एक वर्षांपूर्वी साजिदाच्या आयुष्याला ग्रहण लागलं जेव्हा, तिच्या 35 वर्षीय नवऱ्याला, जुनैदला हरियाणातील भिवानी इथं हिंदू गोरक्षकांनी जीवंत जाळलं. एक महिन्यापूर्वीच तिच्या मुलीचाही मृत्यू झाला. पण याच आठवड्यात तिनं आपल्या दिराच्या घरी स्वतःचं कॉस्मेटीकचं नवीन दुकान सुरू केलं आणि आयुष्याला पुन्हा भिडली. बायका तिच्या 15 बाय 10 च्या दुकानात खरेदीसाठी येतात. त्यांना माहिती आहे की हे वर्ष त्यांच्यासाठी कठीण आहे.
यातच एक परमीना नासिर देखील आहे. तिचा नवराही त्याच रात्री भिवानीत मारला गेला होता. तिनं 150 रुपयाचं सामान विकत घेतलं. दोन्ही बाया एकमेकींकडे बघून हसतात. हे दुकान साजिदासाठी नव्या जगाचा दरवाजा आहे तर परमीनासाठी एक प्रेरणा आहे. साजिदाच्या दुकानाजवळच राहणाऱी परमीना म्हणते, “मलाही असंच एक दुकान उघडायचं आहे. माझा रोजचा खर्च तरी भागेल त्यातनं. पण त्यासाठी मला पैसे हवे आहेत.”
तर साजिदा म्हणते, “माझं सारं आयुष्य बदलून गेलंय. यात आव्हानं आहेत, आसवं आहेत. आता मला पुन्हा नव्यानं आयुष्य जगायचं आहे आणि हो, न्याय देखील हवा आहे.”
साजिदा आणि परमीना, आर्थिक आणि सामाजिक संकटांना भिडत आपलं जगणं सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना त्यांच्या मुलांना शाळेतून काढावं लागलं कारण नवरा गेल्यानंतर घरात कमावणारं कोणी नव्हतं, त्यामुळे फी भरता येत नव्हती. मागील वर्षी झालेल्या या हत्याकांडानंतर त्यांना भीती वाटतेय की जुनैद-नासिर हेट क्राईम म्हणून ओळखली जाणारी ही घटना लोकांच्या आठवणीतून निघून जाईल, नेते हा मुद्दा उचलणार नाहीत.

न्यायसंस्था कासवगतीनं काम करत आहे. राजस्थान गोवंशीय पशू (पशू हत्या व अवैध वाहतूक) कायदा 2015 आणि हरियाणा गोवंश संरक्षण आणि गोसंवर्धन कायदा 2015 च्या विरोधातील त्यांच्या याचिकेवर अजून निकाल यायचा आहे. त्यामुळे त्या निराश आहेत. सध्या त्या पुरुष-प्रधान समाजात स्वतःची जागा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
माझ्या वडीलांनी काय केलं होतं? त्यांना का बरं मारण्यात आलं?
नासिर आणि जुनैदला गोरक्षकांनी मारहाण केली आणि ठार केलं. 16 फेब्रुवारी 2023 रोजी भिवानीत एका बोलेरो कारमध्ये त्यांची जळालेली प्रेतं मिळाली. या घटनेमुळे दोन्ही बायकांचं जगणंच बदललं. परमीना अबोल झाली तर साजिदाला तिचा आवाज मिळाला.
अन्यायाच्या विरोधात ती उघडपणे बोलत आहे आणि न्यायालयीन गोष्टींविषयी वकीलांशी चर्चा करत आहे. नवरा मेल्यानंतर सहा मुलांची जबाबदारी साजिदाच्या खांद्यावर आली. त्यातच वडीलांच्या जाण्यानं तिची मोठी मुलगी परवाना पार हादरून गेली. ती आजारी पडली, तिचं वजन कमी झालं, त्यातच तिचा मृत्यू झाला. जुनैदचा भाचुलत ऊ इस्माईल म्हणतो, “परवाना नेहमी विचारायची की माझ्या वडीलांनी काय केलं होतं? त्यांना का बरं मारण्यात आलं? ते कधी घरी परत येतील? आमच्याकडे याची उत्तरं नव्हती.”
