शेखर पाटील
- आपण सर्वजण वापरत असलेल्या व्हॉटसॲपसाठी मोबाईल क्रमांकाची असलेली ओळख आता नावात परिवर्तीत होणार असून मेटा कंपनीने आपल्या या मॅसेंजरसाठी 'युजरनेम' प्रणाली लागू करण्याची केलेली घोषणा ही अनेक अर्थांनी लक्षणीय असून हा बदल आपण सर्वांनी जाणून घेणे गरजेचे आहे.
- व्हॉट्सॲप युजरनेम हे केवळ एक छोटे अपडेट नसून ते भविष्यातील डिजिटल संवादाचे नवे 'डोमेन नेम' ठरणार आहे. येणाऱ्या काळात आपली डिजिटल ओळख ही फोन नंबरपेक्षा आपल्या युजरनेमवरून अधिक ठळकपणे ओळखली जाईल.
मेटा कंपनीची मालकी असणाऱ्या व्हाटसॲपचे जगभरात तब्बल ३०० कोटींपेक्षा जास्त युजर्स असून यातील सर्वाधिक म्हणजे जवळपास ८० कोटींच्या आसपास भारतातील आहेत. आपल्या देशातील टेलकॉम क्रांतीच्या लाटेवर स्वार होत व्हाटसॲपने मारलेली मुसंडी विलक्षण अशीच असून याचमुळे हे ॲप आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेले आहे. यातच आता भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मेटा कंपनीने भारतीय वंशाचे कुणाल शाहा यांना व्हाटसॲपच्या प्रमुखपदी नियुक्त केलेल्या बाब देखील लक्षणीय होय.
२००९ साली व्हॉटसॲपचे आगमन झाले तेव्हा मोबाईल इंटरनेट बाल्यावस्थेत होते. त्यावेळेस टेलकॉम कंपन्यांचे महागडे संदेश आणि याच्या सोबतीला प्रतिमा आणि व्हिडीओज शेअर करण्याची सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून या ॲपने मोठी क्रांती केली. यातील महत्वाचा घटक म्हणजेच फोन क्रमांक यालाच केंद्रित करून व्हॉटसॲपने लॉगिनची सुविधा दिली असून ती आजवर सुरू आहे. काही वर्षांपासून व्हॉटसॲप वेबच्या माध्यमातून याला संगणकावर वापरण्याची सुविधा मिळालेली आहे. असे असले तरी मोबाईल क्रमांक हीच कोणत्याही व्हॉटसॲपच्या युजरची खरी ओळख असून याला आता युजरनेमच्या माध्यमातून नवीन आयाम मिळणार आहे. मेटा कंपनीने काल याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
आजच्या काळात आपला मोबाईल नंबर हा केवळ संपर्क क्रमांक राहिलेला नाही, तर तो आपल्या विविध सेवांशी कनेक्ट आहे. तो आधार, युपीआय, बँकिंग सेवा, सरकारी दस्तऐवज आणि विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सशी जोडलेला एक संवेदनशील दुवा आहे. अशा परिस्थितीत, केवळ व्हॉट्सॲपवर चॅट करण्यासाठी अनोळखी व्यक्तीला आपला वैयक्तिक फोन नंबर देणे हे डिजिटल सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत जोखमीचे ठरत होते. समजा मी एखाद्या व्हॉटसॲप ग्रुपमध्ये असून यातील साडेपाचशेपैकी दहा जणांना ओळखतो, मात्र मी ग्रुपमध्ये असल्यामुळे इतर जणांना देखील माझा मोबाईल क्रमांक कळत असतो. तसेच कुणीही माझा क्रमांक मोबाईलमध्ये सेव्ह करून मला व्हॉटसॲपवरून सहज संदेश पाठवू शकतो. ही बाब गोपनीयतेसाठी घातक असल्याने व्हॉटसॲपच्या मूळ संरचनेत बदल करण्याची मागणी कधीपासूनच करण्यात येत होती.

