भागा वरखडे
- भारतातील बहुतेक रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले असले, तरी अनेक दुर्गम आणि डोंगराळ मार्गांवर अजूनही डिझेल इंजिनांचा वापर सुरू आहे.
- अशा मार्गांसाठी हायड्रोजन इंधनावर धावणारी रेल्वे ही पर्यावरणपूरक, किफायतशीर आणि आधुनिक पर्याय म्हणून पुढे येत आहे.
- प्रदूषणमुक्त वाहतूक, ऊर्जा स्वावलंबन आणि हरित विकासाच्या दिशेने भारतीय रेल्वेचे हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
जगभरात हवामान बदलाचे संकट अधिक तीव्र होत असताना जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्नशील आहे. भारतानेही २०७० पर्यंत ‘नेट झिरो’ कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य निश्चित केले आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी ऊर्जा, उद्योग आणि वाहतूक क्षेत्रात हरित तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक आहे. रेल्वे क्षेत्रात हायड्रोजन इंधनाचा वापर ही त्याच दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हायड्रोजन ट्रेनचे कार्यतत्त्व पारंपरिक डिझेल इंजिनांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. या ट्रेनमध्ये हायड्रोजन इंधन थेट जाळले जात नाही. त्याऐवजी ‘फ्युएल सेल’ या तंत्रज्ञानाद्वारे हायड्रोजन आणि वातावरणातील ऑक्सिजन यांची रासायनिक अभिक्रिया घडवून वीज निर्माण केली जाते.
ही वीज मोटर चालवते आणि उपउत्पादन म्हणून केवळ पाण्याची वाफ निर्माण होते. त्यामुळे धूर, कार्बन डायऑक्साइड किंवा इतर प्रदूषक वायूंचे उत्सर्जन होत नाही. परिणामी ही ट्रेन पर्यावरणासाठी अत्यंत सुरक्षित आणि स्वच्छ मानली जाते. भारतीय रेल्वेने या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन विकसित केली आहे.
प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक रेल्वेची नवी दिशा
ही योजना यशस्वी झाल्यास भारत आशियातील हायड्रोजन रेल्वे तंत्रज्ञान स्वीकारणाऱ्या अग्रगण्य देशांमध्ये स्थान मिळवू शकतो. यामुळे देशातील संशोधन, अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रालाही नवे बळ मिळेल. हायड्रोजन ट्रेनमुळे रेल्वे सेवेत अनेक सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. सर्वप्रथम पर्यावरणीय दृष्टिकोनातून मोठा लाभ होईल. डिझेल इंजिनांमधून कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड आणि सूक्ष्म कणांचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होते. यामुळे वायुप्रदूषण वाढते आणि हवामान बदलालाही चालना मिळते. हायड्रोजन ट्रेनमुळे हे प्रदूषण जवळपास शून्यावर येऊ शकते. स्वच्छ हवा आणि हरित पर्यावरणाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा बदल ठरेल. दुसरा महत्त्वाचा परिणाम म्हणजे ध्वनिप्रदूषणात घट.

डिझेल इंजिनांच्या तुलनेत हायड्रोजन ‘फ्युएल सेल’वर चालणाऱ्या ट्रेन कमी आवाज करतात. त्यामुळे रेल्वेमार्गालगत राहणाऱ्या नागरिकांना अधिक शांत वातावरण मिळेल. रेल्वे प्रवासही अधिक आरामदायी होईल. ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनेही हायड्रोजन ट्रेन महत्त्वपूर्ण ठरते. भारत मोठ्या प्रमाणावर खनिज तेलाची आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारातील तेलाच्या किमतीतील चढ-उतारांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. भविष्यात हरित हायड्रोजनचे देशांतर्गत उत्पादन वाढल्यास इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. त्यामुळे परकीय चलनाची बचत होईल आणि ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल शक्य होईल.
