शेखर देशमुख
काय गंमत आहे पहा, लोकशाहीची जननी, संविधान, सबका साथ असं काही काही सांगणाऱ्या देशात अमूक फाइल, तमूक फाइल, धुरंधर १,२ असे सौहार्द बिघडवणारे सिनेमे झुंडी झुंडीने पाहिले जातात. सत्ताधारी जणू काही फार मोठे देशकार्य आहे, अशा आविर्भावात अशा सिनेमांसाठी आवर्जून वेळ काढतात. थेट पंतप्रधान जाहीर सभांतून आडून आडून सिनेमाची जाहिरात करतात. पण उठता बसता संविधानाची साक्ष काढणाऱ्या सत्ताधाऱ्यांपैकी कोणी ‘मैं वापस आऊंगा’ पाहात असल्याचा फोटो सोशल मीडियावर अपलोड करत नाही. राज्य सरकार या सिनेमाला टॅक्स फ्री करण्यासाठी पुढाकार घेत नाही. सहकुटुंब सहपरिवार परधर्मद्वेषावर आधारलेली हिंसा बघायला जाणाऱ्यांपर्यंत ‘मैं वापस आऊंगा’ पोहोचतच नाही.
मैं वापस आऊंगा…या वाक्याचं मराठीकरण केलं की, वर्तमानातल्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करणारं ब्रीदवाक्य अनुवादित होऊन कानांवर आदळतं. पण इम्तियाज अली या दिग्दर्शकाला ‘मैं वापस आऊंगा’ मधून मुळांपासून तुटलेल्या, पण म्हणून मुळांची असीम ओढ असलेल्या, सीमेपलीकडून निर्वासित म्हणून भारतात आलेल्या ९५ वर्षांच्या इशरसिंग ग्रेवालची (नसिरुद्दीन शाह) गोष्ट सांगायचीय. आजोबांच्या अपूर्ण इच्छांची कदर असलेल्या निरवैर (दिलजित दोसांज) नावाच्या नातवाची गोष्ट सांगायचीय. हा झुमर्स पिढीचा प्रतिनिधी, परदेशात राहणाऱ्या… आयुष्याचं काय करावं… पझेसिव्ह गर्लफ्रेंडला कसं हाताळावं या दुविधेत अडकलेला… पण त्याच्यात आजोबांवर झालेल्या संस्कारांचा अंश थोडाफार झिरपलाय. कुटुंबातले बाकीचे सगळे त्यांच्या जाण्याची आणि प्रॉपर्टीवर ताबा घेण्याची वाट पाहताहेत.

आजोबा एक दिवस तडक गाडीत बसतात आणि आपल्या ड्रायव्हरला आदेश देतात, गाडी सरगोध्याच्या दिशेला नेली. फाळणी झालीय. दोन देश निर्माण झालेत. त्यानंतर दोन देशांत, दोन धर्मांत द्वेषाची हिंसेची कितीतरी आवर्तनं पार पडलीत, हे त्यांच्या स्मृतीतून जणू पुसलं गेलंय. त्यांना फक्त सरगोध्याला जायचंय. मरण्याआधी जियाला (शर्वरी वाघ) दिलेलं वचन पूर्ण करायचंय. पण अटारी बॉर्डर, भारत-पाकिस्तान सीमारेषा, तिथली सुरक्षा व्यवस्था, पासपोर्ट-व्हिसा या झंझटींशिवाय सीमेपलीकडून जाणं शक्य नाही. ते सहन न होऊन त्यांची तब्येत हलते. त्यांना हॉस्पिटलमध्ये अखेरच्या प्रवासासाठी दाखल केलं जातं. पण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर मरणाच्या दारात शिरूनही ते प्राण सोडत नाही. त्यांना काय म्हणायचंय, हे घरातल्या कोणालाही कळत नाही. नातू निरवैर ते समजून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत राहतो.
अखेरीस नातू निरवैर आजोबांच्या इच्छांचा सन्मान करत सीमेपार जातो, व्हिडिओ कॉल सुरु ठेवत सरगोध्यातल्या आजोबांनी तारुण्यात तुडवलेल्या गल्ल्यांमध्ये शिरतो. प्रेम फुललेल्या जागांभोवती रेंगाळतो. जियाच्या हवेलीचा माग काढतो. जिया इशरच्या (तरुणपणीच्या भूमिकेत वेदांग रैना) येण्याची वाट पाहात दहा वर्षांपूर्वीच गेलेली असते. जियाचं भलं मोठं पोट्रेट बघून, तिला मैं वापस आऊंगा असं वचन दिलेल्या आणि आता मरणपंथावर असलेल्या इशरसिंग ग्रेवालच्या डोळ्यांत तारुण्याची चमक परतते… सिनेमा संपतो. मधल्या काळात, दोन प्रेमी जीवांची ताटातूट मुस्लीम-शीखांमध्ये झालेलं हिसेंचं थैमान, बायांवर झालेले अत्याचार, आपल्यावर अत्याचार होऊ नये म्हणून इशरसिंगच्या मागे सीमेपलीकडे राहिलेल्या बायांनी एकेक करून स्वतःला संपवणं असं सारं दिसत राहातं. फक्त मुस्लिमांनीच शीखांची कत्तल केली एवढंच दिसत नाही, तर शीखांमधला त्या क्षणांतला हिंसेचा ज्वर पडदाभर दिसत राहतो.

