Skip to main content

“नसबंदी, नक्षलवाद आणि पुनर्वसन: नस जोडताना आयुष्याची धडपड”

Article in Marathi
Suraj Patke
28 Mar 2026
4 min read
76 views
 “नसबंदी, नक्षलवाद आणि पुनर्वसन: नस जोडताना आयुष्याची धडपड”

सुरज पटके (गडचिरोली)


  • नक्षलवादी च‌ळवळीत लग्न करायचं असेल तर पुरुषांची अगोदर नसबंदी केली जाते.


  • गेल्या दोन वर्षांत शेकडो नक्षलवादी शरण आले असून त्यांच्या पुनर्वसनाचा एक वेगळाच प्रयोग सुरू आहे, ज्यात ‘'नसबंदी रिओपनिंग’ केली जाते.


  • त्यामुळे विवाहानंतर अपत्यप्राप्तीची इच्छा बळावलेले तरुण नक्षलवादी पोलिसांकडे आत्मसमर्पण करू लागले आहेत.


दंडकारण्याच्या जंगलात संध्याकाळ पटकन उतरते. झाडांच्या सावल्या एकमेकांत मिसळतात आणि अंधार हळूहळू सगळं गिळून टाकतो. कधीकाळी याच अंधारात राहणारा लच्छू (नाव बदललेलं) आता गडचिरोलीच्या भामरागडातील एका छोट्याशा गावातल्या मातीच्या घराच्या ओसरीवर बसलेला आहे. समोर अंगणात त्याची बायको जेवण बनवतेय, घरात रेडिओवर हलकी गाणी लागलेली आहेत. सगळं काही साधं, सामान्य, जणू काही आयुष्य नेहमीच असंच होतं.


पण लच्छूच्या आयुष्यात ही ‘सामान्य’ गोष्ट फार उशिराने आली. तो जवळपास दहा वर्षं नक्षल चळवळीत होता. आता तो ‘सरेंडर’ झालाय. जंगलात, बंदुकीच्या सावलीत, सततच्या हालचालीत. त्या काळात त्याचं आयुष्य फक्त ‘लढाई’ होतं. त्यात वैयक्तिक इच्छा, स्वप्नं, कुटुंब यांना फारशी जागा नव्हती. जेव्हा त्याला माओवादी संघटनेत लग्न करायचं होतं, तेव्हा त्याला सांगण्यात आलं, लग्न करू शकतोस परंतू “नसबंदी करावी लागेल.” त्यावेळी लच्छूने फार विचार केला नाही. त्याला वाटलं, हीच क्रांतीची किंमत आहे. मुलं नकोतच, कारण मुलं म्हणजे जबाबदारी, आणि जबाबदारी म्हणजे संघर्षात अडथळा.


नक्षल चळवळीत पुरुषांची नसबंदी का केली जाते?


नक्षल चळवळ स्वतःला समतेची, शोषणविरोधी लढाई म्हणून मांडते. पण तिच्या अंतर्गत जीवनपद्धतीत, विशेषतः स्त्री-पुरुष संबंधांमध्ये, अनेक न सांगितलेले नियम असतात. लग्न ही इथे वैयक्तिक गोष्ट नसते तर ती संघटनेच्या परवानगीवर अवलंबून असते. कोणाशी नातं जोडायचं, केव्हा जोडायचं आणि त्या नात्याचं स्वरूप काय असेल, हे चळवळीच्या नेतृत्वाच्या चौकटीत ठरतं. कुटुंब ही संकल्पना इथे वेगळीच बनते. ‘संघटना’ हेच कुटुंब असतं. वैयक्तिक आयुष्य, भावनिक बंध, पालकत्व या सगळ्या गोष्टींना दुय्यम स्थान दिलं जातं. म्हणूनच नसबंदी ही फक्त वैद्यकीय प्रक्रिया नसते, ती एका विचारसरणीचा भाग असते, जिथे माणूस स्वतःच्या शरीरापासूनही दूर जातो.


