Skip to main content

सेनेच्या वर्धापनदिनानंतर एकच प्रश्न, हा ‘दंगलकार नितीन चंदनशिवे’ नेमका कोण आहे?

Article in Marathi
Shantanu Khuje
Today
43 views
 सेनेच्या वर्धापनदिनानंतर एकच प्रश्न, हा ‘दंगलकार नितीन चंदनशिवे’ नेमका कोण आहे?

शंतनू खुजे


  • शिवसेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यात काल एक राजकीय भाषण नव्हे, तर एक कविता चर्चेचा विषय ठरली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सादर झालेल्या कवी नितीन चंदनशिवे यांच्या कवितेने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट मिळवला आणि काही तासांतच सोशल मीडियावर लाखो लोकांपर्यंत पोहोचली. 


  • अनेकांसाठी हा कवी नवीन होता. पण महाराष्ट्रातील बहुजन, आंबेडकरी आणि परिवर्तनवादी सांस्कृतिक विश्वात 'दंगलकार' म्हणून ओळखले जाणारे नितीन चंदनशिवे गेली अनेक वर्षे गावागावांत कविता, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांतून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहेत. 


  • मग नेमका कोण आहे हा कवी? त्याच्या कवितेत असे काय आहे की ती व्यासपीठ ओलांडून लोकांच्या चर्चेचा विषय बनते.



शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या दोन्ही पक्षांचा काल वर्धापनदिन सोहळा साजरा झाला. अनेक राजकीय भाषणे झाली, आरोप-प्रत्यारोप झाले. पक्षाच्या भविष्यासंदर्भात भूमिका मांडल्या गेल्या. पण कार्यक्रम संपल्यानंतर सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत राहिला तो शिवसेनेचा राजकीय नेता नव्हता, तर तो होता एक कवी, ज्याचं नाव ‘नितीन चंदनशिवे’... साहित्य विश्वात त्याला ‘दंगलकार’ नितीन चंदनशिवे या नावानं ओळखलं जातं.


उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सादर झालेल्या त्यांच्या भाषणाने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट मिळवला. काही तासांतच या भाषणाचे व्हिडिओ फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपच्या स्टेटसवर फिरू लागले. अनेकांनी ते शेअर केलं, अनेकांनी त्यांचं भाषण ऐकले आणि अनेकांनी एकच प्रश्न विचारला, हा नितीन चंदनशिवे नेमका कोण आहे?


User Image


सेनेच्या वर्धापनदिनानंतर एकच प्रश्न, हा ‘नितीन चंदनशिवे’ नेमका कोण आहे?


हा प्रश्न केवळ एका कवीची ओळख शोधण्यापुरता मर्यादित नाही. उलट तो आजच्या महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजकारण समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण नितीन चंदनशिवे हा मुख्य प्रवाहातील साहित्य संमेलनांतून घडलेलेा कवी नाही, त्यांना मोठ्या प्रकाशन संस्थांनी पुढे आणलेले नाही, विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांची कविता शिकवली जात नाही, मराठी साहित्यविश्वातील प्रतिष्ठित पुरस्कारांच्या यादीतही त्यांचं नाव कधी दिसत नाही…. तरीही गावागावांतील हजारो लोक या ‘दंगलकाराला’ओळखतात, त्यांची कविता पाठ करतात आणि त्यांच्या कार्यक्रमांसाठी गर्दी करतात.


नितीन चंदनशिवे यांची ओळख प्रामुख्याने ‘दंगलकार’ अशी आहे. महाराष्ट्रातील अनेक परिवर्तनवादी, आंबेडकरी आणि बहुजन सांस्कृतिक व्यासपीठांवर गेल्या काही वर्षांत हे नाव सातत्याने ऐकू येतयं. विशेष म्हणजे ही ओळख त्यांनी स्वतः तयार केलेली नाही. त्याच्या ‘दंगल’ या कवितेने लोकांमध्ये निर्माण केलेल्या प्रतिसादातून ही उपाधी त्याला मिळाली. 


नितीन चंदनशिवेंच्या कवितेची ताकद केवळ शब्दांत नाही, तर सादरीकरणात आहे. ते  कविता वाचत नाही तर अक्षरश: जगतात. त्यांच्या आवाजात शाहिरीचा जोश आहे, भाषणाची धार आहे आणि आंदोलनाची अस्वस्थता आहे. त्यामुळे त्यांच्या कविता पुस्तकाच्या पानांपेक्षा व्यासपीठावर अधिक जिवंत वाटतात. सामाजिक प्रश्न असो, जातीय विषमतेचा अनुभव असो, संविधानावरील विश्वास असो किंवा सत्तेविषयीचा रोष असो, चंदनशिवेच्या कवितेत ते थेट, स्पष्ट आणि भावनिक स्वरूपात व्यक्त होतात.


