Skip to main content

’माझा मुलगा शोधून द्या हो, पाच वर्ष झाली आता…’’ पोलीस, पुढारी, कोर्ट अन् मीडियासमोर टाहो फोडणाऱ्या एका बापाची शोकांतिका!

Article in Marathi
Shantanu Khuje
06 Jan 2026
7 min read
83 views
’माझा मुलगा शोधून द्या हो, पाच वर्ष झाली आता…’’ पोलीस, पुढारी, कोर्ट अन् मीडियासमोर टाहो फोडणाऱ्या एका बापाची शोकांतिका!

 शंतनू खुजे 

  • गेल्या पाच वर्षांपासून सिद्धार्थ वाल्मिक बहिरव हा तरुण छ. संभाजी नगरमधून बेपत्ता झाला आहे.
  • त्याच्या वडिलांनी बेपत्ता मुलाला शोधण्यासाठी जंगजंग पछाडले, पण काहीही उपयोग झाला नाही.
  • वडिलांना वाटतं, "सिद्धार्थ  जिवंत आहे, कदाचित तो वेठबिगार म्हणून अडकला असेल…" 
  • वडिलांनी केली याचना, ‘बाईमाणूस’ने घेतला पुढाकार




बाईमाणूस’च्या अधिकृत मोबाईल क्रमांकावर गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने एका वृद्ध व्यक्तीचा फोन येत होता. “काहीही करा पण, माझा मुलगा शोधून द्या” अशा वारंवार विनवण्या करायचा. 26 सप्टेंबर 2025 रोजी ‘बाईमाणूस’ने एक विस्तृत रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. तो रिपोर्ट वाचून ती व्यक्ती सातत्याने फोन करत होती. त्या रिपोर्टचा विषय होता कातकरी आदिवासी मजुरांच्या वेठबिगारीचा…नाशिकच्या इगतपुरी परिसरातून बेपत्ता झालेल्या एका कातकरी मुलीचा शोध घेताना तब्बल ७२ आदिवासी मजुरांची वेठबिगारीतून सुटका करण्यात आली. एका अल्पवयीन मुलीला मजुरीसाठी विकल्याच्या धक्कादायक घटनेमुळे हे संपूर्ण रॅकेट उघडकीस आले होते.

ह्या घटनेचे सविस्तर वृत्त ‘बाईमाणूस’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी बाईमाणूसच्या ऑफिसमध्ये एक फोन आला. या फोनवर पन्नाशीत असलेल्या एका व्यक्तीने “माझा मुलगा शोधून द्या” अशी विनवणी ‘बाईमाणूस’कडे केली. त्यानंतर त्यांचे फोन सतत यायला लागले. हा नेमका काय विषय आहे याबद्दल शेवटी ‘बाईमाणूस’ने जाणून घेण्याचे ठरवलं आणि जी काही माहिती समोर आली ती ऐकून आम्ही थक्क झालो.


नेमकं प्रकरणं काय ?


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील सिद्धार्थ वाल्मिक बहिरव या तरुणाचा विवाह ९ जून २०१९ रोजी फुलंब्री तालुक्यातील वारेगाव येथे झाला. लग्नानंतरचे पहिले काही दिवस आनंदात गेले, पण नंतर मात्र सिद्धार्थला वास्तवाची जाणीव होऊ लागली. सिद्धार्थच्या हाताला काम नव्हते, तो बेरोजगार होता. संसाराचा गाडा हाकण्यासाठी पैसा लागतो आणि नेमका तोच नसल्याने घरातलं वातावरण बिघडलं. पत्नीने दीड महिन्यातच आपला निर्णय जाहीर केला. "दिवाळीनंतर नवऱ्याला काम मिळालं तरच मी नांदायला येईल." असं तिने स्पष्टपणे सांगितलं आणि या अटीवर ती रक्षाबंधनला तिच्या माहेरी निघून गेली.


User Image (बेपत्ता असलेला सिद्धार्थ वाल्मिक बहिरव)

हाताला नसलेलं काम आणि पत्नी सोडून गेल्याचं नैराश्य या दुहेरी आघाताने सिद्धार्थ अस्वस्थ झाला. पण त्याने प्रयत्न सोडले नाहीत. पत्नीच्या अटीनुसार नोकरीच्या शोधात तो महिनाभर औरंगाबाद शहरात भटकला. अनेक ठिकाणी काम मागितलं, पण यश आलं नाही. अखेर, पत्नी माहेरी गेल्याच्या तीन आठवड्यांनंतर, निराशेच्या गर्तेत अडकलेल्या सिद्धार्थने घर सोडलं. एकदाचा तो गेला आणि आता 5 वर्षे उलटूनही तो परतलेला नाही.


