संजना खंडारे
- छ. संभाजी नगरच्या स्मशानभूमीत मृतदेह आल्यानंतर मानवी देहाच्या शेवटच्या प्रवासाची सर्व तयारी करून देण्याऱ्या मसणजोगी समाजाच्या ४० महिला काय सांगत आहेत?
- कागदावर स्मशानात काम करणारे कर्मचारी हे पुरुष, प्रत्यक्षात मात्र बायकांनाच मृतदेहावर अंतिम संस्कार का करावं लागतं?
- स्मशानाबाहेरचं जग अजूनही मसणजोगी समाजासाठी का आहे बंद?
स्मशानभूमीच्या आत पाय ठेवण्यापूर्वी लहानपणापासून कानावर जे जे ऐकायला मिळालं होतं ते सारं आठवायला लागलं… जसं की, हिंदू धर्मात काही धारणा आहेत, साधारणपणे स्मशानभूमीत स्त्रिया जात नाहीत. यासाठी अनेक कारणं सांगितली जातात. स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त संवेदनशील असतात, कुटुंबातील व्यक्तीचं निधन झाल्यानंतर घरावर दुःखाचा डोंगर कोसळतो.
मृत व्यक्तीच्या अंत्ययात्रेत सहभागी होणं महिलांसाठी अत्यंत क्लेशदायक असतं. अशा परिस्थितीत स्मशानभूमीतील दुःखी, नकारात्मक वातावरण महिला सहन करू शकत नाही. स्मशानभूमीत नकारात्मक ऊर्जा खूप असते. दुःखद वातावरणात स्त्रिया स्वतःच्या मनावर ताबा ठेवू शकत नाही. त्यांच्यावर आसपासच्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम लगेच होतो. यामुळेच महिला अंत्यसंस्कारावेळी स्मशानभूमीत जात नाहीत, वगैरे वगैरे…
मात्र स्मशानूमीत शिरल्यानंतर आणि तिथे सुनिता शेळकेसोबत काही तास घालवल्यानंतर स्त्रियांचं पुरुषांपेक्षा अधिक संवेदनशिल असणं, स्मशानातील नकारात्मक वातावरण सहन करू न शकणं हे सगळंच थोतांड असल्यासारखं वाटू लागलं…
दुपारचे तीन वाजले होते. छ. संभाजीनगरच्या पडेगाव येथील स्मशान शांत दिसत होतं, पण ती शांतता सवयीची होती. स्मशानात राहणाऱ्या सुनीता शेळकेची लहान लेकरं स्मशानाच्या मोकळ्या जागेत खेळत होती. जणू काही हे ठिकाण त्यांच्या आयुष्याचा नैसर्गिक भागच…. बाजूलाच वाहणाऱ्या मोठ्या नाल्यातून प्रचंड दुर्गंधी येत होती.
पडेगावमधील सगळ्या पाइपलाईन्स इथेच सोडलेल्या... मांसविक्री करणाऱ्या दुकानांतली घाणही याच नाल्यात... दुर्गंधी इतकी तीव्र होती की, श्वास घेतानाही अंग कापरं भरावं.. पण सुनीतासाठी तेही आता नवीन नव्हतं. तेवढ्यात दोन पुरुष हातात डॉक्टरांनी दिलेलं मृत्यू प्रमाणपत्र घेऊन आले. “तीन तासांत मृतदेह येईल,” एवढंच सांगून ते निघून गेले. त्यांच्या आवाजात औपचारिकता होती, संवेदना नव्हती. सुनीताने मान हलवली. तिला माहीत होतं, आता वेळेच्या चौकटीत सगळं नीट व्हायला हवं...
पडेगावच्या याच स्मशानभूमीत सुनीता शेळके त्यांच्या कुटुंबासह राहतात
ती लोखंडी जाळीकडे वळल्या. आधीच्या चितेची राख अजून तिथेच होती, हातात झाडू घेऊन तिने राख साफ केली. नंतर पूर्ण स्मशान झाडून पाणी मारून घेतलं. जणू कुणाच्या शेवटच्या प्रवासासाठी ती त्या जागेला मान देत होती. लोखंडी जाळीवर भुश्यापासून बनवलेले बायोमास ब्रिकेट्स रचले. मातीच्या मडक्यांच्या ढिगातून एक मडकं उचलून त्यात पाणी भरून बाजूला ठेवलं. हे सगळं करताना तिच्या चेहऱ्यावर कसलीही घाई नव्हती.. होती तर फक्त सवय आणि जबाबदारी.