User Image(व्हॅसेक्टॉमी रिव्हर्सल शस्त्रक्रिया करण्यात आलेले आत्मसमर्पित नक्सलवादी (फोटो क्रेडिट: गडचिरोली पोलीस विभाग))


लच्छू सांगतो, “तेव्हा असं वाटायचं की आपण मोठ्या लढाईचा भाग आहोत. स्वतःच्या आयुष्याचा जराही विचार करायचा नाही.” त्याचा आवाज शांत असतो, पण त्या शांततेत एक थकवा दडलेला असतो.


गेल्या काही वर्षांनंतर परिस्थिती बदलली. सततच्या चकमकी, सहकाऱ्यांचा मृत्यू, आणि जगण्याचा कंटाळा, या सगळ्यांनी लच्छूला आतून हलवायला सुरुवात केली. शेवटी त्याने शरण येण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सोपा नव्हता. जंगल सोडणं म्हणजे फक्त जागा बदलणं नव्हतं; ती एक ओळख सोडणं होतं.


शरणागतीनंतर त्याचं आयुष्य हळूहळू बदलायला लागलं. प्रशासनाने त्याला घर दिलं, थोडी आर्थिक मदत दिली. गावात परत येताना लोकांनी सुरुवातीला अंतर ठेवलं, पण काळानुसार तेही कमी झालं. या सगळ्यात त्याच्या आयुष्यात एक नवा प्रश्न उभा राहिला, “आता पुढे काय…?”


त्याचं लग्न झालं होतं, पण मुलं होणं शक्य नव्हतं. नसबंदीमुळे त्याच्या आयुष्यातील एक शक्यता कायमची बंद झाली होती. त्या वेळी त्याला पहिल्यांदाच जाणवलं की, जंगलात घेतलेले निर्णय आयुष्यभर सोबत राहतात.


'नसबंदी रिओपनिंग'... शरण आलेल्या नक्षलवाद्यांच्या आयुष्यात नवी पहाट


याच काळात त्याला ‘'नसबंदी रिओपनिंग'’बद्दल माहिती मिळाली. डॉक्टरांनी सांगितलं की शस्त्रक्रिया करून नस पुन्हा जोडता येऊ शकते, पण यशाची खात्री नाही. तरीही लच्छूने हा प्रयत्न करायचं ठरवलं.


“मला एक संधी हवी होती,” तो म्हणतो, “सामान्य आयुष्य जगण्याची.”


ही ‘नस जोडण्याची’ प्रक्रिया फक्त वैद्यकीय नव्हती; ती भावनिक होती, सामाजिक होती, आणि कदाचित राजकीयही होती. ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर त्याची नस जोडत होते, पण त्या क्षणी लच्छूला वाटत होतं की, तो स्वतःचं आयुष्य पुन्हा जोडतोय.


User Image(अशोक होळी आणि सुशीला गव्हारे, २०१६ मध्ये नसबंदी रिओपनिंग केल्यानंतर त्यांना आज आराध्या आणि अक्षरा या दोन मुली आहेत. (फोटो क्रेडिट: गडचिरोली पोलीस विभाग) )


आज त्या शस्त्रक्रियेला दोन वर्षं झाली आहेत. त्याला अजून मूल झालेलं नाही. डॉक्टर अजूनही आशा सोडू नका असं सांगतात. पण लच्छू आता त्या उत्तराची वाट पाहत बसलेला नाही. तो शेती करतो, गावातल्या छोट्या कामांत हातभार लावतो, आणि संध्याकाळी घरी परततो.


“आता आयुष्य शांत आहे,” तो हसत म्हणतो, “पण कधी कधी वाटतं, आपण काहीतरी कायमचं मागे सोडलंय.”


