Skip to main content

प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेलं अमेरिका, पण शस्त्रांच्या सावलीत जगणारं असुरक्षित समाजजीवन

Article in Marathi
Bhaga Warkhade
22 Apr 2026
4 min read
13 views
प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेलं अमेरिका, पण शस्त्रांच्या सावलीत जगणारं असुरक्षित समाजजीवन

भागा वरखडे



  • अमेरिका हे जगातील सर्वात शक्तिशाली आणि समृद्ध राष्ट्रांपैकी एक असून, आर्थिक प्रगती, तंत्रज्ञान आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यासाठी ओळखले जाते.


  • मात्र या तेजस्वी प्रतिमेमागे व्यक्तिगत शस्त्रास्त्रांचा वाढता वापर आणि त्यातून होणाऱ्या हत्या हे एक गंभीर वास्तव दडलेले आहे.


  • ही समस्या केवळ अमेरिकेपुरती मर्यादित नसून, जागतिक चिंतेचा विषय बनली असून भारतासह इतर देशांसाठीही अभ्यासाचा मुद्दा ठरत आहे.


अमेरिकेत शस्त्र बाळगणे हा संविधानिक अधिकार आहे. या अधिकारामुळे नागरिकांना स्वतःच्या सुरक्षेसाठी बंदूक ठेवण्याची मुभा मिळते; परंतु याच स्वातंत्र्याचे रूपांतर कालांतराने ‘शस्त्रसंस्कृती’ त झाले आहे. त्याचा प्रत्यय दोन दिवसांपूर्वी आला. एका माथेफिरूने बंदुकीच्या गोळ्या झाडून आठ मुलांची हत्या केली. विशेष म्हणजे त्यात सात मुले त्याची स्वतःचीच होती. संपन्न राष्ट्र असलेल्या अमेरिकेत अशा घटना नव्या नाहीत. विविध अभ्यासांनुसार, अमेरिकेत दरवर्षी सुमारे तीस ते चाळीस हजार लोकांचा मृत्यू शस्त्रास्त्रांमुळे होतो. यामध्ये खून, अपघात आणि आत्महत्या या तिन्ही प्रकारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या मृत्यूंपैकी मोठा वाटा आत्महत्यांचा असतो. 


मानसिक आरोग्याच्या गंभीर प्रश्नाकडे हे आकडे निर्देश करतात. सामूहिक गोळीबाराच्या घटनांनी तर अमेरिकेची ओळखच जणू बदलून टाकली आहे. शाळा, चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स आदी सार्वजनिक ठिकाणे आता सुरक्षित राहिलेली नाहीत. काही अहवालांनुसार, वर्षातील जवळपास प्रत्येक दिवशी एखाद-दुसरी गोळीबाराची घटना घडते.


या घटनांमुळे केवळ जीवितहानीच होत नाही, तर समाजाच्या मानसिक आरोग्यावरही खोल परिणाम होतो. भीती, असुरक्षितता आणि अविश्वास यांची भावना नागरिकांच्या मनात घर करते. या हिंसाचारामागील कारणे बहुआयामी आहेत. सर्वप्रथम, शस्त्रांची सहज उपलब्धता हा प्रमुख घटक आहे. अनेक राज्यांमध्ये शस्त्र खरेदीसाठीची प्रक्रिया तुलनेने सुलभ आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे मानसिक आरोग्याच्या समस्या. नैराश्य, एकाकीपणा, तणाव आणि सामाजिक तुटलेपणा यामुळे व्यक्ती असंतुलित वर्तनाकडे वळू शकते. तिसरे म्हणजे, हिंसेचे काही प्रमाणात गौरव करणारी संस्कृती. चित्रपट, व्हिडीओ गेम्स आणि माध्यमांमधून दिसणारा प्रभाव हीदेखील एक बाजू आहे. जगातील सर्वात संपन्न आणि प्रगत देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेकडे पाहताना एक विरोधाभासी चित्र समोर येते.


अमेरिकेतील विऱोधाभासी वास्तव


एका बाजूला प्रचंड आर्थिक विकास, उच्च जीवनमान, तंत्रज्ञानातील आघाडी आणि वैयक्तिक स्वातंत्र्याची कास धरलेली व्यवस्था; तर दुसऱ्या बाजूला वाढती असुरक्षितता, मानसिक ताणतणाव आणि शस्त्रांच्या दुरुपयोगातून घडणाऱ्या भीषण सामूहिक हत्याकांडांची मालिका. ‘संपत्ती म्हणजे समाधान’ हा समज अमेरिकेच्या बाबतीत खोटा ठरताना दिसतो. अमेरिकेत शस्त्र बाळगण्याचा अधिकार हा संविधानिक हक्क मानला जातो. आज परिस्थिती अशी आहे, की देशात लोकसंख्येपेक्षा अधिक बंदुका उपलब्ध आहेत. शस्त्र मिळवण्याची सुलभता, पार्श्वभूमी तपासणीतील त्रुटी आणि शिथिल नियमावली यामुळे शस्त्रांचा दुरुपयोग वाढत चालला आहे. दरवर्षी अमेरिकेत हजारो लोक शस्त्रांमुळे प्राण गमावतात. यात आत्महत्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. 


