टीम बाईमाणूस
- ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या 'Everybody Loves A Good Drought' या प्रसिद्ध ग्रंथाचा हेमंत कर्णिक यांनी मराठीत अनुवाद केलेले 'दुष्काळ आवडे सर्वांना' या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यात पार पडले.
- 'ओला आणि कोरडा दुष्काळ तर निसर्ग आणतोच, पण सरकारची चुकीची धोरणे, मानवनिर्मित टंचाई आणि जागतिक युद्धाचे सावट यामुळे निर्माण होणारा 'कृत्रिम दुष्काळ' हा ग्रामीण भारतासाठी अधिक घातक आणि विनाशकारी ठरत आहे,' असा सूर या विचारमंथनातून उमटला.
'ओला आणि कोरडा दुष्काळ तर निसर्ग आणतोच, पण सरकारची चुकीची धोरणे, मानवनिर्मित टंचाई आणि जागतिक युद्धाचे सावट यामुळे निर्माण होणारा 'कृत्रिम दुष्काळ' हा ग्रामीण भारतासाठी अधिक घातक आणि विनाशकारी ठरत आहे,' असा सूर पुण्यातील एका विशेष विचारमंथनातून उमटला.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या १३ आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'Everybody Loves A Good Drought' या प्रसिद्ध ग्रंथाचा हेमंत कर्णिक यांनी मराठीत अनुवाद केलेले 'दुष्काळ आवडे सर्वांना' हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले.
पुण्यातील एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन कॉन्फरन्स हॉल येथे २२ जुलै रोजी हा विशेष सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला पी. साईनाथ, शेती आणि पाणी प्रश्नांचे अभ्यासक डॉ. सोमिनाथ घोळवे, महिला किसान मंचच्या सीमा कुलकर्णी आणि अनुवादक हेमंत कर्णिक आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी मार्क्सवादी विचारवंत व जनशक्ती ग्रंथ प्रकाशनचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे होते. ग्रामीण भागातील दारिद्र्य, दुष्काळाचे राजकारण आणि सामाजिक वास्तवावर लख्ख प्रकाश टाकणाऱ्या या ४१२ पानांच्या महत्त्वपूर्ण ग्रंथाला वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.
सारणी आणि सांगवी गावची गोष्ट...
'दुष्काळ आवडे सर्वाना' या पुस्तकाचे लेखक पी. साईनाथ म्हणाले, बीडमधील ‘सारणी आणि सांगवी या गावांतील अनेक कुटुंबांना दरवर्षी दुष्काळामुळे घरदार सोडून ऊसतोड मजुरीसाठी भटकावे लागत होते. ऊसतोड मजुरी हे केवळ रोजगाराचे साधन नव्हते, तर ते सामाजिक अन्यायाचे आणि शोषणाचे चक्र होते.
पी. साईनाथ
मात्र, या परिस्थितीला शरण न जाता गावातील काही सुशिक्षित तरुणांनी मजुरीच्या या पारंपरिक साखळीतून बाहेर पडण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांनी पर्यायी रोजगाराचा मार्ग म्हणून ट्रक ड्रायव्हिंगचा व्यवसाय स्वीकारला. हळूहळू या तरुणांची एक मजबूत साखळी तयार झाली आणि त्यातून एका मोठ्या वाहतूक व्यवसायाचा जन्म झाला. ज्या हातांमध्ये एकेकाळी ऊसतोडीचे कोयते होते, त्यांनी ट्रकांचे स्टिअरिंग हातात धरून गावाला समृद्धीच्या दिशेने नेले.
हा संघर्ष इतका यशस्वी ठरला की, २०२५ पर्यंत सारणी–सांगवी परिसर ट्रक आणि लोडिंग कंटेनर व्यवसायाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखला जाऊ लागला. गावातील सुमारे ८० जणांकडे मिळून तब्बल ४०० ट्रक आणि लोडिंग कंटेनर जमा झाले. व्यवसायाला गती मिळाल्यानंतर देशातील मोठ्या आणि नामांकित ट्रान्सपोर्ट कंपन्यांनीही या गावकऱ्यांना विश्वासाने काम देण्यास सुरुवात केली.'
पुढे ते म्हणाले, 'गावाने स्वतःच्या हिमतीवर दुष्काळावर मात करून आर्थिक स्थैर्य मिळवले खरे, परंतु आज हा व्यवसाय एका वेगळ्याच संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. सध्या जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशात डिझेलची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. हजारो मैल दूर सुरू असलेल्या या युद्धाचा थेट परिणाम ग्रामीण महाराष्ट्रातील या दोन गावांच्या अर्थकारणावर झाला आहे. डिझेलच्या टंचाईमुळे आणि गगनाला भिडलेल्या भावांमुळे आज अनेक गाड्या जागेवरच उभ्या करण्याची वेळ आली आहे. ज्या गावकऱ्यांनी बँका किंवा फायनान्स कंपन्यांकडून कर्जे काढून गाड्या घेतल्या होत्या, त्यांच्यासमोर आता हप्ते कसे फेडायचे, हा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे.’
