(नूतन)
रमेशभाई मागील महिन्यात गुजरातच्या हिमालय मॉल जवळचं आपलं लहान दुकान उघडत असतानाच त्यांना टायरच्या घासण्याचा आवाज आला. त्यानंतर जोरदार टक्कर झाली. त्यांनी मागे वळून पाहिलं तर एक पांढरी ‘थार’ गाडी समोर उभ्या असलेल्या गाड्यांवर आदळली होती. ते म्हणतात, “मी फक्त बघत उभा होतो,” त्यांचा आवाज थरथरत होता.
पण खरा खेळ अजून बाकी होता. थार-चालक 24 वर्षीय हरेश ठाकोर बाहेर पडला. तो संतापलेला दिसत होता. घटनेचा व्हिडीयो काढत असलेल्या एका मुलावर त्यानं हल्ला चढवला. लोक आता ओरडत होते, पळत होते. रमेशभाई सांगतात, “त्याला चढली होती यात शंका नाही. तो हिंसकही झाला होता. बारमधली लढाई त्यानं आता रस्त्यावर आणली होती.”
दारूबंदी असलेल्या गुजरात मध्ये दारू पिऊन गाडी चालवून झालेला हा आणखी एक अपघात होता. यात आता वाढ होत आहे आणि पोलिस असहायपणे बघत आहेत. ठाकोरच्या गाडीनं एक दुचाकी आणि तीन कार तोडल्या. यात प्रेरक मोदीचीही कार होती. त्यानं ठाकोरला याविषयी विचारलं तेव्हा ठाकोरनं त्याला शिवीगाळ करत त्याच्यावर आणि त्याच्या वडिलांवर हल्ला चढवला. यात प्रेरकचा 15 हजाराचा मोबाईल कुठेतरी हरवला. लोक जमलेले पाहून ठाकोरनं चाकू काढला, रस्त्यावरचे दगड उचलले आणि लोकांवर फेकू लागला. लोकांनी मग त्याला ठोकणं सुरू केलं. ठाकोरच्या हल्ल्यातही अनेक लोक जखमी झाले. 
गुजरातमध्ये दारूबंदी असली तरी…?
गुजरातमध्ये दारू-बंदी आहे. पण इथल्या अपघाताच्या घटनांवरून तसं काही वाटत नाही. राज्याच्या परिवहन विभागानुसार अहमदाबादमध्ये 2024 साली दारू पिऊन गाडी चालवण्याच्या 2,081 घटना घडल्या. प्रत्यक्ष आकडे जास्त असल्याची शक्यता आहे. 2025 मध्ये आत्तापर्यंत 580 लोकांना अशा घटनांमध्ये अटक झाली आहे, म्हणजेच दिवसाला 9 अटक. मागील वर्षी दिवसाला 5 अटक असे प्रमाण होते. वडोदरामध्ये होळीच्या रात्री 31लोकांना अटक झाली होती.
यातून पुन्हा तोच प्रश्न येतो, गुजरातमधील दारू-बंदी कामाची नाही हे समजण्यासाठी आणखी किती अपघात होण्याची गरज आहे? मार्च महिन्यात वडोदरामध्ये एका विद्यार्थ्यानं करेलीबाग इलाक्यात लोकांवर कार चालवली. हेमाली पटेल यांचा यात मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले, यात लहान मुलंही होती. लोकांनी जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कार-चालक रक्षित चौरासिया बाहेर आला आणि हसत ओरडला, ‘अनदर राऊंड’ आणि मग ओम नमः शिवायचा जाप करू लागला. ‘अनदर राऊंड’ फक्त नशेतली बकबक नव्हती तर एक घोषणा होती, टोस्ट होता, एक असा क्षण ज्यामुळे लोक स्तब्ध झाले. जणूकाही इथं नाटक सुरू होतं आणि झालेल्या घटनेची त्याला अजिबात काळजी नव्हती.