शिवसेनेच्या वर्धापनदिनात ‘नितीन चंदनशिवे’ इतके व्हायरल का झाले?


म्हणूनच शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत झालेल्या कार्यक्रमात नितीन चंदनशिवेंनी तब्बल ४५ मिनिटे तुफान राजकीय फटकेबाजी केली. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी गावगाड्यावर जे काही संस्कार केलेत, जे रोपटे लावलंय त्याला प्रबोधनकारांच्याच नातवाने पाणी घालावं, आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढावा, अशा शब्दात 'दंगलकार' कवी नितीन चंदनशिवे यांनी ठाकरेंचा वर्धापन दिन गाजवला. ओमदादांच्या नावाच्या पुढे आता 'राजे' हा शब्द लावण्याची गरज नाही, तो शब्द वाझेंच्या राजाभाऊंना शोभून दिसतोय, असंही चंदनशिवे म्हणाले. त्यांच्या भाषणातील काही मुद्दे…


  • शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी कधीच झाला नव्हता, शिवसेनेचा जन्म मराठी माणसाच्या अस्मितेसाठी झाला होता. कोण आलं किंवा कोण गेलं याने शिवसेना संपणार नाही.


  • आदित्य ठाकरे तुम्ही महाराष्ट्र पिंजून काढा. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी गावगाड्यावर जे काही संस्कार केलेत, जे रोपटे लावलंय त्याला प्रबोधनकारांच्याच नातवाने पाणी घालावं. गावगाड्याजवळ एक हुंदका आहे, जो एका नव्या ठाकरेची वाट पाहत आहे. ती पोकळी भरून काढण्याची जबाबदारी तुमची आहे. ओरिजनल शिवसैनिक ब्रँड तयार करा.


  • ओमदादांच्या नावातील राजे हा शब्द काढून टाका. निंबाळकरांच्या ओमच्या पुढे राजे लावण्याची गरज नाही. राजे हा शब्द वाझेंच्या राजाभाऊंना शोभून दिसतोय. राजाभाऊंनी निष्ठावंतांना फुंकर दिली.


  • स्वतःला मूल झालं नाही म्हणून शेजाऱ्याला बोलवायचं, आणि ऑपरेशन यशस्वी झालं तर तिसराच कुणीतरी पेढे वाटतोय याचं आश्चर्य वाटतंय. 40-50 वर्षांपूर्वी शिवसेनेचा जो दरारा होता तो दरारा आता परत मुंबईत दिसावा.. 


  • मला संजय राऊत यांनी फोन केला, त्यामुळे इकडे आलो. संजय राऊत यांनी शिवी दिली म्हणून यांनी दंगा केला. पण यांनी जी फेक अकाउंट काढून ठेवलीत ते दुसऱ्यांना शिवीगाळ करतात त्याचं काय? एक दिवस यांच्या घरातील अब्रूवर यांनी हात घातला की समजेल.


  • आम्ही कुणाजवळ जाऊन बसावं आणि कुठून उठून जावं हे ज्याला समजलं, त्यालाच आयुष्य कळालं. उद्धव ठाकरेंना सोडून गेलेले जे कोणी आहेत त्यांच्या वेदना आहेत, त्यांची काही कारणं आहेत. दिवसभर हे उद्धाटनं करतात आणि रात्री दार लावून रडत बसतात.


  • तुम्हाला देवेंद्रचा देवा भाऊ होण्यासाठी 1500 रुपये द्यावे लागले, निवडून आल्यानंतर ते परत घ्यायलाही विसरला नाहीत.


  • शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि राजकारण करायचं ही यांची वृत्ती. महापुरूषांच्या पुतळ्याजवळ मेंढरांची गर्दी वाढली. ती गर्दी जोपर्यंत पुस्तकांजवळ होत नाही तोपर्यंत काही खरं नाही.


  • या देशाच्या संविधानाला जर साधं नख जरी लावण्याचा प्रयत्न केला तर माझा हा काळा रंग तुमच्यात मिसळून जाईल. आता ही वैचारिक भाषा कुणाला समजत नाही.