लच्छूची ही कहाणी त्याच्या एकट्याची नाही. गडचिरोली, बस्तर आणि आसपासच्या भागात अशा अनेक कहाण्या शांतपणे घडत आहेत. शरण आलेले नक्षलवादी आपल्या आयुष्याला पुन्हा आकार देण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजण 'नसबंदी रिओपनिंग' करून घेत आहेत, काहीजण नव्या नात्यांमध्ये गुंतत आहेत, तर काहीजण फक्त शांतपणे जगण्याचा प्रयत्न करत आहेत.


या सगळ्या प्रक्रियेकडे पाहताना एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, हे खरंच ‘पुनर्वसन’ आहे का, की एका आयुष्याची ‘पुनर्रचना’?


गडचिरोलीत पोलीस आणि डॉ. अभय बंग यांचा पुढाकार


नक्षल चळवळीत असताना संघटनेने त्यांच्या शरीरावर नियंत्रण ठेवलं. नसबंदी ही त्याचाच एक भाग होती. त्या वेळी त्यांच्या वैयक्तिक इच्छांना फारशी किंमत नव्हती. आता, शरणागतीनंतर, सरकार आणि प्रशासन त्यांना ‘नवं आयुष्य’ देण्याचा प्रयत्न करत आहे. 'नसबंदी रिओपनिंग' हा त्याचाच एक भाग आहे. 


गडचिरोलीमध्ये गेल्या काही वर्षांत शरण आलेल्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाचा एक वेगळाच प्रयोग सुरू आहे. गडचिरोली पोलिस आणि SEARCH (Society for Education, Action and Research in Community Health) या संस्थेच्या संयुक्त पुढाकारातून ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत 'नसबंदी रिओपनिंग' शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. या उपक्रमांतर्गत नुकत्याच मार्च 2026 मध्ये 14 शरण आलेल्या नक्षलवाद्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे आतापर्यंत गडचिरोलीमध्ये एकूण 50 शरण आलेल्या नक्षलवाद्यांची 'नसबंदी रिओपनिंग' करण्यात आलेली आहे. त्यापैकी 13 जणांना नंतर मुलंही झाली आहेत. या शस्त्रक्रियेचं यश सुमारे 40 टक्क्यांच्या आसपास असल्याचं डॉक्टर सांगतात.


या प्रक्रियेच्या मागे फक्त वैद्यकीय गरज नाही, तर एक व्यापक पुनर्वसनाचा विचार आहे. गडचिरोली पोलिसांच्या पुढाकारासोबतच डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांच्या नेतृत्वाखालील SEARCH संस्थेने या प्रक्रियेला वैद्यकीय आधार दिला आहे. ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत केवळ शस्त्रक्रिया नाही, तर आरोग्य, रोजगार, कौशल्य प्रशिक्षण, ओळखपत्र, घरकुल आणि मानसिक समुपदेशन अशा अनेक पातळ्यांवर माजी नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जातो.


User Image (Project Sanjeevani अंतर्गत आयोजित करण्यात आलेला आत्मसमर्पित नक्सलवादी यांचा विवाह सोहळा (फोटो क्रेडिट: गडचिरोली पोलीस विभाग))


गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पित या पुनर्वसनासाठी 'प्रोजेक्ट संजीवनी' राबविला जात आहे. याअंतर्गत चातगाव येथील सर्च फाउंडेशनच्या माँ दंतेश्वरी रुग्णालयात २१ मार्च रोजी विशेष शिबिर घेण्यात आले. यामध्ये गडचिरोलीतील १३ आणि गोंदिया जिल्ह्यातील १, अशा एकूण १४ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या सर्वांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली.


