सायली मेश्राम
- चंद्रपूरमध्ये तेंदूपत्ता गोळा करताना चार महिलांचा वाघीणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला, पण या घटनेकडे थोडं खोलात जाऊन पाहिलं, तर एक वेगळंच चित्र दिसतं. हा प्रश्न केवळ एका “आक्रमक” वाघीणीचा नाही. हा प्रश्न आहे तापलेल्या जंगलांचा, बदलत्या हवामानाचा, वाढत्या पर्यटनाचा,संकुचित होत जाणाऱ्या अधिवासांचा आणि जंगलाच्या सीमेवर जगणाऱ्या माणसांच्या असुरक्षित आयुष्याचा.
- तीव्र उष्णतेमुळे वाघांमध्ये आक्रमकता वाढतेय, व्याघ्र पर्यटनाच्या वाढत्या दबावामुळे वाघांचं नैसर्गिक वर्तन बदलतयं आणि त्यांच्या प्रजननावर परिणामही होतोय. याचा फटका बसतोय आदिवासी आणि गरीब महिलांना…
चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही जंगलात वाघीणीच्या हल्ल्यात चार महिला मृत्युमुखी पडल्या, तेव्हा सुरुवातीला ही घटना नेहमीच्या चौकटीत समजावून सांगितली गेली. “वाघीणीचा हल्ला”, “नरभक्षक वाघीण”, “वनविभागाची मोहीम”, “रेस्क्यू ऑपरेशन” अशा शब्दांनी बातम्यांची जागा भरून गेली. गेल्या काही दिवसांपासून परिसरात भीती पसरली आणि जंगलात जाण्यास मनाई करण्यात आली… आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी उभी राहिली ती एक वाघीण.
पण या घटनेकडे थोडं खोलात जाऊन पाहिलं, तर एक वेगळंच चित्र दिसतं. हा प्रश्न केवळ एका “आक्रमक” वाघीणीचा नाही. हा प्रश्न आहे तापलेल्या जंगलांचा, बदलत्या हवामानाचा, वाढत्या पर्यटनाचा, संकुचित होत जाणाऱ्या अधिवासांचा आणि जंगलाच्या सीमेवर जगणाऱ्या माणसांच्या असुरक्षित आयुष्याचा. चंद्रपूरमध्ये घडलेली घटना हा केवळ वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा विषय नाही; ती भारतातील जंगल व्यवस्थापनाच्या बदलत्या वास्तवाची गंभीर सूचना आहे. या चार महिलांच्या मृत्यूकडे फक्त “वाघाचा हल्ला” म्हणून पाहिलं, तर आपण या संपूर्ण वास्तवाचा मोठा भाग दुर्लक्षित करू.

वाघ का चिडत आहेत? चंद्रपूरच्या रक्तरंजित घटनेमागचं बदलतं जंगल
विदर्भात यंदाचा उन्हाळा नेहमीपेक्षा अधिक कठीण ठरला. एप्रिल-मे महिन्यात तापमान ४५ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं. शहरात राहणाऱ्या लोकांसाठी ही उष्णता एसी, कुलर किंवा बंद घरांच्या माध्यमातून सहन करणं शक्य होतं; पण जंगलात राहणाऱ्या प्राण्यांसाठी ती थेट अस्तित्वाचा प्रश्न बनते. विशेषतः वाघांसाठी. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पशुवैद्यकीय अधिकारी आणि जलद बचाव पथक प्रमुख डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी या घटनेनंतर एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. ‘लोकसत्ता’शी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की,चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी परिसरातील वाढता मानव-वाघ संघर्ष समजून घ्यायचा असेल, तर “उष्णतेमुळे वाघांच्या शरीरावर आणि वर्तनावर काय परिणाम होतो?” हा प्रश्न मध्यभागी ठेवावा लागेल.
