कुणाल रामटेके
विदर्भातील भटके विमुक्त विशेषतः मच्छीमार आणि अन्य शोषित वंचितांसाठी अविरत कार्यरत असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिनानाथ वाघमारे यांचे दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे निधन झाले. त्यांनी आपली अवघी हयात शोषितांच्या व्यापक हितासाठीच्या लढ्यात घालवली. याच काळात गेल्या सहा ते सात वर्षांपासून ते कॅन्सरसारख्या आजाराशीही झुंज देत होते. मात्र त्यांना भेटल्या नंतर कधी कोणत्याही प्रकारची नकारात्मकता जाणवत नव्हती. ते एक प्रेरणादाई विचारवंत कार्यकर्ते होते.
सामाजिक प्रश्न आणि त्यांना भिडण्याचा संविधानिक मार्ग याविषयीचे सतत चिंतन ते मांडत असत. वंचितांच्या विधायक लढ्याचा भावी कृती कार्यक्रम काय असला पाहिजे? आणि त्यासाठी आजारातून उठल्यावर आपण काय करणार याची मांडणी त्यांच्या शेवटच्या भेटीत त्यांनी केली होती. अलीकडेच ते ‘कोरो’ संस्थेच्या 'भटके विमुक्त संयोजन समिती, महाराष्ट्र राज्य' द्वारा आयोजित 'भटके विमुक्त संवाद यात्रे'त आपल्या आजारपणातही सहभागी झाले होते. त्यांच्या निधनाची बातमी ऐकली आणि त्यांच्या वैचारिक संघर्षाचा एक मोठा पट डोळ्यांसमोरून निघून गेला.
वंचितांच्या प्रश्नांना केवळ आंदोलनांपुरतेच मर्यादित न ठेवता त्याला विधायकतेची जोड देत अनेक अभ्यासपूर्ण लेख, १२ विश्वासहार्य अहवाल आणि ७ दिशादायी पुस्तके यांच्या माध्यमातून शासन आणि समाज यात प्रभावी हस्तक्षेप त्यांनी निर्माण केला. एकाच वेळी विचार, कृती आणि चिकित्सकतेची त्यांची पार्श्वभूमी कोणत्याही कार्यकर्त्याला प्रभावित करणारी होती. विदर्भातील पुरोगामी चळवळीत ज्यांचे आदराने नाव घेता येईल असे ते एक होते.

महाराष्ट्रात तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील कोंडाकोसरा या अत्यंत छोट्या आणि विकासापासून हजारो मैल दूर असलेल्या गावात ढीवर समाजात त्यांचा जन्म झाला. ज्या समाजात आपण जन्मास आलो त्या समाजाचे आपण देणे लागतो, या भूमिकेतून आयुष्यभर त्यांनी या आणि अशा वंचित समूहांच्या उत्थानासाठी काम केले. कुटुंबाची कोणतीही मोठी शैक्षणिक पार्श्वभूमी नसतांना नागपूर विद्यापीठातून बीएससीची पदवी घेत संगणक प्रशिक्षण व्यवसाय उभा करत कोणत्याही पाठबळा अभावी आपल्या परिश्रमातून मिळवलेला पैसा सामाजिक हितासाठी वापरला. स्वतःला सावरत इतरांच्या आयुष्याची काठी होण्याचा त्यांचा प्रयत्न केवळ परपांगी समाजसेवे पुरता मर्यादित न राहता आहे त्या परिस्थितीच्या मुळापर्यंत जात कारणांचा शोध घेत प्रश्नमुक्ती करण्याचा होता. यासाठीच त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून २०१२ साली नागपूर येथे ‘संघर्ष वाहिनी’ची स्थापना केली. या माध्यमातून भटक्या विमुक्त समाजाच्या आजीविका, निवारा आणि जमीन हक्क, आरोग्य आणि शिक्षण विषयक अधिकार, या समाजातील बालके आणि महिलांचे अधिकार यासाठी विधायक अशी चळवळ उभी केली.
आज महाराष्ट्रात भटके विमुक्त समुदायाच्या ४२ जाती-जमाती आहेत. त्यांचे स्वतंत्र आणि संविधान अमलबजावणीच्या ७५ वर्षा नंतरही नागरिक म्हणून किमान अधिकारही आपली शासन संस्था सुनिश्चित करू शकली नाही. या समूहाची नेमकी जनसंख्या काय? या प्रश्नाचे ठोस उत्तरही आपणास देता येत नाही. नागरिकत्वाच्या किमान दस्तांचा प्रश्न आजही अहिरणीवर उभा आहे. सरकारे आणि त्यांचे विविध आयोग येऊन गेले. मात्र या समूहांचे प्रश्न आपल्या सामाजिक आणि शासकीय अनास्थेचे जिवंत स्मारक ठरले आहेत.
भटके विमुक्त समुदायाच्या वंचनेचा शिक्षण अभाव हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. अशा वेळी या समाजाला शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात पालात राहणाऱ्या भटक्यांच्या १२५ वस्त्यांचे सामाजिक-शैक्षणिक सर्वेक्षण करून ६ ते १४ वयोगटातील हजारो मुले मोफत व सक्तीच्या शिक्षणापासून वंचित असून शाळाबाह्य आहेत, ही बाब दिनानाथ वाघमारे यांनी त्यांच्या ‘Out of School Children in NT-DNT’ या अहवालाच्या माध्यमातून मांडली. त्यांच्या या अहवालाची दखल घेत शासनाने २०१५ साली ७५ हजार वंचित कुटुंबातील शाळाबाह्य मुला-मुलींचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला.