गडचिरोली पोलीस विभागाचे अधीक्षक निलोत्पल यांनी बाईमाणूसशी बोलतांना सांगितले की,


"प्रोजेक्ट संजीवनी हा गडचिरोली पोलीस विभागाचा आत्मसमर्पण केलेल्या नक्सलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राबवलेला एक महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील उपक्रम आहे. याआधी ३६ आत्मसमर्पित नक्सलवाद्यांवर व्हॅसेक्टॉमी रिव्हर्सल शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या होत्या, आणि नुकत्याच आणखी १४ पुरुषांवर या शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. विशेष म्हणजे, याआधी शस्त्रक्रिया झालेल्या काहींना अपत्यप्राप्ती झाली असून ते आज आत्मविश्वासाने आपल्या कुटुंबासोबत सुखी आणि स्थिर आयुष्य जगत आहेत. प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत याआधी आम्ही आत्मसमर्पित नक्सलवाद्यांसाठी घर, शासकीय कागदपत्रे, ओळखपत्रे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला होता. मात्र, त्याचबरोबर त्यांचे कौटुंबिक आयुष्यही समृद्ध आणि पूर्ण व्हावे, त्यांना अपत्यसुख मिळावे, या उद्देशाने SEARCH संस्थेच्या सहकार्याने व्हॅसेक्टॉमी रिव्हर्सल शस्त्रक्रियेचे शिबिर आयोजित करण्यात आले. या शस्त्रक्रियेनंतर संबंधित व्यक्तींमध्ये लक्षणीय आत्मविश्वास वाढलेला दिसून येतो. ते मुख्य प्रवाहात राहून आपल्या कुटुंबासाठी जबाबदारीने काम करण्यास पुढाकार घेत आहेत. काही जण लॉयड मेटल्ससारख्या उद्योगांमध्ये कार्यरत आहेत, तर काही जण शासकीय योजनांच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीत सहभागी होत आहेत. गडचिरोली पोलीस विभाग यापुढेही आत्मसमर्पित नक्सलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांना सन्मानाने मुख्य प्रवाहात स्थिर करण्यासाठी अशा उपक्रमांना सातत्याने पुढे नेणार आहे.”


ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी पद्मश्री डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या लीलावती रुग्णालयातील तज्ज्ञ डॉ. श्रीरंग पुरोहित, डॉ. सुशील नेहेते, डॉ. लीना आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. नागसेन साखरे व डॉ. वर्षा बारई यांच्या पथकाने अथक परिश्रम घेतले. 


यासंदर्भात बाईमाणूसशी बोलतांना डॉ. श्रीरंग पुरोहित सांगतात,


“गडचिरोलीतील SEARCH हॉस्पिटलमध्ये गेल्या आठवड्यात आत्मसमर्पण केलेल्या १४ नक्षलवाद्यांवर व्हॅसेक्टॉमी रिव्हर्सल शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या. या रुग्णांचा वयोगट २३ ते ४० वर्षे दरम्यान होता आणि २५ मार्च रोजी सर्व रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुढील फॉलोअपचे नियोजनही करण्यात आले आहे. जिल्हा पोलिसांच्या पुढाकारातून ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात आली असून, आत्मसमर्पण केलेल्या व्यक्तींना पुन्हा कौटुंबिक जीवन सुरू करता यावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. गडचिरोली पोलिसांनी SEARCH हॉस्पिटलशी संपर्क साधल्यानंतर या शस्त्रक्रियांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात आली. SEARCH ही संस्था गेली चार दशके गडचिरोलीमध्ये आरोग्य सेवा देत असून, ग्रामीण आणि आदिवासी रुग्णांसाठी आम्ही नियमितपणे प्लास्टिक सर्जरी कॅम्प आयोजित करतो. या शस्त्रक्रियांच्या माध्यमातून अशा प्रकारची आरोग्य सेवा देण्याची संधी मिळाल्याचा मला आणि माझ्या टीमला अत्यंत आनंद आहे.”

करू आत्मसमर्पण पोलिसांकडे, उघडून नसबंदी जीवन होईल आनंदी…


अपत्यप्राप्तीमुळे कार्यकर्ते कौटुंबिक सुखात रममाण होऊन नक्षली चळवळीपासून दूर जाऊ नयेत म्हणून विवाहापूर्वीच त्यांची नसबंदी करण्याचा दंडक दलम कमांडरने घालून दिला आहे. त्यामुळे विवाहित नक्षलवाद्यांमध्ये निर्माण होत असलेल्या नाराजीलाच शस्त्र बनवून नक्षली चळवळीविरोधात वापरण्याची ही योजना महाराष्ट्र आणि छत्तीसगड पोलिसांनी आखली असून तिला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी विवाहित नक्षलवाद्यांसाठी ‘नसबंदी रिओपनिंग फॉर्म्युला’ तयार केला आहे.