वाघ हे ‘होमियोथर्मिक’ प्राणी आहेत. म्हणजे त्यांच्या शरीराचं अंतर्गत तापमान एका मर्यादेत स्थिर राहणं आवश्यक असतं. पण माणसांप्रमाणे त्यांच्या शरीरात घामग्रंथी नसतात. त्यामुळे शरीरातील उष्णता बाहेर टाकण्यासाठी ते मुख्यतः पाणवठे, सावली आणि थंड प्रदेशांवर अवलंबून असतात. जेव्हा जंगलातील तापमान अत्यंत वाढतं, पाणवठे आटतात आणि सावलीचे भाग कमी होतात, तेव्हा वाघांच्या शरीरावर ताण वाढतो. या अवस्थेला ‘हायपरथर्मिया’ म्हटलं जातं.
डॉ. खोब्रागडे यांच्या मते, या अवस्थेत वाघांच्या शरीरात ‘कॉर्टिसोल’ आणि ‘अॅड्रेनालिन’सारखे तणाव निर्माण करणारे हार्मोन्स वाढतात. त्याचा थेट परिणाम त्यांच्या वर्तनावर होतो. ते अधिक अस्वस्थ, चिडचिडे आणि आक्रमक बनतात.
वाघांच्या प्रदेशात जगणारी माणसं : चंद्रपूरच्या घटनेमागचं अस्वस्थ वास्तव
विदर्भातील आदिवासी आणि ग्रामीण भागात तेंदूपत्ता हंगाम म्हणजे जगण्याचा हंगाम असतो. वर्षभर फारशी कमाई नसलेल्या अनेक कुटुंबांसाठी मे-जूनमधला हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. पहाटेपासून महिला जंगलात जातात. झाडाखाली वाकून पानं गोळा करतात. उन्हात तासन्तास फिरतात. त्यांना जंगलातील प्रत्येक वाट परिचित असते; पण त्या वाटांवर आता केवळ साप, विंचू किंवा रानडुक्करांचा धोका उरलेला नाही. तिथे अस्वस्थ वाघांचाही वावर वाढतो आहे.
विशेष म्हणजे, उन्हाळ्यात वाघ ज्या भागात आश्रय घेतात, ओढ्यांच्या काठावर, उरलेल्या पाणवठ्यांजवळ, दाट सावलीत… त्याच भागात तेंदूपत्ता मोठ्या प्रमाणावर मिळतो. म्हणजे जंगलात दोन वेगवेगळ्या जगण्याच्या लढाया एकाच जागी येऊन भिडतात. एका बाजूला उष्णतेपासून बचाव करण्याचा प्रयत्न करणारा वाघ आणि दुसऱ्या बाजूला पोटासाठी पानं गोळा करणारी महिला.
डॉ. खोब्रागडे यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. तेंदूपत्ता गोळा करताना महिला बराच वेळ वाकलेल्या अवस्थेत काम करतात. वाघाची दृष्टी हालचाली आणि शरीराच्या आकारावर आधारित असते. त्यामुळे काही वेळा वाकलेली मानवी आकृती त्याला चारपायी प्राण्यासारखी भासू शकते. आधीच तणावाखाली असलेला वाघ अशा परिस्थितीत तात्काळ हल्ला करू शकतो. म्हणजे चंद्रपूरमध्ये घडलेली घटना “नरभक्षक वाघीण” या एका शब्दात मावणारी नाही. ती उष्णतेने बदललेल्या जंगलातील अस्थिरतेची घटना आहे.

धक्कादायक : व्याघ्र पर्यटनामुळे वाघांचे प्रजनन धोक्यात
पण मनुष्य विरुद्ध वन्यप्राणी संघर्ष या मुद्द्याला आणखी एक किनार आहे तो म्हणजे, जंगलात वाढलेला मानवी हस्तक्षेपही आहे. विशेषतः व्याघ्र पर्यटन. गेल्या दशकभरात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय व्याघ्र पर्यटन केंद्रांपैकी एक बनलं आहे. देशभरातून पर्यटक इथे येतात. जंगल सफारी ही आता एक मोठी अर्थव्यवस्था झाली आहे. रिसॉर्ट्स, लक्झरी स्टे, ऑनलाइन बुकिंग, व्याघ्रदर्शनासाठीची स्पर्धा, या सगळ्यामुळे जंगलाच्या आत मानवी हालचाली प्रचंड वाढल्या आहेत.
