Skip to main content

कधी काही प्रकरणांत निर्दोष मुक्तता, कधी पॅरोलवर बाहेर… गुरमीत राम रहीमचा ‘महिमा’ अद्याप टिकून आहे का…?

Article in Marathi
Dhyanesh Maharav
21 Mar 2026
29 views
 कधी काही प्रकरणांत निर्दोष मुक्तता, कधी पॅरोलवर बाहेर… गुरमीत राम रहीमचा ‘महिमा’ अद्याप टिकून आहे का…?

ज्ञानेश महाराव


  • बुवाबाजीचा भांडाफोड करणाऱ्या पत्रकार रामचंद्र छत्रपतीच्या खून प्रकरणातून गुरमीत राम रहीमची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने अलीकडेच निर्दोष सुटका केली.
  • त्यापूर्वी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने डेरा प्रबंधन समितीचे सदस्य रणजित सिंह हत्या प्रकरणात गुरमीत राम रहीमची निर्दोष मुक्तता केली होती.
  • त्याची २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा १० वर्षांवर आलीय. त्यामधून राम रहीमचा महिमा अद्याप टिकून असल्याची साक्ष मिळते.


"मोदी सरकार" २०१४ मध्ये सत्तेत येण्यापूर्वीच भक्तांच्या मुलींवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात आसाराम बापू, मुलगा नारायण साई याच्यासह जेलबंद झाला होता. त्यावेळी निघालेल्या निषेध मोर्च्यात आणि चर्चांत "संघ-भाजप परिवार" संघटना "काँग्रेस आघाडी सरकार"ला हिंदुविरोधी ठरवत आघाडीवर होत्या. "मोदी सरकार" सत्तेत आल्यावर आसारामबापूची सुटका होईल, अशा बाता मारल्या जात होत्या. प्रत्यक्षात उलटे झाले. रामपाल महाराज (हिस्सार, राजस्थान), रामवृक्ष यादव (मथुरा, उत्तर प्रदेश),  राम रहिम (सिरसा, हरयाणा) असे आणखी तीन "राम" त्यांच्या बदकर्मी व्यवहारामुळे आसारामप्रमाणेच तुरुंगात गेले.  


रामपालचा हिस्सार येथे "सतलोक आश्रम" होता. तिथे आपल्या अनुयांना कैदेत ठेवणे आणि २६ भक्तांचा खून करणे, ह्या आरोपांखाली त्याला २०१४ मध्ये अटक झाली. या पोलीस कारवाईच्या वेळी झालेल्या संघर्षात सहा जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा निकाल २०१८ मध्ये लागला. त्यात रामपाल ह्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. दरम्यान, जून २०१६ मध्ये रामवृक्ष यादव याच्यावर पोलीस कारवाई झाली. तो स्वतःला "बाबा जयगुरू देव"चा वारसदार समजायचा.


त्याने "आझाद भारत वैदिक वैचारिक क्रांती सत्याग्रही संप्रदाय" स्थापन करून आपल्या सत्संगासाठी मथुरेतील "जवाहर बाग" परिसरातील २८० एकर सरकारी जमीन हडप केली होती. तिच्या रक्षणार्थ त्याने आपल्या अंधभक्तांचे सशस्त्र दल तयार केले होते. (त्यामुळे त्याच्यावर देशद्रोहाचाही गुन्हा लागला.) त्यांच्यात आणि कारवाई करणाऱ्या पोलिसांत गोळीबारी झाली. त्यात दोन पोलीस अधिकाऱ्यांसह २६ लोकांचे जीव गेले. रामपाल आणि रामवृक्ष यांना अटक करण्यासाठी पोलीस व सुरक्षारक्षक दलाला आठवडाभर झगडावं लागलं. 