ज्या रात्री परवाना मेली, त्याच रात्री तिनं साजिदाला फोनवर म्हटलं होतं की ती लवकर बरी होऊन घरी येईल. पण ती येऊ शकली नाही. रात्री तिला हार्ट अटॅक आला आणि त्यातच ती गेली. साजिदा रडत म्हणते, “मला माहिती नव्हतं की ती अशा पद्धतीनं घरी परत येणार आहे म्हणून.”
साजिदाच्या घराजवळच एक दुकान आहे ज्यात किराण्याचं सामान भरलेलं आहे. गावातले लोक इथं गप्पा मारायला जमतात. हे जुनैदचं दुकान आहे. त्यानं ते भाड्यावर घेतलं होतं. पण साजिदाला ते चालवायला मिळू शकलं नाही. त्यामुळे ती स्वतःच असं काही करतेय जे करताना तिनं तिच्या नवऱ्याला जवळून पाहिलं होतं.
गावातल्या महिला ग्राहकांशी तिचा संबंध येतो. दुकानातली कमाई आणि दुध विकून ३५ वर्षीय जुनैद आपल्या तीन मुलांना आणि मोठ्या भावाच्या दोन लांमुना गावातल्या एका खासगी शाळेत महिना पंधरा हजार रुपये भरून शिकवायला पाठवायचा. ही मुलं आता एका आधुनिक मदरशात शिकायला जातात. जिथं इस्लामी शिक्षणासोबतच गणित, इंग्रजी, विज्ञानही शिकवलं जातं. या वर्षीच्या बकरीदला साजिदा आपल्या मुलांसाठी नवीन कपडे विकत घेऊ शकली नाही.
तिला आपल्या मुलांना खासगी शाळेत शिकवायचं आहे. तिला विश्वास आहे की तिच्यात आपलं व मुलांचं आयुष्य बदलण्याची ताकद आणि क्षमता आहे. परमीना आपलं दुःख विसरण्यासाठी घरगुती कामात मग्न राहते. पण तिलाही आपल्या आई-वडीलांकडून पैसे घेऊन एक दुकान उघडायचं आहे. आपल्या बहिणीकडे राहणारी परमीना म्हणते, “मला आपलं दुकान उघडायचं आहे. पैसे नसल्यामुळे मी हे करू शकेन की नाही माहिती नाही. पण घरखर्चात मलाही थोडा हातभार लावायचा आहे.”
“गावात शांती आहे. या गोष्टीची आता कोणी आठवण काढत नाही.
जुनैदच्या घरच्यांकडे दोन एकर शेती आणि एक म्हैस आहे. नवीन दुकान उघडण्याआधी साजिदा दुध आणि शेतातील भाजीपाला विकून महिन्याला आठ हजार कमवायची. जुनैद असताना ही कमाई घरखर्चात उपयोगी पडायची पण आता ती पुरेशी नाही.

तिला राजस्थान सरकार आणि एमआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीन औवेसी यांच्याकडून एकूण सहा लाख रुपयांची मदत मिळाली. आपल्या मोठ्या मुलाच्या नावानं तिनं याची एफडी काढली. मागील तीन महिन्यांपासून तिला हजार रुपये महिन्याची विधवा पेंशनही लागू झाली आहे. साजिदाच्या घाटमिका गावातील बहुसंख्य मुस्लिम लोक नोकऱ्या मिळत नसल्यानं शेती किंवा मजूरीचं काम करतात.