या अनुषंगाने 'युजरनेम' हे नवीन फिचर देण्यात आले आहे. कुणीही आपल्या सेटींगमध्ये अकाऊंट या विभागात गेल्यानंतर त्याला युजरनेम हा नवीन भाग दिसणार आहे ( अद्याप भारतात हे फिचर आलेले नाही, यामुळे तूर्तास आपल्याला ते दिसणार नाही हे लक्षात घ्यावे ! ) येथे आपण आपले युजरनेम निवडू शकतो. सध्या जगभरातील युजर्सला आपापले नाव रिझर्व्ह करण्याची सुविधा मिळणार आहे, जेणेकरून युजर्सना त्यांच्या आवडीचे नाव आधीच राखून ठेवता येईल.
युजरनेम निवडण्यासाठी काय करायचे?
युजरनेम निवडण्यासाठी देखील काही बाबी लक्षात घ्याव्यात.
- हे युजरनेम किमान ३ आणि कमाल ३५ अक्षरांच्या दरम्यान असणे अनिवार्य आहे.
- यामध्ये इंग्रजी मुळाक्षरे, अंक आणि काही विशिष्ट चिन्हांचा समावेश करता येईल.
- प्रत्येक युजरनेमची सुरुवात '@' या चिन्हाने होईल, ज्यामुळे ते इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील हँडल्सप्रमाणे चटकन ओळखता येईल.
- तांत्रिकदृष्ट्या, हे युजरनेम एक 'युनिक आयडेंटिफायर' असेल, म्हणजेच एकाच नावाचे दोन युजर्स या प्लॅटफॉर्मवर असू शकणार नाहीत. यामुळे आगामी काळात @shekhar243 किंवा @shekharpatil आदींसारखी नावे व्हॉटसॲप युजर्सला मिळणार आहेत. आणि हे नाव जगातील एकाच युजरला मिळेल.
- प्रत्येकाला व्हॉटसॲपवर एकमेवाद्वितीय असे नाव मिळणार असून आपण ते 'रिझर्व्ह' करून ठेवणे गरजेचे आहे.
- व्हॉट्सॲप युजरनेम हे केवळ मजकुरापुरते मर्यादित नसेल. प्रत्येक युजरनेमशी संबंधित एक युनिक 'क्यूआर कोड' देखील जनरेट केला जाईल.
- जर तुम्हाला कोणाला तुमचा नंबर न देता तुमची ओळख सांगायची असेल, तर तुम्ही सहजपणे तुमचा युजरनेम क्यूआर कोड स्कॅन करू देऊ शकता. यामुळे संवादाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि 'कॉन्टॅक्टलेस' होईल.
- हे फिचर विशेषतः कॉन्फरन्स, बिझनेस मीटिंग्स आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नेटवर्किंग करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल.
Username Key हे अतिरिक्त सुरक्षा कवच
या तांत्रिक रचनेतील सर्वात नाविन्यपूर्ण भाग म्हणजे 'युजरनेम की' (Username Key). हे एक अतिरिक्त सुरक्षा कवच आहे जी युजरला त्याच्या गोपनीयतेवर पूर्ण नियंत्रण देते. जेव्हा एखादी नवीन व्यक्ती तुमच्या युजरनेमद्वारे तुम्हाला मेसेज करण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा तुम्ही ती 'की' सेट केली असल्यास, त्या व्यक्तीला ती 'की' माहिती असणे आवश्यक असेल. ही 'की' तुम्ही कधीही बदलू शकता किंवा हटवू शकता. यामुळे अनोळखी लोकांकडून येणाऱ्या त्रासदायक मेसेजना तांत्रिकदृष्ट्या आळा बसेल. हे एक प्रकारचे 'प्रीमियम प्रायव्हसी' फिचर असून ते अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे एखाद्याने आधीच आपली 'की' मागून व्हॉट्सॲपपवर मॅसेज पाठविणे सुरू केले आणि ते आपल्याला नको असतील तर आपण लागलीच 'युजरनेम की' बदलून तो त्रास बंद करू शकतो. हे फिचर ऐच्छिक असणार आहे, याचा अर्थ असा की ज्यांना आपला फोन नंबरच वापरायचा आहे, ते तो सुरू ठेवू शकतील. परंतु, युजरनेम निवडल्यानंतर फोन नंबर हा नवीन संपर्कांसाठी दृश्यमान नसेल.
