(उदीत हिंदुजा)
हरियाणात गोरक्षकांच्या हातून मारल्या गेलेल्या आपल्या मुलाचे अंतिम संस्कार केल्याच्या दुसऱ्या दिवशी राजस्थानचे कट्टर हिंदू भंवर लाल यांच्या चेहऱ्यावर कधी दुःख तर कधी संताप दिसून येत होता. राजस्थानच्या केसरीसिंहपूरा जवळील एका छोट्या गावातील आपल्या काँक्रीटच्या नव्या घराच्या अंगणात बसलेले लाल म्हणतात, “हे गोरक्षक नाहीत, नरभक्षक आहेत.”
पोलिसांनीच गोरक्षकांना ‘टिप’ दिली आणि गाईसाठी एका हिंदूची हत्या झाली
भंवर लाल यांची अन्य दोन मुलं, संदीपच्या अस्थी घेऊन हरिद्वार, उत्तराखंड इथे जात होते. 28 वर्षीय संदीपची पलवल जवळ गोरक्षकांच्या एका समुहानं हत्या केली, जेव्हा तो आपल्या मित्रासह दोन गायी घेऊन लखनौला जात होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हत्येसाठी अटक झालेले पाच लोक, विशेष पोलिस अधिकाऱ्याच्या सूचनेवरून काम करत होते.
बाईकवर स्वार झालेल्या लोकांनी संदीप व त्याचा मित्र बालकिशन यांच्या ट्रकला थांबवलं आणि त्यांना मारहाण केली. ते दोघे मेले असं समजून त्यांना १७ किमी दूर हाजीपूर गावाजवळ एका कालव्यात फेकून दिलं. बालकिशन यातून वाचला. तो कालव्यातून बाहेर आला, पलवलला पोहोचला आणि मदतीसाठी पोलिसांशी संपर्क केला. 10 दिवसांच्या शोधकार्यानंतर 2 मार्चला संदीपचं प्रेत सापडलं. पोलिसांनी आतापर्यंत पाच लोकांना अटक केली आहे. 
पलवल-फरीदाबाद बेल्टमध्ये सहा महिन्यात दुसऱ्यांदा एका हिंदूची हत्या झाल्यामुळे स्थानिक बजरंग दलाच्या सदस्यांमध्येही संतापाचं वातावरण आहे. आरोपी आपल्या संघटनेचे नाहीत असं म्हणून त्यांनी स्वतःला यातून दूर ठेवलं आहे. हरियाणाच्या बजरंग दलाचा राज्य संयोजक भारत भूषण म्हणतो की हे लोक (आरोपी) गोरक्षणाचा अर्थ समजत नाही. ते फक्त याचं नाव खराब करत आहेत.
2015 च्या कायद्यानुसार राज्यात गो-तस्करी, हत्या आणि गोमांस ठेवणे किंवा खाणे यावर बंदी आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये राजस्थान निवासी नासिर व जुनैद यांची जळालेली प्रेतं आढळली होती. एका स्थानिक गोरक्षक समुहानं त्यांचं अपहरण करून हत्या केली होती. ऑगस्ट 2024 मध्ये पश्चिम बंगालच्या 25 वर्षीय भंगार वेचणाऱ्या साबिर मलिकला गोमांस खाल्ल्याच्या आरोपावरून जमावानं मारलं होतं. जमाव हत्या आधी मुसलमानांच्या विरोधात केली जाणारी धार्मिक हिंसा म्हणून ओळखली जात होती. पण ऑगस्ट 2024 पासून यात बदल झाला जेव्हा 19 वर्षीय आर्यन मिश्रा याची फरिदाबाद मध्ये हत्या करण्याती आली.ज्याने खुन केला त्याने म्हटलं की मिश्रा मुस्लिम आहे असं समजून त्यानं हत्या केली, पण आता एका ब्राह्मणाची हत्या केल्याचा त्याला पश्चाताप आहे.
|
संबंधित लेख वाचा: |
“हे गोरक्षक नाहीत, नरभक्षक आहेत.”
भंवर लाल यांच्या घरी जमलेले गावकरी गोरक्षा करणं आपला धर्म मानतात आणि त्यामुळे आपल्यातल्याच एकाला गमावल्याचं दुःख त्यांना झेपत नाही आहे. संजय पंवर सांगतो, “गाय आमची आई आहे. पण आरोपी अशा पद्धतीनं लोकांची हत्या करू शकत नाही. या आरोपींमुळे आम्ही आमचा मुलगा गमावून बसलो आहोत.”
