टीम बाईमाणूस
- महाराष्ट्राच्या खाद्य आणि सांस्कृतिक वारशाला एकाच वेळी दुहेरी सन्मान मिळाला आहे. लोणावळ्याच्या जगप्रसिद्ध चिक्कीबरोबरच नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या पारंपरिक तांबूलालाही नुकतेच भौगोलिक मानांकन (GI Tag) प्राप्त झाले आहे.
- एका बाजूला सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेली शतकभराची गोड परंपरा, तर दुसऱ्या बाजूला देवी रेणुकामातेच्या उपासनेशी जोडलेली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा.
- या दोन्ही उत्पादनांना मिळालेला जीआय टॅग हा केवळ सन्मान नसून स्थानिक ओळख, परंपरा आणि अर्थकारणाला मिळालेले कायदेशीर संरक्षण आहे.
महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्य, सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाला नुकताच दुहेरी मान मिळाला आहे. सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेल्या जगप्रसिद्ध लोणावळा चिक्कीला आणि रेणुकामातेच्या माहूर क्षेत्राशी शतकानुशतके जोडलेल्या पारंपरिक तांबूलाला भौगोलिक मानांकन (GI Tag) प्राप्त झाले आहे. एका बाजूला कष्ट, उद्योजकता आणि पर्यटनातून जागतिक ओळख मिळवलेली गोड परंपरा, तर दुसऱ्या बाजूला श्रद्धा, संस्कृती आणि धार्मिक आचारांचा वारसा जपणारी परंपरा. या दोन्ही उत्पादनांना मिळालेला जीआय टॅग हा केवळ सन्मान नसून महाराष्ट्राच्या स्थानिक ज्ञान, परंपरा आणि अर्थव्यवस्थेला मिळालेले कायदेशीर संरक्षण आहे. या निमित्ताने लोणावळा चिक्कीचा इतिहास, माहूरच्या तांबूलाची अनोखी परंपरा आणि त्याला मिळालेल्या या जागतिक मान्यतेमागची कहाणी.
लोणावळा म्हटलं की हिरव्यागार डोंगररांगा, धबधबे आणि पावसाळी पर्यटनासोबतच सर्वांच्या ओठांवर येणारं नाव म्हणजे लोणावळ्याची प्रसिद्ध चिक्की. आता या गोड परंपरेला मोठा सन्मान मिळाला आहे. लोणावळा चिक्कीला भौगोलिक निर्देशांक (Geographical Indication - GI) टॅग प्राप्त झाला असून, या निर्णयामुळं लोणावळ्याच्या शंभर वर्षांहून अधिक जुन्या खाद्यपरंपरेला अधिकृत ओळख आणि कायदेशीर संरक्षण मिळालं आहे. या मानांकनामुळं चिक्कीच्या अस्सलपणाची खात्री निर्माण होणार असून स्थानिक उत्पादक, व्यापारी आणि ग्राहक यांनाही मोठा लाभ होणार आहे.

लोणावळ्याच्या चिक्कीला नुकताच भौगोलिक मानांकनाचा (GI Tag) बहुमान मिळाला आणि महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतील एका साध्यासुध्या पदार्थाला जागतिक ओळखीचा अधिकृत शिक्का बसला. गूळ, शेंगदाणे आणि तुपाच्या साध्या संगमातून तयार झालेली ही चिक्की केवळ एक मिठाई नाही तर ती सह्याद्रीच्या घाटांची, ब्रिटिशकालीन रेल्वेची, कष्टकरी हातांची आणि स्थानिक उद्योजकतेची शंभर वर्षांची कहाणी आहे. कुटीर उद्योगातून जागतिक ब्रँडपर्यंत पोहोचलेल्या या प्रवासाचा आणि जीआय टॅगनंतर उघडलेल्या नव्या आर्थिक संधींचा हा मागोवा.
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून लोणावळ्यात प्रवेश करताच एक गोष्ट लगेच लक्षात येते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसणाऱ्या असंख्य चिक्कीच्या दुकानांमधून दरवळणारा भाजलेल्या शेंगदाण्यांचा आणि वितळलेल्या गुळाचा सुगंध. आज हा सुगंध लोणावळ्याची ओळख आहे. पण या सुगंधामागे दडलेली कहाणी तब्बल शंभर वर्षांपूर्वीच्या सह्याद्रीत सुरू होते.
ब्रिटिश आणि भारतीय कामगार यांचा चिक्कीशी कसा आहे संबंध?