शेतकऱ्यांमध्ये दुष्काळाचा सामना करण्याची क्षमता
शेती आणि पाणी प्रश्नांचे अभ्यासक डॉ. सोमनाथ घोळवे म्हणाले, 'हे पुस्तक ज्या काळात प्रकाशित झालं, त्या काळात देशात उदारीकरण आणि जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली होती. सरकार ज्या कल्याणकारी योजना राबवत असल्याचं सांगतं, त्या प्रत्यक्षात लोकांचं कल्याण करण्यापेक्षा लाभार्थ्यांची संख्या वाढवण्याकडे अधिक झुकलेल्या दिसतात. आपल्याला ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ एवढेच माहित आहे.
पण योजनांमधून आणि धोरणांमधून समाजातील संपत्तीचा प्रवाह सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याऐवजी कमी केला जातो, कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. अशा परिस्थितीलाही 'दुष्काळ' म्हटलं पाहिजे. हा मानवनिर्मित दुष्काळ असतो. तो संथगतीने येतो, पण त्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं आणि त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकून राहतात.ओल्या आणि कोरड्या दुष्काळाचा सामना करण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये असते. मात्र, मानवनिर्मित दुष्काळाचा सामना करण्यासाठी त्यांच्याकडे तितकी क्षमता नसते.'
पुढे ते म्हणाले, 'शहरी चष्म्यातून शेतकऱ्यांकडे पाहून त्यांचे प्रश्न समजून घेता येणार नाहीत. शेतीचं अर्थकारण आणि शेतकऱ्याचं वास्तव समजून घेण्यासाठी वेगळ्या दृष्टीकोनाची गरज आहे. आज बहुतांश लोक शेतीचं अर्थकारण शहरी दृष्टिकोनातून पाहतात.
डॉ. सोमनाथ घोळवे
त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या वास्तवाकडे गांभीर्याने पाहिलं जात नाही.शहरी विकासाची सावली ग्रामीण भागावर पडत असल्यामुळे तेथील प्रश्न अधिक गुंतागुंतीचे होत आहेत आणि त्यांची सोडवणूक करताना अनेक अडचणी निर्माण होतात. शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तींचे आघात तर होतातच, पण त्याचबरोबर मानवनिर्मित धोरणांमुळेही त्यांना मोठे फटके बसतात. ही वस्तुस्थिती समजून घेणं आज अत्यंत गरजेचं आहे.'
'दुष्काळ आवडे सर्वांना' पुस्तक आमच्यासाठी महत्त्वाचं ठरलं
सोपेकॉमच्या सीमा कुलकर्णी म्हणाल्या, ‘आम्ही मराठवाड्यात काम सुरू केलं तेव्हा तिथला दुष्काळ, दलित समाज आणि महिला शेतमजुरांचे प्रश्न आमच्यासमोर ठळकपणे उभे होते. या प्रश्नांवर नेमकं कसं काम करायचं, यासाठी अनेक लोकांशी चर्चा केल्या आणि त्या विषयाचं सखोल वाचनही केलं.
त्या प्रक्रियेत 'दुष्काळ आवडे सर्वांना' हे पुस्तक आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं. दुष्काळाच्या प्रश्नाचे विविध पैलू समजून घेण्यासाठी या पुस्तकाने मोठी मदत केली. याच काळात महिला किसान मंचाची उभारणीही झाली. कारण दुष्काळ, शेतीवरील वाढतं संकट आणि शेतीतील बदलत्या पद्धतींचा सर्वाधिक भार महिला आणि आदिवासी समाजावर पडत असल्याचं स्पष्ट दिसत होतं.
पुढे त्या म्हणाल्या ‘दुष्काळाबाबतचं बहुतांश दस्तऐवजीकरण आणि मांडणी महिलांच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने पाणीटंचाईपुरतीच मर्यादित राहिली आहे. पाणी म्हणजे फक्त घरगुती वापराचा प्रश्न, अशा चौकटीत दुष्काळाकडे पाहिलं जातं. मात्र दुष्काळाचे परिणाम त्यापेक्षा कितीतरी व्यापक आहेत. त्याचा शेती, रोजगार, उपजीविका, स्थलांतर आणि महिलांच्या श्रमांवर खोल परिणाम होतो.आजही महिलांच्या नावावर किती जमीन आहे, याची विश्वासार्ह आकडेवारी उपलब्ध नाही. ग्रामीण भागातील सुमारे ८० टक्के महिला शेतीमध्ये प्रत्यक्ष काम करतात, पण त्यांच्या श्रमांची आणि योगदानाची अधिकृत नोंदच नाही. त्यामुळे महिलांना शेतकरी म्हणून मान्यता मिळत नाही आणि त्यांच्या प्रश्नांकडेही पुरेशा गांभीर्याने पाहिलं जात नाही.’
निसर्गाच्या दुष्काळाशी लढण्याची ताकद या देशाच्या शेतकऱ्यांत आणि तरुणांत नक्कीच आहे. परंतु, चुकीची धोरणे, जागतिक संकटे आणि उपेक्षित राहिलेले महिलांचे योगदान या मानवनिर्मित आव्हानांकडे वेळीच गांभीर्याने पाहिले नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचे कंबरडे कायमचे मोडेल. त्यामुळे केवळ योजनांचे आकडे न वाढवता वास्तवाला भिडणारी ठोस धोरणे आखणे हीच काळाची गरज आहे.