User Image


‘’जर हातात अण्णाभाऊंची पुस्तकं आली नसती तर एक ओळही लिहिली नसती’’


नितीन चंदनशिवे यांना समजून घेण्यासाठी फक्त कालच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाकडे पाहून चालणार नाही. त्यांच्या मागे उभी असलेली सांस्कृतिक परंपरा समजून घ्यावी लागेल. महाराष्ट्रात कविता ही केवळ साहित्यिक अभिव्यक्ती नव्हती. ती चळवळीचे शस्त्र होती. सत्यशोधक जलसे, आंबेडकरी शाहिरी, कामगार चळवळीतील लोकगीते, शेतकरी आंदोलनातील सांस्कृतिक पथके  या सगळ्या परंपरांनी कविता आणि राजकारण यांचं नातं कायम ठेवलं. अण्णाभाऊ साठे, अमर शेख, वामनदादा कर्डक, भाऊ फक्कड यांच्यापासून पुढे आलेली ही परंपरा आज सोशल मीडियाच्या युगात नव्या रूपात दिसत आहे. पूर्वी गावच्या चौकात किंवा जत्रेच्या मैदानात ऐकली जाणारी कविता आता काही मिनिटांत लाखो लोकांपर्यंत पोहोचते. नितीन चंदनशिवे हे या नव्या संक्रमणाचे प्रतिनिधी आहेत. त्यांची लोकप्रियता पुस्तक विक्रीतून मोजता येत नाही; ती व्हायरल व्हिडिओ, सार्वजनिक कार्यक्रम आणि लोकांच्या प्रतिक्रियांमधून दिसून येते.


'दंगलकार' म्हणून प्रसिद्ध असलेले कवी नितीन चंदनशिवे हे मूळचे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ गावकुसाबाहेरच्या भागातील आहेत. नंतरच्या काळात उपजीविकेसाठी ते पुणे येथे स्थायिक झाले. आपल्या आयुष्याचा पट उलगडून सांगताना नितीन चंदनशिवे सांगतो,’’ शब्दांशी केलेली मैत्री आयुष्याची शिदोरी समजायला हवी, कामधंद्यासाठी पुण्यात गेलो. नोकरी मिळाली नाही म्हणून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. रात्री कुठेच झोपायची सोय नसलयामु‌ळे वॉचमनची नोकरी धरली. त्या कामावर सुख असं होतं की झोपायला मिळायचं आणि पगारही मिळायचा.वॉचमनच्या कामाला फारस काही कष्टाचं काम नसतं, तिथेच पुस्तकं वाचायला मिळाली आणि मेंदूची चांगली मशागत झाली. जर हातात अण्णाभाऊ साठे यांची पुस्तकं आली नसती तर नितीन चंदनशिवेने एक ओळ आयुष्यात लिहिली नसती, अण्णाभाऊ साठे यांना वाचल्यानंतरच मला लिहिता आलं, अशी कबुली हा ‘दंगलकार’ देतो.


‘’बाबासाहेबांनी आम्हाला उभं केलं नाहीतर आजही आम्ही खराटे लावून फिरलो असतो’’


‘’मी मरेपर्यंत अभिमानाने सांगत राहीन की माझ्या लिखाणाची प्रेरणा ऊर्जा हे अण्णाभाऊ साठे आहेत आणि मला लिहिण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  देत असतात. फुले-शाहू-आंबेडकर-अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या समाज प्रबोधनातून, समाजाच्या विकासातून आम्ही श्वास घेतोय, घास खातोय. आज आमचं घराचं नाव संविधान आहे, बाबासाहेबांनी आम्हाला उभं केलं नाहीतर आजही आम्ही ढुंगणाला खराटे लावून फिरलो असतो, असेही चंदनशिवे सांगतो.


शब्द सामर्थ्य वाढल्याने पुढे जाऊन कविता लिहिल्या. त्यात जगणं, भवताल मांडल्याने त्या लोकांच्या काळजाला भिडल्या. कालांतराने देश-विदेशात कवितांचे कार्यक्रम गाजवले. त्यातून मिळणाऱ्या मानधनाने पोटाची भूक तर भागवलीच पण जागतिक किर्तीही मिळवून दिली. जे उपभोगलं, जगलं ते कवितेतून मांडले. महाविद्यालयीन जीवनात ‘चांदणं’ ही कविता लिहिली. स्पर्धेत ती वाचनाऐवजी जागेवर सुचलेली ‘या चांदण्यांचा जर ठेचा केला असता तर भाकरीची चिंता मिटली असती’ या ओळी सादर केल्या. परीक्षकांना त्या इतक्या आवडल्या की पहिले पारितोषिक मला मिळाले होते. तेव्हापासून कवितेच्या प्रांतात कधीच मागे फिरून पाहिले नाही. देश-विदेशात मराठीत जगण्याच्या कविता ऐकवल्याचा आनंद आहे, असं चंदनशिवे म्हणतो. 