१८५७ च्या उठावानंतरचा तो काळ. भारतावर इंग्रजांची पकड मजबूत झाली होती. ब्रिटिशांनी व्यापार वाढवण्यासाठी भारतात दळणवळणाची साधने निर्माण करण्यावर भर दिला होता. यामध्ये त्यांचा सर्वात महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होता मुंबई-पुणे लोहमार्ग. मुंबईला दक्षिण भारताशी जोडण्यासाठीचं पाहिलं पाऊल होत. या लोहमार्ग निर्मितीमधला सर्वात मोठा अडथळा होता खंडाळ्याच्या घाटाचा. जगावर राज्य करणारे इंग्रज निसर्गापुढे हार मानणारे नव्हते. आधुनिक ब्रिटीश तंत्रज्ञान आणि हजारो भारतीय कष्टकरी हातांनी खंडाळ्याच्या घाट फोडला. तब्बल २५ बोगदे बनवून मुंबईला पुण्याशी जोडलं. त्याकाळातला हा चमत्कारच होता.
हा चमत्कार साध्य करण्यासाठी भारतीय मजूर राबत होते. प्रचंड थंडी, पाऊस याच्याशी सामना देत होते. अशावेळी त्यांचा आहार त्यांच्या श्रमाला पुरेसा नव्हता. काम करणारे कामगार चक्कर येऊन पडणे हा तर रोजचा परिपाठ झाला होता. ब्रिटीश अधिकारी सुद्धा या प्रकाराने हवालदिल झाले होते.

लोणावळ्यामध्ये भेवरजी अगरवाल नावाचे एक सदगृहस्थ होते. राजस्थान मधून आलेल्या अगरवाल यांच लोणावळ्यामध्ये मिठाईचं दुकान होत. दुकानाचे नाव मगनलाल मिठाई. आपल्या लाडक्या मुलाच्या नावान त्यांनी हे मिठाईच दुकान सुरु केलं होत. अगरवाल शेठना रोज चालले कामगारांचे हाल दिसत होते.. त्यांना आठवलं राजस्थानला त्यांच्या गावाकडे गुळभाकरी म्हणून प्रकार असतो. याच धर्तीर शेंगदाणे आणि गुळ एकत्र करून त्यांनी गुडदानी बनवण्याचा प्रयोग केला.
…आणि या रेसिपीला नाव पडलं, चिक्की!
हे दोन्ही पदार्थ लोणावळ्यामध्ये सहज उपलब्ध होते त्यामुळे किंमतसुद्धा जास्त नव्हती. थंडीत आणी पावसात भरपूर दिवस टिकणारी तत्काळ उर्जा देणारी आणि विशेष म्हणजे खिशाला परवडणारी पौष्टिक गुडदानी रेल्वे मजुरांच्यात लगेच हिट झाली. भेवरजी यांच्या पाठोपाठ मगनलाल आणि त्यांचे दोन सुपुत्र अंबालाल, मोहनलाल यांनी गुडदानी च्या धंद्याला बरकत आणली.
फक्त रेल्वे कामगारच नाही तर लोणावळा स्टेशनला थांबणाऱ्या रेल्वेप्रवाशांमध्ये ही गोड गुडदानी खूप फेमस झाली. गुडदानी खरेदी करताना उडालेल्या झुंबडीमुळे अनेकांची रेल्वे मिस होऊ लागली. मुंबई पुणे रेल्वेचा लोणावळ्याच्या हॉल्टचा वेळ वाढवण्यात आला. याशिवाय अगरवाल शेठना अधिकाऱ्यांनी रेल्वे मध्ये पॅकेजमधून गुडदानी विकण्याची विनंती केली. अंबालाल अगरवाल यांनी डोके लढवून आज आहे ते पॅकेजिंगला सोपे असे रूप गुडदानीला दिले. आता प्रश्न आला नावाचा. ब्रँड म्हणून सगळ्यांच्या तोंडात हे नाव बसले पाहिजे. खूप विचार केल्यावर त्यांना नाव सुचले,
"चिक्की"... गुडदानीला अख्ख्या देशभर चिक्की म्हणूनच ओळखले जाऊ लागले.
कुटीर उद्योगातून जागतिक ब्रँडपर्यंत... लोणावळा चिक्कीचा गोड प्रवास
रेल्वेमार्ग सुरू झाला. सह्याद्रीचे धुके, धबधबे आणि थंड हवा अनुभवण्यासाठी मुंबई-पुण्यातील पर्यटक लोणावळ्यात येऊ लागले. प्रवासाच्या आठवणी म्हणून काहीतरी खास घेऊन जाण्याची त्यांची इच्छा असे. तेव्हा स्थानिकांनी चिक्कीला स्मृतिचिन्हाचे रूप दिले. हळूहळू रेल्वे स्थानकाजवळ आणि बाजारपेठेत लहान दुकाने उभी राहिली. काही इतर कुटुंबांनी घरगुती पातळीवर चिक्की बनविणे सुरू केले. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाककृती गेली. गुळाचा दर्जा, शेंगदाणे भाजण्याची पद्धत, पाकाची योग्य वेळ आणि तुकडे कापण्याचे कौशल्य ही सर्व कारागिरी अनुभवातून विकसित झाली.

