अवंतिका कुमारीला आता ‘आयएएस’ अधिकारी नाही व्हायचयं… तिनं आता आकाश, तारे, उपग्रह अशा आणखी विस्मयकारी गोष्टी शोधून काढल्या आहेत. नेपाळ सीमेलगतच्या पूर्वी-उत्तर प्रदेशच्या हसूडी औसानपूर गावची ही 14 वर्षीय विद्यार्थिनी भारताच्या पहिल्या ग्रामीण अंतराळ प्रयोगशाळेतून पदवी घेणाऱ्या 30 जणांपैकी एक आहे. त्यासाठी एक बॉलिवूड चित्रपट, मोठी स्वप्नं बघणारा विद्यार्थ्यांचा एक गट, त्यांना पाठींबा देणारे गावचे सरपंच आणि दोन वर्षांपूर्वी बालकदिनानिमित्ता भारतीय अंतराळ संशोधन संघटना अर्थात इस्रोने घेतलेला पुढाकार कारणीभूत ठरला आहे. आता हे सारे मिळून एक स्थानिक हवामान केंद्र तयार करत आहेत आणि ड्रोनचा उपयोग पूराची भविष्यवाणी करण्यासाठी करता येईल का याची तपासणी करत आहेत.
सिद्धार्थनगरची ही अवंतिका कुमारी नावाची लाजरी पोरगी, त्या भागातून येते ज्या भागाला 2018 च्या नीति आयोगाच्या अहवालानुसार देशातील सर्वांत कमी विकसीत प्रदेशात ठेवण्यात आलं होतं, मात्र सध्या अवंतिका रॉकेट, ड्रोन, विमानांविषयी सतत बडबडत असते. ती उपग्रह डिझाईनवर काही सल्लेही देऊ शकते आणि तिला दुर्बिण देखील तयार करता येते. जोवर अंतराळ आणि विज्ञानाचा विषय निघत नाही तोवर तिला शब्द फुटत नाहीत. ती म्हणते, “दोन वर्षांपूर्वी तुम्ही मला विचारलं असतं की मला काय व्हायचं आहे तर मी म्हटलं असतं की मला शिक्षिका किंवा आयएएस अधिकारी व्हायचं आहे.” पण आता अवंतिका ताऱ्यांच्या दिशेनं निघाली आहे.

कुठल्यातरी कोपऱ्यातील हसूडी औसानपूर गाव अन् अंतराळ प्रयोगशाळा
हसूडी औसानपूर गावात कच्चा रस्ता आहे. नाल्या उघड्या आहेत आणि घरांच्या भिंती पोपड्यांनी भरल्या आहेत. पण इथल्या मोकळ्या मैदानात एक निळ्या रंगाची इमारत उठून दिसते. हे भारतातील पहिलं प्राथमिक विद्यालय आहे जिथं अंतराळ प्रयोगशाळा आहे. 2019 मध्ये याची सुरूवात झाली. गावचे सरपंच दिलीप त्रिपाठी यांनी विद्या बालन व अक्षय कुमार यांचा ‘मिशन मंगल’ हा चित्रपट पाहिला. चित्रपट फारसा चालला नाही पण त्रिपाठींच्या मनात अंतराळ प्रयोगांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता मात्र जन्माला आली. त्रिपाठींनी याचा गावातील एका कार्यक्रमात उल्लेख केला आणि नंतर ते ही गोष्ट विसरूनही गेले, पण विद्यार्थी विसरले नाहीत. त्रिपाठी सांगतात, “काही विद्यार्थी माझ्याशी बोलायला आले यावर. जेव्हा मला त्यांची उत्सुकता खरी वाटली तेव्हा मी त्यांना इस्त्रोलाच मेल पाठवायला सांगितलं की त्यांनी आमच्या गावातही असाच कार्यक्रम राबवावा.”
विद्यार्थ्यांनी इस्त्रोला पाठवलेल्या ईमेलला उत्साहजनक प्रतिसाद लाभला नाही. तिथल्या वैज्ञानिकांनी सांगितलं की व्योमिका स्पेस अकॅडमी ही खासगी शाळांसाठी तयार करण्यात आलेला सर्वोत्तम अंतराळ कार्यक्रम आहे. त्रिपाठींनी इंटरनेटवर त्याचा शोध घेतला. ही अकॅडमी इस्त्रोद्वारा समर्थित एक शैक्षणिक मंच आहे जिथे ज्यातून विद्यार्थ्यांना विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात अभ्यास-करियर करण्यासाठी मदत करतो. त्रिपाठी म्हणतात, “मुलं निराश झाली. इस्त्रोला वाटलं असेल की गावातल्या या विद्यार्थ्यांमध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची योग्यता नाही.”