2 फेब्रुवारी रोजी संदीप आणि बालकिशन पलवल नजिक एका पोलिस चौकीपाशी थांबले आणि लखनौला जाणारा रस्ता त्यांनी विचारला. एका विशेष पोलिस अधिकाऱ्याला (एसपीओ) वाटलं की ते हत्येसाठी गाई लखनौला घेऊन जात आहेत. त्यानं संदीपला आधी रस्ता सांगितला व नंतर स्थानिक गौरक्षकांना फोन केला.
पलवलचे पोलिस निरीक्षक सांगतात की, एक सामान्य पोलिस अधिकारी व विशेष पोलिस अधिकारी यांच्यात फरक असतो. एसपीओ पोलिसिंगसाठी मदत करतो. नाव न सांगण्याच्या अटीवर हा पोलिस निरीक्षक पुढे सांगतो की, एसपीओनं गोरक्षकांना फोन केला की नाही याविषयी पोलिसांना माहिती नाही. एसपीओ हिंदू आहे त्यामुळे त्यानं गायींना गोशाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला असावा पण त्यात हिंसेची त्याला अपेक्षा नसावी असं निरीक्षक सांगतो.
तलवार आणि हतोड्याने बेदम मारहाण करून कालव्यात फेकून दिलं…
संदीप व बालकिशन यांच्या पिक-अप ट्रकला सहा जणांनी थांबवलं. निरीक्षकाच्या सांगण्यानुसार नंतर गोरक्षकांनी आपल्या गुरूला बोलावलं. जो सोहनाचा रहिवाशी आहे आणि स्थानिक गोरक्षक समूहाचा नेता आहे. तो आपल्या सोबत्यांसह तलवारी आणि हातोडे घेऊन आला. त्यांनी संदीप व बालकिशन यांना हाजीपूर जवळील एका कालव्याजवळ नेलं. तिथं त्यांना मारहाण केली व नंतर त्यांना कालव्यात फेकून दिलं. बालकिशनला पोहोयला येत होतं त्यामुळे तो वाचला.
डीएसपी क्राईम मनोज वर्मा यांनी सांगितलं, “बालकिशन आधी सोहना ठाण्यात गेला. पण तिथं त्याला सांगण्यात आलं की हे प्रकरण त्यांच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. त्यांना पलवलच्या कँप ठाण्यात नेण्यात आलं. 23 फेब्रुवारीला तिथं एफआयआर दाखल करण्यात आली.” संदीपचं प्रेत शोधण्यासाठी एनडीआरएफची मदत घेण्यात आली. 10 दिवसांनी त्याचं प्रेत मिळालं. कालव्यात सांडपाण्याचं पाणी सोडलं जातं, जे घाणेरडं असल्यामुळे त्याची देखभाल क्वचितच होते. त्यामुळे इतका वेळ लागल्याचं तपासणी अधिकारी सांगतात. प्रेत शेवटी 15 किमी दूर सापडलं.
गोरक्षकांना सोबत घेऊनच काम करण्याचे पोलिसांना आदेश
पोलिसांनी दरम्यान आरोपींचा शोध घेणं सुरू केलं. यातून पाच संशयितांना पकडण्यात आलं. आणखी तीन संशयितांना पकडण्यासाठी पोलिस शोध घेत आहेत. हरियाणा पोलिसांचे स्थानिक गोरक्षक समुहांसोबत तणावाचे व गुंतागूंतीचे संबंध राहिले आहेत. गोहत्याबंदी कायदा आल्यानंतर पोलिसांना गोरक्षकांसोबत काम करावं लागत आहे आणि त्यांना आपल्या सीमा ओलांडण्यापासून थांबवावंही लागत आहे. डीएसपी वर्मा सांगतात की, आधी हे लोक अनधिकृत नाकेबंदी करायचे आणि गाड्या थांबवायचे. त्यानंतर आम्ही त्यांना याविषयी नोटीस पाठवली आणि असं करण्यापासून थांबवलं.
भारत भूषण सांगतो की, खऱ्या गोरक्षकांनी नेहमीच पोलिस आणि स्थानिक प्रशासनाशी सहकार्य केलं आहे. तो सांगतो की, मी हे स्पष्ट केलं आहे की कोणीही एकतर्फी कारवाई करू शकत नाही. पण गायी नेताना पाहिल्यावर जमाव बेकाबू होतो हे तो मान्य करतो. वाढत्या हिंसेसाठी त्यानं गाईंच्या अवैध तस्करीला जबाबदार ठरवलं. तो म्हणतो की भाजप राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात सत्तेत आहे. त्यांना गोतस्करी नियंत्रित करायची आहे, लोकांना नाही. पण यातली कोणतीही गोष्ट अजूनही होत नाही.