वाघसंख्या वाढणं हे निश्चितच संवर्धनाचं यश आहे. पण या यशाची दुसरी बाजूही आहे. सीसीएमबी (सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलेक्युलर बायोलॉजी)आणि सीएसआयआरने (कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रयल रिसर्च) केलेल्या संशोधनातून आता हे स्पष्ट झालं आहे की वाढत्या पर्यटनाचा वाघांच्या नैसर्गिक वर्तनावर गंभीर परिणाम होत आहे. २०२० ते २०२३ या काळात ताडोबा, बांधवगड, कान्हा, कॉर्बेट आणि पेरियार या व्याघ्र प्रकल्पांमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात संशोधकांनी ६१० वाघांच्या ७२८ विष्ठा नमुन्यांचं परीक्षण केलं. या नमुन्यांमधून तणाव आणि प्रजननाशी संबंधित हार्मोन्सचा अभ्यास करण्यात आला. त्यातून असं आढळलं की ज्या भागांमध्ये पर्यटनाचा दबाव अधिक आहे, तिथल्या वाघिणींमध्ये तणावाचं प्रमाणही जास्त आहे.
ताडोब्यासारख्या प्रकल्पांमध्ये हे चित्र अधिक स्पष्टपणे दिसतं. व्याघ्रदर्शनासाठी तयार करण्यात आलेले पाणवठे, दिवसातून अनेक वेळा फिरणारी वाहनं, इंजिनांचा आवाज, वाघांच्या जवळ जाऊन छायाचित्रण करण्याची स्पर्धा, या सगळ्याचा त्यांच्या नैसर्गिक वर्तनावर परिणाम होतो आहे. विशेषतः वाघिणी आता प्रजननासाठी आणि बछड्यांच्या संगोपनासाठी अधिक शांत आणि मानवी हस्तक्षेपापासून दूर जागा शोधू लागल्या आहेत. वाघिणींना बाळंतपणासाठी आणि बछड्यांचे संगोपन करण्यासाठी सुरक्षित, शांत आणि मानवी हस्तक्षेपापासून दूर जागा आवश्यक असतात. मात्र, जंगलातील 'गाभा' क्षेत्रामध्येही पर्यटनाचा दबाव वाढत असल्याने वाघिणी आता जंगलाच्या अधिक आतल्या आणि दुर्गम भागांकडे सरकत असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे. दीर्घकालीन दृष्टिकोनातून हा बदल वाघांच्या प्रजननावर परिणाम करू शकतो.
म्हणजे जंगलातली शांतता हळूहळू संपत चालली आहे. पूर्वी ज्या भागात वाघ सहजपणे राहत होते, ते भाग आता पर्यटनाच्या दबावाखाली आले आहेत. त्यामुळे वाघ अधिक आतल्या भागात सरकत आहेत. पण जंगलंही मर्यादित आहेत. एकीकडे वाढती वाघसंख्या, दुसरीकडे संकुचित होत चाललेले अधिवास, त्यात उष्णतेचा ताण आणि पर्यटनाचा दबाव, या सगळ्यामुळे जंगलातील संतुलन ढासळत आहे. आणि या ढासळलेल्या संतुलनाची पहिली किंमत कोण मोजतं? जंगलाच्या सीमेवर राहणारी गरीब माणसं.