User Image


पत्रकार हत्या प्रकरणात गुरमीत राम रहीमची निर्दोष मुक्तता

  

आसाराम "रेपिस्ट", रामपाल "टेररिस्ट", रामवृक्ष "गँगस्टर" ; तर बाबा राम रहीम हा "तूने तिरखी आँखो से देखा/ तो मेरा सिस्टम हिल गया - असली सेक्साट गाणी स्वनिर्मित सिनेमात हिरो बनून हिरोईनला उद्देशून म्हणणारा "परमपूज्य"! त्याच्यावर त्याच्याच आश्रमातील दोन साध्वींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. त्यावर ऑगस्ट २०१७ मध्ये पंचकुला कनिष्ठ न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आणि राम रहिमला १० वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. त्यानंतर दीडवर्षांनी विशेष सीबीआय न्यायालयाने आणखी एका प्रकरणात (११ जानेवारी २०१९ रोजी) १० वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. ती पुराव्याअभावी रद्द करण्याचा निर्णय नुकताच पंजाब- हरयाणा उच्च न्यायालयाने दिलाय. २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा १० वर्षांवर आलीय. त्यामधून राम रहिमचा महिमा टिकून असल्याची साक्ष मिळते.


ही रद्द केलेली शिक्षा "दैनिक पूरा सच"चे संपादक रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येशी संबंधित आहे. कॉलेजमध्ये शिकत असतानाच रामचंद्र छत्रपती यांनी  ध्येयनिष्ठ पत्रकारितेचा ध्यास घेतला होता. २००० मध्ये त्यांनी "पूरा सच" नावाचं सायंदैनिक सिरसामधून प्रकाशित करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून बाबा राम रहीम हा "संत नसून सैतान आहे", असं सांगणाऱ्या बातम्या यात नियमित छापून येत. बाबाच्या दबावाला बळी न पडता रामचंद्र छत्रपती यांनी बाबाने बलात्कार केलेल्या महिला शिष्येचं पत्रही छापलं होतं. त्यामुळेच हे प्रकरण लोकांसमोर आलं. अन्यथा तिने पाठवलेली पत्रं संबंधितांनी दुर्लक्षितच केली होती.


परिणामी, २४ ऑक्टोबर २००२ रोजी घराबाहेर पडणाऱ्या रामचंद्र छत्रपती यांच्यावर दोन बाईकस्वारांनी गोळ्या झाडल्या. चार आठवडे हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी अपयशी झुंज दिल्यानंतर २१ नोव्हेंबरला त्यांचं निधन झालं. त्यानंतर राज्यभरातल्या पत्रकारांनी एकत्र येऊन न्यायासाठी लढा दिला. न्या. राजेंद्र सच्चर यांच्यासारखे मान्यवरही त्यासाठी आग्रही होते. त्यामुळे सरकारला ते प्रकरण "सीबीआय"कडे द्यावं लागलं. त्या प्रकरणाचा निकाल लागण्याआधीच, १९९९ मध्ये दोन महिला भक्तांवर त्याने केलेल्या बलात्काराचं प्रकरण पुढे आलं. त्यातल्या एका महिलेने तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयींना पत्र पाठवून तिच्यावर झालेला अत्याचार स्पष्ट शब्दांत नोंदवलाय. त्या पत्रात म्हणतात -  "लोकांसाठी देवी असलेल्या आम्ही वेश्यांसारख्या जगतोय !" 


या पत्राच्याच आधारे राम रहिमला शिक्षा सुनावताना कोर्टाने म्हटलं होतं, "तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या शिष्येवर तुम्ही जनावरासारखे तुटून पडलात. त्यामुळे तुमची शिक्षा कमी करता येणार नाही!" अत्याचार झालेल्या दोनच महिला समोर आल्या असल्या, तरी प्रत्यक्षात अशा ४० महिला सिरसाच्या आश्रमात असल्याची चर्चा तेव्हा झाली होती. बाबाच्या या अय्याशीसाठी खास "अंडरग्राऊंड" घर बनवण्यात आलं होतं. त्याला "गुफा" म्हटलं जात असे. या महिलांवर कायम सुरक्षारक्षकांची नजर असे. त्यांचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान संपावा, अशी त्यांना जाणीवपूर्वक वागणूक दिली जात असे. गुरुमहाराज त्यांचं लग्न "डेरा"तील एखाद्या शिष्याशी कधी लावून देतात याची वाट बघत त्या कोमेजून जात.


"श्री हुजूर महाराज संत गुरमीत राम रहीम सिंगजी"चा उगम कसा झाला?