मृतदेह येईपर्यंत घरातली उरलेली कामं उरकायची होती. जगणं थांबत नाही, कोणाच्या मृत्यूसाठीसुद्धा नाही..हे सुनीताला फार आधीच कळून चुकलं होतं. थोड्याच वेळात स्वर्गरथ स्मशानात आला. त्याच्यासोबत आलेले नातेवाईक हुंदके देत रडत होते. कुणाचं तरी आयुष्य संपलं होतं.. मात्र, सुनीता आणि त्यांच्या कुटुंबासाठी हे दृश्य नवीन नव्हतं. म्हणूनच त्यांची मुलं घरात टीव्हीसमोर बसली होती कार्टूनच्या आवाजात मृत्यूचा आवाज दडपून टाकत...
मृतदेह लोखंडी जाळीवर ठेवला गेला. सुनीताने शांतपणे त्यावर लाकडं रचली. नातेवाईकांनी फुलं अर्पण केली, शेवटचा नमस्कार केला. चिता पेटवली गेली.
हळूहळू स्मशानातली गर्दी ओसरू लागली. रडणं थांबलं, पावलं मागे वळली आणि त्या ओसरणाऱ्या गर्दीत सुनीता एकट्याच उभ्या राहिली.. कोणी दक्षिणा देईल का, या आशेवर. ही आशा जगण्याची होती... तेवढ्यात एक माणूस त्यांच्या जवळ आला. त्याने खिशातून दोनशे रुपयांची नोट काढून तिच्या हातावर ठेवली. सुनीताच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं, पण डोळ्यांत समाधान होतं.
तसं बघायला गेलं तर दक्षिणा सोडून मृतदेहाचे अंतिम सस्कार करण्याच्या कामाचे कोणतेच पैसे सुनीताला नाही तर तिच्या नवऱ्याला मिळतात. कारण स्मशानात काम करण्याचे त्यांना कंत्राटी पद्धतीने पैसे मिळतात. पण गेल्या चार महिन्यांपासून सुनीताचे पती कॅन्सरग्रस्त असल्याने अत्यसंस्काराची सगळीच कामं सुनितालाच करावी लागतात.
स्मशानभूमीत काम करणाऱ्या 40 महिलांची कैफियत
50 वर्षांची सुनिता शेळके सांगतात...
"बघा ताई पाच वाजता उठले पण काम काई सरत नाही..सकाळी पोरांच्या शाळेची तयारी, मग स्मशानातली साफ-सफाई, घरातला स्वयंपाक बाकीची कामं, पाहुणेरावळे सगळंच बघावं लागतं..आता 10 वर्षांपासून मी माझ्या नवऱ्याला या कामात मत करते. माझी लेकरं पण हेच काम करतात..काय भिव नाही की काय न्हाई. आमचा कुलदैवत महादेव आहे, त्यामुळं हे आमच्यासाठी देवस्थान आहे. आमचे लेकरं तर जिथं माणूस जाळला त्या सरणावर थंडी वाजली की हात शेकतात काहीच व्हत नाही बघा.’’
ही कैफियत फक्त सुनीताची नाही तर छ. संभाजीनगर शहरामध्ये राहणाऱ्या 40 बायकांची आहे. संभाजीनगर शहरामधील मृत्यूसोबत जगणाऱ्या जवळपास 40 महिला पहाटेपासून रात्रीपर्यंत राखेत आपली स्वप्नं झाडत असतात. मृतदेह स्मशानभूमीत आणल्यानंतर त्या देहावर होणारा प्रत्येक संस्कार अर्थात मानवी देहाच्या शेवटच्या प्रवासाची सर्व तयारी करून देण्याची 'सेवा' या महिला स्मशानभूमीत करतात.