‘दंगलकार’ नाव कसं पडलं…?


‘दंगलकार’ हे नाव चुकीने पडलं अस सांगताना चंदनशिवे या नावामागचा एक किस्सा सांगतात. ‘’ परांड्याला एक कवी संमेलन आयोजित केलं होतं आणि समोरच्या गर्दीत हिंदू आणि मुस्लिम असे रसिक एकत्र बसले होते. नेमकं त्याच काळात आमच्या सांगलीमध्ये दंगल घडली होती आणि हिंदू-मुस्लिम हा विषय ऐरणीवर होता. त्याच क्षणी अचानक मला ‘दंगल’ ही कविता सुचली आणि कविता सादर केल्यावर रसिकांनी माझ्यावर अक्षरश:पैशांची उधळण केली. मला आठवतयं ते पैसे गोळा केले तेव्हा आकडा होता ३७ हजार रुपये… दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी छापून आली की, 


‘कवितेवर पैसे उधळले जातात तेव्हा आणि खालच्या ओळीत लिहिलं होतं दंगलकारांनी जिंकली परांडेकरांची मने…’  खरं म्हणजे त्या बातमीत टायपिंग मिस्टेक झाली होती. पत्रकाराला लिहायचं होतं दंगल कवितेने जिंकली परांडाकरांची मने, मात्र छापून आलं दंगलकारांनी जिंकली परांडेकरांची मने. आणि मग हेच बिरुद आजही मी मिरवतोय.’’


User Image


‘’कांबळेचा मुलगा कांबळेला म्हणाला की’’, तुफान व्हायरल कविता


नितीन चंदनशिवेंची सर्वाधिक लोकप्रिय झालेली कविता म्हणजे कांबळे… कवी लिहितो, 


‘’आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला नुसताच कणला आ करून. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली पण कांबळेने पाठीवर सावित्री काढली. म्हणून चिडून मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला... पण कांबळे हुशार, नाही रडला नुसताच कणला आ करून. 


कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला, कांबळे गुलाबी झाला आणि तिच्या प्रेमात पडला. मग तिनं गार्डनमध्ये बसल्यावर विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला, "वेडे मी माणूस, माणूस माझी जात. प्रेमात कसली आली जात?" मग 'माणूस माझी जात' असं म्हणणारी एकच जमात पुरोगामी वाल्यांची. मग तिनंही कांबळेला असा तुडवला... पण कांबळे बी हुशार नाही रडला नुसताच कणला आ करून. 


कांबळेच लग्न ठरलं, घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणाला पटत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणाले सत्यनारायण, कांबळे म्हणला जमत नाही, बाबासाहेब वाचा. मग भावकी म्हणाली, मित्र म्हणाले जागरण गोंधळ बोकाड तरी काप. कांबळे म्हणला पटतच नाही गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच कांबळेला दार लावून असा तुडवला... पण कांबळे हुशार नाही रडला नुसताच कणला आ करून. 


मग कांबळे चळवळीत आला. या पुरोगामी संघटना वगैरे या सगळ्याचे गट तट पडलेले बघितले. राजकीय पक्षांचे, संघटनांचे. कांबळे सर्वांना म्हणाला सगळ्यांनी एकत्रित या, विचार जिवंत ठेवा, चळवळ जिवंत ठेवा. दिवसभर ओरडत राहिला मग संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळेला असा तुडवला. मग याला कळले तुडवायला एकत्रित आले म्हणून पण कांबळे नाही रडला नुसताच कणला आ करून. 


परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं की, "डॅडा फुले-शाहू-आंबेडकर कोण? हे संविधान काय भानगड आणि शिवाजी महाराज खरच जन्माला आले होते का?" डॅडा आता मात्र कांबळे चिडला. कारण गावभर पेरत राहिला आणि घरातच काही उगवलं नाही म्हणून त्याने मुलालाच असं तुडवला... पण चिरंजीव कांबळे बी हुशार तो पण नाही रडला नुसताच कणला आ करून. 