समाजाकडून मदतीऐवजी दिशाभूल…


घरातील आपला तरुण मुलगा बेपत्ता झाल्यावर सिद्धार्थचे वडील वाल्मीक बहिरव यांनी शोधाशोध सुरू केली. पण अशा वेळी समाजाकडून मदत मिळण्याऐवजी दिशाभूल कशी केली जाते, याचा कटू अनुभव त्यांना आला. नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांकडून विविध अफवा पसरवल्या गेल्या. सिद्धार्थच्या वडिलांनी ‘बाईमाणूस’ला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना नातेवाईकांकडून तीन प्रमुख ठिकाणांचे खोटे निरोप देण्यात आले. सुरुवातीला वाळूज एमआयडीसीमध्ये सिद्धार्थ कामाला आहे असं सांगण्यात आलं. नंतर पंढरपूर (वाळुंज) परिसरात एका भाजीवालीकडून भाजी खरेदी केल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर काही दिवसांनी सीएट टायर कंपनीत तो नोकरीला आहे अशी माहितीही काही नातेवाईकांनी दिली.


User Image(सिद्धार्थचे वडील वाल्मिक बहिरव)

या प्रत्येक निरोपावर विश्वास ठेवून सिद्धार्थचे वडील त्या त्या संबंधित ठिकाणी पोहोचले. कंपन्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या भाजीवालीची चौकशी केली. पण हाती काहीच लागले नाही. वाल्मीक बहिरव म्हणतात की, "लोक आमच्या भावनांशी खेळले. त्यांनी आम्हाला पळवलं, पण मिळालेली माहिती सगळी खोटी निघाली." "आमच्या वाईट काळातही समाज आमच्या पाठीशी उभा राहिला नाही" अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.


पोलिसांकडून इतके वर्ष बघ्याची भूमिका...


वाल्मीक बहिरव यांच्या मते या संपूर्ण प्रकरणात सर्वात संतापजनक भूमिका जर कोणाची असेल, तर ती छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसर पोलीस ठाण्याची आहे. वडिलांनी मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली. अपेक्षा होती की, पोलीस सायबर सेलची मदत घेतील, कॉल रेकॉर्ड काढतील किंवा तातडीने पथके रवाना करतील. मात्र, झालं भलतंच.


सातारा पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी एस.एन. शिरसाठ यांनी तपासाची गती तर वाढवली पण सोबतच, फिर्यादी वडिलांना एक पत्र देखील पाठवले. त्या पत्राचा आशय होता "आम्ही तपास करतच आहोत, तुम्ही तुमच्या जीवाला काही बरे-वाईट करून घेऊ नका."

(तपासात काहीच प्रगती नाही त्यामुळे आपण आत्महत्या करीत आहोत आणि याला पूर्णतः प्रशासन जबाबदार असेल, अशा आशयाचा व्हिडिओ वाल्मीक बहिरव यांनी प्रसिद्ध केल्यानंतर त्यांना हे पत्र पाठवण्यात आले होते)


User Image(कन्नड पोलिसांनी वाल्मीक बहिरव यांना पाठवलेले पत्र)



वाल्मिक यांनी सिद्धार्थ हरवल्याबद्दलची तक्रार दाखल करून आता जवळपास ६ वर्षे झाली. त्यानंतर सातारा पोलीस स्टेशनमध्ये अनेक तपास अधिकारी येऊन बदली होऊन निघून गेले. दोन महिन्यांपूर्वी बदली झालेले तपास अधिकारी कामठे यांच्याशी ‘बाईमाणूस’शी संपर्क साधला असता आपल्याला या प्रकरणाबद्दल माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.


गृहमंत्र्यांपासून स्थानिक आमदारांपर्यंत सर्वानी दिली फक्त पोकळ आश्वासनं


पोलीस दाद देत नाहीत म्हणून, सिद्धार्थाचे वडील वाल्मीक बहिरव यांनी राजकीय नेत्यांची पायरी झिजवायला सुरुवात केली. स्थानिक आमदारांपासून तत्कालीन गृहमंत्र्यांपर्यंत त्यांनी प्रत्येकाकडे मदत मागितली. पण या सर्वांनी त्यांना फक्त पोकळ आश्वासनं दिली. वाल्मीक यांनी सर्वप्रथम तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी आश्वासन दिले की, "मी संबंधित पोलीस आयुक्तांना फोन करतो." पण त्या एका फोनपलीकडे काहीच झालं नाही. त्यानंतर सिद्धार्थच्या वडिलांनी मंत्रालयात देखील पत्रव्यवहार केला.



