कोमल ठोंबरे
- अवघ्या सात वर्षाच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या त्रिशा ठोसरला केवळ सोशल मीडियावर फॉलोअर्स नाहीत म्हणून अनेक चित्रपट आणि वेबमालिका नाकारण्यात आल्या आहेत.
- आजच्या मनोरंजन उद्योगाची बदलती भाषा आहे. गेल्या काही वर्षांत कास्टिंगची पद्धत मोठ्या प्रमाणात बदलली आहे ती म्हणजे कलाकाराचं सोशल मीडिया अस्तित्व.
- मनोरंजन उद्योगात ‘फॉलोअर्स’ ही नवी करन्सी बनली आहे. पण या करन्सीची किंमत कोण भरतोय? तो कलाकार, ज्याच्याकडे कौशल्य आहे पण ‘visibility’ नाही?
मुंबईतल्या अंधेरीत एका छोट्याशा ‘कास्टिंग ऑफिस’च्या बाहेर सकाळपासून गर्दी आहे. हातात पोर्टफोलिओ, मोबाईलमध्ये सेव्ह केलेले मोनोलॉग आणि चेहऱ्यावर थोडीशी भीती, थोडीशी आशा. ही सगळी तरुण मुलं-मुली एका वेब सिरीजसाठी ऑडिशन देण्यासाठी आलेली आहेत.
“नाव?”
“अभिजीत…”
“इंस्टाग्राम आयडी?”
‘कास्टिंग असिस्टंट’चा हा दुसरा प्रश्न आहे. अभिजीत क्षणभर थांबतो. त्याच्याकडे अभिनयाचं प्रशिक्षण आहे, दोन वर्षं थिएटर केलंय… पण त्याचा इंस्टाग्राम अकाउंट फारसा सक्रिय नाही.
“तीन हजार…” तो हळू आवाजात सांगतो.
कास्टिंग असिस्टंटच्या चेहऱ्यावर फारसा बदल दिसत नाही. “ठीक आहे, पुढे जा.”
ही केवळ एक ऑडिशन नाही तर ही आजच्या मनोरंजन उद्योगाची बदलती भाषा आहे. गेल्या काही वर्षांत मुंबई, पुणे, हैदराबादसारख्या शहरांमध्ये कास्टिंगची पद्धत मोठ्या प्रमाणात बदलली आहे. पारंपरिक ऑडिशन अजूनही होतात, पण त्यासोबत एक नवा निकष उभा राहिलाय तो म्हणजे कलाकाराचं सोशल मीडिया अस्तित्व.
एका कास्टिंग कोऑर्डिनेटरने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं,
“आमच्यावर प्रोड्यूसर्सचा स्पष्ट दबाव असतो. ते म्हणतात, ज्याच्याकडे ऑडियन्स आहे, त्यालाच प्राधान्य द्या. कारण तो आपल्या फॉलोअर्सना घेऊन येईल.”

Netflix, Amazon Prime Video, Disney+ Hotstar यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर रोज नवीन कंटेंट येत असतात. या स्पर्धेत प्रत्येक प्रोजेक्टला लगेच प्रेक्षक मिळणं गरजेचं असतं. त्यामुळे ‘रेडी-मेड ऑडियन्स’ असलेले कलाकार निर्मात्यांसाठी अधिक आकर्षक ठरतात.
मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक स्पर्धेच्या युगात एकवेळ आपण हा फंडा मान्यदेखील करू, परंतू जेव्हा एखाद्या बाल कलाकारासमोरदेखील अशी अट ठेवली जाते तेव्हा…
असंच काहीसं घडलं आहे रूपेरी पडद्यावर आपल्या सहजसुंदर वावराच्या जोरावर वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार पटकावणाऱ्या मराठमोळ्या त्रिशा विवेक ठोसर या बाल कलाकाराच्या बाबतीत…
इन्स्टा फॉलोअर्स कमी म्हणून सिनेमात घेतलं नाही - बालकलाकार त्रिशा ठोसर
सात वर्षाच्या त्रिशा ठोसरकडे केवळ सोशल मीडियावर फॉलोअर्स नाहीत, या एकमेव कारणामुळे अनेक चित्रपट आणि वेबमालिका नाकारण्यात आल्या आहेत. एकीकडे १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध आणण्याची चर्चा जोर धरत असताना अशा बालकलाकारांकडून फॉलोअर्सची अपेक्षा कशी ठेवली जाऊ शकते, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘नाळ २’ या चित्रपटातील ‘चिमी’च्या भूमिकेसाठी त्रिशाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एवढ्या लहान वयात हा मान मिळवणारी त्रिशा अष्टपैलू कलाकार कमल हासन यांच्यानंतर केवळ दुसरी बालकलाकार ठरली होती. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमासाठी अलीकडेच त्रिशाला ‘मटा सन्मान २०२६’ मध्ये लक्षवेधी कामगिरी म्हणून सन्मानित करण्यात आले. याशिवाय बीसीआयएफएफ गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पेशल ज्युरी मेन्शन, झी चित्रगौरव, फिल्मफेअर, महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार पासून राष्ट्रीय पुरस्कार; अशा अनेक सन्मानांनी तिच्या कामाची दखल घेतली आहे.