सुनीता शेळके
मृतदेह दहन करण्यासाठी लाकडाचे थर रचणं, त्यावर दिशेनुसार मृतदेह ठेवण, मृतदेह तिरडीतून सोडवण, त्याची बोटं मोडण, तूप लावून मालिश करण, तूप भरणं आणि अग्निडाग देण्यासाठी मृतदेह फुले आदींनी सजविण ही कामं या महिला अविरतपणे करत आहेत. समाज ज्यांच्याकडे पाहायलाही टाळतो, ज्यांच्या कामाला नाव नाही, ज्यांच्या संघर्षाला आवाज नाही त्यांची ही गोष्ट आहे. ही बातमी नाही, हा आकडा नाही.. हा आहे मृत्यूच्या सावलीत जगणाऱ्या छ.संभाजीनगर शहरातील महिलांच्या आयुष्याचा ‘बाईमाणूस’ने केलेला ग्राउंड रिपोर्ट....
“महादेवाचं वरदान म्हणून आम्हाला स्मशान मिळालं…”
छ. संभाजीनगर शहरात एकूण 40 ते 45 महिला या स्मशानभूमीमध्ये काम करतात. त्या फक्त तिथे कामच करत नाही तर तिथे त्यांच्या कुटुंबासोबत राहतात देखील. या सर्व महिला भटक्या प्रवर्गात असलेल्या मसणजोगी समाजातील आहेत.
तुम्ही स्मशानभूमी मध्ये का राहता, असं विचारल्यावर छ. संभाजीनगरच्या क्रांती चौक येथील स्म्शानभूमीत राहमाऱ्या 80 वर्षाच्या लक्ष्मीबाई पवार बोलायला लागतात....
"आमच्या सासू- सासऱ्यानं आम्हाला सांगितलेलं हाय की पूर्वीच्या काळात महादेवनं आमच्या पूर्वजांना इचारलं व्हतं की, तुमाला वरदान म्हणून काय पायजे? तव्हा आमच्या पूर्वजानं मागायला झोळी अन् स्म्शानभूमीत भाकरीसाठी रचायला तीन दगडाएवढी जागा द्या हे वरदान मागितलं होतं. मी पाहायलेलं हाय आमचं आई-वडील, सासू-सासरे सासरेचे वडील समदे पहिल्या पिढीला स्मशानातच राहायचे तिथंच खायचे बी..अन गावोगावी झोळी पसरून भिक्षा मागत फिरायचे.. मी स्वतः पाच पिढ्या बघितल्या...माह्या नातवाचं शिक्षणं केलं पण त्याह्यलं ड्युट्याच लागना बाहेर..मंग ते बी हितच काम करायलें खायले. दफनभूमी मध्ये खड्डे खोंदतात, मवती आल्या की जाळतात, कोणी दक्षिणा देतं कोणी न्हाई.."
क्रांती चौक स्मशानभूमीत राहणाऱ्या 80 वर्षीय लक्ष्मीबाई पवार – पाच पिढ्यांपासून स्मशानाशी जोडलेलं आयुष्य.
‘’आम्हाला यम समजलं जातं’’
लक्ष्मीबाईची सून रेणुका पवार मग या गप्पांमध्ये सहभागी होते. ती म्हणते,
"35-40 वर्ष झाले बघा आम्ही या शहरात आलोत. ह्याच्याआधी आम्ही परभणीला राहायचो. आता कुठेही जाऊ तर आमचं हे कामच आहे मसणजोगीचं… ते काम नाही तर सेवा म्हणून आम्ही करतो. सरकारकडून आता कुठे आम्हाला मानधन मिळायला लागलं ते पण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर..आम्हाला ना पिवळं राशन कार्ड मिळत ना सरकारच्या कोणत्या योजनेचा लाभ मिळत. घरकुल सुद्धा मिळत नाही. आता आम्ही काढले दिवस स्मशानभूमीत. पण, आमच्या नातवंडांना आम्हाला शिकून मोठं करायचं आहे...स्मशानभूमीबाहेरचं जग त्यांना दाखवायचंय. त्यांचं आयुष्य या राखेत राख होऊ द्यायचं नाहीये..."