व्हॉट्सॲपच्या तांत्रिक धोरणानुसार, या युजरनेम्सची कोणतीही सार्वजनिक डिरेक्टरी (Public Directory) नसेल. फेसबुक, इंस्टाग्राम अथवा टेलीग्रामवर आपण नावावरून कोणालाही शोधू शकतो आणि प्लॅटफॉर्म आपल्याला सजेशन्स देतो, पण व्हॉट्सॲपवर असे होणार नाही. जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीचे नेमके युजरनेम माहित असेल, तरच तुम्ही त्याच्याशी संपर्क साधू शकाल. ही बाब युजर्सच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण यामुळे मोठ्या प्रमाणावर डेटा हार्वेस्टिंग करणे किंवा अनोळखी लोकांना त्रास देणे कठीण होईल.

या युजरनेममुळे नेमका काय फरक पडणार?
आता व्हॉट्सॲपवर युजरनेमची आवश्यकता का ? आणि ते आल्यानंतर नेमका फरक काय पडणार ? ते देखील लक्षात घ्यावे. व्हॉट्सॲपवर आतापर्यंत असलेली फोन नंबरची अनिवार्यता ही अनेक युजर्ससाठी, विशेषतः महिला आणि व्यावसायिक मंडळीसाठी एक मोठी चिंतेची बाब होती. जेव्हा आपण एखाद्या मोठ्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील होतो, तेव्हा त्या ग्रुपमधील प्रत्येक सदस्याला आपला फोन नंबर सहजपणे दिसतो. अशा परिस्थितीत, आपला नंबर कोणाच्या हाती जाईल आणि त्याचा वापर कशासाठी केला जाईल, यावर आपले कोणतेही नियंत्रण नसते. युजरनेम फिचरमुळे ही समस्या मुळापासून नष्ट होण्यास मदत होणार आहे.
आता कोणत्याही व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये सामील होताना आपला फोन नंबर लपलेला राहील आणि केवळ युजरनेम इतरांना दिसेल, ज्यामुळे आपली मूळ ओळख सुरक्षित राहील. कुणाचाही नंबर सुरक्षितपणे लपवला गेल्यामुळे नको असलेले कॉल्स किंवा मेसेज येण्याची भीती संपुष्टात येईल. हा बदल डिजिटल सामाजिक संवादाला एक नवीन दिशा देणारा ठरेल. ऑनलाईन खरेदी करतांना मोबाईल क्रमांकाचा गैरवापर होण्याची भिती देखील यामुळे नष्ट होणार आहे. तर ही नवीन प्रणाली महिलांना अक्षरश: वरदान सिध्द होण्याची शक्यता आहे.
यात व्हॉट्सॲपवरील 'युजरनेम की' ही संकल्पना एखाद्या घराच्या डिजिटल गेटसारखी आहे. तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुमच्या 'घरात' म्हणजेच चॅट बॉक्समध्ये शिरू शकणार नाही. हे फिचर केवळ गोपनीयताच देणार नसून युजरला स्वतःच्या वेळेवर आणि कोणाशी संवाद साधायचा यावर पूर्ण अधिकार प्रदान करणार आहे. ही 'कंट्रोल'ची भावना युजर्सना अधिक सक्षम बनवेल. व्हाटसॲपवर आधीच एंड-टू-एंड एकक्रिप्शनचे अभेद्य कवच असून याच्या जोडीला युजरनेम आल्यास या मॅसेंजरवरील सुरक्षा व गोपनीयता अजून मजबूत होणार आहे.
व्हॉट्सॲप वरील युजरनेमचा सर्वात मोठा फायदा म्हणजे भीतीमुक्त संवाद होय ! अनेकदा लोक केवळ आपला नंबर उघड होईल या भीतीने नवीन लोकांशी किंवा गटांशी जोडले जात नाहीत. युजरनेममुळे ही भीती संपुष्टात येईल. युजर्सना आता हे माहित असेल की, जरी त्यांनी अनोळखी व्यक्तीशी संवाद साधला, तरी त्यांचा खाजगी नंबर सुरक्षित राहील. हे स्वातंत्र्य त्यांना नवीन संधी शोधण्यास आणि नवीन लोकांशी जोडले जाण्यास प्रवृत्त करेल.
दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे युजरला मिळणारे संपूर्ण नियंत्रण होय. व्हॉट्सॲपने दिलेली युजरनेम की आणि जनरेटरची सुविधा युजर्सना त्यांच्या आवडीनुसार ओळख निर्माण करण्यास मदत करते. जर एखाद्या युजरला आपले नाव बदलायचे असेल किंवा चॅट सुरक्षित करायची असेल, तर तो काही सेकंदात आपले युजरनेम बदलू शकतो. हे नियंत्रण पारंपारिक फोन नंबरच्या बाबतीत शक्य नव्हते, कारण फोन नंबर बदलणे ही एक मोठी आणि कठीण प्रक्रिया असते. युजरनेममुळे ही लवचिकता युजर्सच्या हातात येणार आहे. तर, लहान-मोठे ब्रँडस, व्यावसायिक आणि कंटेंट क्रिएटरसाठी हे फिचर संधीची नवीन कवाडे उघडून देणारे आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ज्यांचे आधीच अधिकृत हँडल्स आहेत, त्यांना व्हॉट्सॲपवर देखील तेच नाव वापरण्याची प्राधान्याने संधी दिली जाणार आहे. यामुळे एका ब्रँडची सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकसमान ओळख (Consistent Presence) टिकवून ठेवणे सोपे होईल.
युजरनेम फिचरमुळे व्हॉट्सॲप मॅसेंजर आता इन्स्टाग्राम, टेलीग्राम वा सिग्नल प्रमाणे युजरला वापरता येणार आहे. अर्थात, व्हाटसॲपवर सर्चची सुविधा नसल्याने ते अधिक सुरक्षीत असेल. तर या मॅसेंजरमधील हा बदल 'जेन झी'ला व्हॉट्सॲप सोबत जोडून याला नवा अत्याधुनीक स्टायलीश लूक प्रदान करणार आहे. एकंदरीत, युजरनेम फिचर हे युजर्सना अधिक सुरक्षित, स्वतंत्र आणि सक्षम बनवणारे एक प्रभावशाली साधन ठरणार आहे. तर, यामुळे सगळेच काही चांगले होणार नसून याची दुसरी बाजू देखील तपासून पाहणे गरजेचे आहे.
जर युजरने सावधगिरी बाळगली नाही, तर…?
व्हॉट्सॲप युजरनेम फिचरचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे 'इम्पर्सनेशन' किंवा दुसऱ्याच्या नावाने खाते उघडणे होय. एखादा सायबर गुन्हेगार एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे किंवा संस्थेचे युजरनेम तयार करून लोकांची फसवणूक करू शकतो. यावर उपाय म्हणून व्हॉट्सॲपने सेलिब्रिटी, सार्वजनिक व्यक्तिमत्त्वे आणि सरकारी संस्थांची युजरनेम्स राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही, सामान्य युजर्सच्या नावाचा वापर करून फिशिंग हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरे आव्हान हे 'युजरनेम की' व्यवस्थापनाचे आहे. जर युजरने आपली सुरक्षा की विसरली, तर त्याला नवीन लोकांशी संवाद साधण्यात अडथळे येऊ शकतात. तसेच, गुन्हेगार युजर्सना बनावट लिंक्स पाठवून त्यांची युजरनेम की चोरण्याचा प्रयत्न करू शकतात. सायबर गुन्हेगारीच्या या नवीन पद्धतींना तोंड देण्यासाठी व्हॉट्सॲपला आपल्या युजर्सना सतत शिक्षित करावे लागेल. जर युजरने सावधगिरी बाळगली नाही, तर ही नवीन सुरक्षा प्रणालीच त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते.