आता कांबळे वेडा झालाय. त्याला व्यवस्थेने वेड ठरवलंय. कांबळेला वेड्यांच्या दवाखान्यात दाखल केले आणि कांबळी वेड्यासारखं मानवतेच्या घोषणा देतोय. कांबळे वेड्यासारखं 'सर्व धर्म समभाव' म्हणतोय. कांबळे वेड्यासारखं 'भारतीय' म्हणून ओरडतोय. पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंधी नाही, कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान त्यानं उघडून ठेवलंय. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवतायत पण कांबळे नाही रडत नुसताच कणतोय आ करून. 


या कवितेमागची भूमिका स्पष्ट करताना चंदनशिवे सांगतात की, महाराष्ट्र हा पुरोगामी चळवळीचा, परिवर्तनवादी असा समजला जातो आणि या पुरोगामी चळवळीची विचारधारा जपणारी लोकांची संख्या ही जास्तच आहे, पहिल्यापासून. मग ते महात्मा फुले असतील, आगरकर असतील. जे परिवर्तनवादी आहेत, जे लेखक आहेत, साहित्यिक आहेत, कार्यकर्ते आहेत. तो विचार जपणारी माणसं जी आहेत, ती माणसं सातत्याने ही भूमिका घेत असताना, शहाणपणाचा मागोवा घेत असताना अजूनही काही अंधश्रद्धाळू कर्मकांडात अडकलेली माणसं ही या लोकांना म्हणावा तसा प्रतिसाद देत नाहीत.


उलट त्याच्याकडे 'हा एक कुणीतरी वेडा आहे आणि हा अतिशहाणा आहे' असं समजून त्याची टिंगलटवाळी कायम करत असतो असा एक वर्ग आहे. हा महाराष्ट्र पुरोगामी चळवळीचा आहे, हा विचारांचा आहे आणि ही चळवळ ज्यांच्या ज्यांच्या घरात आहे, ज्यांच्या मेंदूत हे विचार रुजले आणि या चळवळीशी जे आज कनेक्ट राहिलेत, आज आम्हाला त्याचा अभिमान एवढ्यासाठी वाटतो की आमच्या घरातल्या आमच्या महिला सेफ आहेत त्याच्यामुळं. कारण हा विचार असल्यामुळं आमच्या महिलांना कॅप्टननं गाठलेलं नाही खरातनं किंवा आमच्या महिला त्या अंधश्रद्धेला बळी पडल्या नाहीत, त्या उघड्या डोळ्यानं जागृत राहिल्या. म्हणून हा विचार महत्त्वाचा वाटतो.


आपला विद्रोह नेमका कशासाठी आहे…?


आपला विद्रोह नेमका कशासाठी आहे हे सांगताना चंदनशिवे म्हणतात की, हा देश चांगलाच आहे. या देशासारखा सुंदर देश जगात कुठला नाही. विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान वाटणं हे प्रतिज्ञेतून झालं. पण त्या अभिमान वाटणाऱ्या विविधतेने नटलेल्या परंपरांना न बघणाऱ्यांला ते दाखवणं हा माझा विद्रोह आहे. 'भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत.' ही सामूहिकरित्या आम्ही लहानपणापासून दहावीपर्यंत मांडलेली प्रतिज्ञा आहे. ती आम्ही विसरत चाललोय, म्हणून मी म्हणत असतो की आमच्या मेंदूमध्ये शिक्षणाचा ध्यास नाही, शिक्षणाचा म्हणजे शहाणपणाचा ध्यास नाही, बुद्धीमध्ये ज्ञानाचा वास नाही. अडाणी नाही आम्ही थोडेफार शिकलो पहिली ते दहावी रोज प्रतिज्ञा बोललो 'भारत माझा देश आहे'. 


"भारत माझा देश आहे इथे येऊन बघा प्रत्येकाच्या तोंडाला फेस आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत कौरवांनाही लाजवतील असे चारा खाऊ पांडव आहेत. विस्तवासारख्या दंगली होतात इथं, प्रत्येक हाताला काम आहे कारण बाबरीच्या ढिगाऱ्याखालून बुद्ध गायब आणि आता तिथे राम आहे." 


