अप्सरा आगा
- यंदाच्या रमजानवर युद्धाचं सावट ओढावलंय. युद्धामुळे देशातील अनेक भागात गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झालीये.
- आखाती प्रदेशातील युद्धामुळे खजूर, सुकामेव्याच्या आयातीवर परिणाम होऊन वाहतूक खर्च वाढला, त्यामुळे सुकामेव्याचे दर वाढले आणि व्यापार मंदावला.
- सुकामेवा, शेवई विक्रेत्यांचा माल कमी पडल्यानं नफा घटला असून, यंदा ईद साधेपणानं साजरी करण्याची वेळ आलीय.
'मागील दोन वर्षांपासून मी कोंढव्यामध्ये सुखामेव्याचे दुकान चालवतो. सुरुवातीला व्यवसाय उत्तम चालला होता. घरातली माणसं उत्साहानं सण साजरे करत होती. पण यावर्षी काहीतरी वेगळंच घडलं. एकीकडे जगात युद्ध सुरू असताना, इकडे आमचं अर्थकारण पूर्ण बिघडलं. कळत नाही काय होतेय. प्रत्येक सणाला अडथळा येतोच. कोरोनाच्या काळातही आम्ही सण नीट साजरे करू शकलो नाही. आता पुन्हा तीच अवस्था. युद्धाच्या परिणामामुळे सुकामेव्याचे भाव आकाशाला भिडले. मार्केट यार्डमधून थोडा थोडा माल आणून ठेवला होता, तो आता संपायला आलाय. नवीन स्टॉक आणण्याचीही परिस्थिती नाहीये. दर वाढल्यानं गिऱ्हाईकही कमी झालेत. पूर्वी जिथे १० लीटर खीर करायची तिथे आता फक्त ५ लिटरवरच भागवतो. दुकानातून मिळणारा फायदा वर्षभर घर चालवायला उपयोगी पडायचा. पण आता माल नसल्यानं पुढील वर्ष कसं करायचं, ही चिंता सतावतेय. युद्धाचा आमच्या छोट्या व्यवसायावर किती मोठा परिणाम झालाय, हे फक्त आम्हालाच समजतं.'
रमजानचा महिना आणि आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या कोंढव्यात राहणाऱ्या परवीन भाभीचे हे हताश उद्गार युद्धाचा परिणावर अचूक भाष्य करतं.

आखाती देशातील युद्धाचं रमजानच्या आनंदावर सावट
रमजानचा महिना म्हणजे केवळ उपवास नाही, तर तो आहे भक्ती, संयम आणि माणुसकीचा एक पवित्र उत्सव... पहाटेच्या अजानापासून ते संध्याकाळच्या इफ्तारपर्यंत, मुस्लिम बहुल भागांत एक वेगळीच चैतन्यमय ऊर्जा पाहायला मिळते. गजबजलेल्या गल्ल्या, अत्तराचा दरवळ आणि इफ्तारच्या तयारीची लगबग यामुळे वातावरणात एक उत्साह असतो. पण यंदा या आनंदावर अमेरिका-इस्त्रायल-इराण युद्धाचं सावट जाणवतंय. आखाती देशातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ विस्कळीत झालीये. त्याचा थेट परिणाम खजूर आणि सुकामेव्यावर झालाय. इराण, इराक आणि आखाती देशांतून येणाऱ्या खजुरांची आवक घटल्याने आणि वाहतुकीचा खर्च वाढल्याने भाव कमालीचे वाढले आहे. आवडीचा 'अजवा' असो वा 'मबरूम', युद्धाच्या झळांनी या गोडव्याची किंमत वाढवली असली, तरी पुण्याच्या बाजारपेठेत खरेदीचा उत्साह मात्र अजूनही कायम आहे.
इस्लामच्या कॅलेंडरनुसार नववा महिना असलेल्या रमजानमध्ये चंद्रदर्शन झाल्यावर महिनाभर रोजे ठेवले जातात. त्यानंतर शव्वालच्या पहिल्याच दिवशी चंद्रदर्शनानंतर ईद-ऊल-फितर साजरा केला जातो. रमजान हा मुस्लिमांसाठी सर्वात पवित्र महिना. शीरखुर्मा, बिर्याणी, गुलगुले, नवे कपडे, शाही अत्तरं, जिव्हाळ्याचे नातेवाईक आणि दोस्तलोकांची घरी अखंड वर्दळ…
रमजान महिन्यात पुण्यातील बाजारपेठांमध्ये उत्साह, गर्दी, खरेदीची लगबग यांचा मिलाफ असा दिवाळी सारखाच माहोल दिसतो. कपड्यांच्या दुकानांसमोर आणि छोट्या-छोट्या स्टॉलवर लोकांची गर्दी असते. लहान मुलांना सांभाळत महिलांची बुरखा, सलवार कमीज यांच्या खरेदीसाठी लगबग चालू असते. त्यात फ्रॉक, कुर्ता-पायजमा आणि शेरवानी घेण्यासाठी मुलांची चढाओढ चालू असते. बांगड्या, पायजेब, मेहंदी, काजळ आणि सुगंधी अत्तर विकणाऱ्या दुकानांवर महिलांची गर्दी असते. प्रत्येकजण आपल्या आवडीचे रंग, डिझाईन निवडताना दिसतो. ईद जवळ येत असल्याने नवीन कपडे, दागिने आणि अत्तर घेण्याची ही जुनी परंपरा प्रत्येक घरात जिवंत होते.