      

"डेरा" म्हणजे आश्रम आणि "सच्चा सौदा" म्हणजे खरा व्यवहार ! त्याचं रूपांतर अव्यवहारात कसं झालं? सिरसा शहर हे हरयाणा राज्याच्या पश्चिम टोकाला; आणि पंजाब व राजस्थान या राज्यांना खेटून आहे. तिथे १९४७ च्या भारत- पाक फाळणीनंतर बेपरवाह मस्ताना नावाचा "फकीर" बलुचिस्तानमधून पंजाबमार्गे आला होता. त्याला त्याच्या पंजाबी गुरूने सिरसा येथे पाठवलं होतं. तिथे त्याने १९४८ मध्ये "डेरा सच्चा सौदा"ची स्थापना केली. त्याने "नामशब्द" हा ध्यानाचा सोपा मार्ग हजारो लोकांना शिकवला.


User Image


शीख आणि हिंदू धर्मातल्या पुरोहितशाहीने समाजातल्या दलित आणि कारागीर जातींना दूर लोटलं होतं. त्यांना या भक्ती आणि सुफी परंपरेतून प्रेरणा घेतलेल्या बाबाचा सोपा मार्ग आपलासा वाटला. ह्या बलुचिस्तानी बाबाने १९६० मध्ये देह ठेवण्यापूर्वी "शाह सतनाम सिंग" नावाचा आपला वारसदार नेमला होता. बलुची बाबाच्या पश्चात त्याने "मी मृत्यूनंतर ८ वर्षांनी जन्म घेणार आहे," अशी घोषणा केल्याची कहाणी पसरवण्यात आली. ह्या कहाणीमुळे "डेरा सच्चा सौदा"च्या दोन प्रमुखांनी मिळवलेली पुण्याई मातीला मिळाली.


बलुची बाबाच्या पुनर्जन्माच्या बनावट कहाणीमुळे १९६८ मध्ये जन्मलेल्या गुरमीत सिंगला वारसदार नेमणं सोयीचं गेलं. गुरमीत धार्मिक नव्हता. तो बऱ्यापैकी श्रीमंत घरातला, छानछोकीत राहाणारा, एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील मगहर सिंग हे गंगानगर जिल्ह्यातल्या गुरुसर मोडिया गावात जमीनदार होते. ते 'डेरा'चे सक्रिय कार्यकर्ते असल्याने त्यांच्या शब्दाला तिथे वजन होतं. त्यांच्याबरोबर गुरमीतही लहानपणापासून 'डेरा'शी जोडलेला होता. तीन मुलांचा बाप असलेला हा फॅशनेबल तरुण 'डेरा'चा वारसदार बनेल, असं कुणाच्या ध्यानीमनीही नव्हतं. पण सतनाम सिंग यांनी १९९० मध्ये मोठ्या सत्संगाचं आयोजन करून वारसदार म्हणून गुरमीतच्या नावाची घोषणा केली. यामुळे गुरमीत सिंगचा तो "श्री हुजूर महाराज संत गुरमीत राम रहीम सिंगजी" झाला. ह्या ओळखीला पुढे त्याने "इन्सान" हे शेपूट लावलं. त्यानंतर एका विदेशी युनिव्हर्सिटीकडून "मानद डॉक्टरेट"ची पदवी मिळवून तो आपल्या नावापुढे "डॉक्टर" पदवीचा टिळा लावू लागला.


गुरमीत याच्या 'डेरा'चा वारसदार म्हणून निवडीमध्ये गुरमीत याचा मित्र गुर्जन सिंगचा हात होता. काकाचा खून करून तुरुंगात गेलेला हा गुर्जन तुरुंगातून बाहेर आला आणि खलिस्तानी अतिरेकी बनला. त्याच्या पिस्तुलाच्या दहशतीने गुरमीत वारसदार बनला. अर्थात, याचे पुरावे कुणाकडेही नसले, तरी गुरमीतचे पुढील काळातले उत्पात पाहता वेगळे पुरावे देण्याची गरज उरत नाही. गुरमीतच्या निवडीत त्याची "जात" हीदेखील महत्त्वाचा घटक ठरली. गुरमीत हा उच्च मानल्या गेलेल्या जाट शिखांमधल्या "सिद्धू" ह्या पोटजातीतला आहे. मात्र, "डेरा सच्चा सौदा"चे बहुसंख्य अनुयायी हे 'जाट' आणि 'खत्री' या उच्च जातींमधील शिखांनी केलेल्या भेदभावामुळे दुखावलेल्या दलित आणि ओबीसी समाजातील होते आणि आहेत. मात्र, त्यांच्यामधील पर्यायांना डावलून "खत्री" असणाऱ्या सतनाम सिंग यांनी "जाट" गुरमीत याला वारसदार निवडलं.