अहमदाबाद येथे डिसेंबर 2024 मध्ये एका ट्रक-चालकानं एका माणसाला व त्याच्या तीन वर्षांच्या नातीला चिरडलं होतं. अशा भयंकर घटना घडूनही मोटार वाहन कायदा 185 अंतर्गत संबंधित गुन्हेगारावर प्रकरण दाखल केलं जात नाही. त्यामुळे प्रत्यक्ष आणि सरकारी आकडेवारीत अंतर राहतं. यामुळे या प्रश्नाचं खरं स्वरूप पुढे येत नाही. रस्ते सुरक्षा आणि परिवहन विशेषज्ञ, डॉ. प्रियांक त्रिवेदी सांगतात, “दारू पिऊन घडणाऱ्या अपघातांमध्ये चुकीचं रिपोर्टींग किंवा रिपोर्टींग न होण्याची शक्यता जास्त असते. उपलब्ध आकडेवारी जमिनीवरील प्रत्यक्ष स्थिती दाखवत नाही. विशेषतः यात प्रभावशाली लोकांचा संबंध असेल तर. यावर उपाय म्हणून एखादं एप विकसीत करता येईल. ज्यात लोक अशा घटनांची जास्तीतजास्त माहिती टाकू शकतील. यामुळे खरी माहिती जमा होण्यास मदत होईल.”
संबंधित लेख वाचा: 1) दारुबंदी असलेल्या गडचिरोलीत दारूनिर्मितीचा कारखाना… डॉ. अभय बंग विरुद्ध सरकारच्या लढाईत कोण जिंकणार? |
मिजानला दररोज भयावह स्वप्न पडतात
दरियापूरचा वीस वर्षांचा मिजान दिवसा झोपतो आणि रात्री जागतो. आपल्या वाईट स्वप्नांपासून वाचण्याचा हाच एक मार्ग त्याच्याकडे आहे. स्वप्नात त्याला दिसतं की तो रस्त्यावर उभा आहे, एक कार वेगानं त्याच्याकडे येत आहे, तो ओरडत आहे, ‘वाचवा-वाचवा.’ मग घामानं भिजलेला मिजान जागा होतो. दोन वर्षांनंतरही तो हे विसरला नाही आहे. ज्या अपघातामुळे त्याची ही दुःस्वप्नं सुरू झाली तो जुलै 2023 मध्ये इस्कॉन फ्लायओव्हरचा अपघात आहे ज्यात तथ्य पटेल याने आपल्या जग्वार गाडीनं अनेकांना धडक दिली ज्यात 9 लोक जागीच ठार झाले आणि 10 जखमी झाले.
मिजान जखमींपैकी एक होता. फ्लायओव्हरवर एक कार आणि ट्रकचा आधीच अपघात झाला होता आणि त्यात सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी गर्दी जमली होती. मिजानही त्यांच्यात होता. तेव्हाच पटेलची गाडी गर्दीत घुसली. मिजानचा पाठीचा कणा आणि पाय चिरडला गेला. त्याच्या उपचारावर १० लाखांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. त्याचं कुटुंब सामान्य उत्पन्न गटातील आहे ज्यांना हा खर्च परवडण्यासारखा नाही. अपघातानंतर त्याला शाळा सोडावी लागली. मृतांमध्ये दोन पोलिस शिपाई देखील होते.
लोकांनी सांगितलं की पटेल नशेत होता. मिजानची आई रेहाना आपले डोळे पुसत सांगते, “तो आपल्या दोन मित्रांसोबत फिरत होता. अपघातात सापडलेल्या लोकांची मदत करायला थांबला होता. कोणाला ठाऊक होतं की त्याचा दयाळूपणा आमच्यासाठी शाप ठरणार आहे म्हणून.” रेहाना यांना दोन मुलं आहेत. मिजान आता 20 वर्षांचा आहे. त्याच्या दोन्ही पायांत चार फ्रॅक्चर आहेत. कुटुंबाची सारी बचत संपल्यानंतर त्याचं डॉक्टरकडे जाणं बंद झालं आहे. आता तो फक्त घरी असतो. रेहाना रोज दारू, सरकार आणि दारूड्या चालकांना शिव्याशाप देत असतात. त्या म्हणतात, “दारू प्यायला मिळत असेल तर दारूबंदीला काय अर्थ आहे? श्रीमंत माणसं दारू पितात आणि आम्ही गरीब लोक त्यांच्या दारूची किंमत चुकवतो.”
‘’आधी आम्ही क्रिकेटवर बोलायचो, आता दररोज अपघातांवर बोलतो’’
रोज सकाळी पाच वाजता, 62 वर्षीय रमेशचंद्र अहमदाबाद मध्ये आपल्या घरापासून आपल्या मित्रांसोबत 2-3 किलोमीटरच्या फेरफटक्याला बाहेर पडतात. नेहमी हे मित्र रोजच्या विषयांवर हलक्याफुलक्या गप्पा मारायचे पण आता त्यात एकच विषय असतो. “आधी आम्ही क्रिकेट, आमचे नातू, मुलं याविषयी बोलायचो. पण आता कोणत्या रस्त्यावर अपघात झाला, कोणी गाडी ठोकली याविषयी बोलत असतो. रोजच पेपरमध्ये अशा अपघाताच्या बातम्या येत आहेत. अनेकजण नशेतच गाडी चालवत असल्याचं दिसून येतं.”