User Image(फोटो क्रेडिट: गडचिरोली पोलीस विभाग)


‘नक्षलवादी करतात जबरीने नसबंदी, करू आत्मसमर्पण पोलिसांकडे, उघडून नसबंदी  जीवन होईल आनंदी’ असे घोषवाक्यच पोलिसांनी बनवले आहे. त्यामुळे विवाहानंतर अपत्यप्राप्तीची इच्छा बळावलेले तरुण नक्षलवादी पोलिसांकडे आत्मसमर्पण करू लागले आहेत.


माओवादी चळवळीत महिलांचे शोषण…


माओवादी चळवळीच्या या सगळ्या नियमांमध्ये स्त्रियांचं स्थान अधिकच गुंतागुंतीचं राहिलं आहे. गेल्या काही वर्षांत शरण आलेल्या अनेक महिला नक्षलवाद्यांनी त्यांच्या अनुभवांबद्दल बोलायला सुरुवात केली आहे. या कहाण्यांमधून एक अस्वस्थ करणारी वास्तवता समोर येते, जिथे ‘समते’च्या घोषणांआड अनेकदा शोषण लपलेलं असतं. काही महिलांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं की, संघटनेत सुरुवातीला त्यांना समानतेची, सन्मानाची भाषा ऐकायला मिळाली. पण प्रत्यक्षात, निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत त्यांचा आवाज मर्यादित होता. वरिष्ठ नेत्यांकडून दबाव, अनिच्छित संबंध आणि कधी कधी लैंगिक शोषणाच्या घटनाही त्यांनी अनुभवलेल्या आहेत.


शरण आलेल्या एका महिलने मुलाखतीत सांगितलं होतं की, “आम्हाला सांगितलं जायचं की आपण सगळे समान आहोत. पण काही गोष्टींबद्दल प्रश्न विचारले की, उत्तर मिळायचं नाही. किंवा उलट आपल्यालाच दोष दिला जायचा.”


User Image

काही महिलांनी जबरदस्तीने संबंध ठेवण्याचे, किंवा वरिष्ठांच्या दबावाखाली निर्णय घ्यावे लागल्याचे अनुभवही सांगितले आहेत. या गोष्टींबद्दल बोलणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. कारण संघटनेत प्रश्न विचारणं म्हणजे ‘विचारसरणीविरोधी’ ठरणं. यामुळे अनेक महिला मानसिकदृष्ट्या ताणाखाली राहत होत्या. काहींनी सांगितलं की, त्यांना स्वतःच्या शरीरावरचा अधिकारही पूर्णपणे नसल्यासारखं वाटायचं.


लच्छूची बायको, जी स्वतः कधीच जंगलात गेली नव्हती, ती या सगळ्याकडे वेगळ्या नजरेने पाहते. ती म्हणते, “आम्हाला फक्त साधं आयुष्य हवं आहे. बाकी काही नाही.”


पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे. पुनर्वसन ही केवळ धोरणाची गोष्ट नाही. ती माणसाच्या आयुष्याशी, त्याच्या शरीराशी, आणि त्याच्या स्वप्नांशी जोडलेली आहे. लच्छू संध्याकाळी अंगणात बसलेला असतो. आकाशात तारे हळूहळू दिसायला लागतात. त्याच्या चेहऱ्यावर एक शांतता असते, पण त्या शांततेत एक अपूर्णता दडलेली असते. कदाचित ती कधीच पूर्ण होणार नाही. पण तरीही तो जगतोय, प्रयत्न करतोय, आणि प्रत्येक दिवशी आपलं आयुष्य थोडं थोडं जोडतोय… कधी नस जोडून, तर कधी स्वतःलाच पुन्हा जोडून.