शीख आणि हिंदू धर्मांतील दलित "डेरा"समोर नतमस्तक का झाले?


हिंदू धर्मीयांमधील जाती भेदभावाला कंटाळून पंजाबातल्या दलितांनी समतेचं तत्त्वज्ञान सांगणारा शीख धर्म स्वीकारला. पण तिथेही त्यांची निराशा झाली. कारण शीख धर्मात वर्चस्व असणाऱ्या जाट आणि खत्री शिखांनी दलितांना आपल्या बरोबरीचं मानलंच नाही. त्यामुळे शीख आणि हिंदू दोन्ही धर्मांतल्या दलितांना "डेरा" आपले वाटले. त्यांची संख्या पंजाबात ३२ टक्के आणि हरयाणात १९ टक्के आहे.  "डेरा सच्चा सौदा" असलेल्या सिरसामध्ये हे प्रमाण सर्वाधिक २६.६ टक्के आहे. आता हा वर्ग बऱ्यापैकी विदेशात नोकरीधंद्यात स्थिरावल्यामुळे आर्थिकदृष्ट्याही संपन्न झालाय. तथापि, सांस्कृतिकदृष्ट्याही त्यांच्या परंपरा समृद्ध असूनही, सामाजिक मान्यता मिळत नसल्यामुळे त्यांनी 'डेरा'च्या माध्यमातून आपले सामाजिक आणि राजकीय दबावगट निर्माण केलेत. ( हे वास्तव समजून घेतल्यावर, राम रहीमची पॅरोलवर सुटका निवडणुकीच्या काळातच का होते, असा प्रश्न पडणार नाही.)


गुरमीत जेव्हा "डेरा"चा प्रमुख म्हणजे "डेरामुखी" झाला; तो १९९० चा काळही त्याच्या भरभराटीसाठी अनुकूल ठरला. या काळात जागतिकीकरणामुळे समाजात आर्थिकदृष्ट्या संपन्नता आली होती आणि "मंडल आयोग"च्या अंमलबजावणीमुळे सामाजिक सन्मानाचं भानही आलं होतं. हरयाणा-पंजाबमध्ये असे शेकड्याने 'डेरे' असले तरी बाबा राम रहीमसारखा त्याचा फायदा कुणीच करून घेतला नाही. 'डेरा'ची सत्ता हातात येताच राम रहीमने स्वतःच प्रभाव वाढवण्यासाठी सर्व प्रकारचे हातखंडे आजमावायला सुरुवात केली. 'डेरा'च्या  साहित्यामधून राम रहिम विषयी चमत्काराच्या घटना प्रकाशित होऊ लागल्या. त्याचं सर्वसामान्य  पूर्वायुष्यही चमत्काराच्या कथांनी फुलवण्यात आलं. त्याच्या स्पर्शाने कॅन्सर कसा बरा झाला. त्याच्या दर्शनाने प्रमोशन कसं मिळालं. नोकरी कशी मिळाली. कर्ज कसं फिटलं. लग्नानंतर २०-२५ वर्षांनी मूल कसं झालं ; याच्या सुरस आणि चमत्कारिक अनुभव-कथा 'डेरा'च्या वेबसाइटवर प्रकाशित होऊ लागल्या. 


User Image


तो फक्त "मेसेंजर ऑफ गॉड" म्हणजे "देवदूत" नाही, तर "साक्षात देवच" असल्याचा विश्वास त्याच्या भक्तांमध्ये निर्माण करण्यात आला. ह्या अंधभक्तीतून निर्माण झालेल्या हिंसकतेचे प्रदर्शन शिष्येच्या केसमध्ये पंचफुला कोर्टाने राम रहीमला १० वर्षांची सक्तमजुरीची सजा सुनावल्यानंतर घडले. ऑगस्ट २०१७ मध्ये कोर्टात आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असलेला राम रहीम न्यायाधीशांना हात जोडून मधुमेह, रक्तदाब, हृदय विकार यांची कारणं सांगत सजा कमी करण्याची भीक मागत होता आणि त्याला देव मानणारे दीड लाख अंधभक्त न्यायाधीशांवर दबाव आणण्यासाठी कोर्टाबाहेर जमले होते.


