ज्या दिवशी होमियोपॅथी शिकणाऱ्या 19 वर्षीय दलित विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, त्या दिवशी तिने आपल्या चुलत भावाला फोन करून डॉक्टरांकडे घेऊन जाण्यास सांगितलं. काही वेळानं तिनं परत फोन केला आणि म्हटलं की तिला कॉलेज कँपस बाहेर जाण्याची परवानगी दिली जात नाहीये. काही तासांनी, गुजरात मेहसाणा येथील मर्चँट होमियोपॅथी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या प्रथम वर्षाच्या त्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली.
तिनं शेवटच्या पत्रात लिहीलं- ‘माझी आत्महत्या माझ्या मित्रांना मदत करेल.’
29 जानेवारीच्या तिच्या मृत्यूनं सर्वांना हादरवलं आणि संस्थेतील शोषण, धमकी आणि अत्याचार यांच्या आरोपांची चौकशी सुरू झाली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे प्रशासनाने कॉलेज चार दिवस बंद ठेवलं. प्राचार्यांसहीत चार प्राध्यापकांना आत्महत्येसाठी भाग पाडल्याबद्दल अटक झाली आहे. पण ते जामिनावर सुटले. प्राध्यापक तिला शिव्या देत होते, तिच्यावर आरोप करत होते, शिक्षा देत होते, इतरांपासून वेगळं ठेवत होते असं तिच्या मित्रांचं म्हणणं आहे.
‘माझी आत्महत्या माझ्या मित्रांना मदत करेल.’
कॉलेज पुन्हा सुरू झालं आहे पण तणाव कायम आहे. चारही आरोपी प्राध्यापकांना वर्ग घेण्याची बंदी आहे. फॅकल्टी मेंबर्स काहीही बोलायला तयार नाहीत आणि विद्यार्थी यामुळे चिंताग्रस्त आहे की त्यांनी आंदोलन केलं त्याचा त्यांच्या विरोधात उपयोग करण्यात येईल कारण ते आता अंतिम परीक्षेची तयारी करत आहेत. मृतक मुलीच्या मित्राने सांगितलं, “आम्ही खूप घाबरलेले आहोत. ही परीक्षा आम्हाला उत्तीर्ण करायची आहे.” तर मृतकाच्या घरच्यांना अजूनही समजत नाहीये की तिच्या मृत्यूचं कारण काय होतं.
सुरेंद्रनगर जिल्ह्यातील पाटडी कोर्टातील वकील असेलेल तिचे वडील, प्रवीण श्रीमाली सांगतात, “माझ्या मुलीला लहानपणापासूनच डॉक्टर व्हायचं होतं. ती हुशार आणि मेहनती होती. मला आधीच सर्व गोष्टी माहिती असत्या तर कदाचित आज ती जिवंत असती.” पण प्राचार्य कैलाश जिंगा पटेल या आरोपांना नाकारतात. ते म्हणतात, “मला वाटलं नव्हतं की आमच्या कॉलेजात असं काही घडेल म्हणून. मी इथं 35 वर्षांपासून शिकवत आहे.”
मृतकाची जवळची मैत्रिण अंजीता पटेल दुःखी होती पण चकीत नव्हती. एका महिन्यापूर्वीच मुलीला एका प्राध्यापकाने वर्गात सर्वांसमोर रागावलं होतं. तिनं इथं प्रवेश घेतल्यापासून तिच्यासोबत ज्या गोष्टी घडल्या त्यापैकी ही ऐक होती. अंजीता म्हणते, “त्यानंतर तिनं म्हटलं होतं की मला आत्महत्या करायची आहे. महिन्याभरानं ती तिच्या खोलीत मृत आढळली.” मुलगी कॉलेजात प्रवेश मिळाला म्हणून खुश होती. ट्यूशन, कोचिंग न घेताच तिनं हे यश मिळवलं होतं.
2024 मध्ये आपलं डॉक्टर होण्याचं स्वप्न साकारण्यासाठी तिनं नागवाडा गावातील आपलं घर सोडलं. कुटुंबातील ती पहिली होमियोपॅथी डॉक्टर होऊ शकली असती. पण मागील काही महिन्यांपासून हे स्वप्न पूर्ण न होण्याच्या शक्यता सुरू झाल्या. आणखी एका विद्यार्थिनीनं सांगितलं. “प्राध्यापकांपैकी एकानं दलित मुलीचा अपमान केला होता. ‘आपल्या औकातीत राहा,’ असं त्यानं म्हटलं पण एफआयआर मध्ये त्याला उल्लेख नाही.”
‘’औकातीत राहात जा… नाहीतर’’!