छ. संभाजीनगरच्या पुष्पनगर स्मशानभूमीतले गोविंद गायकवाड यावरचा एक अनुभव सांगताना म्हणतात,
"एक दिवस आमच्या नातेवाईकांच्या घरी मी गेलो होतो. मोजून अर्ध्या तासात मी त्या गल्लीतून बाहेर पडलो आणि त्यानंतर काही वेळात त्या गल्लीमध्ये एका ४२ वर्षीय माणसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्या सर्वांना असं वाटलं की, मसणजोगी आपल्या गल्लीत येऊन गेला आणि म्हणूनच त्या माणसाचा मृत्यू झाला. त्यानंतर मला सांगण्यात आलं की तुम्ही आमच्या इकडे येत जाऊ नका."
रेणुका पवारचे पती साहेबराव पवार सांगतात,
"आम्ही कोणत्या पाहुण्यांच्या घरी गेलो, तर लगेच काहीजण चिडवण्याच्या सूरात बोलतात की "काय मग, आज कोणाला घेऊन जायला आले आहात.."
रेणुका पवार – कोरोनाच्या काळात 24 तास मृतदेहांवर अंतिम संस्कार करणाऱ्या, पण कुठेही नाव नोंद न झालेल्या मसणजोगी महिला.
म्हणजे आम्हाला जणू ते यमच समजतात. समाजातील इतर लोकांना वाटतं हा मसणजोगी आहे, याला जादू-टोणा येत असेल, ह्याच्या घरचं पाणी प्यायचं नाही की, ह्याच्या सावलीला पण उभं राहायचं नाही. लग्नाकार्यात आम्हाला बोलवत नाही, कोणी बोलावलंच तर त्यांच्या घरातले, आजूबाजूचे इतर लोक त्यांना टोमणे मारतात. लोकांमध्ये अंधश्रद्धा आहे आमच्याबद्दल त्याला आम्ही काहीच करू शकत नाही. ना आम्हाला कोणता जादू-टोणा येतो ना काही, पण आता या लोकांना सांगावं तरी कोणी?
“कोरोना काळात 24 तास काम, पण आमचं कुठेही नाव नाही…”
रेणुका पवार आणि त्यांचं 9 जणांचं कुटुंब म्हणजेच त्यांची सासू, त्यांचा नवरा, त्यांची दोन मुलं, दोन सुना आणि ३ नातवंड असे सगळेजण गेली ३० वर्ष झाली स्मशानातच राहतात. कोरोनाचा काळ हा या सर्वांसाठी कसा होता, असं विचारल्यावर रेणुका पवार नाराजीच्या सुरत बोलायला लागतात,
"जाऊ द्या आता काय सांगायचं, जीवाची बाजी लावून आम्ही आमची ही ड्युटी आहे असं समजून 24 तास काम केलं पण काय कुठे आमचं नाव नाही. सगळ्यांचा सत्कार झाला..पोलिसांचा, डॉक्टरांचा, ऍम्ब्युलन्स वाल्यांचा, पण या सगळ्यामध्ये आम्ही सरकारला कुठेच दिसलो नाही."
रेणुका त्यांच्या पाच वर्षाच्या नातवाकडे बोट करतांना म्हणाल्या,
"याचा जन्म कोरोना काळात झालाय. विचार करा कसं केलं असेल माझ्या सुनेनं..आम्ही तर इकडे बॉडी जाळण्यात दिवसभर असायचो. लोकांची सेवा केली पण सुनेच्या गरोदरपणात तिला मी माझ्या हाताने एक कप चहा पण नाही करून देऊ शकले, ना तिचं डोहाळजेवण केलं..तिच्या पोटात दुखायला लागलं तेव्हा एक रिक्षा इकडे यायला तयार नव्हती. तेव्हा शेजारच्यांची गाडी मागून दवाखान्यात नेलं.."
कागदावर पुरुष, प्रत्यक्षात बायका : स्मशानातील कामाचं वास्तव..
