अविनाश पोईनकर
- १८५७ मध्ये ‘जंगोम सेना’ उभारून इंग्रजाविरुद्ध लढा उभारणारे क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके कोण होते ?
- क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके… १८५७ चा आदिवासी नायक, ज्याने जंगोम सेना उभारून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.
- इतिहासाच्या पुस्तकात ‘द अनसंग हिरो’ राहिलेल्या एका क्रांतिकारकाची ही ओळख, क्रांतिवीर बाबुराव यांच्या जयंतीनिमित्ताने…!
क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके… इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरोधात १८५७ मध्ये मध्य भारतातातील चांदागड म्हणजे आताच्या महाराष्ट्रातील चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात स्वातंत्र्याची पहिली क्रांतीज्योत पेटवणारा आदिवासी नायक. केवळ २५ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी आदिवासींना संघटित करून ‘जंगोम सेना’ उभारली, आणि इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरिया यांच्या सूचनेनुसार चांदागडचे जिल्हाधिकारी कॅप्टन क्रीक्टन यांनी त्यांच्या सेनेला वीर बाबुरावांना ‘जिंदा या मुर्दा’ पकडण्याचे आदेश द्यावे लागले. ‘कोण आहे हा वाघाचा पोरगा, ज्यांनी आमच्या इंग्रज सरदारांना मारण्याची हिंमत केली?’ अशी बडबड करत वीर बाबुरावांच्या शोधात सैन्य धाडले.
कोण होते वीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके ? कुठला लढा उभारला होता त्यांनी? इंग्रजांना का धास्ती घ्यावी लागली बाबुरावांची? गोंडवाना परिसरात त्यांच्या शौर्याच्या कहाण्या ऐकवल्या जात असल्या तरी इतिहासाच्या पुस्तकात ‘द अनसंग हिरो’ राहिलेल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील या क्रांतिकारकाची ही ओळख ‘१८५७ के स्वाधीनता शहीद वीर बाबुराव पुल्लीसूरबापू राजगोंड’ या पुस्तकात लेखक पुरुषोत्तम सेडमाके यांनी करून दिली आहे.
चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात पूर्वी पारंपारिक गोंड साम्राज्याचं वर्चस्व होतं. अठराव्या शतकात या साम्राज्यावर इंग्रजांनी सत्ता मिळवून येथील जनतेवर अन्यायकारक सावकारशाही सुरू केली. नापिकी आणि दुष्काळामुळं शेतकरी हवालदील झाला होता, तरी वसूली करणे सुरुच होते. या जुलूमशाहीविरुद्ध वीर बाबूरावांनी बंड पुकारलं. १८५७ मध्ये सात महिन्यांच्या कालावधीत ब्रिटिशांविरुद्ध अनेक लढाया करून त्यांनी आदिवासींमध्ये स्वातंत्र्याची आशा जागवली. त्यांना शेवटी फाशी देण्यात आली.

कोण होते वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके ?
शहीद वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांचा जन्म १२ मार्च १८३३ रोजी चांदागडातील मोलमपल्ली (किष्ठापूर) येथे गोंड घराण्यातील जमीनदार कुटुंबात झाला. मध्यप्रदेशातील रायपूर येथे चौथीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं. वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत युद्धनितीत माहिर होऊन सामाजिक नीतीमुल्ये, दांडपट्टा, तलवार, भालाफेक, गुल्ह्यार असे प्रशिक्षण घेतले. गोटुल शिक्षा केंद्रात अक्षरज्ञानासोबत विविध कलागुणात निपुणता मिळवली. आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन त्यांना अन्यायाची जाणीव करुन देऊन आवाज उठवण्यासाठी प्रोत्साहित केले. २४ सप्टेंबर १८५७ रोजी ५०० आदिवासींना तयार करून ‘जंगोम सेना’ उभी केली आणि या सेनेत सहभागी झालेल्यांना प्रशिक्षणही दिलं.
‘जंगोम’ या शब्दाचा गोंडी भाषेत अर्थ होतो क्रांती, जागृती... ही क्रांती व जागृतीची मशाल घेवून स्वातंत्र्याचं पहिलं रणशिंग या आदिवासीबहुल भागात क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांनी इंग्रजांविरुद्ध फुंकलं.
‘आपण निसर्गाच्या सानिध्यात जगणारे स्वतंत्र लोक आहोत. हा देश आपला आहे आणि आपण या देशाचे मालक आहोत. आता आम्हाला गुलामी नको तर आपल्या सर्वांना मालक म्हणून जगायचं आहे. बाहेरून आलेले इंग्रज आपल्यावर हुकुमत करत आहे, हे आता सहन करायचे नाही. इंग्रजांनी आपल्या चार ही बाजूने जाळे टाकलेले आहे, हे जाळे तोडणे आवश्यक आहे.’ वीर बाबुरावांच्या क्रांतिकारी भाषणातील हे शब्द गोंडवाना प्रदेशात स्वातंत्र्याची पेरणी करणारे असल्याचेही पुरुषोत्तम सेडमाके यांनी त्यांच्या पुस्तकात मांडलंय.