आत्महत्येच्या दोन दिवसांनी पोलिसांना तिच्या खोलीत एक नोट मिळाली ज्यात तिनं आपल्या प्राध्यापकांना हैवान व यमराज म्हटलं होतं. तिनं चौघांची नावं लिहिली होती. होमियोपॅथी मटेरिया मेडिकाचे प्रा. विपाक्षी सुरेश राव वासनिक, मेडिसीनेच प्रा. प्रशांत चांदमलजी नुवाल, फार्मसीचे प्रा. वाय. चंद्र बोस आणि फिजियोलॉजीचे प्रा. संजय रिठे. तसेच प्राचार्य कैलाश जिंगा पटेल यांचंही नाव नोटमध्ये होतं. सर्वांवर भारतीय न्याय संहिता कलम 108 (आत्महत्येसाठी उचकवणं), कलम 54, आणि एट्रोसिटी अंतर्गत खटले दाखल करण्यात आले आहेत. एफआयआर मध्ये श्रीमाली यांनी आरोप केलाय की वासनिक त्यांच्या मुलीवर ओरडले होते व त्यांनी परीक्षेत नापास करण्याची धमकी दिली होती.
नुवाल यांनी तिला तीन वेळा जर्नल लिहायला सांगितलं होतं आणि चूक नसतानाही वर्गाबाहेर 3 तास उभं ठेवलं होतं. नुवाल यांनी तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचाही आरोप आहे. बोस तिला एकटीला वर्गात बोलवायचा आणि अश्लील बोलायचा असाही आरोप आहे. रिठे तिला वर्गात अपमानित करायचा आणि मग दिलासा देण्याचा नावाखाली चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. मुलीने जेव्हा प्राचार्याकडे याची तक्रार केली तर रिठेनं तथाकथितपणे म्हटलं की तिला कॉलेजात शिकायचं असेल तर हे सारं सहन करावं लागेल. कैलाश पटेल म्हणतात, “हे सर्व आरोप आहोत. मला याविषयी काही माहिती नाही.”
श्रीमाली यांनी मेहसाणा कोर्टात आरोपींच्या विरोधात बीएनएस कलम 74, 75 (लैंगिक शोषणाचे आरोप) अंतर्गत आरोप दाखल करण्याची याचिका केली पण पोलिसांनी ती पुरेसे पुरावे नसल्याच्या कारणावरून फेटाळली. श्रीमाली म्हणतात की त्यांच्या मुलीने जानेवारीच्या सहलीनंतर जे झालं त्याविषयी सांगितलं होतं. ते म्हणतात, “मी माझ्या मुलीला म्हटलं की प्राध्यापकांना गुरूजी म्हटलं जातं. त्यांचा असा काही वाईट विचार नसेल.”
अनुशासन की शोषण…?
मेहसाणाचे एसपी तरुण दुग्गल सांगतात, “चौकशी अजून सुरू आहे. आम्ही विद्यार्थी आणि प्राध्यापकांची चौकशी करत आहोत. अजून आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं नाही.” साठ एकर परिसरातील मर्चंट एज्युकेशन कॅम्पसमध्ये अनेक अभ्यासक्रम शिकवले जातात. होमियोपॅथीची स्थापना 2017 मध्ये 33 फॅकल्टींसोबत झाली होती. वर्षाला 95 हजार शुल्क इथं घेतलं जातं. अनेक विद्यार्थी म्हणतात की इथले प्राध्यापक सर्रास धमकावतात, शोषण करतात.
एक जण सांगते, “या गोष्टी आमच्या इथं नेहमीच घडतात. सुरूवातीलाच काही जणांना लक्ष्य केलं जातं आणि मग त्यांना वर्षभर त्रास दिला जातो.” प्राचार्यांनी या गोष्टी नाकारत म्हटलं की विद्यार्थी अनुशासन व नियमांना, शोषण व धमक्यांशी जोडत आहेत. ते म्हणाले, “कॉलेजची एक शिस्त आहे. ज्याचं सर्वांना पालन करावं लागतं. आम्हाला उपस्थिती ठेवावी लागते. विद्यार्थी 70-80 टक्के उपस्थितीच्या खाली गेला तर त्यांना आम्ही परीक्षेला बसू देत नाही. हे काही शोषण नाही.”

पण मुलीच्या मैत्रिणींनी सांगितलं की तिला अनेकदा लक्ष्य केलं जायचं. मृतक आणि कॉलेज प्रशासनात वादाची सुरूवात तेव्हा झाली जेव्हा प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना फार्मसी व्हिजीटसाठी जयपूरला जायचं होतं. त्यानंतर 5-13 जानेवारीला हरिद्वारला जायचं होतं. पटेल आणि मृतक मुलीला प्रवासाआधी घरी दोन दिवस जाण्यासाठी सुट्टी हवी होती. त्यांनी प्राचार्यांना तशी विनंती केली.