User Image

सामूहिक गोळीबाराच्या घटना तर आता दुर्दैवाने नित्याच्या झाल्यासारख्या आहेत. शाळा, मॉल, कार्यालये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कधीही हिंसा उसळू शकते, अशी भीती सामान्य नागरिकांच्या मनात घर करून बसली आहे. या सगळ्यामागे केवळ शस्त्रांची उपलब्धता हा एकमेव घटक नाही, तर मानसिक आरोग्य, सामाजिक एकाकीपणा, कौटुंबिक ताणतणाव तसेच काही सांस्कृतिक घटकही तितकेच जबाबदार आहेत.


मानसिक ताण, राजकारण आणि वाढत चाललेली गुंतागुंत


मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष ही अमेरिकेतील मोठी समस्या आहे. प्रचंड स्पर्धा, यशस्वी होण्याची सततची धडपड, वैयक्तिक आयुष्यातील तुटलेले संबंध आणि सामाजिक आधारव्यवस्थेचा अभाव यामुळे अनेक लोक नैराश्याच्या गर्तेत ढकलले जातात. अशा स्थितीत सहज उपलब्ध असलेली शस्त्रे ही विनाशाची साधने बनतात. एका क्षणाच्या आवेगातून घडलेली कृती अनेक निष्पाप जीव घेऊन जाते. अमेरिकन राजकारणातही या प्रश्नावर तीव्र मतभेद आहेत. एक गट शस्त्र बाळगण्याच्या अधिकाराचे कट्टर समर्थन करतो, तर दुसरा गट कठोर नियंत्रणाची मागणी करतो. परिणामी ठोस आणि सर्वमान्य धोरण आखण्यात अडथळे निर्माण होतात. या राजकीय दुराव्याचा थेट परिणाम म्हणजे समस्या अधिकच गंभीर होत जाणे. ही प्रवृत्ती केवळ अमेरिकेपुरती मर्यादित राहिलेली नाही. युरोपातील काही देशांमध्येही शस्त्रसंबंधित हिंसाचाराच्या घटना वाढताना दिसतात. 


जागतिक प्रभाव आणि भारतातील परिस्थिती


जरी तिथे कायदे तुलनेने कठोर असले, तरी जागतिकीकरण, स्थलांतर, अतिरेकी विचारसरणी आणि सामाजिक असंतोष यामुळे परिस्थिती गुंतागुंतीची बनत आहे. काही प्रमाणात अमेरिकेतील संस्कृतीचे अनुकरण आणि माध्यमांमधून होणारा प्रभावही या बदलाला कारणीभूत ठरत आहे. भारताच्या संदर्भात चित्र काहीसे वेगळे आहे. येथे शस्त्रास्त्रांवर नियंत्रण ठेवणारे कायदे तुलनेने कडक आहेत. परवाना मिळवण्याची प्रक्रिया कठीण असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडे शस्त्रांची संख्या मर्यादित आहे, तरीही भारत पूर्णपणे सुरक्षित आहे असे म्हणता येणार नाही. काही अहवालांनुसार, भारतात दरवर्षी हजारो खुनांच्या घटना घडतात; परंतु त्यातील सर्वच घटना शस्त्रास्त्रांशी संबंधित नसतात. अनेकदा धारदार शस्त्रे, वैयक्तिक वाद किंवा सामाजिक संघर्ष ही कारणे असतात. 


User Image


भारतामध्ये बेकायदेशीर शस्त्रांचा प्रश्नही गंभीर आहे. काही भागांमध्ये अवैध मार्गाने शस्त्रे मिळवली जातात आणि त्यांचा वापर गुन्ह्यांसाठी केला जातो. तसेच, काही ठिकाणी शस्त्र बाळगणे हे प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते. ही मानसिकता भविष्यात धोकादायक ठरू शकते. त्यामुळे, कायद्याबरोबरच सामाजिक दृष्टिकोनात बदल घडवणे आवश्यक आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘समाधान मानण्याची वृत्ती’ हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. आधुनिक समाजात भौतिक यशाला प्रचंड महत्त्व दिले जाते; परंतु मानसिक समाधान आणि भावनिक स्थैर्य याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. अमेरिकेसारख्या देशात प्रचंड संपत्ती असूनही लोक असमाधानी का आहेत, हा प्रश्न विचारण्यासारखा आहे. सततची स्पर्धा, उच्च अपेक्षा, वैयक्तिक आयुष्यातील ताण आणि सामाजिक एकाकीपणा यामुळे समाधान हरवते. अशा स्थितीत काही व्यक्ती हिंसेकडे वळतात.