याच काळात काही उद्योजकांनी या व्यवसायाला संघटित रूप दिले. पॅकिंग, दर्जा, विविध चवी आणि ब्रँडिंग यामुळे लोणावळ्याची चिक्की महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशभर पोहोचू लागली. आज शेंगदाण्यांबरोबरच काजू, बदाम, तीळ, ड्रायफ्रूट्स, नारळ, पिस्ता, अंजीर अशा अनेक प्रकारांमध्ये चिक्की उपलब्ध आहे. पण तिच्या मूळ चवीचा आत्मा अजूनही गूळ आणि शेंगदाण्यांच्या साधेपणातच आहे.
लोणावळ्याच्या चिक्कीला मिळालेला भौगोलिक मानांकन (Geographical Indication - GI) हा केवळ सन्मानाचा शिक्का नाही तर तो स्थानिक उद्योजकांच्या अनेक दशकांच्या परिश्रमाला मिळालेले कायदेशीर संरक्षण आहे. आतापर्यंत देशात कुठेही चिक्की तयार करून तिच्यावर "लोणावळा चिक्की" असा शिक्का मारणे सहज शक्य होते. ग्राहकांना ती खरी लोणावळ्यातील आहे की नाही, हे ओळखण्याचा कोणताही अधिकृत मार्ग नव्हता. परिणामी, नावाचा फायदा अनेकांनी घेतला; पण त्यामागे श्रम करणाऱ्या स्थानिक उत्पादकांना त्याचा फारसा लाभ मिळत नव्हता.
जीआय टॅगने ही परिस्थिती बदलली आहे. आता "लोणावळा चिक्की" हे नाव विशिष्ट भौगोलिक परिसराशी जोडले गेले आहे. म्हणजेच, या नावाची विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारीही आता त्या परिसरातील उत्पादकांवर येते. जशी कोल्हापुरी चप्पल, महाबळेश्वर स्ट्रॉबेरी, नागपूर संत्री किंवा दार्जिलिंग चहा यांची स्वतंत्र ओळख आहे, तशीच आता लोणावळ्याच्या चिक्कीलाही अधिकृत ओळख मिळाली आहे. या निर्णयामुळं चिक्की उत्पादक आणि विक्रेत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. जीआय टॅगमुळं ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होईल. पारंपरिक पद्धतीनं तयार होणाऱ्या चिक्कीला योग्य बाजारपेठ मिळेल आणि स्थानिक उद्योगाला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यापारी व्यक्त करत आहेत.
रेणुकामातेच्या चरणी अर्पण होणाऱ्या तांबूलाला अखेर जागतिक ओळख
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेल्या माहूरगडावरील श्री रेणुका मातेच्या भक्तांसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. तिरुपती देवस्थानच्या प्रसिद्ध लाडूनंतर आता माहूरच्या तांबूल प्रसादाला मानाचा 'जीआय टॅग' म्हणजेच भौगोलिक मानांकन प्राप्त झालं आहे. या मानांकनामुळं तांबूल प्रसादाला राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळाली असून, देशातील जीआय टॅग प्राप्त करणारा हा दुसरा प्रसाद, तर महाराष्ट्रातील पहिलाच प्रसाद ठरला आहे.