छ. संभाजीनगरमध्ये 40 ते 45 स्मशानभूमी आहेत. या स्मशानभूमीत काम करणारे 10 पुरुष हे कायमस्वरूपी तत्वावर काम करतात, तर 23 पुरुष आणि सात महिला कंत्राटी तत्वावर काम करतात. 1994 पासून जे लोक संभाजीनगर शहरात मसणजोगी म्हणून काम करतात त्यांना 2004 मध्ये महानगरपालिकेने कायमस्वरूपी कामावर घेतले आणि 2004 नंतर जे आहेत त्यांना कंत्राटी पद्धतीने. कायमस्वरूपी असणाऱ्यांना चतुर्थ श्रेणी कामगाराच्या सर्व सुविधा आणि 52,000 रुपये मिळतात, तर कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्यांना 18 हजार रुपये मिळतात. आता जे कंत्राटी तत्वावर काम करतात त्यांना अठरा हजारात घरखर्च भागवणं कठीण होत असल्याकारणाने ते बाहेर जाऊन जे मिळेल ते काम करतात. त्यामुळे पुरुष बाहेर असल्यावर त्याच्या बायकोला किंवा मुलाबाळांनाच स्मशानातील सगळीच कामं करावी लागतात.
बेगमपुरा स्मशानभूमी
स्मशानातील बायकांना या कामाचे पैसे मिळतात का? असा प्रश्न विचारल्यावर गोविंद गायकवाड स्पष्ट करतात की,
"संभाजीनगर शहरामध्ये फक्त सात महिला आहेत ज्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत. बाकीच्या ज्या सगळ्या महिला आहेत त्यांचे पुरुष हे काम करतात अशी नोंद महानगरपालिकेत आहे.. पण एकट्या माणसाने हे काम होत नाही म्हणून या बायका अत्यंसंस्काराचे काम करतात.. कोणी दक्षिणा दिली तरच, नाहीतर घरातल्या कुठल्या कामाचा जसा यांना मोबदला मिळत नाही तसा या कामाचा देखील यांना काहीच मोबदला मिळत नाही. कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे आहेत त्यांना महिन्याला 18 हजार रुपये मिळतात.. आणि 2004 नंतर महानगरपालिकेने ज्यांना परमनंट करून घेतलं, त्यांना 52 हजार रुपये मिळतात... पण परमनंटमध्ये एकही महिला नाहीये.."
मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेला मसणजोगी समाज
मसणजोग्यांना उपजिविकेचं दुसरं कोणतंही साधन उपलब्ध नाही आणि जे साधन उपलब्ध अहे ते स्मशानाशी जोडले गेलेले आहे, ते प्रेताशी जोडले गेलेले आहे. जिथे जीवनाचा शेवट होतो तिथे त्यांच्या जगण्याचा प्रारंभ होतो. आपले पोट भरायचे असेल तर कुणीतरी मेले पाहिजे. जोपर्यंत कुणी मरत नाही तोपर्यंत त्याच्या पोटाचा मार्ग मोकळा होत नाही. आज कोण मरेल, उद्या कोण मरेल या विवंचनेत तो असतो. नुसतं मरून चालणार नाही स्मशानात येणाऱ्या त्या मयताच्या अंगावर चांगले कपडे असतील का, दागिने असतील का, तिरडीला बांधलेले बांबू चांगले असतील का, त्याच्या प्रेतयात्रेत खारका टाकल्या जात असतील का, हे सगळं त्याला हव असतं. कारण त्यांचे आयुष्य हे मरणाशी जोडले गेलेले आहे.
मृताच्या अंगावरची शाल, साड्या त्यांच्या रोजच्या वापरात. उलट त्यामागे श्रद्धेचे मिथक असते. ताटीवरचं पांढर कापड, ताटीचे बांबू, सूत, पिंडदानाचं अन्न यावर उपजीविका करणाऱ्या मसणजोगी समाजाचा जगण्याचा स्तर खरोखरच अस्वस्थ करणारा. स्मशान, मृतात्मे, भूत-खेत, करणी, पिंडदान, स्मशानाची व्यवस्था पाहायची, हे आमचे जगणे. काही जण स्मशानात रखवालदाराचं काम करतात. काही सरणं रचतात. काही जण सावडल्यानंतर राखेची विल्हेवाट लावतात. मृताचे नातेवाईक बक्षिसी देतात, तीच कमाई.. कुणाच्यातरी मरणाशी मसणजोग्यांचे आयुष्य जोडले गेल्यामुळे माणूस म्हणून असलेली त्यांची मान्यताच संपुष्टात आली आहे. मसणजोग्यांना कुणी माणूस म्हणत नाहीत तर भुताचा अंश, शैतानाच अंश,स्मशानाचा अंश ही या मसणजोग्यांची ओळख.