मात्र यावेळची परिस्थिती वेगळी आहे. कारण यंदाच्या रमजानवर युद्धाचं सावट ओढावलंय. युद्धामुळे देशातील अनेक भागात गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झालीये. सरकारकडून कमर्शिअल गॅसचा पुरवठा काही प्रमाणात बंद करण्यात आलाय. त्यामुळे अनेक हॉटेल्स बंद झालेत तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कोळसा, लाकडाच्या भट्ट्या तसंच चुली पेटवून काही हॉटेल व्यवसायिक हॉटेल सुरु ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र हे काम वेळखाऊन आणि तेवढंच खर्चीक असल्यानं परवडत नाहीये.
‘’आम्ही चार गाड्या सुकामेवा आणतो, पण यावेळी फक्त दोन गाड्या आल्या’’
पुणे शहरातल्या मोमीनपुरा बाजारात झहीर मुजाहिद यांचं कुटुंब पन्नास वर्षांपासून रमजान ईदच्या महिन्यात सुकामेवा-शेवयाचं दुकान लावतात. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’शी बोलताना ते सांगतात, 'रमजान सुरू होण्याच्या अगोदरच आम्ही सुकामेवा आणून ठेवतो. पुढे एक महिना दुकान चालतं. त्यामुळे चांगला आर्थिक फायदा होतो आणि ईद धुमधडाक्यात साजरी करतो. पण यंदा युद्धामुळं सगळा धंदा ठप्प झालाय. आम्ही चार गाड्या सुकामेवा आणतो, पण यावेळी फक्त दोन गाड्या रमजानच्या आधी आणून ठेवल्या होत्या. आता काही मिळतच नाही. एवढे दर वाढलेत की, आम्हालाही परवडत नाही, ग्राहकांना तर कुठं परवडणार. लोक फक्त ईदला सुकामेवा शीरखुर्मा बनवायला थोडं थोडं घेऊन जातात. आता तर युद्धामुंळं माल पण येईना, त्यामुळे किंमती वाढल्या आहेत. आम्ही मार्केट यार्डातून आधी स्टॉक केला होता, पण आता युद्धामुंळं बंद झालं. सुकामेव्याचे दरदेखील वाढलेत आणि गिऱ्हाईकही कमी झालेत. युद्धानं आमचं सगळं नियोजनच उलटं पालटं करून टाकलंय.'

शिरखुर्म्यासाठी शेवई खूप महत्वाची. शेवईमुळेच शिरखुर्म्याला चव येते. मोमीनपुरामध्ये शहीद भाई यांची दुसरी पिढी रमजानमध्ये शेवईचं दुकान लावतात. ते सांगतात, 'आम्ही दरवर्षी मालेगावातून एक टन शेवई आणतो. कधी कधी तेही पुरत नाही. नंतर पुन्हा कमी पडलं तर आणतो. त्यामुळे दरवर्षी साठ ते सत्तर हजार रुपये फायदा होतो, पण यावेळी पहिला माल आणलेला तेवढाच आहे. तिकडून गाड्याच येत नाहीत आता. सगळा आमचा धंदा ठप्प झालाय. येण्या-जाण्याचा खर्चदेखील वाढला आहे. रमजान महिना संपत आला. ईद जवळ आली पण दहा हजारसुद्धा फायदा झाला नाही. मालच नाही तर विकायचं काय?
