शेखर पाटील
- नवी दिल्लीतील अलीकडच्या आंदोलनाने केवळ सरकारलाच प्रश्न विचारले नाहीत, तर भारतीय समाजातील दोन पिढ्यांमधील माहितीच्या विश्वातील खोल दरीही उघड केली.
- एका बाजूला व्हॉट्सॲपवरील फॉरवर्डवर विश्वास ठेवणारी ज्येष्ठ पिढी, तर दुसऱ्या बाजूला इन्स्टाग्रामच्या लाईव्ह, रील्स आणि दृश्य पुराव्यांवर विश्वास ठेवणारी 'जेन-झी'.
- हा संघर्ष केवळ दोन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा नाही, तर सत्य, लोकशाही, आंदोलन आणि संवादाच्या बदलत्या व्याकरणाचा आहे. या डिजिटल स्थित्यंतराचा वेध घेणारे हे भाष्य.
नुकत्यात संपलेल्या देशव्यापी आंदोलनाच्या निमित्ताने 'जेन-झी'ची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ही संकल्पना समजण्यासाठी आपल्याला विविध वयोगटांना असलेली नावे समजून घ्यावे लागतील. साधारणपणे १९४६ ते १९६५ पर्यंत जन्मलेल्यांना बेबी बुमर्स, यानंतर ६५ ते ८० दरम्यानचे जेन-एक्स, ८१ ते १९९६ मिलेनियल्स, १९९७ ते २०१२ मधील 'जेन-झी', आणि २०१२ ते २०२५ दरम्यानचे 'जेन-अल्फा' मानले जातात. यातील 'जेन झी' ही साधारणपणे चौदा-पंधरा ते एकोणतीस-तीस वर्षांच्या दरम्यानची असून जंतर-मंतरवरील आंदोलनात हाच वयोगट मोठ्या प्रमाणात सक्रीय सहभागी झालेला आहे.
या आंदोलनाच्या निमित्ताने देशभरातील चळवळींच्या इतिहासाला एक नवीन वळण कसे लागले आणि यात तंत्रज्ञानातील दोन पिढ्यांचा सुप्त संघर्ष कसा कारणीभूत आहे, याबाबतचे हे भाष्य…

…म्हणूनच 'व्हाटसॲप युनिव्हर्सिटी' असे उपहासात्मक नाव पडले
जगभरात सध्या सोशल मीडिया आणि एकूणच इंटरनेटचा वापर करणाऱ्या चार पिढ्या (बेबी बूमर्स, एक्स, मिलेनीयल्स आणि जेन झी) आहेत. यातील आधीच्या तीन पिढ्या या प्रामुख्याने व्हाटसॲपचा वापर करणाऱ्या मानल्या जातात. ज्येष्ठ पिढी एका बंदिस्त 'इको चेंबर'मध्ये वावरत आहे. व्हॉट्सॲप हे मुख्यत्वे 'ट्रस्ट-आधारित' नेटवर्कवर चालणारे माध्यम आहे, जिथे एखाद्या ओळखीच्या व्यक्तीने पाठवलेला संदेश हा अंतिम सत्य मानला जातो. याच विश्वासार्हतेचा फायदा घेऊन प्रोपगंडा पेरला जातो. यामुळे आपल्या व्हाटसॲप ग्रुपमध्ये कुणीही कोणताही मॅसेज सेंड केला की, त्याची खातरजमा न करता तो तात्काळ दुसरीकडे व्हायरल केला जातो. यातच ओळखीच्या व्यक्तीने संदेश पाठविला असेल तर बिनदिक्कतपणे पुढे ढकलला जातो. यातून विविध राजकीय पक्षांनी आपापल्या फेक प्रोपगंडा प्रसृत करणाऱ्या प्रणाली उभारल्या आहेत. यालाच 'व्हाटसॲप युनिव्हर्सिटी' असे उपहासात्मक नाव मिळाले असून ते जगभरात प्रचलीत झाले आहे.