Share this article
धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार
ग्राउंड रिपोर्ट

धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार

धाराशिव येथे पहिल्यांदाच 'पंचायत परिषद' आयोजित करण्यात आली, यात ३५ गावांतील महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत हवामान बदल आणि दुष्काळ निवारणासाठी स्थानिक पातळीवरील 'कृती आराखडा' तयार केला गेला. वाढत्या उष्णतेचा आणि पाणीटंचाईचा थेट फटका ग्रामीण महिलांच्या आरोग्याला, आर्थिक स्थितीला आणि विशेषतः मुलांच्या शिक्षणाला कसा बसत आहे, यावर महिलांनी आपले वास्तव अनुभव मांडले. केवळ समस्या न मांडता महिलांनी गट शेती, ठिबक सिंचन, रेन पाईपचा वापर, वृक्षलागवड आणि शेळी-कुक्कुटपालनासारख्या पूरक व्यवसायांच्या माध्यमातून हवामान बदलावर मात करण्यासाठी धोरणात्मक उपायांची मागणी केली. याच परिषदेत 'दुष्काळ पूर्वसूचना प्रणाली' अहवालाचेही प्रकाशन झाले.

3 min read
A
Apsara Aga
वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?
ग्राउंड रिपोर्ट

वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?

ताडोबातील काही वाघ दिसेनासे झाल्याच्या चर्चांमुळे वन्यजीव क्षेत्रात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरूस्थित एका वन्यजीव छायाचित्रकाराच्या चौकशीमुळे संशयांना नवे वळण लागले आहे. छायाचित्रणाच्या नावाखाली जंगलात नियमबाह्य हालचाली, मेलेली जनावरे टाकणे आणि रात्री-अपरात्री फिरण्याचे आरोप या छायाचित्रकारावर आहेत. वन विभागाने मात्र चौकशी केवळ अनधिकृत प्रवेशासंदर्भात असून शिकारीचे कोणतेही पुरावे नाहीत, असा दावा केला आहे.

8 min read
S
Shantanu Khuje
Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने बलात्कार केला, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. ही एक गंभीर "crime" असून, या "rape case" मुळे "beed news" मध्ये मोठी खळबळ उडाली आहे, ज्यामुळे "breaking news" म्हणून हा प्रकार समोर आला आहे. या "crime news" संदर्भात अधिक माहितीसाठी पाहा हा विशेष रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...
Video content
ग्राउंड रिपोर्ट

"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...

बीड जिल्ह्यातील खळवट लिमगाव हे गाव एकेकाळी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या भांडणांसाठी आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्यांसाठी ओळखलं जायचं. मात्र आता गावभर बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमुळे परिस्थितीत मोठा बदल झाल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावात CCTV यंत्रणा उभारण्यात आली. त्यानंतर गावातील भांडणं, वाद-विवाद आणि असामाजिक प्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचं ग्रामस्थ सांगतात. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून गावात एकही भांडण झालेलं नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या विशेष ग्राउंड रिपोर्टमध्ये पोलीस अधिकारी, महिला ग्रामस्थ आणि सरपंच यांच्याशी संवाद साधत CCTV मुळे गावात नेमका काय बदल झाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा बाईमाणूसचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!
ग्राउंड रिपोर्ट

"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

11 min read
S
Sanjana Khandare
Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात गेल्या ९ वर्षांपासून सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकेमुळे गावकऱ्यांचे जीवन भयभीत झाले आहे. ११ एप्रिल रोजी बसलेल्या ४.७ रिश्टर स्केलच्या धक्क्याने गावातील जुन्या मातीच्या घरांची कशी पडझड झाली आणि गावकरी कोणत्या भीतीच्या छायेत जगत आहेत, याचा सविस्तर आढावा घेणारा ‘बाईमाणूस’चा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Shantanu Khuje

Comments

Comments are currently disabled or loading...