भारतासमोरील आव्हाने, बेकायदेशीर शस्त्रे आणि बदलती मानसिकता


भारतातही काही चिंताजनक प्रवृत्ती दिसू लागल्या आहेत. काही भागांत शस्त्र बाळगणे हे सुरक्षेपेक्षा प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते. विवाहसमारंभ, राजकीय कार्यक्रम किंवा वैयक्तिक वादांमध्ये शस्त्रांचे प्रदर्शन आणि वापरही अधूनमधून दिसून येतो. याशिवाय बेकायदेशीर शस्त्रांची उपलब्धता हीही एक गंभीर समस्या आहे. भारतासमोर आव्हान असे आहे, की अमेरिकेसारखी परिस्थिती उद्भवू नये यासाठी योग्य वेळी प्रभावी पावले उचलणे. कडक कायद्यांची अंमलबजावणी, बेकायदेशीर शस्त्रांवर नियंत्रण, तसेच नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे, तणाव व्यवस्थापनासाठी साधने उपलब्ध करून देणे आणि कुटुंबव्यवस्थेला बळकट करणे हीही तितकीच महत्त्वाची पावले आहेत.


समाधानाची गरज आणि आधुनिक समाजातील ताणतणाव



शस्त्र हे मूलतः संरक्षणाचे साधन आहे; परंतु त्याचा वापर जर आक्रमणासाठी आणि निष्पाप लोकांचे प्राण घेण्यासाठी होत असेल, तर ते समाजासाठी घातक ठरते. कोणताही अधिकार निरंकुश असू नये. जेव्हा एखादा अधिकार मानवतेलाच धोका निर्माण करू लागतो, तेव्हा त्यावर मर्यादा घालणे ही समाजाची आणि शासनाची जबाबदारी ठरते. प्रगती ही केवळ आर्थिक संपन्नतेत नसून, सुरक्षितता, मानसिक समाधान आणि सामाजिक समरसतेत असते.


User Image

अमेरिकेच्या अनुभवातून धडा घेत, जगातील इतर देशांनी विशेषतः भारताने संतुलित, संवेदनशील आणि दूरदृष्टी असलेली धोरणे स्वीकारणे ही काळाची गरज आहे. भारतातील पारंपरिक समाजरचना, कुटुंबव्यवस्था, सामाजिक बंध आणि सांस्कृतिक मूल्ये ही काही प्रमाणात मानसिक आधार देतात. त्यामुळे येथे समाधानाची भावना तुलनेने अधिक दिसते; मात्र शहरीकरण, बदलती जीवनशैली आणि वाढती स्पर्धा यामुळे ही परिस्थितीही बदलू लागली आहे. त्यामुळे भारतानेही सावध राहणे गरजेचे आहे. 


उपाययोजना, जबाबदारी आणि सुरक्षित समाजाची गरज


उपायांच्या दृष्टीने पाहिले तर, केवळ कायदे कडक करणे पुरेसे नाही. मानसिक आरोग्य सेवा मजबूत करणे, समाजात संवाद वाढवणे, कुटुंबव्यवस्थेला बळ देणे आणि हिंसेविरुद्ध संवेदनशीलता निर्माण करणे आवश्यक आहे. अमेरिकेसाठी शस्त्र नियंत्रणाचे धोरण अधिक कडक करणे, पार्श्वभूमी तपासणी सुधारणे आणि मानसिक आरोग्यावर अधिक गुंतवणूक करणे गरजेचे आहे. भारताने बेकायदेशीर शस्त्रांवर कठोर कारवाई करणे आणि नागरिकांमध्ये जबाबदारीची जाणीव वाढवणे आवश्यक आहे. कोणताही देश केवळ आर्थिकदृष्ट्या बलाढ्य असणे पुरेसे नसते. खरे सामर्थ्य हे सुरक्षित, समाधानी आणि सुसंवादी समाजात असते. शस्त्रास्त्रांच्या छायेत जगणाऱ्या समाजाला शांततेचा मार्ग शोधावा लागेल आणि तो मार्ग केवळ कायद्यांत नव्हे, तर मानवी मूल्यांत आणि समाधानाच्या शोधात दडलेला आहे.