‘’वीस लिटरचा शीरखुर्मा निम्म्यावर आला’’
शेवईबरोबर सुकामेवा पण आणतो, पण यावेळी ईदच्या अगोदर शेवई आणून ठेवल्या. आता सुकामेवा आणायचं म्हटलं तर तोपर्यन्त सगळं ठप्प झालं. आता शेवईतून मिळणाऱ्या पैशातूनच ईद साजरी करावी लागणार आहे. ईदचा पहिल्यासारखा उत्साह नसणार. मुलांना पाहिजे तसे कपडे घेता येणार नाहीत. दरवर्षी वीस लिटरचा शीरखुर्मा बनवत होतो. यावेळी त्याच्या निम्मा बनवावा लागणार आहे. कारण ईदवेळी शेवई, सुकामेवाच्या दुकानातून चांगला नफा मिळतो. त्यामुळे ईद धुमधडाक्यात साजरी करतो. घरातील सर्व लोकांना कपडे घेतो. पण यावर्षी हात आकडता घ्यावा लागणार आहे, नाहीतर वर्षभराचं आर्थिक गणित बिघडेल, अशी भीती वाटते, असे शहीद भाई म्हणतात.
रमजान हा इस्लामी कॅलेंडरचा नववा महिना आहे. मुस्लिम धर्मीयांसाठी हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. यात रोजा, नमाज, कुराण पठण आणि दानधर्म यांचा समावेश असतो. रमजान संपल्यावर ईद-उल-फित्र साजरी केली जाते. हा सण उपवास सोडण्याचा उत्सव म्हणून ओळखला जातो. भारतात, विशेषतः महाराष्ट्र आणि पुण्य्यासारख्या शहरांतील मुस्लिम भागांत रमजान आणि ईदचा माहोल आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचा अनुभव देतो.
घरोघरी आनंद, बाजारात जोम आणि मशिदींमध्ये सामूहिक नमाज यामुळे संपूर्ण वातावरण उत्साही आणि शांततापूर्ण होते. मात्र यंदा युद्धामुळे अनेक लहान दुकानदारांचे गणित बिघडले आहे. बाजारात काही प्रमाणात उत्साह दिसत असला तरी अपेक्षित व्यापार होत नसल्याची खंत दुकानदारांकडून व्यक्त होत आहे. शेवटी दुकानदार सांगतात, 'धंदा थोडा कमी झाला तरी सण थांबत नाही. जे आहे त्यातच आनंद मानायचा. थोडं कमी खरेदी होईल, थोडा कमी शीरखुर्मा बनेल, पण ईद तर साजरी करणारच…जशी जमेल तशी.
सुका मेवा या देशांमधून येतो
सुका मेवा म्हणजे ड्राय फ्रुट हे विविध देशातून येतात. दुबई, इराण, इराक, सौदी, ओमन, मस्कत या आखाती देशातून खजूर येतात. पुण्यातील बाजारात बुमेन, फर्द, किमिया, अजवा, मगजोल, फरत, मदिना, रुकसार, हसना, सुलतान, बुरारी, कलमी, हार्मोनियम, मुज्जरब, बुरारी, गुड, अल्जेरियन यासह ५० पेक्षा जास्त खजुराचे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. इराणमधून पिस्ता व खजूर, सौदी अरेबियातून पिस्ता व अंजीर, अमेरिकेतून बदाम, चिली , अक्रोड, दुबई व पाकिस्तानातून खारीक प्रामुख्याने आयात होते.

पण भारतात पण यापैकी काहींचे उत्पादन होते. काश्मीरमधून केसर व अक्रोड, केरळ व कर्नाटकमधून खोबरे, खजूर तसेच अन्य राज्यातून पण हा मेवा येत असतो. पण सध्या भारताबाहेरून येणारे ड्राय फ्रुट्सची आवक थांबली असल्याचे व्यापारी सांगतात. विविध बंदरांवर हा माल अडकून पडला आणि भाव वधारले. एक मोठी दरवाढ प्रामुख्याने पिस्ता यात झाली. हिरवा पिस्ता २०५० रुपये किलो होता. तो २२५० रुपयावर पोहचला. तर नमकीन पिस्ता हजार रुपयावरून साडे अकराशे रुपये किलो झाला.
सुकामेव्याचे नेमके भाव कसे आहेत?
प्रती किलो पिस्ता २२५० रुपये, चारोळी २०००, किसमिस ५००, अंजीर १४००, काजू ११००, बदाम ११००, खजूर ३००० व खोबरे ४०० रुपये, केसर ३०० (एक ग्रॅम), हा उच्च प्रतीच्या मेव्याचा दर आहे. या पेक्षा कमी किंमतीत पण हे पदार्थ उपलब्ध असून त्याची प्रत मात्र साधारण अशी असते. मुंबई, दिल्ली येथील मोठे व्यापारी हा माल विदेशातून बोलावतात व मग देशभर त्याची विक्री होते. मात्र आता आवक ठप्प पडल्याने ड्राय फ्रुट्स घेणे थोडे जिकिरीचे ठरू लागत आहे.