इस्त्रोने गावातल्या मुलांसमोर ठेवली अट आणि मग पुढे…?
पण मुलं हार मानायला तयार नव्हती. त्यांनी आणखी एक ईमेल पाठवला. यावेळी त्यांनी म्हटलं की त्यांना निदान त्यांची योग्यता सिद्ध करण्याची एक संधी तरी देण्यात यावी. इस्त्रोनं गावातल्या मुलांची परीक्षा घ्यावी आणि जर मोठ्या संख्येनं विद्यार्थी यात उत्तीर्ण झाले तरच इस्त्रोनं गावाची त्यांच्या या कार्यक्रमासाठी विचार करावा, असंही त्यांनी म्हटलं. इस्त्रोला ऐकावं लागलं. 90 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यांतले 55 उत्तीर्ण झाले. गावात लवकरच एक अंतराळ प्रयोगशाळा आली आणि एक संपूर्ण अंतराळ शिक्षण कार्यक्रमही सुरू करण्यात आला.
इस्त्रो वैज्ञानिक, राकेश राज, जे या अभ्याक्रमाचे सुरूवातीला संचालक होते, सांगतात, “हा एक निश्चित कार्यक्रम आहे. पण विद्यार्थ्यांनी त्यांच्या योग्यतेमुळे याचा स्तर आणखी उंचावला. ते नवीन प्रश्न आणि विचार घेऊन यायचे ज्यामुळे आम्हालाही हा कार्यक्रम अधिक चांगला करण्यासाठी मदत झाली.” कार्यक्रमाला मान्यता मिळाल्यानंतर इस्त्रोची टीम आली आणि त्यांनी गावातील ढासळत्या प्राथमिक शाळेची इमारत बदलून टाकली. तिची दुरूस्ती झाली, भिंतीवर नवा रंग चढला. संगणक आले, प्रयोगशाळा तयार झाली. इथं मुलं आपल्या रोजच्या समस्या सोडवण्यासाठी विज्ञानाची मदत घेतात. नेहमीच्या अभ्यासक्रमाच्या बाहेरच्या या गोष्टी असतात. शाळेतील एक शिक्षक मनोज कुमार सांगतात, “गावातील मुलांच्या अडचणी शहरी भागातील मुलांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असतात. ही मुलं व्यावहारीक अडचणी घेऊन येतात. त्यामुळे आम्हालाही आमच्या कोर्सच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागतो.” इस्त्रोनं व्योमिका कार्यक्रमासाठी प्रशिक्षित केलेल्या शिक्षकांपैकी कुमार एक आहेत.

12 वर्षाच्या गरिमाने पूराच्या समस्येवर तोडगा काढला
या कार्यक्रमासाठी निवडल्या गेलेली 12 वर्षांची गरिमानं पूराच्या समस्येवर उपाय शोधण्यात डोकं लढवलं आहे. दरवर्षी नेपाळकडून येणाऱ्या पुरांमुळे या भागात शेतीचं मोठं नुकसान होतं. हे पूर कधी येतील हे सांगता येणं कठीण असतं. कारण ते लहान प्रमाणात येतात आणि त्यांची व्याप्तीही कमीच असते. तिनं आपल्या शिक्षकांना विचारलं की होणारं नुकसान कमी करण्यासाठी पुरांची पूर्वसूचना देता येणारी एखादी यंत्रणा तयार करता येईल का. ती सांगते, “आम्हाला सांगण्यात आलं की मोठ्या सावधगिरीच्या यंत्रणेसाठी व्यापक तंत्रज्ञानाची गरज लागते. पण ड्रोनच्या सहाय्यानं अशा लहान पातळीवर सूचना देता येऊ शकतात.” व्योमिका कार्यक्रमा अंतर्गत आता गावात अशी यंत्रणा स्थापण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मुख्य म्हणजे याची व्यवस्था विद्यार्थीच सांभाळणार आहेत. मुलांनी गावकऱ्यांनाही आपल्या वैज्ञानिक अभ्यासात सहभागी करून घेतलं आहे. ते प्रयोगशाळेत तसेच गावातील चौकातही दुर्बिणीतून आकाशदर्शन घडवतात.
अवंतिका हसत म्हणते, “आम्ही लहान होतो तेव्हा आजी सांगायची की चंद्रावरचे काळे डाग म्हणजे तिथं राहणाऱ्या एका म्हातारीची सावली आहे. काही जण म्हणतात की ती एका मोठ्या पिंपळाच्या झाडाची सावली आहे.” आता गावकरी अशा आकाश निरिक्षणासाठी नेहमीच येतात आणि चंद्रावरचे खडडे बघतात. ती कोणाची सावली नाही हे त्यांना आता समजलंय.

हसूडी औसानपूर प्राथमिक शाळेचे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जिल्ह्यातील अन्य शहरांत जातात. अवंतिकाचे भाऊ-बहिण सरकारी शाळांमध्ये शिकले पण तिला मात्र तिच्या हुशारीमुळे कॉन्वेंट शाळेत प्रवेश मिळाला. तिथं जाण्यासाठी तिला पायी व बसनं रोज 15 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. ती म्हणते, मला इथल्या प्रयोगशाळेत शिकण्याची इच्छा होती. पण माझ्या अभ्यासामुळे मला नवीन शाळेत शिकायला मिळतंय याचाही आनंद आहे. ती आता भविष्यात इस्त्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून काम करण्याचं स्वप्न रंगवत आहे.
अवंतिका प्रमाणेच पायलनेही वाराणसीच्या एका खासगी शाळेत आपल्या हुशारीमुळे प्रवेश मिळवला आहे. त्या दोघीही आता गावातील अंतराळ प्रयोगशाळेत शिकू शकत नसल्या तरीही आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग गावकऱ्यांना करून देण्यास उत्सुक आहेत. “आम्ही हवामान सूचना केंद्र स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहोत. सरकारी सूचना संपूर्ण जिल्हयासाठी असतात, पण आम्हाला स्थानिक गावांसाठी सूचना द्यायच्या आहेत. जिथे पूराची सूचना देता येईल.” ते त्या दिवसाचं स्वप्न बघत आहेत जेव्हा गावातलंच कोणीतरी इस्त्रोच्या रॉकेटमध्ये बसून अंतराळात जाईल. अवंतिका हसत म्हणते, “भारत आता चंद्रावर माणसाला पाठवणार आहे. आमच्यापैकी कोणी त्यात असू शकतो.”
सौजन्य – द प्रिंट
अनुवाद – प्रतिक पुरी