गाईंची वाहतूक करण्याचे अधिकृत कागदपत्रे असूनही जमावाने ऐकल नाही…
संदीप आणि बालकिशन यांनी गायींची वाहतुक करण्याचे कागद स्वतःजवळ बाळगले होते तरीही त्यांची हत्या करण्यात आली. सीआयए निरीक्षक सांगतात की, दोन प्रकारचे गोरक्षक असतात. एक जे चांगलं काम करतात आणि गायींची देखरेख करतात. दुसरे ते आहेत ज्यांना माहिती नाही की गोरक्षा म्हणजे नक्की काय करणं असतं. ते म्हणतात की दुसऱ्या प्रकारच्या गोरक्षकांनी संदीपची हत्या केली आहे. हा समूह स्वतःला ‘ग्वाल सेना’ म्हणवतो, तो नोंदणीकृत नाही. त्यात पलवलचे तरुण सहभागी आहेत जे सोशल मीडियावरील प्रचाराने प्रभावित झाले आहेत.
वर्मा म्हणतात की, ग्वाल सेना आणि वैध, नोंदणीकृत गोरक्षक संघटनेत मानसिकतेचा फरक आहे. ते सांगतात की कोणताही गुन्हेगार गुन्हा करण्यासाठी कारण शोधत नाही. सीआयए निरीक्षक म्हणतात की, गोहत्या नेहमीच घडत आली आहे पण जेव्हापासून हिंदू-प्रधान सरकार सत्तेत आलं आहे आणि गोहत्याबंदी कायदा आला आहे, लोकांनी धर्माचा आधार घेणं सुरू केलं आहे. म्हशीदेखील कापल्या जातात पण त्यांच्यासाठी कोणी आवाज उठवत नाही. 
भंवर लाल यांच्या घरात बायका वेगळ्या ठिकाणी बसल्या आहेत. गावातल्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या लाल यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्यांचा अजून बालकिशनशी संपर्क झालेला नाही. ते म्हणतात, “संदीपचा रोका (साखरपुडा) झाला होता. मे-जून दरम्यान त्याचं लग्न होणार होतं. तो एक पेंटर होता. तो या सगळ्यात कसा अडकला तेच समजत नाही.”
बालकिशन दुसऱ्या गावात राहतो. तो गावात येऊन तरुणांना लहानसहान कामं देतो. जी ड्रायव्हिंगशी संबंधीत असतात. भंवर लाल म्हणतात की, संदीप आणि बालकिशन यांची फारशी ओळख नव्हती. पण कमाईसाठी संदीपनं हे काम स्विकारलं असावं असा त्यांचा अंदाज आहे.
“जर आताही हिंदूच बाधित होत आहेत तर हा धर्माचा प्रश्न नाहीये’’
केसरीसिंहपूरा नगरपालिका सदस्य आणि दैनिक भास्करचे पत्रकार सोमनाथ नायक म्हणतात, “पोलिसांनी संदीप व बालकिशनच्या सुरक्षेसाठी आणखी जास्त प्रयत्न करायला पाहिजे होते. पोलिसांनीच गोरक्षकांना बोलावलं. त्यांनी ट्रकसोबत सुरक्षाकर्मी पाठवायला हवे होते ज्यामुळे काही अनुचित घडू नये. यात पोलिसांचा हलगर्जीपणा स्पष्टच आहे.” नायक म्हणतात की, गोरक्षकांनी काम करण्यावर त्यांचा आक्षेप नाही पण ते ज्या पद्धतीनं काम करत आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे एका घरातील आनंद नष्ट झाला आहे.
गावाची अशी भावना आहे की गाईंच्या रक्षणासाठी गोरक्षक महत्त्वाचे आहेत. अनेकांना जमावांनी मारलेल्या मुस्लिमांच्या घटना माहिती आहेत. राजस्थानातील पहलू खानची हत्या सर्वांनाच माहिती आहे ज्याच्यावर गोतस्करीचा आरोप होता पण त्याच्या कागदपत्रांतून असं काही स्पष्ट झालं नव्हतं. केसरीसिंहपूरा नगरपालिका अध्यक्ष जवाहर अग्रवाल म्हणतात, “जर आताही हिंदूच बाधित होत आहेत तर हा धर्माचा प्रश्न नाही आहे. हे अराजक आहे. जमावाचा न्याय पोलिसांची जागा घेऊ शकत नाही.”
(सौजन्य - द प्रिंट)
अनुवाद - प्रतिक पुरी