User Image(वाल्मीक बहिरव यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलेले निवेदन)

तिथून पत्रांचे उत्तर यायचे, ज्याची प्रत सातारा पोलीस ठाण्याला पाठवली जायची. त्या पत्रावर लिहिले असायचे "योग्य ती कारवाई करा." पण स्थानिक पोलिसांनी या पत्रांना कधीच गांभीर्याने घेतले नाही. ती पत्रं फक्त फाईलचा भाग बनून राहिली. मंत्रालयात संपर्क केल्यानंतर त्यांनी स्थानिक आमदार नितीन पाटील, तत्कालीन मंत्री अब्दुल सत्तार (सिल्लोडचे आमदार) आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची देखील भेट घेतली. सत्तार यांना तर ते दोनदा भेटले. प्रत्येकाने निवेदन स्वीकारले, सांत्वन केले पण फक्त "बघू, करू" म्हणून बोळवण केली.


न्यायालयात पोलीस तपासातील विसंगती उघड


जेव्हा मदतीचे सर्व दरवाजे बंद झाले, तेव्हा वाल्मीक बहिरव यांनी शेवटचा पर्याय म्हणून न्यायालयात धाव घेतली. १३ मार्च २०२३ रोजी त्यांनी ॲड. डी.बी. पवार यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी रिट याचिका (Criminal Writ Petition No. 3597) दाखल केली.


न्यायालयाने पोलिसांना जाब विचारताच, पोलिसांनी स्वतःची बाजू वाचवण्यासाठी एक धक्कादायक आणि तितकाच संशयास्पद दावा केला. पोलीस आणि सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, "पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अपघातात एक मृतदेह सापडला होता, तो चेहरा ओळखू न येण्याइतपत खराब झाला होता. तो मृतदेह सिद्धार्थचा असू शकतो."


User Image(वाल्मीक बहिरव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ दाखल केलेली याचिका)


आणि इथेच पोलीस तपासातील विसंगती उघड झाली. सिद्धार्थ बेपत्ता झाला ऑगस्ट २०१९ मध्ये आणि पोलिसांनी संदर्भ दिलेला अपघात होता २०२३ च्या सुमारास घडलेला.


वाल्मीक बहिरव आणि त्यांचे वकील डी.बी. पवार यांनी न्यायालयात हा मुद्दा लावून धरला. २०१९ मध्ये हरवलेला माणूस २०२३ च्या अपघातात कसा असू शकतो? ही तारखांची तफावत स्पष्ट करते की, पोलीस हे प्रकरण गांभीर्याने घेत नाहीत. न्यायालयासमोर काहीतरी उत्तर द्यायचे म्हणून आणि केस बंद करण्यासाठी पोलिसांनी हा अपघाताचा बनाव रचला किंवा तसा संशय व्यक्त केला, असे सिद्धार्थच्या वडिलांची ठाम मत आहे. पोलिसांनी काढलेली ही निव्वळ पळवाट असं ते म्हणतात.


न्यायालयात दाखल केलेल्या या याचिकेच्या सद्यस्थितीबद्दल वाल्मीक बहिरव सांगतात की, “याचिका दाखल केल्यानंतर मी तीन तारखांना हजर राहिलो, प्रत्येक सुनावणीत न्यायाधीशांनी फक्त पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या. त्यामुळे त्यानंतरच्या सुनावणीला मी हजर राहिलो नाही. न्यायालयात गेलो की त्याच त्या गोष्टी ऐकून सिद्धार्थच्या आठवणी ताज्या होतात, त्यामुळेही मी तारखेवर हजर राहणे टाळतो.”


वडिलांना वाटतं, "सिद्धार्थ जिवंत आहे, कदाचित तो वेठबिगार म्हणून अडकला असेल…"


पोलिसांनी जरी हात वर केले असले, तरी वाल्मीक बहिरव यांचा असा दावा आहे की सिद्धार्थ जिवंत आहे. त्यांच्याकडे या दाव्याला पुष्टी देणारे दोन अत्यंत महत्त्वाचे पुरावे आहेत. सिद्धार्थ घरातून निघताना सोबत पॅन कार्ड, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम कार्ड घेऊन गेला होता. तेव्हा त्याच्या बँक खात्यात ७,००० रुपये शिल्लक आहेत. गेल्या पाच वर्षांत या खात्यातून एकही रुपया काढला गेला नाही किंवा जमा झाला नाही.


वडील म्हणतात, जर सिद्धार्थचा अपघात झाला असता, तर त्याचे पाकीट किंवा कार्ड तिथे सापडले असते. जर तो मुक्तपणे कुठे तरी फिरत असता, तर त्याने पैशांचा वापर केला असता. पण खाते जसेच्या तसे असणे याचा अर्थ, तो अशा ठिकाणी आहे जिथे त्याला आर्थिक व्यवहार करण्याचे स्वातंत्र्य नाही.