व्हाट्सॲपवर येणारी माहिती बऱ्याचदा फॉरवर्ड केलेली असते. दुर्दैवाने, या माध्यमाचा वापर मोठ्या प्रमाणावर फेक न्यूज, अर्धसत्य, द्वेषयुक्त संदेश आणि राजकीय प्रोपगंडा पसरवण्यासाठी केला जातो. ज्येष्ठांची पिढी, ज्यांनी माहितीची सत्यता पडताळण्याचे तंत्रज्ञानात्मक शिक्षण घेतलेले नाही, ती बऱ्याचदा या फॉरवर्ड केलेल्या मेसेजवर सहजासहजी विश्वास ठेवते. जास्तीत जास्त फेक कंटेंट व्हाटसॲपवरच शेअर केले जाते ते याचमुळे ! आणि याचमुळे व्हाटसॲप बदनाम झाले आहे.
वास्तविक पाहता, तरूणाई सर्व सोशल मंच उपयोगात आणत असली तरी प्रामुख्याने इन्स्टाग्राम हे त्यांचा जीव की प्राण होय! ते याचा विपुल वापर करतात. हे विलक्षण गतीमान आणि ग्राफीक्स व व्हिडीओजला प्राधान्य देणारे माध्यम आहे. इन्स्टाचा सुपरस्पीड अल्गोरिदम, रील्स, मीम्स, शॉर्ट व्हिडिओ आणि इन्फोग्राफिक्स आदींवर नवीन पिढी फिदा असल्याचे हे आधीच सिध्द झालेले असले तरी आधी मनोरंजन म्हणून वापरण्यात येणाऱ्या इन्स्टाग्रामचा आंदोलनासाठी विलक्षण परिणामकारक पध्दतीत वापर सुरू असल्याचे आपण सर्वजण सध्या अनुभवत आहोत.
यामुळेच जंतर-मंतरवरील आंदोलनाची व्यापकता प्रचंड प्रमाणात वाढली असून हे आंदोलन भौगोलीक सीमारेषा ओलांडून देशच नव्हे तर जगभरात पसरले. येथे क्षणाक्षणाचे अपडेटस हे इन्टाग्रामच्या माध्यमातून जगापर्यंत पोहचले. या प्रोटेस्टच्या पहिल्या टप्प्यात सरकारतर्फे करण्यात येणाऱ्या दाव्यांना आंदोलकांनी लाईव्ह व्हिडीओजच्या माध्यमातून तात्काळ खोडून काढले. तर पोलिसांच्या लाठीमाराची भयावहता देखील जगासमोर परिणामकारकतेने मांडली.
'जेन-झी'चा हुंकार : व्हॉट्सॲप पिढीसमोर इन्स्टाग्राम जनरेशनचे आव्हान
या आंदोलनातील विशेष बाब म्हणजे अनेक तरूण-तरूणींनी आपल्या पालकांना देखील सोशल मीडियातून फटकारले आहे. आधीच्या पिढीतील बेजबाबदारावर जाहीरपणे रोष व्यक्त करणाऱ्या पिढीने आज जंतर-मंतरवरून सरकारला आव्हान दिले आणि येथेच आता भारतातील आंदोलनांच्या इतिहासाने एक नवीन वळण घेतलेय असे आपण ठामपणे म्हणू शकतो. जंतर-मंतरचे आंदोलन हे आधीच्या चळवळींना छेद देणारे ठरले आहे. कारण आंदोलक तरूणाई हे एकाच वेळी सरकारशी लढत असतांना अनेकदा आपल्या वडिलधाऱ्यांशी देखील संघर्ष करत असल्याचे या आंदोलनातून दिसून आले. अनेक तरूणांनी आपले कुटुंबिय हे भाजपचे समर्थक असून देखील आपण या आंदोलनात सहभागी झाल्याचे आवर्जून नमूद केल्याची बाब ही लक्षणीय अशीच आहे.