सुनीता शेळके यांच्या घरातलं काम टाकून त्या स्मशान साफ करत आहेत.
महाराष्ट्रात मसणजोगी समाजाचा समावेश भटक्या-विमुक्त जाती (VJNT/NT) प्रवर्गात केला आहे. मात्र कागदपत्रांचा अभाव, पोटजातीबाबतची अस्पष्टता आणि शासकीय नोंदी नसल्यामुळे अनेक कुटुंबे आजही शासनाच्या सुविधांपासून वंचित राहिली आहेत. शिक्षण, आरोग्य व रोजगारासाठी असलेल्या योजना माहितीअभावी किंवा प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत.
मसणजोगी समाजात परंपरा व उपजीविकेनुसार काही प्रकार किंवा पोटगट आढळतात, जे धार्मिक सेवा, लोककला किंवा पारंपरिक व्यवसायांशी संबंधित आहेत; मात्र या प्रकारांची अधिकृत नोंद सर्वत्र उपलब्ध नसल्याने समाजाची अचूक आकडेवारी समोर येत नाही. मसणजोगी समाज हा पूर्वीपासूनच स्मशानात राहतो, जशी इतरांची बाकीची कामं असतात तसं यांचं काम म्हणजे माणूस मेल्यानंतर त्याच्या शरीराची विल्हेवाट लावणं. पण यांच्या ह्या कामाला समाजात तेवढा मान-सन्मान मिळत नाही,जो इतरांना मिळतो.
‘’स्मशानाबाहेरचं जग अजूनही आमच्यासाठी बंद…’’
मसणजोगी समुदाय हा अजूनही स्मशानाबाहेर का नाही पडू शकला, याला सगळ्यात जास्त जिम्मेदार इतर समाजातील लोक असल्याचं स्मशानात राहणाऱ्यांचं म्हणणं आहे. याबद्दल गोविंद गायकवाड सांगतात,
"अहो आमची पोरं बाहेर शिकायला गेली तर त्यांना भाड्याने रूम पण मिळत नाही.'कोणत्या जातीची आहात? बापरे तुम्ही मसणजोगी का? नको आम्ही या जातीतल्या लोकांना खोल्या देत नाही..' असं म्हणतात..मग आमच्या पोरांना जात बदलून सांगावी लागते, तेव्हा कुठे त्यांना भाड्याने रूम मिळतात. बर आता कोणाला नसेल राहायचं स्मशान भूमीमध्ये तर लेकरांच्या शाळा जिथून जवळ पडतील अश्या जागी आमच्या समाजातील काही लोक भाड्याने राहायला जातात. एखाद्याला कुणी दिलीच राहायला जागा आणि त्या घरमालकाला ताप जरी आला तर त्यांना वाटतं यानेच काही तरी केलं असणार. अशा कित्येक घटना घडल्या आहेत. आमच्या मुलांच्या खोलीमधून पसारा काय फेकून दिला..हाकलूनच काय दिलं.. आम्हालाही वाटतं याच स्मशानातून एखादा डॉक्टर, एखादा अधिकारी व्हावा. या राखेतून त्यांची राख नाही तर सोनं व्हावं. शासनदरबारी आमचा प्रतिनिधी असावा..त्यांनी आमचे प्रश्न मांडावे..पण इथल्या सामाजिक व्यवस्थेला हे मंजूर नाही हे आम्हाला प्रत्येक पावलावर जाणवतं..."