अशा अपघातांची चर्चा आता व्हॉट्सएप ग्रुपवरही सुरू असते. रोजच्या या अपघातांमुळे गुजरातच्या मध्यम वर्गीय परिसरात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. रस्ते सुरक्षितपणे पार करता येणं ही मोठी समस्या बनली आहे. अहमदाबादमध्ये फेब्रुवारीत एक हीट-अँड-रन प्रकरणात एका महिलेचा मृत्यू झाला. चार लोक जखमी झाले. एका पांढऱ्या कारनं त्यांना उडवलं आणि पळून गेली. दुसरीकडे एका ऑडी-चालकानं सहा गाड्यांना धडक मारली.
त्यानंतर तो शांतपणे आपल्या कारमध्ये बसून सिगरेट पित असल्याचा व्हिडीयो समोर आला. त्याला कोणताही पश्चाताप झालाय असं दिसत नव्हतं. इतक्या गंभीर अपघातानंतरही त्याला लवकरच जामीन मिळाला. अशा बऱ्याच प्रकरणात आरोपी हे संपन्न, श्रीमंत आणि राजकीय सत्तेशी निकट असलेले लोक असतात ज्यामुळे त्यांना कायदेशीर परिणाम कमीच भोगावे लागतात.
एक वरिष्ठ परिवहन अधिकारी सांगतात, “कायद्याची अंमलबजावणी कमकुवत आहे. प्रकरणांची नोंद झाली तरीही त्यांना मोटार कायदा 185 अंतर्गत दाखल करण्यात येत नाही. अनेक प्रकरणांमध्ये बाहेरच प्रकरण मिटवलं जातं किंवा निष्काळजीपणे गाडी चालवल्याची फुटकळ कलमं लावली जातात.”
आता मला स्कुटीवरून मुलाला शाळेत सोडायला भिती वाटते…
अपघातात सापडलेल्या कुटुंबासाठी या फक्त घटना नसतात तर त्यांचं सगळं जगणंच यामुळे बदलून जातं. अहमदाबादच्या छाया पटेल आपल्या ९ वर्षांच्या मुलाला रोज दुचाकीवरून शाळेत सोडायच्या. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी असं करणं बंद केलं. वाढत्या अपघातांमुळे त्यांनी हा निर्णय घेतला. मुलगा आता व्हॅनमधून येतो. त्या सांगतात, “त्याला शाळेत सोडणं, परत आणणं मला खूप आवडायचं. तो खास आमचा वेळ असायचा. पण आता रोजच्या अपघाती घटना पाहून भीती वाटते. माझ्या नवऱ्यानं सांगितलं की आमच्या जाण्यायेण्याच्या मार्गावरच मोठा अपघात घडला. त्यानंतर मुलगा, कधीच घरी न येण्यापेक्षा उशीरा आला तरी चालेल असं त्यानं आणि माझ्या सासूनं म्हटलं. मी त्याचा विरोध करू शकले नाही.”
गुजरातच्या विचित्र कायद्यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. दारुबंदी असली तरीही दारू-तस्कर, खासगी पार्ट्या, अनौपचारिक नेटवर्कमधून दारू सहजपणे मिळते. गुजरात उच्च न्यायालयानं म्हटलं होतं की वाहन-चालकांसाठी दारूची लहानशी मात्राही मान्य असणार नाही, तरीही प्रत्यक्षात यावर काही कारवाई केली जात नाही. गुजरातमधल्या अशा अपघातानंतर जे व्हिडीयो व्हायरल होतात त्यात पोलिसांवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले जातात. पण पोलिस वेगळी आकडेवारी देतात ज्यात सुरक्षा वाढत आहे, कारवाई योग्य होत आहे आणि अपघात कमी होत आहे. अहमदाबाद परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार, रस्ते अपघातातील मृतांच्या संख्येत २५ टक्के घट झाली आहे. 2019-25 दरम्यान 102 घटना घडल्या ज्यात 19 लोक मेले आणि 100 लोक जखमी झाले. पण प्रत्यक्ष आकडे यापेक्षा जास्त असल्याची शक्यता आहे ज्यांची नोंदच झाली नाही.
पोलिसांच्या आकडेवारीत गडबड कशी?