वाढती वाघसंख्या, संकुचित होत चाललेले अधिवास
भारताने वाघसंख्या वाढवण्यात उल्लेखनीय यश मिळवलं आहे. ताडोबा परिसरातही वाघांची संख्या वाढली आहे. पण एक मूलभूत प्रश्न विचारला जातोय, वाघ वाढले, पण त्यांच्यासाठी पुरेसं सुरक्षित जंगल वाढलं का? जंगलांचे तुकडे होत आहेत. कोळसा खाणी, रस्ते, उद्योग, रिसॉर्ट्स, पर्यटन आणि मानवी वस्ती यामुळे अधिवासांवर दबाव वाढतो आहे. एका मर्यादित जागेत अधिक वाघ राहू लागले, तर परस्पर संघर्ष वाढतो. तरुण वाघ नवीन क्षेत्र शोधण्यासाठी बाहेर पडतात. काही वेळा ते मानवी वस्त्यांच्या दिशेने जातात. या परिस्थितीत उष्णता आणि पर्यटनाचा दबाव हा अतिरिक्त ताण निर्माण करतो. आणि शेवटी या सगळ्याचा परिणाम कुणावर होतो? जंगलाच्या सीमेवर राहणाऱ्या गरीब लोकांवर.
चंद्रपूरमध्ये मृत्यू झालेल्या महिला पर्यटक नव्हत्या. त्या जंगलात रोमांच शोधायला गेल्या नव्हत्या. त्या आपल्या घरासाठी अन्न शोधायला गेल्या होत्या. त्यांच्यासाठी जंगल म्हणजे निसर्गरम्य अनुभव नव्हे; ते उपजीविकेचं साधन आहे. भारतातील संवर्धनाच्या चर्चेत हा माणूस अनेकदा अदृश्य राहतो. “वाघ वाचवा” हा नारा दिला जातो, पण जंगलाच्या काठावर जगणाऱ्या लोकांचं आयुष्य किती असुरक्षित झालं आहे, याकडे फार कमी लक्ष दिलं जातं.
हवामान बदलाबद्दल बोलताना आपण अनेकदा शहरांमधील उष्णतेचा उल्लेख करतो. पण जंगलात त्याचे परिणाम अधिक गुंतागुंतीचे आहेत. तापमान वाढतं. पाणवठे आटतात. प्राण्यांच्या हालचाली बदलतात. मानवी संपर्क वाढतो. संघर्ष तीव्र होतो. पर्यटनामुळे जंगलातील शांतता कमी होते. अधिवासांवर दबाव वाढतो. आणि शेवटी हे सगळं जंगलाच्या सीमारेषेवर येऊन फुटतं.
चंद्रपूरमध्ये घडलेली घटना हे त्याचं भयावह उदाहरण आहे. उद्याच्या काळात तापमान आणखी वाढेल, पर्यटनाचं व्यापारीकरण आणखी तीव्र होईल आणि जंगलांवरील दबाव वाढतच राहील, तर अशा घटना अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यावर उपाय म्हणून केवळ “समस्याग्रस्त वाघ” पकडणं पुरेसं ठरणार नाही. जंगलातील पाणवठ्यांचं पुनरुज्जीवन, पर्यटनाचं वैज्ञानिक नियमन, वाघांच्या प्रजनन क्षेत्रांना संरक्षण, जंगलालगतच्या गावांसाठी सुरक्षित रोजगार आणि तेंदूपत्ता संकलकांसाठी सुरक्षा यंत्रणा यांचा गंभीरपणे विचार करावा लागेल. नाहीतर आपण वाघांची संख्या वाढल्याचा आनंद साजरा करत राहू आणि त्याच जंगलाच्या सावलीत माणसं मरत राहतील.
चंद्रपूरच्या जंगलात आज फक्त वाघ अस्वस्थ नाहीत. तिथलं संपूर्ण जंगल अस्वस्थ आहे. आणि त्या अस्वस्थ जंगलाच्या मध्यभागी एक महिला रोज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जाते. तिच्या हातात जगण्याची टोपली असते, पण तिच्या भोवती हवामान बदल, विस्कटलेलं संवर्धन आणि तापलेल्या जंगलांची अदृश्य भीतीही फिरत असते.