सिद्धार्थला कामाची अत्यंत गरज होती. वडिलांच्या मते, बेपत्ता होण्यापूर्वीच्या काळात त्याने अनेक मित्रांना फोन करून कामासाठी विचारणा केली होती. औरंगाबादमध्ये फिरताना त्याची कोणाशीतरी ओळख झाली असावी, ज्याने त्याला कामाचे आमिष दाखवले. त्याच्या वडिलांचा दाट संशय आहे की, त्याला फसवून परराज्यात किंवा एखाद्या दुर्गम भागात नेले गेले आहे आणि तिथे त्याला वेठबिगार म्हणून डांबून ठेवले आहे. अशा ठिकाणी माणसाकडून मरेस्तोवर काम करवून घेतले जाते, पण त्याला ना पैसे मिळतात, ना घरच्यांशी संपर्क साधता येतो. मोबाईल पाचोडला सोडून देणे आणि त्यानंतर कोणताही संपर्क नसणे, यामुळे हा संशय अधिक बळकट होतो.


सिद्धार्थ घर सोडून पाच वर्षे उलटून गेली आहेत. सिद्धार्थची पत्नी, जिने "तुला नोकरी लागली तरच येईल" अशी अट घातली होती, तिने दुसरे लग्न केले आहे आणि तिला आता मूलबाळही आहे. तिचे आयुष्य पुढे सरकले आहे.पण सिद्धार्थचे आई-वडील मात्र २०१९ च्या त्याच वळणावर उभे आहेत. त्यांच्याकडे आता फक्त वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातींची रद्दी, नेत्यांना दिलेल्या निवेदनांच्या झेरॉक्स प्रती आणि उच्च न्यायालयाच्या तारखा उरल्या आहेत.


एनसीआरबीची आकडेवारी काय सांगते..?


राष्ट्रीय गुन्हे नोंद शाखेच्या अहवालावर नजर टाकल्यास, महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी ६० ते ६५ हजार व्यक्ती बेपत्ता होतात असे दिसून येते. २०१९ ते २०२३ या पाच वर्षांची आकडेवारी बघितल्यास, हरवलेल्या व्यक्तींमध्ये केवळ महिलाच नव्हे, तर पुरुष आणि लहान मुलांचाही मोठा समावेश आहे. विशेषतः २०२३ सालातील आकडेवारीनुसार, राज्यात बेपत्ता असलेल्यांची एकूण संख्या १ लाख २२ हजारांच्या घरात पोहोचली आहे.


पोलिस प्रशासनाने राबवलेल्या विविध मोहिमांमुळे हरवलेल्या व्यक्तींना शोधून काढण्याचे प्रमाण वाढले आहे. २०२३ मध्ये बेपत्ता असलेल्या १ लाखांहून अधिक लोकांपैकी सुमारे ७१,००० जणांना सुखरूप शोधण्यात यश आले आहे. यामध्ये ४० हजारांहून अधिक महिला आणि ३० हजारांहून अधिक पुरुषांचा समावेश आहे. हरवलेल्यांपैकी अनेकांना सुखरूप शोधण्यात पोलिसांना यश आले असले तरीही अनेक जण अजूनही बेपत्ताच आहेत.


राष्ट्रीय गुन्हे नोंद शाखेच्या आकडेवारीत दरवर्षी हरवलेल्या हजारो व्यक्तींची नोंद होते. पण या नोंदींच्या पलीकडे एक भयानक वास्तव असते, ते म्हणजे मागे राहिलेल्या कुटुंबाचा प्रशासकीय व्यवस्थेशी सुरू असलेला लढा. अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांनी हरवलेल्या व्यक्तीचा सुखरूप शोध घेतला असला तरीही काही प्रकरणांमध्ये पोलिसांना अपयश आलय.


सिद्धार्थ जिवंत आहे की मृत, हे शोधणे आता न्यायालयाच्या आदेशावर अवलंबून आहे. पण "सिद्धार्थच्या अस्तित्वाचे पुरावे जिवंत असताना, त्याला कागदोपत्री मारण्याचा प्रयत्न का केला जातोय?" हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आपल्या मुलाला शोधण्यासाठी वाल्मिक बहिरव यांची सुरू असलेली ही धडपड जर बघितली तरी सामान्य माणसालाही इथल्या व्यवस्थेची कीव येईल.