पण, एवढं सगळं बघूनही कुणा एका धर्माप्रती द्वेष वा तिरस्काराचा भाव मनात उत्पन्न होत नाही. ज्यांनी फाळणीची वेदना अनुभवलीय, त्यांच्या अंगी प्रेम, सौहार्द, करुणा तेवढी जाणवत राहते. सिनेमा संपल्यानंतर क्रेडिट टायटल सुरु असताना दिग्दर्शक गाणं पेरतो. ते गाणं इशर सिंगच्या वेदनेपासून सुरु होऊन निर्वासितांच्या विस्थापित-स्थलांतरितांच्या वैश्विक वेदनेला जाऊन भिडतं. त्यात अमेरिका-इस्रायलआदी युद्धखोर राष्ट्रांनी मध्य पूर्वेत वेळोवेळी लादलेल्या युद्धांमुळे निर्वासित झालेल्यांच्या छावण्या दिसतात. अन्नाला मोताद झालेली निरागस, सैरभैर मुलं दिसतात. केवळ जगण्यासाठी म्हणून आफ्रिकी देशांतून परागंदा होऊन युरोपकडे जाऊ पाहणाऱ्या आफ्रिकी स्थलांतरितांच्या कधीही बुडू पाहणाऱ्या बोटी दिसतात. इथे दिग्दर्शक इम्तियाज अली, इशर सिंगची विस्थापनामुळे ठसठसत राहिलेली वेदना वर्तमानातल्या वैश्विक वेदनेशी जोडली जोडतो. एक प्रकारचा वैश्विक करुणेचा ( युनिव्हर्सल कम्पॅशन) भाव त्यातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो.
मग प्रश्न मनात येतो, ज्यांना फाळणीची साधी धग जाणवली नाही, त्यांच्यामध्ये परधर्मद्वेष, हिंसेचा अंश आला कुठून? तो रुजवला कोणी?
काय गंमत आहे पहा, लोकशाहीची जननी, संविधान, सबका साथ असं काही काही सांगणाऱ्या देशात अमूक फाइल, तमूक फाइल, धुरंधर १,२ असे सौहार्द बिघडवणारे सिनेमे झुंडी झुंडीने पाहिले जातात. सत्ताधारी जणू काही फार मोठे देशकार्य आहे, अशा आविर्भावात अशा सिनेमांसाठी आवर्जून वेळ काढतात. सिनेमा बघतानाचे फोटो छापून आणतात. थेट पंतप्रधान जाहीर सभांतून आडून आडून सिनेमाची जाहिरात करतात. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन ठिकठिकाणचे नगसेवक/ खासदार आपल्या मतदारांना मोफत तिकिटं वाटतात. सिनेमा टॅक्स फ्री करण्यासाठी ‘डबल इंजिन’ सरकारांमध्ये चढाओढ लागते. पण उठता बसता संविधानाची साक्ष काढणाऱ्या सत्ताधाऱ्यांपैकी कोणी ‘मैं वापस आऊंगा’ पाहात असल्याचा फोटो सोशल मीडियावर अपलोड करत नाही. कोणी राज्य सरकार या सिनेमाला टॅक्स फ्री करण्यासाठी पुढाकार घेत नाही. सहकुटुंब सहपरिवार परधर्मद्वेषावर आधारलेली हिंसा बघायला जाणाऱ्यांपर्यंत मैं वापस आऊंगा पोहोचतच नाही. त्यांच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर झडझडून चर्चा झडतच नाही.

हे सारं या देशाचं खूप काही बिघडलंय, बिघडत चाललंय, हे सांगतंय. कदाचित यातलेच कोणी इम्तियाज अलीचा मैं वापस आऊंगा पाहायला जातीलही. त्यात लाख चुका काढतील, हे असंच का, ते तसंच का…असे प्रश्न करतील. घरटी एक अशा संख्येने जन्माला आलेले समीक्षक या सिनेमाची चिरफाड करतील, त्यांनी ती अवश्य करावी. पण इम्तियाज अली देऊ पाहतोय, तो व्यापक संदेश नजरेआड होऊ देऊ नये. हा संदेश परस्पर प्रेम, सौहार्द आणि करुणेच्या मूल्यांची आठवण करून देणारा आहे, याचं भान सुटू देऊ नये.
लेखक समीक्षक संजय आर्वीकरांनी ‘सोशल करेक्शन’ अशी संज्ञा उपयोगात आणली होती. ‘मैं वापस आऊंगा’ त्या सोशल करेक्शनच्या दिशेचा सर्वार्थाने प्रतिकूल वातावरणातला एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. त्याचं महत्त्व प्रत्येक लोकशाहीवादी समंजस माणसास जाणवावं.
(लेखक समतावादी मुक्त संवाद पत्रिका मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.)