त्यांना आवरण्यासाठी हरयाणातील "भाजप सरकार"ला (मुख्यमंत्री मनहरलाल खट्टर) लष्कर बोलवावे लागले. न्यायमूर्तींनी आपला निकाल जाहीर करताच, बाबाच्या बॉडीगार्डने कोर्टातच राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या मुस्कटात भडकावली. तर कोर्टाबाहेर राम रहिमच्या अंधभक्तांनी पिशव्या-झोळ्यांमधून आणले दगड आणि हत्यारे बाहेर काढून ती बंदोबस्तासाठी असणाऱ्या जवानांवर उगारली. दुकाने आणि रस्त्यावरची खाजगी वाहने जाळली. रेल्वे, पोस्ट ऑफिस अशा सरकारी इमारतींवर हल्ला केला. ह्या हिंसाचारात ३८ लोक मृत्युमुखी पडले आणि २७० जखमी झाले.


'डेरा'चा प्रमुख बनल्यानंतर केवळ नऊ वर्षांत राम रहीम निर्ढावलेला बलात्कारी बनला. यावरून त्याचं अधःपतन किती वेगाने झालं याचा अंदाज येऊ शकतो. अनिर्बंध सत्तेमुळे त्याने एकामागून एक खूनही केले आणि पचवले. बाबाने केलेले अत्याचार उघड करणाऱ्या शिष्येचा भाऊ राजिंदर सिंग याचा खून १० जून २००३ ला झाला. त्याआधी शिष्येचं पत्र छापणारे "पूरा सच"चे  संपादक रामचंद्र छत्रपती यांचा खून घडवला होता. त्या पाठोपाठ "डेरा"चा माजी मॅनेजर फकीर चंद गायब झाला. याशिवाय, त्याच्या ४०० शिष्यांना नपुंसक बनवण्याचा भयंकर आरोप राम रहीमवर होता. 'डेरा'मध्ये शिष्य म्हणून राहिलेले हंसराज चौहान यांनी १७ जुलै २०१२ ला हायकोर्टात याचिका दाखल करून राम रहीमवर हा आरोप केला होता.


त्याने केलेल्या याचिकेमध्ये नमूद केले की, "राम रहीमच्या आदेशानुसार 'डेरा'तील डॉक्टरांची टीम वेदनादायी ऑपरेशन करून शिष्यांना नपुंसक बनवत असे. त्यामुळे देवाचे दर्शन होईल, असं त्यांना सांगितलं जात असे." ह्या नपुंसक पहारेकऱ्यांच्या बंदोबस्तात राम रहीमशी शारीरिक संबंध असलेल्या महिला शिष्यांना ठेवण्यात येत असे, ह्याची नोंद ह्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या "सीबीआय"च्या अहवालात आहे. १९९९ ते २०१९ ह्या एकत्रित घटनाक्रमाचा आढावा घेऊन "विशेष सीबीआय न्यायालय"ने राम राम रहीमला संपादक रामचंद्र छत्रपती यांच्या खून प्रकरणात १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. त्यासाठी योग्य ठरलेले पुरावे पंजाब- हरयाणा उच्च न्यायालयात निकामी कसे ठरतात? निकाल का फिरतात? हा नामाचा नाही, तर कामाचा महिमा आहे.