राष्ट्रीय पुरस्कार पटकावला तरी सोशल मीडिया ठरतोय अडचण!
इतक्या लहान वयात चमकदार यश मिळवूनही गेल्या काही महिन्यांत त्रिशाला पाच-सहा विविध सिनेमे, वेबमालिका प्रोजेक्ट्समधून केवळ सोशल मीडिया फॉलोअर्स कमी असल्यामुळे नाकारण्यात आले. त्रिशा सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही. केवळ सिनेमाच्या प्रमोशनल गोष्टीच किंवा पुरस्कारांची माहिती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिची आई गौतमी ठोसर टाकत असतात. सर्व यशानंतरही पुढे संधी मिळण्यात सोशल मीडिया फॉलोअर्स हा निकष पुढे येत असल्याने प्रश्न निर्माण होत आहेत.

गौतमी ठोसर यांनी सांगितले की, ‘माझी मुलगी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्हावी, अशी आमची अजिबात इच्छा नाही. ती एक बालकलाकार आहे आणि तिचे मुख्य लक्ष अभिनयावर आणि शिक्षणावर असायला हवे, असेच आम्हाला वाटते. आजकाल लहान मुलांकडूनही सतत व्हिडिओ बनवणे, कंटेंट तयार करणे, फॉलोअर्स वाढवणे याची अपेक्षा ठेवली जाते, पण आम्ही त्या शर्यतीत नाही धावायचे, असे ठरवले. त्रिशा सध्या तिच्या कामात खूप चांगली प्रगती करत आहे. चित्रपटांमधील भूमिका, सेटवरील अनुभव आणि त्यातून शिकणे; हीच तिची खरी ओळख आहे. आम्हाला तिच्या अभिनय कौशल्यावर विश्वास आहे. फॉलोअर्सच्या आकड्यांमागे धावण्यापेक्षा ती एक उत्तम अभिनेत्री बनावी, हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे’.
कोण आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेती 7 वर्षीय त्रिशा ठोसर?
त्रिशाचा अभिनयाकडे असलेला कल अगदी लहानपणापासूनच दिसून येत होता. तिच्या कुटुंबाने तिच्या प्रतिभेला ओळखले आणि ती जोपासण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांनी त्रिशाला नाट्य आणि स्थानिक नाटकांमध्ये अनुभव दिला, ज्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला. या मार्गदर्शनाने, तिच्या सहज अभिनयासह, तिला राष्ट्रीय रंगमंचावर नेले. तिच्या अभिनयात नैसर्गिक निरागसता आणि अभिव्यक्तीची खोली होती, ज्यामुळे प्रेक्षक आणि ज्युरी सदस्य दोघांचेही मन जिंकले.
त्रिशाची कारकीर्द लहान असली तरी, तिने अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले आहे, ही स्वतःमध्ये एक महत्त्वाची कामगिरी आहे. तिने प्रसिद्ध चित्रपट निर्माते महेश मांजरेकर आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव यासारख्या मराठी चित्रपटसृष्टीतील प्रमुख नावांसोबत काम केले आहे. हा एक अमूल्य अनुभव आहे, ज्यामुळे तिला अभिनयाचे बारकावे समजण्यास मदत झाली आहे.
“ऑडिशन आधी फॉलोअर्स: कलाकाराचा कस की आकड्यांची सत्ता?”
गेल्या काही काळापासून मनोरंजन क्षेत्रात एक नवीन प्रकार उदयास आला आहे, तो म्हणजे सोशल मीडियावरील फॉलोअर्स बघून कलाकाराची भूमिकेसाठी निवड करणे. किंवा सोशल मीडियावर अधिक फॉलोअर्स असणाऱ्या व्यक्तीची एखाद्या भूमिकेसाठी निवड करणे. या प्रकाराबद्दल अनेक कलाकारांनी भाष्य केलं आहे. तसंच सोशल मीडियावरील फॉलोअर्स बघून एखाद्या भूमिकेसाठी निवड होणे याबद्दल स्पष्ट शब्दांत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
मराठी अभिनेत्री प्राजक्ता हनमघरने या प्रकारावर आपली स्पष्ट भूमिका व्यक्त केली आहे. प्राजक्ता म्हणते की, “हल्ली सोशल मीडियावरील फॉलोअर्स बघून कास्टिंग केलं जातं. हे मला विशेषच वाटतं. मला त्याचा त्रास होतो किंवा आनंद होतो; यापेक्षा मला हे खूप गंभीर वाटतं. मग एक मिलियन आणि बिलियनमध्ये असलेले फॉलोअर्स तिकीट काढून चित्रपट बघायला का येत नाहीत? त्याच्या निम्म्या लोकांनी तरी चित्रपट बघितला पाहिजे किंवा तुमचं काम बघितलं पाहिजे ना?”