उद्योग, रोजगार आणि रेल्वेच्या कार्यक्षमतेला नवी गती
हायड्रोजन ट्रेनमुळे उद्योग क्षेत्रालाही मोठी चालना मिळू शकते. हायड्रोजन उत्पादन, साठवण, वाहतूक, ‘फ्युएल सेल’ निर्मिती, विशेष टाक्या, नियंत्रण प्रणाली आणि देखभाल यांसारख्या अनेक नवीन उद्योगांना संधी निर्माण होतील. संशोधन संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालये आणि स्टार्टअप कंपन्यांसाठीही नव्या संशोधनाच्या दिशा खुल्या होतील. यामुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. रेल्वेच्या कार्यक्षमतेतही सुधारणा होण्याची शक्यता आहे.
हायड्रोजन ‘फ्युएल सेल’ प्रणाली ऊर्जेचा अधिक कार्यक्षम वापर करते. भविष्यात तांत्रिक प्रगतीमुळे या प्रणाली अधिक विश्वासार्ह आणि कमी खर्चिक बनतील. त्यामुळे दीर्घकालीन दृष्टीने रेल्वेच्या देखभाल खर्चातही घट होऊ शकते. तथापि, हायड्रोजन ट्रेनची अंमलबजावणी ही आव्हानांशिवाय नाही. सर्वात मोठे आव्हान म्हणजे खर्च. ‘हायड्रोजन फ्युएल सेल’ तंत्रज्ञान, विशेष टाक्या आणि सुरक्षा यंत्रणा या सर्वांची किंमत पारंपरिक डिझेल इंजिनांच्या तुलनेत जास्त आहे.
हरित हायड्रोजनचे आव्हान
प्रारंभी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागणार आहे. दुसरे आव्हान म्हणजे हरित हायड्रोजनचे उत्पादन. आज उपलब्ध असलेला बहुतेक हायड्रोजन नैसर्गिक वायूपासून तयार केला जातो. त्यात कार्बन उत्सर्जन होते. पर्यावरणपूरक परिणाम साधण्यासाठी सौर किंवा पवनऊर्जेच्या साहाय्याने पाण्याचे विद्युत अपघटन करून तयार होणारा ‘ग्रीन हायड्रोजन’ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करणे आवश्यक आहे. यासाठी स्वतंत्र पायाभूत सुविधा उभाराव्या लागतील. सुरक्षेचाही प्रश्न महत्त्वाचा आहे.
हायड्रोजन हा अत्यंत हलका आणि ज्वलनशील वायू असल्याने त्याची साठवण आणि वाहतूक अत्यंत सुरक्षित पद्धतीने करावी लागते. आधुनिक सेन्सर, उच्च दर्जाच्या टाक्या, नियमित तपासणी आणि प्रशिक्षित मनुष्यबळ यांची आवश्यकता असेल; मात्र आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे हे आव्हान प्रभावीपणे हाताळणे शक्य आहे. हायड्रोजन भरण्याची केंद्रे उभारणे हे आणखी एक मोठे काम आहे. ज्या मार्गांवर हायड्रोजन ट्रेन चालवायच्या आहेत, त्या मार्गांवर इंधन पुरवठ्याची स्वतंत्र व्यवस्था उभारावी लागेल. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या तसेच खासगी उद्योग यांच्यात प्रभावी समन्वय आवश्यक ठरेल.
कुशल मनुष्यबळ आणि दीर्घकालीन फायदे
तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धताही महत्त्वाची आहे. चालक, अभियंते, तंत्रज्ञ आणि देखभाल कर्मचाऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचे विशेष प्रशिक्षण द्यावे लागेल. कौशल्य विकासावर भर दिल्यास भारतीय रेल्वे जागतिक दर्जाची क्षमता निर्माण करू शकेल. या सर्व आव्हानांनंतरही हायड्रोजन ट्रेनचे फायदे दीर्घकालीन स्वरूपाचे आहेत. सुरुवातीचा खर्च जास्त असला, तरी प्रदूषण कमी होणे, इंधन आयात घटणे, आरोग्यविषयक लाभ, पर्यावरण संरक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास यामुळे देशाला व्यापक आर्थिक व सामाजिक लाभ मिळू शकतो.

