वाट रोखण्याचे प्रयत्न करत आहे, त्याचबरोबर संवादातून ते पर्यायी जीवनशैलीचा विचारही करू पाहात आहे.