यानंतर प्राजक्ताने असंही म्हटलं, “सगळी माध्यमे वेगवेगळी आहेत आणि प्रत्येक माध्यमाची गरजही वेगवेगळी आहे. हे आपल्याकडील लोकांच्या कधी लक्षात येणार माहीत नाही. प्रत्येक माध्यमाचं महत्त्व हे तितकंच आहे. आम्ही ज्या माध्यमात काम करत आहोत, इन्फ्लुएन्सर ज्या माध्यमात काम करतात किंवा निवेदक वगैरे ज्या माध्यमात काम करतात, ही सगळी माध्यमे वेगवेगळी आहेत. त्यामुळे आता माध्यमांची सरमिसळ करणं मला धोकादायक वाटत आहे. पुढे येणाऱ्या गोष्टींसाठी हे खूप धोकादायक आहे.”
थिएटर विरुद्ध ‘रील्स’... एक नवा संघर्ष
पुण्यातून मुंबईत आलेली साक्षी गेली तीन वर्षं थिएटर करतेय. तिने अनेक प्रयोगांमध्ये काम केलंय, पुरस्कारही मिळवलेत. पण गेल्या सहा महिन्यांत तिला एकही मोठं ऑडिशन कॉल आलेलं नाही.
“माझ्या एका मित्राने सरळ सांगितलं, तू reels बनवायला सुरुवात कर. नाहीतर तुला कोणी पाहणारच नाही,” साक्षी म्हणते.
स्वातीसारख्या अनेक कलाकारांसाठी हा सल्ला एक प्रकारचा तडजोडीचा मार्ग आहे. कारण त्यांच्यासाठी अभिनय ही एक गंभीर प्रक्रिया आहे, जी ‘ट्रेंडिंग’ कंटेंटमध्ये बसत नाही.

दुसऱ्या बाजूला, सोशल मीडियावर लोकप्रिय झालेले अनेक चेहरे आता थेट वेब सिरीज आणि चित्रपटांमध्ये दिसू लागले आहेत. एका प्रोडक्शन मॅनेजरच्या मते, “त्यांच्याकडे आधीपासून लाखो फॉलोअर्स असतात. त्यामुळे प्रमोशनचा अर्धा भार ते स्वतः उचलतात. हे बिझनेसच्या दृष्टीने फायदेशीर आहे.”
ही बाजू पूर्णपणे चुकीची नाही. डिजिटल प्लॅटफॉर्म्सने अनेक नव्या कलाकारांना संधी दिल्या आहेत. पण या प्रक्रियेत ‘टॅलेंट’ आणि ‘ट्रेंड’ यांचं नातं गुंतागुंतीचं होत चाललं आहे.
अमरावतीच्या एका छोट्या गावातून आलेला शंतनू सांगतो, “माझ्याकडे स्मार्टफोनच नव्हता काही वर्षांपूर्वी. इथे आल्यावर अकाउंट उघडलं. पण फॉलोअर्स वाढवणं ही एक वेगळीच लढाई आहे.” शंतनूसारख्या अनेकांसाठी हा प्रश्न केवळ ‘स्किल’चा नाही, तर ‘अॅक्सेस’चा आहे. डिजिटल साधनं, वेळ, आणि नेटवर्क हे सगळं सर्वांनाच समान मिळत नाही.
या सगळ्या प्रक्रियेत एक मोठा बदल दिसतो तो म्हणजे, कलाकाराची ओळख बदलते आहे. तो आता फक्त भूमिका साकारत नाही, तर सतत स्वतःला ‘दिसवत’ राहतो. दररोज पोस्ट, reels, collaborations या सगळ्यामुळे कलाकार एक प्रकारची ‘कंटेंट मशीन’ बनतो. त्याच्या आयुष्याचा प्रत्येक भाग ‘एंगेजमेंट’मध्ये मोजला जातो. एका सिनियर अभिनेत्याने सांगितलं, “आमच्या काळात आम्ही भूमिकांसाठी जगायचो. आजची पिढी अल्गोरिदमसाठी जगते.”
