- अप्सरा आगा
गेल्या वर्षी माथेरानमध्ये एक घटना घडली… परशुराम गोमा पिरकट हा 45 वर्षांचा आदिवासी हातरिक्षा चालक पर्यटकाला त्याच्या हातरिक्षामध्ये बसवून माथेरानच्या हॉटेलमध्ये जात होता. ‘वे साईड’ रिसॉर्टचा चढ चढून जेव्हा परशुरामने त्याची हातरिक्षा मेरिटाईम हाऊसपर्यंत खेचत आणली तेव्हा अचानक त्याला भोवळ आली आणि तो रिक्षा सोडून जमिनीवर कोसळला. इथर लोकांनी लगेचच परशुरामला ई-रिक्शामध्ये टाकलं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मात्र तोपर्यंत त्याचा जीव गेला होता. आपला चरितार्थ चालविण्यासाठी हा आदिवासी तरुण कैक वर्षांपासून हातरिक्षा ओढत होता.
वाहनउद्योगात रोज नवी क्रांती घडत असताना माणसं माणसाला ओढत नेत असल्याची अमानवी प्रथा भारतात पश्चिम बंगालमध्ये कोलकाता आणि महाराष्ट्रात माथेरानमध्ये सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील माथेरान या पर्यटनस्थळी वाहनांचे प्रदूषण टाळण्यासाठी तसेच निसर्गसौंदर्य अबाधित ठेवण्याच्या नावाखाली सुमारे १०० वर्षांपासून मानवी रिक्षाचा वापर केला जातो आहे. रिक्षात बसलेल्या व्यक्तीला तीन माणसे ओढत नेण्याच्या या प्रकाराला आजवर अनेकांनी विरोध केला आहे. मात्र माथेरानमधील घोडे व्यावसायिक आणि मूठभर निसर्गप्रेमींच्या अट्टहासामुळे मानवी रिक्षाला नवा पर्याय शोधण्याच्या प्रयत्नांना आता कुठे मुहुर्त मिळाला आहे.
माणसाने माणसाला ओढून नेण्याची ही पद्धत बंद व्हावी म्हणून
हिरव्यागार सौंदर्याने नटलेल्या माथेरानच्या या भूमीवर हातरिक्षा कामगारांच्या अमानवी कष्टाच्या पावलांचे ठसे खोल मातीत अगदी आतापर्यंत उमटले होते. मात्र आता ही अमानवी प्रथा कायमची संपुष्टात आली आहे. माथेरानच्या शांत कुशीत गेल्या कित्येक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या हातरिक्षा प्रथेवर अखेर कायमचे विरामचिन्ह लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रथेला अमानवीय आणि मानवी प्रतिष्ठेच्या विरोधात ठरवत ती येत्या सहा महिन्यांत पूर्णतः बंद करण्याचा निर्णय दिला आहे. त्याऐवजी पर्यावरणपूरक ई-रिक्षा ही वापरण्याचा आदेशही देण्यात आला आहे.
संबंधित लेख वाचा: 1) आदिवासींमध्ये ना हुंडाबळी जातो ना मुलीचा बाप कर्जबाजारी होतो, मग ‘सुसंस्कृत’ कोण? |
मात्र हा प्रश्न आणि त्यावरचे निवारण अद्यापही झालेले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे हातरिक्षावर उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक कुटुंबांच्या पोटापाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. व्यवसायच हातून जातोय, उद्याचं काय? हा प्रश्न घेऊन अनेक हातरिक्षा चालक चिंतेच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
माथेरानमध्ये हातरिक्षा का सुरू झाली होती?
