- संजना खंडारे
त्यांचं आपापसात अगदी किरकोळ भांडण झालं होतं… लहान लहान मुलं, वय किती तर अवघ्या आठ-दहा वर्षांची ती निरागस पोरं! पण या लहानग्यांनी अगदी मोठ्यांसारखं हे भांडण मनाला लावून घेतलं. मनात राग ठेवला, एकमेकांवर डुख धरला आणि त्याचा परिणाम इतका भयंकर झाला की त्या घटनेने सबंध महाराष्ट्र हादरला…
जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील श्री गणपती विद्यालयाच्या आदिवासी विकास प्रकल्पअंतर्गत असलेल्या आश्रमशाळेत 21 जुलैच्या मध्यरात्री ती धक्कादायक घटना घडली. आठ वर्षांच्या इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या एका मुलाचा त्याच्याच वयाच्या वर्गमित्राने आणि आणखी एका चौदा वर्षाच्या मुलाने दोरीने गळा आवळून खून केला. एका आदिवासी आश्रमशाळेत घडलेली ही भयावह घटना, मात्र त्याची ना कुठे फारशी चर्चा झाली ना ही बातमी ‘ब्रेकिंग’ ठरली. आदिवासी-भटक्या विमुक्तांना जसं समाजाने लाथाडलं आहे तसंच काहीसं या घटनेच्याबाबतीत घडलं.
‘बाईमाणूस’च्या टीमने या आश्रमशाळेला भेट दिली आणि समोक अनेक प्रश्न उपस्थित झाले. या कोवळ्या मुलांनी इतकं टोकाला जाऊन असं का केलं असेल? वादाचं नेमकं कारण काय होतं? त्या रात्री हॉस्टेलच्या रूम नंबर 13 मध्ये नेमकं काय घडलं? हे घडत असताना कोणालाच कसं कळलं नाही? आश्रम शाळेच्या वसतीगृहामध्ये ‘त्या’ रूममध्ये रात्री एकाचवेळी 24 विद्यार्थी झोपलेले होते.. त्या 24 पैकी कोणाला काहीच कसं कळलं नाही? इयत्ता दुसरीत शिकणारे विद्यार्थी हत्येचा कट कसा काय रचू शकतात? किरकोळ वाद इतक्या टोकाला गेलाच कसा ज्यातून एका आठ वर्षाच्या मुलाला त्याचा जीव गमवावा लागला....?
21 जुलैच्या रात्री खोली नंबर 13 मध्ये नेमकं काय घडलं?
नेहमीप्रमाणे आश्रम शाळेच्या वसतीगृहामधील मुलं जशी सकाळी पाच वाजता उठतात तसाच बालवीर अजय पवार देखील उठला… आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच्या या निवासीशाळा आणि वसतिगृहात तीनशे विद्यार्थी राहतात. बालवीर हा ‘पारधी’ समाजाचा. बालवीरची आई सखू आणि वडील अजय गावोगावी फिरून लहान मुलांची खेळणी विकतात. शहरात सध्या गजानन महाराजांची पालखी आलेली आहे. या पालखीबरोबर फिरून ते खेळणी विकतात. बालवीरला चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी त्याला या आश्रम शाळेत दाखल केले होते. लवीरची बहीण गौरी (वय 9 )देखील याच वसतिगृहात राहते. या दोघांनी गेल्या वर्षी येथे प्रवेश घेतला.
तर, सकाळचे सगळे विधी करून बालवीर 7.00 वाजता इतर मुलांसोबतच नाश्ता करण्यासाठी गेला.. 8.50 ला शाळा भरते. बालवीर शाळेत गेला ते दुपारी तीन वाजेपर्यंत. तीनच्यानंतर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे शाळेतच एक्स्ट्रा क्लास म्हणजेच ट्युशन घेतले जातात.. सात ते नऊ वाजेपर्यंत मुलांचा खेळण्याचा वेळ असतो... बालवीर मुलांसोबत ग्राउंडवर मनमोकळेपणाने खेळत होता. नऊ वाजता त्याने वस्तीगृहाच्या कॅन्टीनमध्ये जेवण केलं आणि इतर मुलांसोबत तो रूममध्ये झोपायला गेला... रूम नंबर 13. या रूममध्ये एकूण 24 विद्यार्थी त्या रात्री होते.. पण कोणालाही कल्पना नव्हती की आपल्या सोबत राहणाऱ्या बालवीरची आपल्या सोबतची ही शेवटची रात्र ठरेल..