ज्यांच्याकडे शेती नाही ते ड्रायव्हरचं काम करतात. काही गुरंढोरं पाळतात. त्यातूनच ते गोरक्षकांच्या निशान्यावर येतात. एका वृद्धानं म्हटलं, “जुनैद-नासिरच्या हत्येनंतर इथं फार भीती होती पण आता परिस्थिती सामान्य होत आहे.” घाटमिकात 1600 लोक राहतात. यात जास्त करून लहान शेतकरी आणि ट्रक ड्रायव्हर्स आहेत. इथं गायींच्या तस्करीचा मुद्दा तापलेलाच असतो. पण गावचे सरपंच म्हणतात की ते त्यांचं काम करत आहेत. रामावतार खंडेलवाल म्हणतात, “गावात शांती आहे.
या गोष्टीची आता कोणी आठवण काढत नाही. जुनैद-नासिर यांच्या हत्येनंतर मी गावातल्या लोकांना गायींची तस्करी न करण्याविषयी अनेकदा सांगितलं पण ते ऐकत नाहीत आणि अजूनही असंच करत आहेत.” नोव्हेंबर २०१७ मध्ये गावातलाच उमर खान अलवर जिल्ह्यांत मृत आढळला होता. त्याच्या कुटुंबाचं म्हणणं आहे की त्याचीही गोरक्षकांनीच हत्या केली आहे.
‘’न्यायालयात जाणं महागडं आहे’’
गोरक्षकांनी मुसलमानांच्या विरोधात जी हिंसा सुरू केली आहे तिला थोपवण्याचा या दोन्ही बायकांचा विचार आहे. पण याकडे केलं जाणारं दुर्लक्ष यामुळे त्या नाराज आहेत. साजिदा सांगते की “अनेक राजकीय पुढारी तिच्या घरी आले पण नंतर सर्वांना या हत्याकांडाचा विसर पडला.
नासिर आणि जुनैद यांना न्याय मिळण्यासाठी त्यावर चर्चा होत राहणं गरजेचं आहे.” खंडेलवाल म्हणतात की “जुनैद आणि नासिर यांना जीवंत जाळण्यात आलं नसतं तर या प्रकरणाकडे कोणाचं लक्षही गेलं नसतं. त्यांना मारून कुठं तरी फेकण्यात आलं असतं तर ही गोष्ट इतकी वाढली नसती.
या हत्येचा संबंध गोरक्षकांनी केलेल्या जबरीच्या खंडणीवसूलीशी आहे.” पशू व्यापार करणाऱ्या मुसलमानांच्या विरोधातील हिंसाचाराच्या घटनांमुळे चार महिला एकत्र येऊन राजस्थान व हरियाणाच्या गोवंश संरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत आहेत. जमीयत-उलेमा-ए-हिंदचे कार्यकर्ता मागच्या जून महिन्यात साजिदाच्या घरी भेटले होते.
तिथे परवीना सोबतच खुर्शीदन (उमर खान याची बायको) व अस्मीनाही होती जिचा नवरा रकबर खान आणि त्याचा मित्र असलम याला जुलै 2018 मध्ये जमावानं मारलं होतं. साजिदा म्हणते, “आमची इच्छा आहे की हा कायदा रद्द व्हावा. अनेक लोक मारले गेले आहेत. दोन्ही राज्यांतील अनेक बायका न्यायाची मागणी करत आहेत.”
त्यांच्या याचिकेवर कारवाई होणं अजून बाकी आहे. इकडे साजिदा आणि परमीना जुनैद-नासिर हत्याकांडाच्या कासवगतीनं काळजीत आहेत. या दोघींचे वकील, मोहम्मद नासिर यांनी अशा संवेदनशील प्रकरणांची चौकशी होण्यासाठी विशेष न्यायालयाची मागणी केली आहे. ते म्हणतात की, पोलिसांनी अजून कमान जिल्हा न्यायालयात पुरावे दिलेले नाहीत.