‘चार हात लांबच बरं’ : स्मशानातील कुटुंबांबद्दल समाजाची मानसिकता
संभाजीनगर शहरातील बेगमपुरा स्म्शानभूमीपासून 100 मीटर अंतरावर सुभाष काळे ह्यांचं किराणा दुकान आहे. तुमच्या घराजवळ स्मशानभूमी आहे, त्यात राहणाऱ्या मसणजोगी कुटुंबाबद्दल तुम्हाला काय वाटतं असं विचारल्यावर त्यांनी प्रतिक्रिया द्यायला अगोदर नकार दिला. मात्र नंतर ते म्हणाले की,
"स्मशानात जे मसणजोगी कुटुबं राहतं त्यांना आम्ही अमावस्या-पौर्णिमेला आमच्या दूकानातलं कोणतं सामान देत नाही. आता काय सांगता येतं काय करतील ते. लेकरांना आम्ही रात्र झाली की घराच्या बाहेर नाही खेळू देत. आता लोकांना वाटतं भूत-बीत काय नसतं पण एखाद्यावेळा जीवावर बेतलं तर काय करावं म्हणून चार हात लांब राहिलेलंच बरं.."
क्रांती चौक येथील स्मशानभूमीत खेळतांना या मुलीला भीती वाटत नाही.
याच भागात राहणाऱ्या सलमा शेख यांच्याशी बोलल्यावर त्या म्हणाल्या,
"अभी क्या बोलना इसके बारे में. हमको तो कूछ नहीं लगता..इन्सान हे कब ना कब मरनेच वाला ये..हमारे घर के सामनेसे तो हमेशाच बॉड्या जाते..अभी २० साल से तो इधरईच हें..आज तक तो कुछ हमको हुआ नहीं..ओर वो जो समशान मी रह्यते ना वो बिचारो का तो ये कामीच हें..हम तो उनसे बाता करते.. हमे कुछ नहीं लगता.."
बेगमपुरापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ जवळ असल्याकारणाने अनेक विद्यार्थी इथे राहतात. त्यातला एक किशोर जगताप या विद्यार्थ्याशी बोलल्यावर तो म्हणाला,
"आता बरेच विद्यार्थी या भागात स्म्शान आहे म्हणून राहत नाहीत, पण इकडे रूम स्वस्त आहे म्हणून मी राहतो. काही भीती वाटत नाही. बाकीच्यांना वाटते. माझे काही मित्र तर रात्री माझ्या रूम पण येत नाहीत, पण ठीक आहे.. आता ज्याची त्यांची अंधश्रद्धा.."
“आर्मीमध्ये जायचंय… अन्यथा मसणजोगीच राहीन”
छ. संभाजीनगरच्या पडेगाव येथील स्मशानातील सुनीता यांचा मुलगा शंकर आता अकरावीमध्ये आहे. तो विवेकानंद महाविद्यालयात शिकतोय.
"मला 12 वी चांगल्या मार्कने पास करायची आहे आणि मग आर्मी भरतीची तयारी करायचीये, इथेच राहिलो तर पुन्हा मसणजोगीच बनेन.."
असं शंकर हसत हसत म्हणतो, पण त्याच्या या हसण्यामागे एक वास्तव आहे ते म्हणजे त्यांना माहितीये आम्हाला दुसरीकडे कोणी काई काम देणार नाही..
पडेगाव स्मशानभूमी - सरण रचण्यासाठी हा मुलगा बांबू नेऊन देत आहे..
शंकरला एक बहीण आहे, जी दहावीमध्ये आहे. अंजली सांगते
"माझ्या घरामध्ये कोणीच नर्स नाहीये म्हणून मला नर्स बनायची इच्छा आहे.. मेलेल्या माणसापासून काय भीती, उलट जिवंत माणसाची भीती वाटते..”
सुनीता यांच्या नणंद किर्ती गायकवाड ‘बाईमाणूस’शी बोलताना म्हणतात,
"अहो मेलेल्या माणसापासून काय भीती, उलट जिवंत माणसाची जास्त भीती वाटते. मेलेला माणूस काय करणार.."