जगातील काही देशांनी हायड्रोजन रेल्वेचे यशस्वी प्रयोग करून दाखवले आहेत. त्यांचा अनुभव लक्षात घेऊन भारत स्वतःच्या भौगोलिक आणि आर्थिक गरजांनुसार अधिक किफायतशीर आणि स्वदेशी उपाय विकसित करू शकतो. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांनाही या प्रकल्पामुळे नवी गती मिळू शकते. भारतीय रेल्वेचे भविष्य केवळ अधिक वेगवान गाड्यांमध्ये नसून अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेमध्ये आहे.
भारताच्या हरित विकासाचा नवा अध्याय
हायड्रोजन ट्रेन ही त्या भविष्याची नांदी ठरू शकते. हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करताना विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधणे ही काळाची गरज आहे. हायड्रोजन तंत्रज्ञान हे त्या दिशेने प्रभावी पाऊल ठरू शकते. एकूणच, भारताची हायड्रोजन ट्रेन ही केवळ नव्या इंजिनाची किंवा नव्या रेल्वेगाडीची कथा नाही; ती देशाच्या हरित विकासाची, ऊर्जा स्वावलंबनाची आणि तांत्रिक प्रगतीची नवी दिशा आहे. या प्रकल्पाचे यश केवळ भारतीय रेल्वेचे रूप पालटणार नाही, तर भविष्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठीही नवा आदर्श निर्माण करेल.
पर्यावरणाचे संरक्षण, आर्थिक विकास आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम साधणारी ही संकल्पना भारताला शाश्वत विकासाच्या मार्गावर अधिक वेगाने पुढे नेईल. त्यामुळे हायड्रोजन ट्रेन हा केवळ वाहतुकीतील बदल नसून भारताच्या प्रगत, स्वच्छ आणि आत्मनिर्भर भविष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणून इतिहासात नोंदला जाईल. भारतीय रेल्वे हा देशाचा कणा आहे. रोज कोट्यवधी प्रवाशांना आणि लाखो टन मालाला एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे पोहोचवणारी ही यंत्रणा आता एका ऐतिहासिक आणि क्रांतिकारी वळणावर उभी आहे.
भारतीय रेल्वेच्या नव्या पर्वाची सुरुवात
तंत्रज्ञान आणि पर्यावरणाचा सुवर्णमध्य साधत भारतीय रेल्वेने हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या रेल्वेची यशस्वी चाचणी पूर्ण केली असून, लवकरच ही ट्रेन रूळावर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. हरियाणातील जिंद ते सोनीपत या ९० किलोमीटरच्या मार्गावर होणारा हा प्रवास केवळ एका नव्या ट्रेनची सुरुवात नाही, तर तो भारतीय वाहतूक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या एका नव्या युगाचा प्रारंभ आहे.

भारतात हायड्रोजन ट्रेन दाखल झाल्यामुळे रेल्वेच्या एकूणच कार्यपद्धतीत आणि प्रवासी अनुभवात मोठे बदल घडून येणार आहेत. जिंद ते सोनीपत मार्गावर सध्या धावणाऱ्या डिझेल गाड्यांना हा ९० किलोमीटरचा पल्ला गाठण्यासाठी जवळपास दोन तास लागतात; मात्र हायड्रोजन ट्रेन हेच अंतर अवघ्या एक तासात पूर्ण करेल, ज्यामुळे प्रवाशांचा पन्नास टक्के वेळ वाचणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञान असूनही सर्वसामान्यांचा विचार करून याचे तिकीटदर अत्यंत किफायतशीर ठेवण्यात आले आहेत. याशिवाय, हायड्रोजन इंजिन हे पारंपरिक डिझेल इंजिनच्या तुलनेत साठ टक्के कमी आवाज करते. यामुळे रेल्वे स्थानकांवरील आणि प्रवासादरम्यान होणारे ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होऊन प्रवाशांना अधिक शांत आणि सुखद अनुभव मिळेल.