User Image


‘बाईमाणूस’ने घेतला पुढाकार


वाल्मीक बहिरव यांचा मुलगा सिद्धार्थ हा गेल्या सहा वर्षांपासून बेपत्ता आहे, त्याच्या वडिलांनी इतके प्रयत्न करूनही तो सापडलेला नाही. त्यामुळे ‘बाईमाणूस’ तर्फे आम्ही संपूर्ण वाचकांना आवाहन करतो की सिद्धार्थ वाल्मीक बहिरव याच्यासंबंधी कुठलीही माहिती तुम्हाला मिळाली तर खालील नंबर वर संपर्क करा.


वाल्मीक बहिरव (कन्नड)

संपर्क क्र. - +91 75888 54517


बाईमाणूस ऑफिस (छत्रपती संभाजीनगर)

संपर्क क्र. - +91 93073 09270





Share this article
धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार
ग्राउंड रिपोर्ट

धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार

धाराशिव येथे पहिल्यांदाच 'पंचायत परिषद' आयोजित करण्यात आली, यात ३५ गावांतील महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत हवामान बदल आणि दुष्काळ निवारणासाठी स्थानिक पातळीवरील 'कृती आराखडा' तयार केला गेला. वाढत्या उष्णतेचा आणि पाणीटंचाईचा थेट फटका ग्रामीण महिलांच्या आरोग्याला, आर्थिक स्थितीला आणि विशेषतः मुलांच्या शिक्षणाला कसा बसत आहे, यावर महिलांनी आपले वास्तव अनुभव मांडले. केवळ समस्या न मांडता महिलांनी गट शेती, ठिबक सिंचन, रेन पाईपचा वापर, वृक्षलागवड आणि शेळी-कुक्कुटपालनासारख्या पूरक व्यवसायांच्या माध्यमातून हवामान बदलावर मात करण्यासाठी धोरणात्मक उपायांची मागणी केली. याच परिषदेत 'दुष्काळ पूर्वसूचना प्रणाली' अहवालाचेही प्रकाशन झाले.

3 min read
A
Apsara Aga
वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?
ग्राउंड रिपोर्ट

वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?

ताडोबातील काही वाघ दिसेनासे झाल्याच्या चर्चांमुळे वन्यजीव क्षेत्रात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरूस्थित एका वन्यजीव छायाचित्रकाराच्या चौकशीमुळे संशयांना नवे वळण लागले आहे. छायाचित्रणाच्या नावाखाली जंगलात नियमबाह्य हालचाली, मेलेली जनावरे टाकणे आणि रात्री-अपरात्री फिरण्याचे आरोप या छायाचित्रकारावर आहेत. वन विभागाने मात्र चौकशी केवळ अनधिकृत प्रवेशासंदर्भात असून शिकारीचे कोणतेही पुरावे नाहीत, असा दावा केला आहे.

8 min read
S
Shantanu Khuje
Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने बलात्कार केला, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. ही एक गंभीर "crime" असून, या "rape case" मुळे "beed news" मध्ये मोठी खळबळ उडाली आहे, ज्यामुळे "breaking news" म्हणून हा प्रकार समोर आला आहे. या "crime news" संदर्भात अधिक माहितीसाठी पाहा हा विशेष रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...
Video content
ग्राउंड रिपोर्ट

"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...

बीड जिल्ह्यातील खळवट लिमगाव हे गाव एकेकाळी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या भांडणांसाठी आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्यांसाठी ओळखलं जायचं. मात्र आता गावभर बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमुळे परिस्थितीत मोठा बदल झाल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावात CCTV यंत्रणा उभारण्यात आली. त्यानंतर गावातील भांडणं, वाद-विवाद आणि असामाजिक प्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचं ग्रामस्थ सांगतात. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून गावात एकही भांडण झालेलं नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या विशेष ग्राउंड रिपोर्टमध्ये पोलीस अधिकारी, महिला ग्रामस्थ आणि सरपंच यांच्याशी संवाद साधत CCTV मुळे गावात नेमका काय बदल झाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा बाईमाणूसचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!
ग्राउंड रिपोर्ट

"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

11 min read
S
Sanjana Khandare
Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात गेल्या ९ वर्षांपासून सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकेमुळे गावकऱ्यांचे जीवन भयभीत झाले आहे. ११ एप्रिल रोजी बसलेल्या ४.७ रिश्टर स्केलच्या धक्क्याने गावातील जुन्या मातीच्या घरांची कशी पडझड झाली आणि गावकरी कोणत्या भीतीच्या छायेत जगत आहेत, याचा सविस्तर आढावा घेणारा ‘बाईमाणूस’चा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Shantanu Khuje

Comments

Comments are currently disabled or loading...