बाबा राम रहीम हे नाव तब्बल २२ वेळा 'गिनीज बुका'त नोंदवलं गेलंय


बाबा राम रहीम हे नाव तब्बल २२ वेळा 'गिनीज बुका'त नोंदवलं गेलंय. विशेष म्हणजे, यातला एकही विक्रम त्याने स्वतः केलेला नाही. त्याच्या संस्थेने आणि अनुयायांनी हे विक्रम केलेत. २००३ मध्ये सर्वात मोठं रक्तदान शिबीर आयोजित करण्याचा विक्रम "डेरा"ने केला. तो त्यांनीच तीन वेळा मोडला. अशाच प्रकारे सर्वाधिक वृक्षारोपणाचा विक्रम तीनदा केलाय. याशिवाय डायबेटिस, ब्लडप्रेशर, कॉलेस्टेरॉल, सोनोग्राफी, डोळे तपासणी अशा आरोग्यविषयक तपासणींची सर्वात मोठी शिबिरं आयोजित करण्याचेही विक्रम राम रहिमच्या नावावर आहेत. ह्यात सर्वाधिक लोकांनी एकत्र येऊन हात धुण्याचाही अनोखा विक्रम आहे. शिवाय, लोकांनी एकत्र येऊन सर्वात मोठी आकृती तयार करणं, कधी भाज्यांनी सर्वात मोठं चित्रं बनवणं, बोटांच्या ठशांचं सर्वात मोठं चित्र बनवणं असेही  काही विक्रम आहेत.


User Image


बाबाच्या वाढदिवसानिमित्त सर्वात मोठं ग्रीटिंग कार्ड, सर्वात मोठं पोस्टर, सर्वाधिक दिवे पेटवणं, शुभेच्छा देणारे सर्वाधिक व्हिडियो शेअर करणं, असे विक्रम गेले काही वर्ष सुरू आहेत. बाबाला शिक्षा होण्याच्या काही दिवस आधी बाबाच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या शिष्यांनी एकाच केकवर दीड लाख मेणबत्त्या पेटवून नवा विश्वविक्रम केला होता. त्यांची मतं मिळावी, म्हणून राजकारणी अशा उपक्रमाला मदत करीत बुवा- बापूंना डोक्यावर बसवतात. (ही महायुती भलतीच व्यापक आहे.) यामुळेच २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या हरियाणा- पंजाबमधील सभांमध्ये प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदी यांना पंजाब - हरयाणातील ४० विधानसभा मतदारसंघांवर प्रभाव असलेल्या बाबा राम रहीम याचा गौरव करावा लागला होता. बाबानेही 'भाजप'च्या सोयीसाठी प्रखर राष्ट्रवादाची भूमिका घेतली होती.

  

२०१७ ते २०२५ दरम्यान लोकसभेच्या आणि पंजाब- हरयाणा विधानसभेच्या प्रत्येकी दोन-दोन निवडणुका झाल्या. जवळपास प्रत्येक निवडणुकीच्या काळात बाबा राम रहीम पॅरोल / फर्लो‌ रजेवर रोहतक तुरुंगातून बाहेर आला आहे. यातील ६ वेळा त्याची रजा रोहतक कारागृहाचे तेव्हाचे तुरुंग अधीक्षक सुनील सांगवान यांनी मंजूर केली होती. त्यांना २०२४ च्या हरयाणा विधानसभा निवडणुकीत "भाजप"तर्फे उमेदवारी मिळावी, हा योगायोग नाही. ह्यात योजकता आहेच. एप्स्टीनसारखे भयानक हे लोक आहेत. तरीही राम रहीम पाठोपाठ लवकरच लोकशाहीला "रामनाम सत्य है" या घोषात खांदा देण्यासाठी आसाराम, रामपाल, रामवृक्ष यादव यांचीही निर्दोष मुक्तता होईल! रामनामाचा  महिमा असाही आहे. जय श्रीराम!!


(पूर्वप्रसिद्धी : दै. देशोन्नती, रवि. १५ मार्च २०२६. लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक आहेत.)


Share this article
 पंतप्रधानांच्या ‘राष्ट्रीय त्यागा’ची भाषा आणि धोरणांची गप्पी…
कॉलम

पंतप्रधानांच्या ‘राष्ट्रीय त्यागा’ची भाषा आणि धोरणांची गप्पी…

पंतप्रधानांच्या ‘राष्ट्रीय त्यागा’च्या आवाहनात एक महत्त्वाचा प्रश्न गायब आहे तो म्हणजे भारत दरवर्षी अब्जावधी डॉलर्स खाद्यतेल आयातीवर का खर्च करतो? १९९० नंतरच्या धोरणांनी भारताची स्वयंपूर्ण तेलबिया अर्थव्यवस्था कशी मोडली आणि त्याची किंमत आज महाराष्ट्रातील शेतकरी कशी मोजतो आहे? सोयाबीनच्या पडत्या भावापासून ते हवामान बदलामुळे वाढलेल्या रोगराईपर्यंत, ग्रामीण भारत एका दुहेरी संकटात अडकला आहे. ‘त्याग’ नागरिकांनी करायचा, पण धोरणात्मक ‘खोडा’कडे पाहायचं नाही, हीच आजच्या अर्थव्यवस्थेची मोठी शोकांतिका आहे.