पटेल सांगते, “त्यांनी आम्हाला होकार दिला. पण आम्ही जेव्हा वर्गात होतो तेव्हा प्रा. विपाक्षी आत आले आणि त्यांनी आम्ही प्राचार्यांकडे गेलो म्हणून दम भरला, आमच्यावर ओरडले. त्यांनी परीक्षेत बसू न देण्याची धमकीही दिली.” त्यानंतर ती मुलगी पटेलसमोर रडली. तिनं म्हटलं की तिला मरायचं आहे. हे सारं 2 जानेवारीला घडलं. दोन्ही मुलींना प्राचार्य व प्राध्यापकांना माफीपत्र लिहून दिलं जे पटेल म्हणते तसं स्वीकारण्यात आलं नाही.
काही दिवसांनी मृतक आणि आणखी एका प्राध्यापकाचं भांडण झालं. एक जण सांगते, “प्राध्यापकांनी सर्वांना वर्गात एक स्पेशल बुक आणायला म्हटलं होतं. ज्यांनी आणलं नाही त्यांना बाहेर उभं राहण्यास सांगण्यात आलं. मग त्यांनी अचानक त्या विद्यार्थांची नावं विचारली ज्यांनी सुट्टी मागितली होती. त्यांनी अंजीता व त्या मुलीलाही बाकीच्यांसोबत बाहेर उभं केलं, त्यांनी पुस्तक आणलं होतं तरीही.”
तोपर्यंत खूप उशीर झाला होता…
प्राचार्य पटेल यांनी याविषयी काही सांगण्यास नकार दिला. पण त्यांनी म्हटलं की मुलींना सुट्टी दिली होती. ट्रीपवरून आल्यावर मुलीनं आपल्या आई-वडिलांना सारं काही सांगितलं. त्यामुळे वडील खूप चिंतेत पडले. श्रीमाली सांगतात, “मी कॉलेजमध्ये जाऊन प्राध्यापकांशी बोलणार होतो. पण त्याआधीच माझ्या पोरीनं आत्महत्या केली.” त्यांना कोणाशी बोलण्याची संधीच मिळाली नाही. ते कोर्टात असताना, त्यांना कॉलेजमधून फोन आला की त्यांच्या मुलीनं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे व तिला मेहसाणा सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे.
श्रीमाली तिथं पोहोचेपर्यंत त्यांच्या मुलीचं दूर्दैवानं निधन झालं होतं. श्रीमाली यांनी काय घडलं याविषयी मुलीच्या मैत्रिणींकडे चौकशी करायला सुरूवात केली. पटेल आणि पूजा मकवाना यांनी त्या दिवशी मृतक मैत्रिणीचा शोध घेतला. २९ जानेवारीला त्या तिघी कॉलेजमध्ये जाणार होत्या. पण मृतक म्हणाली की तिला हॉस्टेलला परत जायचं आहे. पटेल सांगते, “आम्ही मग हॉस्टेलला गेलो. आम्ही तिला विचारलं की तिला लंचला यायचं आहे का म्हणून. पण तिनं नकार दिला. म्हणाली की तिला भूक नाही आणि आंघोळ करायला निघून गेली.”
जेव्हा बाकीच्या मुली जेवण करून परतल्या आणि खोलीचं दार उघडायला गेल्या तर ते आतून बंद होतं. पटेल सांगते, “पूजा दाराच्या जवळच्या खिडकीतून आत बघायला स्टूलवर चढली होती. तिनं तिला पंख्याला लटकलेलं पाहिलं.” तिच्या मैत्रिणी सांगतात की ती साधीभोळी आनंदात राहणारी मुलगी होती. पण ती क्वचितच तिच्या मनात चालणाऱ्या गोष्टी कोणाला सांगायची. पटेल सांगते, “आम्हाला माहिती नव्हतं की तिला इतका त्रास होत आहे म्हणून. त्या ट्रीपवर जाण्याआधी आम्ही खूप दंगामस्ती केली होती. मलाही वर्गात टारगेट करण्यात आलं होतं आणि आम्ही कॉलेज बदलण्याचा निर्णय घेतला होता. पण काही उपाय करण्याआधीच हे घडलं.”
जिल्हा न्यायालयात मृतकाच्या मोठ्या भावाला तिच्या फोनवर काही गोष्टी मिळाल्या. त्यात तिची एक शेवटची व्हिडीयो रिल होती ज्यात मृतक आपल्या मैत्रिणींसोबत कारमध्ये बसलेली आहे आणि व्हिक्टरीची खूण करत आहे. तिच्या चेहऱ्यावर आनंद आहे, हसू आहे, जे पुन्हा कधीच परत दिसणार नाही.
(सौजन्य - द प्रिंट)
अनुवाद - प्रतिक पुरी