माथेरान… समुद्रसपाटीपासून 2625 फूट (300 मीटर ) उंचीवर असलेले एक थंड हवेचे ठिकाण. 1850 मध्ये ठाणे जिल्हयाचे जिल्हाधिकारी हयूज पोईटस मलेट यांनी हे ठिकाण शोधले व तत्कालीन गर्व्हनर लॉर्ड एलफिन्सटन यांनी ते पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले. लोकसंख्या सुमारे पाच हजारपेक्षा अधिक. नेरळ रेल्वेस्टेशनपासून नऊ किलोमीटर अंतरावर असणारे हे पर्यटकांचे उन्हाळयातील खास पर्यटन स्थळ. 38 प्रेक्षणीय पॉईंटस असलेले व आशियातील एकमात्र स्वचंचलित वाहन मुक्त असलेले हे ठिकाण 1907 मध्ये येथे रेल्वे स्टेशन आरंजी वर्गीय यांनी सुरू केले. रस्त्याच्या एका बाजूला गर्द झाडी तर दुसऱ्या बाजूला दऱ्यांमुळे गाडी बसपर्यंत पोचण्यासाठी नागमोडी घाट पार करावा लागतो. वाहनतळापासून साधारणपणे एक ते दीड तासाचा रस्ता.
मुख्य निवासस्थान हॉटेल किंवा बाजारपेठेत जाण्यासाठी रोजचे साधन घोडे किंवा रिक्षा. रिक्षा म्हणजे इंधनावर चालणारी नाही तर माणसांकडून ओढली जाणारी. येथील पर्यटकांची सेवा हाच त्यांचा हंगामी व्यावसाय बनला आहे. माथेरान हिल स्टेशनवर ब्रिटीश काळापासून गाड्यांना परवानगी नसल्यामुळे, माथेरानमध्ये ये-जा करण्यासाठी लोकांना एकतर चालत जावं लागतं किंवा वाहतुकीसाठी 460 घोड्यांपैकी एकावर प्रवास करावा लागतो. इतकंच नाही तर इथे 94 हाताने ओढायच्या रिक्षांचा वापर करावा लागतो.
अमानवी प्रथेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल दिला?
माथेरानमध्ये स्थानिक 94 हातरिक्षा चालक - मालक आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यातील 20 लोकांना ई- रिक्षा मिळाल्या आहेत. ई- रिक्षांमुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे कारण त्याचा तिकीट दर कमी आहे. त्यामुळे ई- रिक्षा वाढल्या पाहिजेत. जेणेकरून सर्वाना रोजगार मिळेल अशी, व्यावसायिकांची अपेक्षा आहे. माथेरानमध्ये येण्यासाठी तीन पर्याय इथले नागरिक आणि पर्यटकांसमोर उपलब्ध आहेत.
एक म्हणजे ‘माथेरानची राणी’ असेलेली रेल्वे, दुसरं म्हणजे घोडे आणि तिसरा पर्याय म्हणजे हातरिक्षा. त्यातही रेल्वेमुळे तुम्ही फक्त माथेरान स्टेशनपर्यंत पोहोचू शकता. मात्र इथे फिरण्यासाठी, इथले टूरिस्ट स्पॉट पाहाण्याठी घोडे आणि हातरिक्षा हाच पर्याय आहे. माथेरानमधील पर्यटन वाढावे आणि हातरिक्षासारखी अमानवीय प्रथा बंद पडावी यासाठी ई रिक्षा हा पर्याय पुढे आला.
सर्वोच्च न्यायालयाने माथेरानमधील पारंपरिक हातरिक्षा प्रथेवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर स्थानिक हातरिक्षा चालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. "हातरिक्षा बंद, आणि ई-रिक्षा सुरू'' म्हणजे आमचा उदरनिर्वाहच बंद होण्यासारखं आहे. आता आमच्या पोटापाण्याचं काय करायचं, हे सरकारनेच सांगावं," अशी भावना न्यायालयाच्या निर्णयाने थेट झळ पोहोचलेल्या हातरिक्षा श्रमिक वर्गातून व्यक्त होत आहे.