4 min read
G
Girish Patil
सलग 11 दिवस अन् न थांबता 13 हजार मैल उडणारा गॉडविट पक्षी…
कॉलम

सलग 11 दिवस अन् न थांबता 13 हजार मैल उडणारा गॉडविट पक्षी…

गॉडविट पक्षी, वजन किती? फार तर सहाशे ग्रॅम… ऑक्टोबर महिन्याच्या १३ तारखेला पहाटे पाच वाजून १० मिनिटांनी अलास्कावरून निघतो. १३ हजार किलोमीटर कुठंही न थांबता उडतो उडतो उडतो आणि २४ ऑक्टोबरला पहाटे चार वाजून ५५ मिनिटांनी टास्मानियात पोचतो.

4 min read
N
Nilu Damle
Why Climate Action in India Needs Culture to Succeed
Column

Why Climate Action in India Needs Culture to Succeed

While scientific reports and finance frameworks drive formal climate policy, they often fail to connect with the lived realities of local communities. From stand-up comedy about Mumbai’s air pollution to multilingual rap and local folk traditions, culture is emerging as the "behavioral public infrastructure" needed to translate complex data into emotional engagement and collective action.

6 min read
S
Sanjiv Gopal and Brikesh Singh
 एखाद्या देशात चक्क उंदराचा पुतळा का उभारण्यात येतो…?
कॉलम

एखाद्या देशात चक्क उंदराचा पुतळा का उभारण्यात येतो…?

सुरुंग आणि स्फोटकं शोधून हजारो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या 'मागवा' नावाच्या उंदराचा आता कंबोडियामध्ये पुतळा बसवण्यात येणार आहे. मागवा उंदीर स्फोटकांचा वास सव्वीस पटीने अधिक वेगाने घेऊ शकत होता. त्याला तसे खास प्रशिक्षण देण्यात आले होते. पाच वर्षांपूवी त्याचे निधन झाले. या कामगिरीसाठी मागावाला कंबोडिया सरकारने सुवर्ण पदकही दिले होते.

5 min read
N
Nilu Damle
प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेलं अमेरिका, पण शस्त्रांच्या सावलीत जगणारं असुरक्षित समाजजीवन
कॉलम

प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेलं अमेरिका, पण शस्त्रांच्या सावलीत जगणारं असुरक्षित समाजजीवन

- अमेरिका हे जगातील सर्वात शक्तिशाली आणि समृद्ध राष्ट्रांपैकी एक असून, आर्थिक प्रगती, तंत्रज्ञान आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यासाठी ओळखले जाते. - मात्र या तेजस्वी प्रतिमेमागे व्यक्तिगत शस्त्रास्त्रांचा वाढता वापर आणि त्यातून होणाऱ्या हत्या हे एक गंभीर वास्तव दडलेले आहे. - ही समस्या केवळ अमेरिकेपुरती मर्यादित नसून, जागतिक चिंतेचा विषय बनली असून भारतासह इतर देशांसाठीही अभ्यासाचा मुद्दा ठरत आहे.

4 min read
B
Bhaga Warkhade
‘फॅक्ट-चेक' च्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी…?
कॉलम

‘फॅक्ट-चेक' च्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी…?

फॅक्ट-चेक युनिटच्या माध्यमातून सरकारकडून माध्यमांवर नवे नियंत्रण. सरकारच्या नव्या नियमांमुळे पत्रकारितेत वाढतेय सेन्सॉरशिपची मोठी भीती. कायद्याच्या आडून सरकारविरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न.

5 min read
B
Bhaga Warkhade

Comments

Comments are currently disabled or loading...