आणि हा राम जो आहे हा भीती दाखवण्यासाठी राम आणला असं प्रश्न पडतो. आमच्या गाव गाड्यावरचा राम-कृष्ण-हरी म्हणणारा त्यातला राम आम्हाला आमचा वाटतो, त्यातला कृष्ण आम्हाला आमचा वाटतो, त्यातला हरी आम्हाला आमचा वाटतो. हे आमच्या बहुजनांचा राम, सीतेचा राम, लक्ष्मणाच्या सोबत भावासारखं प्रेम भावावर करणारा राम. हा राम सोडून आम्ही एक वेगळा राम आणला आहे. 'राम कृष्ण हरी' मधला जो राम आहे हा आमचा घरातला वाटतो, आमचा वडील वाटतो, आमचा मुलगा वाटतो, आमचा भाऊ वाटतो. हात जोडून जातीपाती विसरून वारकऱ्यांच्या दिंडीत पालखीत 'राम कृष्ण हरी माऊली' म्हणणारा त्यातला जो राम आहे.


User Image


राम राम, मेल्यानंतर 'राम नाम सत्य आहे', नमस्कारानंतर येणारा 'राम राम', 'या जेवायला' याच्यातली जी आपली ममता आहे, याच्यातला जो जिव्हाळा आहे हे सोडून आम्ही 'जय श्रीराम' म्हणतो. त्या जय श्रीराम मध्ये गोडवा आहे पण त्याची ट्युनिंग बदलली की राम लांबचा वाटतो. खरं तर राम हा एक विषय फार जिव्हाळ्याचा आहे माझ्या सुद्धा. मग सीतेचा असणारा राम, हा सत्तेपासून लांब जाणारा राम आणि याच रामाचा वापर सत्तेसाठी होतो. राम हा सीतेच्या सोबत असणारा राम आहे. या रामाला काय काय भोगावं लागलं, भावासोबत मोठ्या भावासारखं उभा असणारा. आज दोन्ही भावात भांडण आहेत आणि दोन्ही भाऊ 'जय श्रीराम' म्हणतायत. तर हा जो आमचा साधा सरळ असणारा राम हा आम्हाला प्रिय आहे.


नव्या ‘इंडिया’त धर्म आहे, कट्टरता आहे. उपाशी भारत त्याला दिसत नाही’’


जी माणसं रोजच्या भाकरीसाठी संघर्ष करतात... या देशात दोन देश मला दिसतात. एक भारत आहे, एक इंडिया आहे. एक रात्रीचं खाल्लेलं पचत नाही म्हणून मॉर्निंग वॉकला वाढलेली चरबी जाळायला आलेला आहे जो कानात हेडफोन घालून वॉकिंग करतोय किंवा रनिंग करतोय आणि घाम गाळून त्याचं वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारा एक इंडिया आहे. आणि त्याच वेळेला बाजूने कामावरती जाणारा टू-व्हीलर वरून, सायकल वरून रोजच्या भाकरीचा प्रश्न मिटवण्यासाठी उपाशी असणारा एक भारत आहे. हा जो वजन कमी करायला आलेला आहे ना इंडिया, ह्या इंडियात धर्म आहे, ह्या इंडियात कट्टरता आहे. आणि या उपाशी भारताला याच्याशी काही देणंघेणं नाही. एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर हा भारत रडतो आणि हा इंडिया ही बातमी स्किप करतो. ही धर्माची कट्टरता वगैरे ही इथपर्यंत आलेली आहे, असं चंदनशिवे एका मुलाखतीत म्हणतात.


‘’सारे धर्मग्रंथ वाचले पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली बोटाला जिभेवर न्याव लागलं आणि नकळतपणे मी धर्माला थुका लावला आणि मी माणूस झालो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात पण मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं, मी जातीला चुना लावला आणि मी माणसात आलो.’’


जात असावी, धर्म असावा ज्याच्या त्याच्या पुरता. तो त्यामध्ये रमणारा असावा. प्रत्येक धर्माला एक अध्यात्म आहे. तो कुणालाच घाबरत नसला तर तो त्याच्या देवाला तरी घाबरतोय. म्हणजे वाईट काम करण्यापासून तो जर थांबत असेल, अध्यात्मामध्ये येत असेल, तर धर्माच्या सावलीखाली तो जर शहाणा होत असेल तर धर्म चांगला आहे. पण हा धर्माचा बाजार घेऊन जर तुम्ही चौकात आलात तर मग मात्र धर्म धोक्याचा आहे. आणि मग त्याच्यापेक्षा 'धर्म धोक्यात आहे' असं म्हणण्यापेक्षा 'तुमच्या सगळ्यांच्या या गडद रंगांमुळे माझा भारत धोक्यात आलाय'. एक्सट्रीम रंग दिसायला लागलेत आपल्याला जातीवादाचे, अशीही कबुली ते देतात.