मुलांना झोपण्यासाठी वसतीगृहाच्या खोलीत ‘डबल बेड’ठेवण्यात आले आहेत. एक विद्यार्थी वर तर दुसरा खाली झोपतो. बालवीरचा पलंग रूम मधील डाव्या कोपऱ्यातील शेवटचा बेड होता. तो वरच्या बेडवर झोपायचा… 21 जुलैच्या रात्री सर्व मुलं झोपल्यानंतर बालवीरचे त्याच्याच बेडवर झोपलेल्या मुलाशी किरकोळ कारणावरून भांडण झाले.
रागात आलेल्या बालवीरच्या मित्राने बेड खाली असलेली दोरी घेतली. त्या दोरीने त्याने दोन वेळा बालवीरच्या गळ्याभोवती गुंडाळून त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात दुसऱ्या मुलाचा आणखी एक मित्र आला आणि दोघांपैकी एकाने बालवीरचे तोंड दाबले.. बालवीरचा श्वास गुदमरला. गळ्याला फास पक्का बसला होता... रात्री एकच्या सुमारास बालवीरचा मृत्यू झाला…
बालवीरचा खून करून त्याचे मित्र गुपचूप झोपी गेले…
बालवीरचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच ते दोघेही त्यांच्या त्यांच्या जागेवर जाऊन झोपले. सकाळी बालवीर उठत नव्हता म्हणून रूममधल्या मुलांनी वसतीगृहाच्या कर्मचाऱ्याला बोलावलं. बालवीर निपचित पडूनअसल्याने कर्मचाऱ्याला संशय आला आणि त्याने शाळेतील शिक्षकांना फोन केला. शिक्षक पोहोचले, बालवीरच्या तोंडातून उलटी झाल्याचं दिसत होतं.
प्रथमदर्शनी सगळ्यांना असं वाटलं बालवीरने झोपेमध्ये उलटी केली, तीच घशात गेली. त्याचा श्वास गुदमरला असावा आणि त्यामुळे त्याचा जीव गेला. त्याला तात्काळ जवळच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी बालवीरला मृत घोषित केलं. बालवीरच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करत असताना डॉ. कृष्णा वानखेडे यांना बालवीरच्या गळ्यावर काही निशाण दिसले आणि बालवीरचा मृत्यू नाही तर खून झालाय असा संशय डॉक्टरांना आला. त्यांनी लगेचच पोलिसांना बोलवलं. एफआयआर दाखल झाली. आणि बालवीरचे शव पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले..
तोपर्यंत पोलिसांनी वसतीगृह गाठलं, बालवीरच्या खोलीत कोण कोण झोपायला होतं त्या सगळ्या मुलांना बोलावलं.. साध्या पोषाखात आलेल्या महिला पोलीसने मुलांशी प्रेमाने संवाद साधला आणि बालवीरच्या खोलीत असलेल्या दोन जणांनी त्यांचा गुन्हा कबूल केला. त्यापैकी एक आठ वर्षाचा तर दुसरा १४ वर्षाचा होता. त्या मुलांच्या पालकांना आणि बालवीरच्या पालकांना पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं. मुलांनी पालकांसमोरही गुन्हा कबूल केला. या दोन्ही मुलांना आता बाल सुधार गृहामध्ये नेण्यात येणार आहे.
शाळेचे संस्थाचालक काय म्हणतात?
ही शाळा ज्या संस्था चालकांची आहे. ते राजाभाऊ देशमुख ‘बाईमाणूस’शी बोलतांना म्हणाले की, "जेव्हा आम्हाला हा प्रकार कळाला तेव्हा आम्ही स्वतः स्तब्ध झालो. इयत्ता दुसरीत असणारा विद्यार्थी असा कसा करू शकतो? आमच्या शाळेमध्ये याआधी असा प्रकार कधीच घडला नाही. या प्रकारामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होणार नाही याची आम्ही सध्या पूर्ण खबरदारी घेतोय. आमच्या वसतीगृहामध्ये, शाळेमध्ये सगळीकडे सिसिटीव्ही कॅमेरेआहेत. मुलांच्या रूममध्ये सहसा कॅमेरे लावत नाहीत म्हणून आम्ही ते लावले नाहीत. पण असा प्रकार यापुढे घडू नये, यासाठी आम्ही डोळ्यात तेल घालून काळजी घेऊ."
ही घटना उघडकीस आल्यानंतर शाळेचे जे शिक्षक सर्वप्रथम घटनास्थळी पोहचे होते त्या अनिल पटाईत (नाव बदलले आहे) यांच्याशी ‘बाईमाणूस’ने संवाद साधल्यावर त्यांनी सांगितलं की, " वसतीगृहाच्या नवीन बिल्डिंगमध्ये मुलांना शिफ्ट केलं होतं.. करून फक्त 15 दिवसच झाले आहेत. आमची ही शाळा खूप चांगली आहे आणि पालकांचा आमच्या शाळेवर विश्वास आहे. म्हणून हा प्रकार घडल्यानंतरही आमची शाळा बंद नाही झाली.