किर्ती ह्या नांदेड जिल्ह्यात मुखेडमधल्या स्मशानभूमीत राहतात. त्यांची तीन लेकरं सासू-सासरे आणि नवरा. त्या सांगतात,
"मी ज्या स्मशानभूमीमध्ये राहते, तिथे बाजूला एक छोटी नदी आहे. तीन वेळेस तर पुराच्या पाण्याने माझं घर उध्वस्त झालं. स्मशानभूमी अजून उंच करून देतो असं कित्येकदा तक्रार केल्यावर सांगितलं, पण कुठे काय कसलच काही नाही? त्या पाण्यात माझ्या घरातलं सगळं धान्य, लेकरांची पुस्तकं, आमचे सगळे कपडे सगळं वाहून गेलं. आम्ही फक्त बाजूला होतो म्हणून वाचलो.. स्मशानाच्या बाहेर जाऊन तर राहू शकत नाह, पण कधीही पावसाळ्यात हीच भीती वाटते की पाणी घरात येतं की काय?"
सुनीता शेळके यांची मुलं शंकर, अंजली आणि रुपाली
हा प्रश्न फक्त किर्ती आणि तिच्या कुटुंबाचाच नाही तर अनेक स्मशानभूमी या गावाच्या शहराच्या बाहेर एखाद्या नाल्याच्या बाजूला, ओढ्याच्या बाजूला नदीच्या बाजूला असतात.. पण त्यांच्या या समस्येकडे कधीच कोणी बघितलं नाही..
संभाजीनगरमध्ये दर महिन्याला किती लोकांचा मृत्यू होतो?
छत्रपती संभाजीनगर शहराची लोकसंख्या 2011 च्या अधिकृत जनगणनेनुसार सुमारे 11.75 लाख होती. त्यानंतर दरवर्षी झालेल्या लोकसंख्यावाढीचा विचार करता, 2025 साली शहराची लोकसंख्या अंदाजे 17 ते 18 लाखांच्या आसपास असल्याचे मानले जाते. या लोकसंख्येच्या आधारावर आणि महाराष्ट्रातील शहरी भागातील सरासरी मृत्यूदर (कोरोना वगळून) पाहता, शहरात दरवर्षी साधारण 6,000 ते 7,000 मृत्यू, म्हणजेच महिन्याला 500 ते 600 आणि दररोज 15 ते 20 मृत्यू होत असल्याचा एक सर्वसाधारण अंदाज काढता येतो. हा आकडा अधिकृत नसून लोकसंख्या आणि सरासरी मृत्यूदरावर आधारित अंदाज आहे.
संभाजीनगरात ऊर्जा अंत्येष्टी असूनही नागरिकांची पाठ..
संभाजीनगर शहरात पर्यावरणपूरक आणि आधुनिक अशी ऊर्जा अंत्येष्टी प्रणाली (Urja Antyeshti System) उपलब्ध असून सध्या शहरात अशा एकूण चार ऊर्जा अंत्येष्टी केंद्रे कार्यरत आहेत. मात्र, ही सुविधा उपलब्ध असूनही नागरिकांकडून तिचा अपेक्षित वापर होताना दिसत नाही. ऊर्जा अंत्येष्टी प्रणालीमुळे लाकडाची बचत होते, वेळ आणि खर्च कमी लागतो तसेच पर्यावरण प्रदूषणात लक्षणीय घट होते. याबद्दल बेगमपुरा स्मशानभूमीत राहणाऱ्या अन्नपूर्णा गायकवाड सांगतात,
बेगमपुराच्या अन्नपूर्णा गायकवाड साठी स्मशानाबाहेरचं जग अजूनही दूरच....
"लोकांना सांगितलं तर ते ऐकत नाही. ते म्हणतात आम्ही पारंपरिक पद्धतीनेच करणार, त्यामुळे आतापर्यंत आम्ही इथे फक्त बेवारस मृतदेह जाळला ते पण एकदाच..आता लोकांमध्ये याला घेऊन जनजागृतीच नाही तर आम्ही तरी काय करावं.."
स्मशानभूमीतील या महिलांची ही कहाणी फक्त मृत्यूची नाही, तर मानवतेची, संघर्षाची आणि आशेची आहे. या महिलांना विचारलं,
“तुम्ही रोज या राखेत राहूनही कसं हसत राहता?” त्या हसत हसत सांगतात, “आपल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी आम्हाला हे करावं लागतं. या राखेतून त्यांचं सोनं व्हावं एवढीच इच्छा आहे.."