सोशल मिडीयावर व्यस्त राहणारी तरुण पिढी महापुरुषांच्या पुतळ्याजवळ गर्दी करीत असून या तरुण पिढीने परिवर्तनाचे विचार आत्मसात करावे. आज सगळ्याच जाती पेटल्याने भारत व भारतीयत्व हरवले आहे, जातीधर्मापेक्षा मी भारतीय असणे आज गरजेचे आहे. हजारो वर्षापासून दलित, बहुजन समाज अन्याय अत्याचार सहन करीत आला. त्यांना न्याय देण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हते. परंतु १४ एप्रिल १८९१ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर नावाचा तळपता प्रज्ञा सूर्य उगवला. त्यांनीच सर्व अन्याय अत्याचार गाडून टाकण्याचे काम करीत सर्वांनाच न्याय देण्याचे काम केले.  प्रत्येक माणसाला जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून ओळख निर्माण करता यावी. कवीच्या कविता या फक्त मनोरंजनासाठी नाहीत तर त्या समाजात बदल घडवण्यासाठी आहेत. परिवर्तनाचे विचार समाजात रुजवणाऱ्या गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, संत तुकारामांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करावे. नेहमी भारतीय म्हणून जगा असा बहुमोल सल्ला नितीन चंदनशिवे देतात.


Share this article
 ‘कुराक’... जगभर गाजलेल्या या सिनेमावर त्यांच्या देशात मात्र बंदी, काय आहे  ‘आला काचू’ ही कुप्रथा…?
कला / साहित्य / सिनेमा

‘कुराक’... जगभर गाजलेल्या या सिनेमावर त्यांच्या देशात मात्र बंदी, काय आहे ‘आला काचू’ ही कुप्रथा…?

‘कुराक’ या किर्गिझस्थानी सिनेमाने जगभरातील अनेक प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवात पारितोषिकं मिळवली. जगभरातून या सिनेमाबद्दल भरभरून बोललं जात आहे. मात्र या ‘कुराक’ सिनेमावर आता त्याच देशात म्हणजे किर्गिझस्तानमध्ये बंदी टाकण्यात आली आहे. किर्गिझस्थानमधील ‘आला काचू’ या महिलांविरुद्धच्या कुप्रथेविरुद्ध हा सिनेमा आवाज उठवतो, म्हणूनच सिनेमावर बंदी टाकली आहे.

3 min read
N
Narendra Bandbe
 'मैं वापस आऊंगा', पण अशा प्रकारे नाही...
कला / साहित्य / सिनेमा

'मैं वापस आऊंगा', पण अशा प्रकारे नाही...

इम्तियाज अली यांचा 'मैं वापस आऊंगा' हा चित्रपट फाळणीला पार्श्वभूमी म्हणून वापरत एक सुंदर प्रेमकथा पडद्यावर उभी करतो. द्वेषाच्या या ‘धुरंधर’ काळात 'मैं वापस आऊंगा' या चित्रपटातील हा प्रेमाचा धागा जणू प्रचंड उकाड्यात पडलेल्या थंडगार पर्जन्यसरीसारखा वाटतो.

4 min read
M
Manish Azad
अस्सी: 'पुरुषी' भावविश्व उलगडणारा सिनेमा…
कला / साहित्य / सिनेमा

अस्सी: 'पुरुषी' भावविश्व उलगडणारा सिनेमा…

बलात्काराच्या एका प्रकरणाभोवती फिरणारा अनुभव सिन्हांचा 'अस्सी' हा चित्रपट प्रथमदर्शनी स्त्रियांवरील हिंसेची कथा वाटतो. मात्र कथानक जसजसं उलगडत जातं, तसतसा हा चित्रपट हिंसेच्या मुळाशी असलेल्या पुरुषी भावविश्वाचा शोध घेऊ लागतो. आरोपींपासून ते पीडितेच्या पतीपर्यंत, न्यायव्यवस्थेपासून ते पोलीस यंत्रणेपर्यंत आणि एका सहा वर्षांच्या मुलापासून ते गुप्तहेरापर्यंत विविध पुरुष व्यक्तिरेखा या चित्रपटात समोर येतात. त्यांच्यामधून पुरुषत्वाची अनेक परस्परविरोधी रूपं उलगडत जातात. स्त्रियांवरील अत्याचार हा केवळ स्त्रियांचा प्रश्न नसून पुरुषत्वाची घडण, सत्ता, हिंसा, काळजी, जबाबदारी आणि न्याय यांच्या गुंतागुंतीच्या नात्यांशी जोडलेला सामाजिक प्रश्न आहे, हे 'अस्सी' ठामपणे अधोरेखित करतो.