पोलिसांना खोटी माहिती देण्यावरून न्यायालयात आधीच एक प्रकरण दाखल झालेलं आहे. नासिरचा छोटा भाऊ अमजद खान आणि जुनैदचा चुलत भाऊ इस्माईल, खटल्याचा आर्थिक खर्च सांभाळत आहेत. प्रत्येक सुनावणीसाठी जवळपास 500 रुपये खर्च होतात. न्यायालयात पोहचायला त्यांना एक तास लागतो. अनेक वाहनं बदलावी लागतात. खराब रस्त्यांमुळे वेळ नेहमीच वाढतो.

अमजद कागदपत्रं आणि त्यांच्या कॉपीज तयार करण्याच्या खर्चामुळे चिंतेत आहे. तो सांगतो, “फक्त चार्जशीटच्या कॉपी काढण्यावरच 4500 रुपये खर्च झाले आहेत. न्यायालयात जाणं महागडं आहे. आता जर वकीलांनीही पैसे घेणं सुरू केलं तर मग खटला लढवताच येणार नाही.”
साजिदा म्हणते, “नासिर आणि जुनैद यांची हत्या करणाऱ्यांना, गाईच्या नावावर कोणाचीही हत्या करणाऱ्यांना मृत्यूदंड मिळायला पाहिजे. पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्या खबऱ्यांवरही कडक कारवाई व्हायला पाहिजे.”
अरावली पर्वत रांगांत वसलेल्या या लहानशा मुस्लिम बहुल गावातील लोक गरमी, लोडशेडींग, महागडं पाणी, खराब रस्ते यांनी जर्जर झाले आहेत. इथले वयोवृद्ध अफझल सांगतात, “आधी घाटमिका विषयी कोणालाच माहिती नव्हती. आता याला नासिर आणि जुनैदच्या नावानं ओळखलं जातं.”
गावकरी सांगतात की गावात फक्त एकच सरकारी शाळा आहे आणि शिक्षक कधीतरीच येतात. इथं हॉस्पिटल नाही. लोकांना उपचारासाठी अलवरला जावं लागतं जे इथून 70 किमी दूर आहे. परमीना आणि नासिर यांना मुल नव्हतं. नवरा गेल्यानंतर ती एकटी पडली आहे. तिनं आता आपल्या दिराच्या सहापैकी दोन मुलांना अनौपचारीकपणे दत्तक घेतलं आहे.
एक मुलगा आणि एक मुलगी. पण तिला आणि साजिदालाही विधवा होण्याच्या तथाकथित कलंकाचे परिणाम भोगावे लागत आहेत. इस्माईल म्हणतो की परमीना तिच्या घरात कैदच झाली आहे. फार थोडे लोक तिला भेटायला येतात. ते म्हणतात, “हे गाव आहे. इथं एखादी विधवा एकटीच गावाबाहेर पडली तर लोक तिच्या चारित्र्यावर संशय घेतात.”
पण साजिदा आणि परमीना दोघीही एकमेकींना साथसंगत देत आहेत. आर्थिक आणि सामाजिक गोष्टीतही. त्या दोघी एकमेकींना भेटतात, बोलतात. एकत्र घराबाहेर जातात. शिवाय त्यांच्यासोबत जे झालं ते इतरांसोबत होऊ नये म्हणूनही त्या सजग आहेत. साजिदाच्या घराबाहेर अचानक आरडाओरडा सुरू झाल्यानंतर सारे बाहेर जातात.
तिथं एक तरुण एका वयस्क माणसावर आरोप लावत होता की त्यानं पोलिसांना त्याच्या घरातील एक सदस्य गोतस्करीत सामिल असल्याची खोटी माहिती दिली. साजिदा ओरडते, “तुम्ही पुन्हा पोलिसांना सांगितलं. यामुळं लोक आणि गावं बर्बाद होत आहेत. हे बघूनच माझं रक्त उकळतं.”
(सौजन्य - द प्रिंट)
अनुवाद - प्रतिक पुरी