“तुझे फॉलोअर्स किती?—मराठी इंडस्ट्रीतलं नवं ऑडिशन”
मुंबईतल्या हिंदी आणि OTT विश्वाबरोबरच, मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतही हा बदल हळूहळू पण ठळकपणे दिसू लागलाय. एकेकाळी मराठी इंडस्ट्री ही ‘अभिनयाचा कस’ पाहणारी, थिएटरमधून आलेल्या कलाकारांना उचलून धरणारी म्हणून ओळखली जायची. पण आता इथेही ‘फॉलोअर्स’चा प्रश्न ऑडिशन रूममध्ये शिरलाय.
पुण्यातील एका कास्टिंग एजन्सीशी बोलताना एक वेगळीच बाजू समोर आली.
“मराठी मालिकांमध्ये TRP हा मोठा फॅक्टर आहे. पण आता प्रोड्यूसर्स विचारतात, या कलाकाराचा सोशल मीडिया कसा आहे? कारण प्रमोशनमध्ये तो उपयोगी पडतो,” असं एका कास्टिंग असिस्टंटने सांगितलं.

टीव्ही चॅनेल्स आणि OTT प्लॅटफॉर्म्सवर प्रचंड स्पर्धा आहे. मराठी मालिकांना केवळ टीआरपीवर अवलंबून राहून चालत नाही, तर सोशल मीडियावर चर्चेत राहणंही तितकंच गरजेचं बनलं आहे. इथेच कलाकाराच्या ‘डिजिटल उपस्थिती’ला महत्त्व मिळतं. मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या एका तरुण अभिनेत्याने सांगितलं, “ऑडिशननंतर मला थेट विचारलं गेलं की तुझं इंस्टाग्राम अकाउंट active आहे का? कारण आम्हाला शोचं प्रमोशन करायला लागेल.” त्याचं ऑडिशन चांगलं झालं होतं, पण त्याच्याकडे फारसे फॉलोअर्स नव्हते. भूमिका दुसऱ्याला मिळाली, जो सोशल मीडियावर जास्त सक्रिय होता.
“दिसणं की असणं? मराठी इंडस्ट्रीतला कलाकाराचा संघर्ष”
ही केवळ एक-दोन उदाहरणं नाहीत. गेल्या काही वर्षांत अनेक मराठी कलाकारांनी स्वतःहून सोशल मीडियावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे. कारण त्यांना जाणवतंय, ही आता ‘अतिरिक्त गोष्ट’ नाही, तर ‘आवश्यकता’ बनली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतही हा ट्रेंड डोकावतो आहे. विशेषतः कमी बजेटच्या चित्रपटांमध्ये प्रमोशनसाठी मोठी रक्कम खर्च करणं शक्य नसतं. त्यामुळे निर्माते अशा कलाकारांकडे वळतात, ज्यांच्याकडे आधीपासूनच स्वतःचा प्रेक्षकवर्ग आहे. एका दिग्दर्शकाने सांगितलं,
“आमच्याकडे मार्केटिंगसाठी मर्यादित बजेट असतं. जर एखाद्या कलाकाराकडे २-३ लाख फॉलोअर्स असतील, तर तो आमच्यासाठी अॅसेट ठरतो.”
ही बाजू समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण हा केवळ ‘टॅलेंट विरुद्ध फॉलोअर्स’ असा सरळ संघर्ष नाही तर हा एक आर्थिक आणि संरचनात्मक बदल आहे, ज्यात कलाकार ‘अभिनेता’ असण्याबरोबरच ‘मार्केटिंग पार्टनर’ही बनतो.
पण या बदलाचा परिणाम पुन्हा त्याच वर्गावर होतो, थिएटरमधून आलेले कलाकार. मराठी रंगभूमी ही आजही अनेक उत्कृष्ट कलाकार घडवते. पण त्या कलाकारांना सोशल मीडियावर स्वतःला मांडण्याची सवय नसते. त्यांचं लक्ष अजूनही भूमिकेच्या तयारीवर असतं, ‘रील्स’वर नाही.
या सगळ्या अनुभवांमधून एक गोष्ट स्पष्ट होते. मनोरंजन उद्योगात ‘फॉलोअर्स’ ही नवी करन्सी बनली आहे. पण या करन्सीची किंमत कोण भरतोय? तो कलाकार, ज्याच्याकडे कौशल्य आहे पण ‘visibility’ नाही? की तो प्रेक्षक, ज्याला हळूहळू ‘कंटेंट’ आणि ‘कला’ यांच्यातला फरक विसरायला लागतोय?
मुंबईतल्या त्या कास्टिंग ऑफिसच्या बाहेर अजूनही रांग लागलेली आहे.
प्रत्येकाच्या हातात पोर्टफोलिओ आहे… आणि खिशात एक मोबाईल. प्रश्न फक्त एवढाच आहे, त्या मोबाईलमध्ये ‘किती फॉलोअर्स’ आहेत?