संयुक्त पोलिस आयुक्त एन. एन. चौधरी सांगतात, “अन्य राज्यांच्या तुलनेत आम्ही ही आकडेवारी नियंत्रणात आणली आहे. मुंबईत कित्येक पीएसआय फक्त अशा अपघातांच्या प्रकरणांच्या तपासासाठीच नेमलेले आहेत. आमची आकडेवारी सुधारली आहे. अपघातांवर आम्ही नियंत्रण आणलं आहे.” काही अधिकारी म्हणतात की दारूबंदी असलेल्या राज्यात दारूचा काळाबाजार ही अटळ गोष्ट असते. एक अधिकारी सांगतो, “प्रत्येक निषिद्ध गोष्टीचा काळाबाजार सुरू होत असतो. आम्ही नियमीतपणे छापे टाकतो आणि दारू जप्त करतो. पण सामान्य अपघातातही लोकांना वाटतं की चालकानं दारू पिली आहे. कायद्यानुसार ब्रेथलायजर मध्ये जोवर 100 मिली मध्ये 30 मिली अल्कोहोल मिळत नाही तोवर आम्ही कलम 185 मध्ये ते प्रकरण नोंदवू शकत नाही.”
पोलिस म्हणतात की ते कडक कारवाई करतात- वाहनं जप्त करतात, अटक करतात आणि अपघाताची पुष्टी झाल्यानंतर लायसन्स रद्द करण्याची शिफारस करतात. पण रस्त्यांवर वेगळाच नजारा दिसतो. दारू पिऊन गाडी चालवण्याची प्रकरणं कधीच पूर्णपणे तपासली जात नाहीत. विशेषज्ञ सांगतात की दारू पिऊन गाडी चालवण्याच्या प्रकरणात अनेक प्रकरणं नोंदवली जात नाहीत किंवा चुकीची नोंदवली जातात. किंवा ती पूर्णपणे सुटतात. ब्रेथलायजर नसेल तर हे जास्त घडतं. सरकारी आकडे काहीही सांगोत लोकांच्या भावना त्याच्या उलट आहेत आणि त्यातही हाय-प्रोफाईल घटनांमध्ये होणारी वाढ अधिक भयंकर आहे. त्रिवेदी म्हणतात, “हे बघणं अत्यंत दुःखद आहे की अपघातातून वाचलेले लोक जगण्यासाठी किती व कसे धडपडत असतात.
आकडेवारीतून त्यांचा हा संघर्ष दिसत नाही. दारू पिऊन गाडी चालवण्याची प्रकरणं कधीच नीट तपासली जात नाहीत. दारू न प्यालेला माणूस एक सेकंदात प्रतिक्रिया देतो तर दारू प्यायलेल्या व्यक्तीला 2-4 सेकंद लागू शकतात आणि हे अंतर जीवघेणं ठरू शकतं. भारतीय रस्ते सुरक्षा यंत्रणेत एक मोठी उणीव आहे. दारूच्या न्यूरोसायकोलॉजिकल प्रभावांना कायद्याच्या प्रक्रियेत स्विकारलं जात नाही. बहुतेक गंभीर अपघातांमध्ये आपण दारूची उच्च पातळी बघतो पण त्याची नोंद केली जात नाही. व्हिडीयोत हे स्पष्ट दिसून येतं की चालक नशेत होता. प्रश्न हा आहे की यावर आपण काही उपाययोजना का करत नाही?”
मिजान आपल्या घरी पलंगावर झोपलेला आहे. मागील दोन वर्षांतील अधिकतर काळ त्यानं इथंच घालवला आहे. खिडकीतून बाहेरचं जग बघत असतो जिथं तो आता पूर्वीसारखा जाऊ शकत नाही. तो म्हणतो, “लोक म्हणतात की तो फक्त एक अपघात होता. पण त्यानं माझं सारं काही हिरावून घेतलं आहे. माझी शाळा, माझे पाय, माझी झोप. आणि ज्या माणसानं हे केलं तो काय करत होता? तो नशेत गाडी चालवत होता.” त्याच्या खोलीच्या खिडकीबाहेर शहराची नेहमीची गती सुरू आहे, गाड्या धावत असतात, लोक जातात, सायरन वाजतात, जगणं सुरू आहे पण मिजान आणि त्याच्यासारख्या असंख्य लोकांचं जगणं त्या अपघातापाशीच थांबलेलं आहे, ज्यात त्यांचा काहीच दोष नव्हता.
(सौजन्य - द प्रिंट)
अनुवाद - प्रतिक पुरी