‘’ना हातरिक्षा आमच्या मालकीच्या होत्या, ना आता ई रिक्षा’’
हातरिक्षा चालवणारे विशाल जोगरे सांगतात, "मागील पाच-सहा वर्षांपासून मी माथेरानमध्ये हातरिक्षा चालवतो, पण ही रिक्षा आमची नाहीच…मालकाची आहे. आम्ही केवळ मजूर. दिवसभर कितीही श्रम केले, तरी त्यातून एक वाटा मालकालाच द्यावा लागतो," असं सांगताना त्या कामगाराच्या डोळ्यात भविष्यातील असुरक्षिततेची स्पष्ट झलक होती. "आत्ताच महागाईचा भार सहन होत नाहीये, त्यात जर ई-रिक्षा आल्या, तर आमचा धंदा आधीच्याच तुलनेत निम्मा होईल. प्रवासी थेट ई-रिक्षाने प्रवास करतील आणि आम्हाला कोणी विचारणार तरी का?" अशा शब्दांत त्यांनी आपल्या भवितव्याबद्दलची चिंता व्यक्त केली.
विकास डोंगरे हे आणखी एक हातरिक्षा चालक सांगतात, "आम्ही आदिवासी आहोत. गेली वीस वर्षं माथेरानमध्ये हातरिक्षा चालवतो. काम केलं तरच घर चालतं. ई-रिक्षा आली, तेव्हा वाटलं होतं, आता आपल्यालाही काहीतरी रोजगार मिळेल. पण प्रत्यक्षात काय झालं? ज्यांच्या नावावर हातरिक्षा आहेत, त्यांनाच ई-रिक्षा मिळाल्या. आम्ही मजूर आहोत, आमचं नाव कुठेच नाही. न्यायालयाने फक्त सहा महिने यापुढे दिले आहेत, तोवर आम्ही हातरिक्षा चालवूच, पण सहा महिन्यांनंतर काय…?
"आमच्या आजोबांपासून हातरिक्षाचा धंदा आहे. आता आमची तिसरी पिढी याच धंद्यात आहे," असं सांगताना अफजल डिंगळे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. "सुरुवातीला पायथ्यापासून हिल स्टेशनपर्यंत फक्त दहा रुपये घेत होतो, ते आता पाचशे-सहाशेपर्यंत गेले. पण भाडं इतकं वाढूनही हातरिक्षाचा धंदा फारसा चालत नाही. न्यायालयाच्या निर्णयामुळे काहीजणांना ई-रिक्षा मिळाल्या. ती लोकं फक्त 70 रुपये भाडं घेतात घेतात, त्यामुळे पर्यटकांचं आकर्षण वाढलं आहे.
‘’हातरिक्षा ओढताना वडिलांना ह्रदयविकाराचा झटका आला’’
'आम्हाला दहावीनंतर शिक्षणच घेता आलं नाही. कारण माथेरानवरून येण्या- जाण्यासाठी एसटी नव्हती. त्यामुळे कॉलेजपर्यंत जाताच आलं नाही.वडिलांनी हातरिक्षा चालवून आम्हाला मोठं केलं. शेवटी हातरिक्षा चालवून त्यांना दम लागायला त्यातच ह्रदयविकाराच्या झटक्याने 2016 ला वडील गेले. त्यामुळे वडिलांनी जे भोगलं आहे ते आमच्या वाट्याला नको. आता जो निर्णय आलाय त्याचे आम्हाला समाधान आहे. ई- रिक्षामुळे आमचं उत्पन्नपण वाढलं आहे. त्यामुळे कुटूंबाचा चांगल्याप्रकारे उदरनिर्वाह करू शकतो. आता तर माझी मुलं चांगलं शिक्षण घेऊन नोकरी करतील, असं रुपेश गायकवाड सांगत होते.
माथेरानमध्ये सध्या 95 रिक्षाचालक आहेत. घोड्यांच्या टापांमधून उडणाऱ्या धुळीमध्ये घोड्याची लीद मिसळून रिक्षाचालकांना दमा, टीबी असे श्वसनजन्य विकार होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अनेक रिक्षाचालकांना प्राण गमवावे लागले आहेत. मानवी हक्क आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. ई-रिक्षा झाल्यास पर्यावरणाचे रक्षण होणार असून मानवी आरोग्यासही उपयुक्त ठरणार आहे.