'व्हॉट्सॲप'वर मिळणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवणारी ज्येष्ठ पिढी आणि 'इन्स्टाग्राम'च्या अल्गोरिदममध्ये वावरणारी वा त्याच्या भोवती फिरणारी तरुण पिढी यांच्यातील हा संघर्ष भारतीय समाजमनाच्या अंतर्गत रचनेतील बदलांचे प्रतिबिंब आहे. एकाच घरात, जेवणाच्या टेबलावर इन्स्टाग्राम पाहणारा मुलगा आणि व्हॉट्सॲपचे फॉरवर्ड वाचणारे वडील यांच्यात होणारा संवाद हा केवळ घरगुती वाद नसून तो दोन पिढ्यांमधील माहितीच्या स्त्रोतांचा संघर्ष आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही पिढी गुंतागुंतीचे राजकीय प्रश्न अत्यंत सोप्या, उपहासात्मक आणि थेट पद्धतीने मांडत आहे. इन्स्टाग्रामवरील हा संवाद विकेंद्रित आणि मुक्त स्वरूपाचा आहे. याचा अर्थ तरुण नेहमीच बरोबर आणि ज्येष्ठ नेहमीच चुकीचे असा अजिबात होत नाही. उलट दोन्ही पिढ्यांच्या अनुभवांमध्ये वास्तवाचे वेगवेगळे पैलू आहेत. ज्येष्ठ पिढीला सामाजिक स्थैर्याची किंमत माहिती आहे, तर तरुण पिढी पारदर्शकतेची मागणी अधिक जोरात करते.

जेव्हा जंतर-मंतरवर एखादा तरुण थेट प्रक्षेपण (लाईव्ह स्ट्रीम) करतो, तेव्हा तो मुख्य प्रवाहातील माध्यमांच्या चौकटी तोडून थेट सत्याशी संवाद साधत असतो. ज्येष्ठांची पिढी व्हॉट्सॲपवर आलेल्या संदेशांना 'अनुभव' म्हणून स्वीकारते, तर तरुण पिढी इन्स्टाग्रामवर दिसणाऱ्या 'दृश्यात्मक' पुराव्यांवर विश्वास ठेवते. हा संघर्ष सत्याच्या शोधाच्या दोन भिन्न पद्धतींमधील आहे, ज्यामुळे एकाच घरात राहणाऱ्या दोन पिढ्यांचे माहितीचे अवकाश पूर्णपणे वेगळे झाले आहे. ही दरी केवळ तांत्रिक नसून ती वैचारिक ध्रुवीकरणाला खतपाणी घालणारी ठरत आहे.
माहितीच्या या माध्यमांतून निर्माण होणाऱ्या मूल्यसंघर्षाने भारतीय समाजव्यवस्थेसमोर एक मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. इन्स्टाग्राम जनरेशन एखाद्या व्यक्तीची ओळख पाहण्यापेक्षा त्याचा व्हिडिओ, त्यातील पुरावा आणि त्यावर होणारी सार्वजनिक प्रतिक्रिया अधिक महत्त्वाची मानते. त्यामुळे एका पिढीसाठी "फॉरवर्ड"तर दुसऱ्यासाठी "लाईव्ह" हे सत्य असते. संघर्षाच्या लढ्यात या पिढीच्या हातातील स्मार्टफोन आणि त्यातील इन्स्टाग्राम हे भेदक अस्त्र ठरल्याचे सिध्द झाले आहे. याला अल्गोरिदमची जोड मिळाल्यावर काय होते ? ते आपण नुकतेच अनुभवले आहेच !