12 min read
V
Viraj Rajshri
ज्या गुन्ह्याने दिल्लीची ओळख बदलली… रंगा-बिल्ला प्रकरणाचा काळाकुट्ट इतिहास!
कला / साहित्य / सिनेमा

ज्या गुन्ह्याने दिल्लीची ओळख बदलली… रंगा-बिल्ला प्रकरणाचा काळाकुट्ट इतिहास!

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राख’ या वेब सिरीजमुळे १९७८ मधील कुप्रसिद्ध रंगा-बिल्ला प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. दिल्लीला हादरवून सोडणाऱ्या या गुन्ह्याने देशभरात संतापाची लाट उसळली होती. नौदल अधिकारी मदन मोहन चोप्रा यांच्या गीता आणि संजय या किशोरवयीन मुलांचे अपहरण, गीतेवरील लैंगिक अत्याचार आणि दोघांची निर्घृण हत्या यामुळे दिल्लीच्या कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले. या प्रकरणाविरोधात जनक्षोभ इतका तीव्र होता की जिल्हा न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपतींपर्यंत सर्व स्तरांवर फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली. अवघ्या चार वर्षांत रंगा आणि बिल्लाला फाशी देण्यात आली. आजही भारतीय गुन्हेगारी इतिहासातील सर्वात भीषण आणि चर्चित प्रकरणांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या घटनेने दिल्लीच्या सामाजिक मानसावर खोल परिणाम केला. ‘राख’च्या निमित्ताने पुन्हा एकदा या काळ्याकुट्ट इतिहासाचा मागोवा.

8 min read
T
Team BaiManus
आणीबाणीपासून युट्यूबपर्यंत… पराभूत न झालेला कॅमेरा आणि ‘डॉक्युमेंट्रीकार’ आनंद पटवर्धनांची लढाई!
कला / साहित्य / सिनेमा

आणीबाणीपासून युट्यूबपर्यंत… पराभूत न झालेला कॅमेरा आणि ‘डॉक्युमेंट्रीकार’ आनंद पटवर्धनांची लढाई!

आणीबाणीच्या काळात गुपचूप देशाबाहेर पाठवावी लागलेली चित्रपटाची रिळे, न्यायालयात लढलेल्या सेन्सॉरशिपविरोधी लढाया आणि आता युट्यूबवरून हटवला गेलेला ‘फादर, सन अँड होली वॉर’ हा माहितीपट... गेली पाच दशकं भारतीय समाजातील अस्वस्थ सत्यांची नोंद घेणाऱ्या आनंद पटवर्धन यांचा प्रवास हा केवळ एका माहितीपट दिग्दर्शकाचा प्रवास नाही; तो भारतीय लोकशाहीच्या विवेकाचा इतिहास आहे. भारतीय माहितीपट परंपरेत अनेक महत्त्वाचे दिग्दर्शक झाले. पण अन्यायाच्या प्रत्येक नव्या रूपासमोर कॅमेरा घेऊन उभे राहण्याचे सातत्य फार थोड्यांनी दाखवले. आनंद पटवर्धन हे त्यापैकी सर्वात महत्त्वाचे नाव आहे…

11 min read
S
Shantanu Khuje
‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ : टीआरपीच्या नावाखाली इतिहासाची गळचेपी?
कला / साहित्य / सिनेमा

‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ : टीआरपीच्या नावाखाली इतिहासाची गळचेपी?

स्टार प्रवाहवरील ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका अवघ्या १५२ भागांनंतर बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित ही मालिका केवळ मनोरंजन नव्हती, तर इतिहास, स्त्री शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाची कथा घराघरांत पोहोचवणारे माध्यम होती. दरम्यान, अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केवळ टीआरपी हा अशा मालिकांचे भवितव्य ठरवण्याचा निकष असू शकत नाही, असे मत व्यक्त करत फुले दाम्पत्याची कथा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

3 min read
S
Sanjana Khandare

Comments

Comments are currently disabled or loading...