यामुळे व्यापक पातळीवरून पाहिले असता, युजरनेममुळे गोपनीयता वाढत असली तरी, फसवणुकीच्या गुंतागुंतीच्या पद्धती देखील विकसित होऊ शकतात. युजर्सनी हे लक्षात ठेवले पाहिजे की युजरनेम हे संरक्षणाचे साधन आहे, पण त्याचा वापर करताना आपली सतर्कता हीच खरी सुरक्षा राहणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे युजरनेम हे ऐच्छिक असल्याने, जे लोक समाधानी आहेत ते आपला फोन नंबर वापरणे सुरू ठेवू शकतात. तर टेलीग्रामवर मोबाईल क्रमांक नसल्याने अनेक जण याचा गैरवापर करत असल्याने तसला प्रकार देखील व्हॉट्सॲपच्या माध्यमातून होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
येणाऱ्या काळात आपली डिजिटल ओळख फोन नंबरपेक्षा युजरनेमवरून
युजरनेमच्या माध्यमातून व्हॉट्सॲप आता नव्या टप्प्यात प्रवेश करणार असल्याचे दिसून येत आहे. खरं तर मॅसेजींगच्या पलीकडेच जात व्हॉट्सॲपवर बिझनेसशी संबंधीत अनेक फिचर्स आहेत. यात पेमेंट सिस्टीम देखील प्रदान करण्यात आली आहे. यामुळे या प्लॅटफॉर्मला ई-कॉमर्स, ऑनलाइन पेमेंट्स आणि डिजिटल आयडेंटीटीच्या एका जागतिक मंचात परिवर्तीत करण्याची तयारी सुरू असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. मेटाला व्हाट्सएपच्या माध्यमातून चीनमधील 'वीचॅट' (WeChat) प्रमाणे एक अशी इकोसिस्टीम तयार करायची आहे, जिथे युजर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या संवादाच्या सोबतीलाच सर्व गरजा म्हणजे खरेदी, बिल पेमेंट आदी एकाच ठिकाणी पूर्ण करू शकेल. या प्रवासात युजरनेम हे 'डिजिटल ट्रस्ट अँकर' म्हणून काम करेल. या प्रक्रियेत व्हॉट्सॲपने घेतलेली सावध भूमिका देखील महत्त्वाची आहे. त्यांनी हा बदल एका रात्रीत न लादता, तो टप्प्याटप्प्याने आणि ऐच्छिक स्वरूपात आणला आहे. तंत्रज्ञानाचा अभ्यासक म्हणून मला असे वाटते की, यामुळे वापरकर्त्यांना नवीन प्रणालीशी जुळवून घेण्यास पुरेसा वेळ मिळेल.
व्हॉट्सॲपच्या या स्थित्यंतरामुळे आगामी काळात टेलिकॉम कंपन्यांच्या पारंपारिक एसएमएस आणि कॉलिंग सेवांवर देखील परिणाम होऊ शकतो. जर कुणाचीही संपूर्ण डिजिटल ओळख व्हॉट्सॲप युझरनेमवर आधारित असेल, तर फोन नंबरचे महत्त्व केवळ इंटरनेट कनेक्टिव्हिटीपुरते उरेल. यामुळे कंपन्या आणि ग्राहक यांच्यातील संवाद अधिक गोपनीय, व्यावसायिक आणि पारदर्शक होईल. ग्राहकाला आपला नंबर व्यवसायांना देण्याची गरज उरणार नाही, ज्यामुळे अनपेक्षित मार्केटिंग कॉल्स आणि स्पॅमचा धोका कमी होईल.
व्हॉट्सॲप युजरनेम हे केवळ एक छोटे अपडेट नसून ते भविष्यातील डिजिटल संवादाचे नवे 'डोमेन नेम' ठरणार आहे. येणाऱ्या काळात आपली डिजिटल ओळख ही फोन नंबरपेक्षा आपल्या युजरनेमवरून अधिक ठळकपणे ओळखली जाईल. फोन नंबरची जागा हळूहळू युजरनेम घेईल आणि यामुळे जगभरातील अब्जावधी वापरकर्त्यांना अधिक खाजगी, सुरक्षित आणि व्यावसायिक वातावरणात संवाद साधता येईल. आपली डिजिटल स्वायत्तता जपण्यासाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी आपले युजरनेम आजच आरक्षित करणे हे काळाची गरज बनली आहे. व्हाटसॲप प्रत्येक युजरला नोटिफिकेशन पाठवून नाव रिझर्व्ह करण्याचे सूचीत करणार आहे. तेव्हा कुणीही आळस न करता आपापले नाव सुरक्षित करावे हेच उत्तम राहणार आहे.