बुधवारी शाळा नेहमीसारखी सुरू झाली, वसतीगृहदेखील सुरूच ठेवले. प्रार्थनेनंतर सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी बालवीरला श्रद्धांजली वाहिली. दिवसभर अनेक पालकांनी वसतीगृहाला भेट देऊन चौकशी केली. पोलिसांनी त्यांचा तपास केला, शाळेने त्यांना पूर्णपणे सहकार्य केलं. मृत मुलाच्या आई-वडिलांना जी मदत लागेल ती शाळेच्या संस्थेद्वारे केली जाईल."
जी दोन मुलं दोषी आढळली त्यापैकी एकाचे नातेवाईक नारायण ढोके (नाव बदलले आहे) भोकरदन पोलीस स्थानकात बसले होते. ते सांगतात की, "आमच्या मुलाने जरी गुन्हा कबूल केला असला तरी आम्हाला दाट संशय आहे की पोलिसांच्या धाकामुळे त्याने तो गुन्हा कबूल केला असावा. इतका लहान मुलगा असं काही करूच शकत नाही. आज दोन वर्ष झाली आमचा मुलगा या शाळेत आहे, पण त्याची आजवर एकही तक्रार नाही आली. मुलाने तसं पोलिसांसमोर कबूल केलंच आहे. आता पुढे त्याचे भविष्य वाचवण्यासाठी जे प्रयत्न करता येईल ते प्रयत्न आम्ही करू."
‘सीआयडी’ मालिका बघायला मुलांना आवडायचं…
या संपूर्ण प्रकाराचा पंचनामा करणारे भोकरदन पोलिस स्टेशनचे किरण बिडवे यांनी ‘बाईमाणूस’शी बोलताना सांगितलं की, "दोन्ही आरोपी मुलांनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांसमोरही, त्यांच्या पालकांसमोरही आणि कोर्टात सुद्धा. या मुलांना आता बाल सुधारगृहात नेण्यात येईल. या मुलांमध्ये वादाचं कारण किरकोळ होतं. पण त्याला मारण्याचा कट कदाचित आधीही रचलेला असू शकतो. या लहान मुलांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सीआयडी या टीव्ही शोचे अनेक एपिसोड बघितलेत असं मुलांनी कबूल केलं."
…आणि त्या अभागी मातेने हंबरडा फोडला
बालवीर पवार हा जालनाच्या परतूर तालुक्यातील पाडळी गावात राहायचा. त्याचे आई-वडील गावोगावी खेळणी विकून उपजीविका करत असतानाच, त्याला चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी त्याला या निवासी शाळेत दाखल केले होते. वसतीगृहाचे व्यवस्थापक माउली तोटे यांनी बालवीरच्या आईला फोन करून त्यांचा मुलगा आजारी असल्याचे फोनवरून कळवले. त्यानुसार त्या भोकरदनला आल्या, शिक्षकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे आपल्या मुलाचा मृतदेह बघताच त्या मातेने टाहो फोडला. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा ‘बाईमाणूस’ने प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. बालवीरचे शवविच्छेदन झाल्या झाल्या त्याचे शव घेऊन आई-वडील त्यांच्या गावी परत गेल्याचे कळले.
हा प्रसंग समाजासाठी, शाळा व्यवस्थापनासाठी व पालकांसाठी एक मोठा इशारा आहे. वयाच्या किशोरवयीन अवस्थेत असलेल्या मुलांमध्ये संवाद आणि भावनिक समज निर्माण करण्यासाठी शाळा व पालकांनी अधिक सक्रिय भूमिका घ्यायला हवी. तसेच आश्रमशाळा, निवासी शाळा आणि वसतिगृहांमध्ये रात्रीच्या सुरक्षेची निश्चित यंत्रणा असणं आवश्यक आहे. आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा हा बालमनावर झालेला अतिशय गंभीर परिणाम आहे.
टीव्ही आणि मोबाइलवरील हिंसाचार सहजपणे दिसत आहे. असे खून आणि द्वेषाची भयानक दृश्ये बघून मुलांच्या मनात त्याचे अनुकरण करण्याची भावना अनावर होते. त्यामुळेच या घटना घडतात. बालवीरच्या मृत्यूने केवळ एका कुटुंबाचा मुलगा गमावला नाही, तर शिक्षण संस्थेतील सुरक्षिततेच्या संकल्पनेलाही काळं फासलं आहे.