तांबूल प्रसादाचं धार्मिक आणि आरोग्यदृष्ट्या महत्व अधोरेखित
माहूर येथील श्री रेणुका मातेच्या दर्शनानंतर भक्तांना दिला जाणारा तांबूल हा शतकानुशतकं चालत आलेला मुख्य प्रसाद आहे. धार्मिक परंपरा, स्थानिक संस्कृती आणि पारंपरिक पद्धतीनं तयार होणाऱ्या या तांबूल प्रसादाचं वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्याला जीआय टॅग मिळवून देण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. विशेष म्हणजे, हा तांबूल प्रसाद केवळ धार्मिक श्रद्धेचं प्रतीक नसून अन्नपचनासाठी उपयुक्त असल्याचेही अभ्यासातून सिद्ध झालं आहे. त्यामुळं या प्रसादाचं धार्मिक आणि आरोग्यदृष्ट्याही महत्त्व अधोरेखित झाले आहे. जीआय टॅग मिळाल्यामुळं आता माहूरच्या तांबूल प्रसादाला देशभरात नवी ओळख मिळणार आहे. त्यामुळं तांबूल प्रसादाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळं माहूरच्या धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्था, रोजगार आणि पारंपरिक उत्पादनांना देखील मोठा फायदा होणार आहे. हा बहुमान माहूरसह संपूर्ण नांदेड जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
असा तयार केला जातो तांबलू प्रसाद
यामागची आख्यायिका अशी की, माहूरगड (जि. नांदेड) येथील रेणुकामातेचे निस्सिम भक्त असलेल्या विष्णुकवी महाराज यांना कधी काळी एक दृष्टांत झाला. देवीने स्वप्नात येऊन आपणास तांबुलाचा नैवेद्य दाखवा, अशी आज्ञा केल्याचे महाराजांनी सांगितले. त्यांनी ही आज्ञा प्रमाण मानून तांबूल अर्पण केला. या घटनेपासून रेणुकादेवीला नैवेद्यानंतर तांबूल अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली. मंदिर परिसरात तांबूल तयार करण्याची परंपरा अनेक वर्षे अखंडपणे सुरू आहे. देवीला पुरणपोळीचा मुख्य नैवेद्य दाखवल्यानंतर तांबूल अर्पण करतात. तांबुलाचा अर्धा भाग देवीच्या मुखात ठेवून उरलेला भाग भाविकांना प्रसाद म्हणून वाटतात.
जीआय मानांकन भौगोलिक वैशिष्ट्यांसाठी दिले जाते. एखाद्या उत्पादन प्रक्रियेत वर्षानुवर्षे एक दर्जा टिकवून राहणे महत्त्वाचा निकष असतो. त्या उत्पादन घटकात दर्जा, चव, रंग, वास यांचे वेगळेपण नियमित टिकून राहत असेल तर त्याच्या वेगळेपणाची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. माहूरच्या तांबूलचे वैशिष्ट्य नैसर्गिक आणि औषधी घटकात सामावलेले आहे. तांबूलसाठी नागवेलीची पाने, कात, चुना, सुपारी, सौफ, लवंग, वेलची, जायफळ, जायपत्री, ओवा, धणेडाळ, आसमान तारा, जेष्ठमध आणि चमनबार या घटकांचा वापर केला जातो. सर्व साहित्य दगडी खलबत्त्यात कुटून तांबूल तयार होते.
मोठ्या दगडी खलबत्त्यात मंदिरात दररोज सकाळी सहा वाजता तांबूल प्रसाद तयार केला जातो. सर्व घटकांचे योग्य मिश्रण एकत्रित करून तांबलू तयार करतात.
हा प्रसाद पचन प्रक्रियेसह एकूण आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे माहच्या तांबुलचा जीआय मानांकनासाठी प्राधान्याने विचार केला गेला आहे. या मानांकनामुळे भाविक आणि व्यावसायिक यांना आनंद झाला आहे. कारण जीआय मानांकनासाठी फक्त माहिती देऊन काम संपत नाही, तर मानांकनाच्या निकषांची वेळोवेळी पूर्तता करावी लागते. तज्ज्ञ आणि संबंधितांना सतत सक्रिय राहणे अपेक्षित असते. या प्रयत्नातूनच 'जीआय 'मानांकन मिळाले आणि माहूरचा तांबूल सर्वदूर पोहचला आहे. आता कुणालाही बनावट तांबूल विकता येणार नाही.

जीआय टॅगमुळं तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुली
माहूरच्या रेणुका माता तांबूल प्रसादाला मिळालेल्या जीआयमुळं महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जपली गेली आहे. त्याचबरोबर जो समूह या तांबुलाशी निगडित आहे, त्या समूहाचं संवर्धनही झालं आहे. त्याचबरोबर अनेक फायदे या जीआयमुळं होणार आहेत. जीआय टॅग मिळल्यामुळं तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठही मिळणार आहे. त्यामुळं रोजगार निर्मितीही होणार आहे. सर्वात म्हणजे देवीच्या भक्तांना ओरिजनल तांबूल मिळणार आहे. डुप्लिकेट तांबुलाला यापुढं कुठल्याही प्रकारे समर्थन होणार नाही, त्याला मज्जाव करण्यात येईल. थोडक्यात जीआयमुळं समृद्धीचा मार्ग नांदेडच्या माहूर ठिकाणच्या मंडळीसाठी खुला झाला आहे.