रील्स, लाईव्ह आणि लोकशाही : जेन-झीने बदलले आंदोलनांचे व्याकरण
पारंपरिक राजकारणात आंदोलने विखुरण्यासाठी पोलीस बळाचा किंवा दडपशाहीचा वापर केला जात असे, पण डिजिटल युगात दडपशाहीचे हेच तंत्र आंदोलकांसाठी उलटवून लावण्याचे 'शस्त्र' बनले आहे. पूर्वी लाठीमार किंवा अटकेच्या भीतीने आंदोलने संपत असत, पण आता पोलीस कारवाई हाच आंदोलनाचा 'डिजिटल आशय' (Content) बनत आहे. पोलिसांकडून होणारा लाठीमार, विव्हळणारे व रडणारे विद्यार्थी आणि सोनाम वांगचुक यांच्यासारख्या नेत्यांची होणारी अटक यांचे व्हिडिओ हे दडपशाहीचे प्रतीक न राहता सलोखा आणि संघर्षाचे 'डिस्ट्रिब्युटेबल एविडन्स' (पुराव्यांचे वितरण) ठरले आहेत.
पोलीस जितक्या वेगाने कारवाई करतात, तितक्याच वेगाने त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यामुळे आंदोलनाला अधिक सहानुभूती आणि बळ मिळते हे यातून अनेकदा दिसले. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना 'बॅड कॅरेक्टर्स' म्हणून संबोधिणे, ही त्यांची सर्वात मोठी रणनीतिक चूक ठरली. तरूणाईने या विधानालाच आंदोलनाच्या प्रचाराचे साधन बनवत आंदोलनाशी संबंधीत लाखो रील्स व्हायरल केले. तंत्रज्ञानाने सामान्य नागरिकाला 'कंटेंट क्रिएटर' बनवून सत्तेच्या पारंपरिक आणि मजबूत रचनेला एक अदृश्य पण प्रभावी आव्हान दिले आहे. आता सत्य हे केवळ सरकारी निवेदनांमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये किंवा टेलिव्हिजनच्या पडद्यावर नसून ते विद्यार्थ्यांच्या मोबाईल स्क्रीनवर जिवंतपणे आणि कोणत्याही संस्करणाशिवाय (Editing) म्हणजेच 'असे-आहे-तसे' पाहायला मिळते. यामुळे सत्तेचा जो दरारा होता, तो आता माहितीच्या पारदर्शकतेसमोर हतबल होताना दिसून आला. यात प्रसारमाध्यमांची मिरासदारी देखील मोडीत निघाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'सेल्फी-स्टाईल' व्हिडिओ
तरुणांच्या या बदललेल्या संवादशैलीची आणि डिजिटल प्रभावाची दखल सत्ताधाऱ्यांनाही अत्यंत गांभीर्याने घ्यावी लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यरात्री प्रसिद्ध केलेला 'सेल्फी-स्टाईल' व्हिडिओ हे याचे उत्तम आणि धोरणात्मक उदाहरण आहे. औपचारिक निवेदने किंवा टेलिव्हिजनवरील औपचारिक भाषणांऐवजी पंतप्रधानांनी थेट फोन हातात धरून, एका सोशल मीडिया क्रिएटरच्या शैलीत तरुणांशी साधलेला संवाद हा माध्यमांच्या राजकारणातील एक ऐतिहासिक बदल दर्शवतो. अधिकृत पत्रकार परिषदांना पूर्णपणे फाटा देऊन थेट संवाद साधण्याची ही गरज केवळ तंत्रज्ञानामुळे नाही, तर तरुणांच्या भाषेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या अनिवार्यतेमुळे निर्माण झाली आहे. यात त्यांनी त्यांच्या नेहमीच्या मित्रों या संबोधनाऐवजी फ्रेंडस अशी दिलेली हाक देखील लक्षणीय होय. याचाच अर्थ असा की, त्यांनी नवीन पिढीशी संवाद साधतांना त्यांच्याच दृश्यभाषेचा वापर केला.