‘संघर्ष वाहिनी’च्या माध्यमातून भटक्या-विमुक्त समुदायास त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तरतुदी मिळाव्यात यासाठी त्यांनी जातीनिहाय जनगणनेचा आग्रह त्यांनी धरला. महाराष्ट्रात आणि देशातही अर्थ संकल्पात विधायक आर्थिक वाटा भटक्या विमुक्तांना मिळावा यासाठी त्यांनी आर्थिक परिषदा घेतल्या. केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा कायद्यान्वये देशात कुणीही उपाशी राहू नये म्हणून प्रशासनाद्वारे राशन कार्ड वितरणाचे कार्यक्रम राबबावे, यासाठी अन्न सुरक्षा परिषद घेवून त्यांनी लक्ष वेधले. भटके विमुक्त समुदायातील पिडीत कुटुंबासाठी स्वतंत्र लोक अदालतीसाठी ते सतत आग्रही राहिले. राज्याच्या तिसऱ्या महिला धोरणात भटक्या समूहातील महिलांच्या मुलभूत हक्कांकडे कानाडोळा झाला त्यावेळी त्यात सुधारणा सुचवत त्यांनी सुचवलेल्या शिफारशी महिला धोरणात समाविष्ट करण्यात आल्या.
राज्य आणि देशातील भटके विमुक्तांच्या प्रश्नावर मांडणी करत असतांना विदर्भ हा त्यांच्या विविध सर्वेक्षणे, अभ्यास आणि कृती कार्यक्रमाचा ‘पायलट’ प्रकल्प होता. विदर्भातील विशेषतः मच्छीमार जाती-जमाती बाबत आढावा घेतांना पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा व नागपूर या सहा जिल्ह्यांतील ३१ तालुके आणि १६३ गावांतील १६०० परंपरागत भोई, ढिवर, कहार, केवट, मच्छिंद्र, कोळी या समुदायांच्या सर्वेक्षणावर आधारित 'मच्छीमारांमधील गरिबी आणि विषमता : कारणे व उपाय' या ग्रंथांचे त्यांनी लेखन केले. यासाठी दिनांक १ सप्टेंबर २०२३ ते २२ जानेवारी २०२४ या कालावधीत माहिती गोळा करत सर्वेक्षण आणि संशोधांच्या माध्यमातून समाजाचे दुख: व्यापक पटलावर आणले.
(दिनानाथ वाघमारे यांच्या आजारपणातील लेखकाची शेवटची भेट - दिनांक २४ मे २०२५)
या संशोधनात पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत मच्छीमार समुदायाची अंदाजे लोकसंख्या १२.३६ लाख असल्याचे त्यांनी संशोधनातून पहिल्यांदाच पुढे आणले. या समुदायातील ६३ टक्के कुटुंब भूमिहीन आहेत. संपत्ती व संसाधने नसल्याने बँकेतून व्यवसायासाठी कर्जदेखील उपलब्ध होत नाही. वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी सरासरी केवळ १११ दिवसच या समुदायातील पुरुषांना, तर ८४ दिवस महिलांना रोजगार मिळतो. त्यामुळे स्थलांतराशिवाय कोणताही पर्याय उरत नाही. मच्छिमार समुदायातील सुमारे ५२ टक्के जनता ही ५० हजार रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारी आहे. शिक्षणाचे प्रमाणही अत्यल्प असून उच्च शिक्षणात २६.६५ विद्यार्थ्यांची नोंदणी होते. पुढे संसाधनांच्या अभावी होत असलेल्या गळतीचा विषय गंभीर असून सर्वांगीण अभावाने हा समाज अद्यापही मुख्य आर्थिक-सामाजिक प्रवाहाचा भाग होऊ शकला नाही. आज जागतिक स्तरावरील मत्स्य उत्पादनाच्या १६ टक्के उत्पादन एकट्या चीनचे, तर त्या पाठोपाठ १४ टक्के उत्पादन हे भारताचे आहे. जगात दुसऱ्या क्रमांकाचे मत्स्योत्पादन करणारा भारत मच्छीमारांच्या प्रश्नांना न्याय देऊ शकला नसल्याची खंत त्यांनी या माध्यमातून व्यक्त केली.
भटके विमुक्त समुदायाचे प्रश्न आपल्या जातीपितृसत्ताक समाजात कधीचेच वाळीत टाकण्यात आले आहेत. मात्र भारतीय संविधानाच्या माध्यमातून निर्माण झालेली आशा, त्यातून मिळालेली दर्जा आणि संधीची समानता, नागरिक म्हणून देण्यात आलेले समता आणि न्यायाचे आश्वासन विधायक परिवर्तनास प्रेरित करणारे आहे. त्यातून जागा होणारा समुदाय आज आपल्या हक्कांसाठी पुढे येतो आहे. आपले प्रश्न मांडतो आहे. नेतृत्व करतो आहे.
आज दिनानाथ वाघमारे आपल्यात नाहीत. मात्र त्यांच्या सारखे अनेक सामाजिक कार्यकर्ते कोणत्याही भौतिक स्वार्थाची पर्वा न करता कार्यरत आहेत. हे कार्य असेच पुढे घेऊन जाणे आणि सामाजिक-आर्थिक समतेचा लढा संविधानिक मार्गांनी अधिक बुलंद करणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.
(लेखक ‘कोरो’ या सस्थेत कार्यरत आहेत.)