ई-रिक्षाचा एक यशस्वी लढा
माथेरानमधील श्रमिक रिक्षा चालक मालक सेवा संघाने येथे ई रिक्षा सुरु करण्यात याव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.गावात ई-रिक्षा सुरु व्हावी यासाठी इथले स्थानिक आणि श्रमिक रिक्षा चालक संघटनेचे सचिव सुनिल शिंदे अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. ते सांगतात, 'मी मूळचा माथेरानचा रहिवासी. माझं शिक्षण झाल्यावर मुंबईला शिक्षक पदावर मी नोकरीला लागलो आणि माझे मित्र माथेरानमध्येच हातरिक्षा ओढत होते. मी माथेरानला गेलो की, मित्र हसत हसत म्हणायचे तुला नोकरी लागली आणि तू मुंबईला गेला.
आम्ही मात्र किती दिवस हातरिक्षा ओढायची. तू चांगलं आयुष्य जगतोय. आम्हालाही सन्मानाने, चांगलं आयुष्य जगायची संधी कधी मिळणार ? त्यांचे हे शब्द माझ्या मनाला लागले. त्यांच्यासाठी काय करता येईल याचा विचार केला. 'हातरिक्षा ओढणे' हे काम आता त्यांना नकोसं झालं होत. लोक चंद्रावर गेलेत आणि हे अजूनही हातरिक्षाच ओढत आहेत. माथेरानहे पर्यटन स्थळ आहे. तिथले पर्यटकच त्याचा रोजगार आहे त्यामुळे हातरिक्षाला दुसरा पर्याय काय आहे याचा विचार केला.
सुनील शिंदे पुढे सांगतात की, '2003 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार माथेरानला इकोसेन्सिटिव्ह झोन (Eco-Sensitive Zone) म्हणून घोषित करण्यात आलं. हा निर्णय माथेरानच्या पर्यावरणीय संवेदनशीलतेच्या संरक्षणासाठी आणि तेथील जैवविविधता, नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी घेण्यात आला. त्यामुळे वाहनांना बंदीच होती. मग आम्ही काही तज्ञ लोकांशी चर्चा केली.
हातरिक्षा चालकांचं श्रम कमी करून त्यांच्या व्यवसायात बदल करता येईल का? चर्चेतून पुढे आलं की हातरिक्षाला ई रिक्षा हा पर्याय असू शकतो. मग आम्हीच पाठपुरावा केला. त्याच आज फळ मिळालं. माथेरानमध्ये 94 हातरिक्षा चालक आहेत त्यातील वीस लोकांना ई- रिक्षा मिळालेत. बाकीच्या लोकांनाही हळूहळू मिळतील. ई- रिक्षांमुळे त्यांचं श्रम कमी होईल आणि आर्थिक परिस्तिथी सुधारेल त्यामुळे त्यांची पुढची शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येईल.
हातरिक्षा बंद करण्याचा निर्णय म्हणजे एका माणसाने दुसऱ्या माणसाला ओढण्याच्या अमानुष प्रथेवर अखेरचा पडदा आहे. हा निर्णय मानवी प्रतिष्ठा आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्यच मानला जातो. हातरिक्षा ओढण्यामुळे अनेक जणांचे हृदयविकाराने प्राण गेले, हा कटू वास्तव आहे. पण दुसरीकडे, हा व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत आलेला असल्याने अनेक कुटुंबांचं आयुष्य त्यावरच अवलंबून आहे.
शिक्षण, कौशल्य किंवा पर्यायी उत्पन्नाची साधनं नसल्यामुळे ही मंडळी दुसऱ्या कोणत्या व्यवसायात सहजपणे स्थलांतर करू शकत नाहीत. ई-रिक्षा हा एक स्वागतार्ह पर्याय असला, तरी त्याचा लाभ सर्वांना समानरित्या मिळालेला नाही. ज्यांना ई-रिक्षा मिळाल्या नाहीत, त्यांचा रोजगार धोक्यात आला असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या घरच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे.