या एका व्हिडिओनंतर पंतप्रधानांच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्ये एका रात्रीत १० लाखांची भर पडली, हे आकडे काय दर्शवतात? हे दाखवतात की, सत्तेला आता 'कंटेंट क्रिएटर'च्या भूमिकेत शिरावे लागत आहे. माध्यमांचा हा 'स्थित्यंतर' काळ आहे, जिथे अधिकृत प्रेस रिलीजचा मृत्यू होत असून रील्स आणि सेल्फी व्हिडिओ हे संवादाचे नवे आणि एकमेव प्रभावी माध्यम बनत आहेत. पंतप्रधान जेव्हा थेट बोलतात, तेव्हा ते माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची जबाबदारी टाळत तर नाहीत ना, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. तरीही, इन्स्टाग्राम जनरेशनला पटेल अशा भाषेत आणि फॉरमॅटमध्ये मांडणे हे आता सरकारसाठी बंधनकारक झाले आहे, कारण या पिढीचा 'अटेंशन स्पॅन' कमी असला तरी त्यांचा प्रभाव मात्र प्रचंड आहे.
लोकशाहीच्या प्रगल्भतेच्या प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाची वळणवाट
नवी दिल्लीतल्या आंदोलनाने भारतीय लोकशाहीच्या एका नवीन डिजीटल आणि अधिक पारदर्शक आयाम दिला आहे. 'जेन-झी' केवळ मोबाईलमध्ये गुंतलेली किंवा विरंगुळा शोधणारी पिढी नसून, ती मोबाईलच्या माध्यमातून व्यवस्थेला जाब विचारणारी 'डिजिटल नागरिक' बनली आहे. इन्स्टाग्रामचा हुंकार आणि व्हॉट्सॲपचा पूर्वग्रह यांमधील दरी भरून काढण्यासाठी केवळ तंत्रज्ञान पुरेसे नाही, तर त्यासाठी प्रामाणिक आणि तथ्याधारित संवादाची गरज आहे. भविष्यातील भारताची लोकशाही ही केवळ पाच वर्षातून एकदा दिल्या जाणाऱ्या मतावर अवलंबून नसेल, तर ती डिजिटल अवकाशातील पारदर्शकता, माहितीची पडताळणी आणि सत्तेला दररोज विचारल्या जाणाऱ्या टोकदार प्रश्नांवर आधारित असेल. ही आंदोलने म्हणजे संस्थात्मक सुधारांसाठी दिलेला एक गंभीर आणि शेवटचा इशारा आहेत. जर आपण या तरुणांच्या आवाजाला केवळ 'सोशल मीडियावरील गोंधळ' म्हणून दुर्लक्षित केले, तर आपण एका मोठ्या लोकशाही संकटाला निमंत्रण देऊ. डिजिटल अवकाशात पारदर्शकता शोधणारा हा तरुण वर्गच भविष्यातील भारताची दिशा निश्चित करेल, यात शंका नाही.
म्हणूनच, या स्थित्यंतराकडे केवळ एक तात्कालिक राजकीय घटना म्हणून न पाहता, ती भारतीय लोकशाहीच्या प्रगल्भतेच्या प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाची वळणवाट आहे, हे आपण मान्य केले पाहिजे. भविष्यातील भारताची लोकशाही मतपेटीतून निघून आता मोबाईलच्या स्क्रीनवर आणि तिथून पुन्हा धोरणात्मक निर्णयांपर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेत आहे, आणि हेच या डिजिटल युगातील सर्वात मोठे सामाजिक-राजकीय यश ठरणार आहे. निव्वळ आकडेवारी पाहिली असता भारतात सर्वाधीक युजर्स हे व्हाटसॲपचे ( सुमारे ८५ कोटी ! ) असून खालोखाल फेसबुक (७० कोटी ) तर इन्स्टाग्रामचे वापरकर्ते तुलनेत कमी म्हणजेच ५५ कोटी आहेत. ही आकडेवारी देशातील तरूणांच्या संख्येच्याच आसपास होय. येत्या काही वर्षांमध्ये हीच पिढी प्रस्थापित होईल तेव्हा 'डिजीटल ॲक्टीव्हिजम' देखील प्रचंड प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.