Share this article
 पंतप्रधानांच्या ‘राष्ट्रीय त्यागा’ची भाषा आणि धोरणांची गप्पी…
कॉलम

पंतप्रधानांच्या ‘राष्ट्रीय त्यागा’ची भाषा आणि धोरणांची गप्पी…

पंतप्रधानांच्या ‘राष्ट्रीय त्यागा’च्या आवाहनात एक महत्त्वाचा प्रश्न गायब आहे तो म्हणजे भारत दरवर्षी अब्जावधी डॉलर्स खाद्यतेल आयातीवर का खर्च करतो? १९९० नंतरच्या धोरणांनी भारताची स्वयंपूर्ण तेलबिया अर्थव्यवस्था कशी मोडली आणि त्याची किंमत आज महाराष्ट्रातील शेतकरी कशी मोजतो आहे? सोयाबीनच्या पडत्या भावापासून ते हवामान बदलामुळे वाढलेल्या रोगराईपर्यंत, ग्रामीण भारत एका दुहेरी संकटात अडकला आहे. ‘त्याग’ नागरिकांनी करायचा, पण धोरणात्मक ‘खोडा’कडे पाहायचं नाही, हीच आजच्या अर्थव्यवस्थेची मोठी शोकांतिका आहे.

4 min read
G
Girish Patil
सलग 11 दिवस अन् न थांबता 13 हजार मैल उडणारा गॉडविट पक्षी…
कॉलम

सलग 11 दिवस अन् न थांबता 13 हजार मैल उडणारा गॉडविट पक्षी…

गॉडविट पक्षी, वजन किती? फार तर सहाशे ग्रॅम… ऑक्टोबर महिन्याच्या १३ तारखेला पहाटे पाच वाजून १० मिनिटांनी अलास्कावरून निघतो. १३ हजार किलोमीटर कुठंही न थांबता उडतो उडतो उडतो आणि २४ ऑक्टोबरला पहाटे चार वाजून ५५ मिनिटांनी टास्मानियात पोचतो.

4 min read
N
Nilu Damle
Why Climate Action in India Needs Culture to Succeed
Column

Why Climate Action in India Needs Culture to Succeed

While scientific reports and finance frameworks drive formal climate policy, they often fail to connect with the lived realities of local communities. From stand-up comedy about Mumbai’s air pollution to multilingual rap and local folk traditions, culture is emerging as the "behavioral public infrastructure" needed to translate complex data into emotional engagement and collective action.

6 min read
S
Sanjiv Gopal and Brikesh Singh
 एखाद्या देशात चक्क उंदराचा पुतळा का उभारण्यात येतो…?
कॉलम

एखाद्या देशात चक्क उंदराचा पुतळा का उभारण्यात येतो…?

सुरुंग आणि स्फोटकं शोधून हजारो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या 'मागवा' नावाच्या उंदराचा आता कंबोडियामध्ये पुतळा बसवण्यात येणार आहे. मागवा उंदीर स्फोटकांचा वास सव्वीस पटीने अधिक वेगाने घेऊ शकत होता. त्याला तसे खास प्रशिक्षण देण्यात आले होते. पाच वर्षांपूवी त्याचे निधन झाले. या कामगिरीसाठी मागावाला कंबोडिया सरकारने सुवर्ण पदकही दिले होते.

5 min read
N
Nilu Damle
‘फॅक्ट-चेक' च्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी…?
कॉलम

‘फॅक्ट-चेक' च्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी…?

फॅक्ट-चेक युनिटच्या माध्यमातून सरकारकडून माध्यमांवर नवे नियंत्रण. सरकारच्या नव्या नियमांमुळे पत्रकारितेत वाढतेय सेन्सॉरशिपची मोठी भीती. कायद्याच्या आडून सरकारविरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न.

5 min read
B
Bhaga Warkhade
 ‘खरात’ आपल्या ‘घरात’ नको असेल तर काय करायला हवं…?
कॉलम

‘खरात’ आपल्या ‘घरात’ नको असेल तर काय करायला हवं…?

खरात नको आपल्या घरात, असे म्हणताना आपण हे समजून घेतले पाहिजे की ज्योतिष, मंत्र-तंत्र आणि चमत्कारांच्या नावाने चालणाऱ्या संपूर्ण फसवणुकीलाच आपल्या घराचा दरवाजा बंद केला पाहिजे. कारण भोंदूंचा दरवाजा बाहेर नसतो; तो घरातूनच उघडतो.

5 min read
V
Vinayak Savle

Comments

Comments are currently disabled or loading...