- हरियाणातील हांसी येथे मोटार पंप चोरीच्या संशयावरून 32 वर्षीय दलित युवकाला बेदम मारहाण करून विहिरीत उलटे टांगल्याचा आरोप.
- पीडिताने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी जबरदस्तीने चोरीची कबुली देण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केला, तर घटनेचा व्हिडिओही चित्रीत करण्यात आल्याचा दावा.
- या प्रकरणी हत्या प्रयत्न, बेकायदेशीर बंधक बनवणे, गुन्हेगारी धमकी आणि एससी-एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
हरियाणातील हांसी जिल्ह्यातून मानवतेला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आलीये. कृषी शेतातील मोटार पंप चोरी केल्याच्या संशयावरून काही उच्चवर्णीय व्यक्तींनी अनुसूचित जातीतील एका 32 वर्षीय युवकाला बेदम मारहाण केलीये. इतकेच नव्हे तर त्याला दोरीने बांधून विहिरीत उलटे टांगण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय.
पीडित युवकाची ओळख बारू (वय 32) अशी असून तो सोरखी गावाचा रहिवासी आहे. बारू हा लोखंडी गेट आणि दरवाजे बनविण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत त्याने आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा भयानक घटनाक्रम सांगितला.
1 जून रोजी घडली घटना
प्राथमिक माहितीनुसार, ही घटना 1 जून रोजी दुपारी सुमारे 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. त्या दिवशी बारू सोरखी गावातून भाटोल गावाकडे जात होता. प्रवासादरम्यान त्याला अचानक पोटदुखी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे तो सुरेंद्र नावाच्या व्यक्तीच्या शेताजवळ थांबला. तक्रारीनुसार, नैसर्गिक विधीसाठी तो शेतात गेला असता तेथे उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी त्याला अडवले. या गटामध्ये दीपक, पवन, पशुवैद्यकीय कर्मचारी जोगा, पवन मंडासा, सुरेंद्र तसेच काही अन्य अज्ञात व्यक्तींचा समावेश होता. हे सर्वजण सोरखी गावातीलच रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे.
चोरीचा आरोप करून सुरू केली मारहाण
बारूच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्तींनी त्याच्यावर शेतातील मोटार पंप चोरी केल्याचा आरोप केला. त्याने हा आरोप फेटाळून लावला असतानाही आरोपींनी त्याला कोणतीही चौकशी न करता बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. लाकडी दांडके, लाथा-बुक्क्यांनी त्याला निर्दयपणे मारहाण करण्यात आली. मारहाणीमुळे तो गंभीर जखमी झाला. मात्र आरोपींचा संताप यावरही थांबला नाही. त्यांनी बारूला जबरदस्तीने दोरीने बांधले आणि शेतातील विहिरीत उलटे टांगल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलाय.

विहिरीत उलटे टांगून कबुलीजबाब मिळवण्याचा प्रयत्न
पीडिताच्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्याला विहिरीत उलटे टांगून मोटार पंप चोरीची कबुली देण्यासाठी दबाव आणला. त्याला मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला. जीवाच्या भीतीने तो सतत विनवण्या करत होता, मात्र आरोपींनी त्याची कोणतीही दखल घेतली नाही.
या अमानुष प्रकारादरम्यान आरोपी सुरेंद्र आपल्या मोबाईल फोनवर संपूर्ण घटना चित्रीत करत होता, असा आरोपही बारूने केलाय. त्यामुळे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची चर्चा सुरू झाली असून पोलिसांकडून त्याची सत्यता पडताळून पाहिली जातेय.
मारहाण आणि छळ केल्यानंतर आरोपींनी बारूला गंभीर परिणामांची धमकी दिली. या घटनेची माहिती कोणालाही दिल्यास त्याला ठार मारण्यात येईल, अशी धमकी देण्यात आल्याचे पीडिताने आपल्या जबाबात म्हटले आहे. या धमकीमुळे घाबरलेल्या बारूने सुरुवातीला कोणाकडेही तक्रार केली नाही. जीवाच्या भीतीने त्याने हा प्रकार गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला.
प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
घटनेनंतर काही दिवस बारू घरीच राहिला. मात्र शरीरातील वेदना असह्य झाल्याने 4 जून रोजी तो हांसी येथील नागरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात घेऊन तातडीने उपचार सुरू केले. उपचारादरम्यान त्याची विचारपूस करण्यात आली असता त्याने संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर 5 जून रोजी पोलिसांनी रुग्णालयात जाऊन त्याचा अधिकृत जबाब नोंदवला.

विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल
पीडिताच्या तक्रारीच्या आधारे बास पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये हत्या करण्याचा प्रयत्न, बेकायदेशीररीत्या बंधक बनविणे, गुन्हेगारी धमकी देणे तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्ह्यांचा समावेश आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
पोलिस अधीक्षकांची प्रतिक्रिया
हांसीचे पोलीस अधीक्षक विनोद कुमार यांनी या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “पीडिताच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण घटनेची सखोल चौकशी केली जात असून सर्व पुरावे गोळा करण्याचे काम सुरुये. तसेच सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या कथित व्हिडिओचीही तपासणी करण्यात येत आहे. व्हिडिओची सत्यता आणि त्यातील व्यक्तींची ओळख पटवून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल”, असे त्यांनी स्पष्ट केले.
घटनेची माहिती समोर आल्यानंतर विविध सामाजिक संघटना आणि दलित हक्कांसाठी कार्य करणाऱ्या संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. केवळ चोरीच्या संशयावरून एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारे मारहाण करणे आणि विहिरीत उलटे टांगणे ही अत्यंत अमानुष आणि कायद्याचा अवमान करणारी कृती असल्याचे मत ही समाज माध्यमांवर व्यक्त करण्यात येत आहे.
हरियाणातील ही घटना पुन्हा एकदा समाजातील जातीय भेदभाव, हिंसक मानसिकता आणि कायदा हातात घेण्याच्या प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरलीये आता या प्रकरणात पोलिस तपासातून नेमके सत्य समोर येण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जातेय.