इंग्रजांशी पहिले युद्ध आणि क्रांतीचे रणशिंग फुंकले
जंगोम सेना सज्ज झाल्यानं चांदागड शेजारील राजगड परंगणा परिसराची इंग्रजांशी युद्ध छेडण्यासाठी वीर बाबुरावांनी पहिल्यांदा निवड केली. ७ मार्च १८५८ रोजी इंग्रजांचा हस्तक असलेला सरदार रामशहाला बाबुरावांनी ठार करून राजगड परंगणा काबीज केल्याने हा पहिला क्रांतिकारी विजय ठरला. या घटनेनं नवनियुक्त कॅप्टन क्रिक्टन यांच्यासह ब्रिटिशांना हादरा बसला. वीर बाबुरावांच्या कारवायावर रोख लावायला कॅप्टन क्रिक्टनने चांदागडाहून इंग्रज सैन्य पाठवले. नांदगाव घोसरी येथे इंग्रजांशी पहिली लढाई जंगोम सेनेची झाली. यात इंग्रज सैन्याचा जंगोम सेनेने दारुण पराभव केला. घोटचे जमीनदार व्यंकटराव आपल्या सैन्यासह वीर बाबुरावांच्या मदतीला धावून आले आणि विजयाने जंगोम सेनेचा आत्मविश्वास वाढला. मात्र इंग्रज सेना पुन्हा परतून येऊन युद्ध पुकारेल, हे वीर बाबुरावांनी जाणले असल्याने वीर बाबुराव व सैन्य गडीसुर्ला टेकडीवर आश्रयासाठी थांबले. येथे दगडांचा ढीग करून बैलबंडीचे चाके आसपासच्या गावांतून गोळा करण्यात आले.
सकाळी साडेचारच्या सुमारास इंग्रज सैन्यानी टेकडीला घेराव घालून टेकडीच्या दिशेने बंदुकीच्या फैरी सुरू केल्या. जंगोम सेनाही दगडांचा आडोसा घेवून इंग्रज सैन्यावर वार करायला सुरुवात केल्याने भांबावून इंग्रज सैन्यांनी पळ काढला. जंगोम सेनेने त्यांच्याकडील तोफा, बंदुका जप्त केल्या. इंग्रज हस्तकांनी बळजबरी करुन नागरिकांची लुटमार करुन उभे केलेली धान्याची कोठारे वीर बाबुरावांनी हस्तगत केली. ती धान्याची कोठारे लोकांसाठी खुली केली जनतेत त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने देशाभिमान जागृती होवून क्रांतीसाठी पोषक वातावरण तयार होत गेले.

वीर बाबुरावांचे युद्ध आणि इंग्रजांना हादरे
वीर बाबुराव आपल्या सैन्यासह १९ एप्रिल १८५८ रोजी समनापूर गावात परगणाचे जमीनदार राजेश्वरराव व नरसिंहराव राजगोंड यांच्याकडे मुक्कामी राहिले तेव्हा वीर बाबुरावांच्या क्रांतीने प्रेरीत होवून या जमीनदारांनी आपल्या सेनेचे नेतृत्व बाबुरांवाकडे सोपवले. इंग्रजांचे वर्चस्व झुगारुन खंडणी बंद करण्याचे जमीनदार, मोकासदारांना बोलावून सूचना व आवाहन करण्यात आले. दक्षिण गोंडवनात बाबुरावांची सेना स्वातंत्र्य संग्रामाकरिता जनजागृतीसाठी फिरत असताना इंग्रजांच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवत होती. सगनापुरच्या परिसरात इंग्रज सेना असल्याची माहीती गुप्तहेरांकडून वीर बाबुरावांना मिळाली आणि वीर बाबुरावांच्या सेनेने त्यांच्यावर जोरदार हल्ला करत तलवारी, बंदुका, गुल्ह्यारिने लढाई सुरू केली. बांबुरावांच्या थोड्या व हुशार सेनेपुढे इंग्रज सैन्यांनी नांगी टाकली. येथेही इंग्रज सैन्यांचा दारुण पराभव करत राजगढ, नांदगाव घोसरी, गडीचुर्ला, समनापूर परंगणावर बाबुरावांनी आपले गोंडीयन साम्राज्य प्रस्थापित केले.
या विजयानंतर बाबुरावांनी आपला मोर्चा बामनपेठकडे वळवला. जंगलात इंग्रज सैन्य असल्याची माहिती मिळाली आणि जंगोम सेनेने छुप्या पद्धतीने जंगलात, झाडावर बसून इंग्रज सैन्याचा मागोवा घेत २७ एप्रिल १८५८ रोजी मध्यरात्री इंग्रज सैन्यावर हल्ला करुन विजय मिळवला. चांदाचे कलेक्टर कॅप्टन क्रिप्टन यांनी चांदा ते सिरोंचा पर्यंत टेलिफोनच्या तारा लावण्यासाठी लॉर्ड डलहौसीच्या आदेशाने ऑपरेटर गार्ट लॅन, हॉल व सहकारी पीटर यांची नेमणूक केली होती. याचा फटका वीर बाबुरावांच्या क्रांतीलढ्यास बसणार असल्याने २९ एप्रिल १८५८ रोजी वीर बाबुरावांनी आपल्या सैन्यासह मध्यरात्री ते थांबून असलेल्या चिचगुडी कॅम्पवर हल्ला चढवून गार्ट लॅन व हॉल यांना ठार केले.
बाबुरावांना ‘जिंदा या मुर्दा’ पकडण्याचे आदेश
गार्ट लॅन व हॉल या दोन इंग्रज अधिकाऱ्यांच्या मृत्यूने जिल्हाधिकारी कॅप्टन क्रिक्टनला जोरदार हादरा बसला. या घटनेने भारतातील इंग्रजच नाही तर इंग्लंड देशातही याचा परिणाम झाला. ही वार्ता थेट इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरिया यांच्यापर्यंत पोहोचल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कॅप्टन क्रिक्टन यांना सूचना दिल्या आणि वीर बाबुरावांना ‘जिंदा या मुर्दा’ पकडण्याचे आदेश दिले. त्यासाठी नागपूरचे कॅप्टन सेक्सपिअरला बोलावून विशेष नेमणूक केली. वीर बाबुराव असे हाती लागणार नाही, त्यांना त्यांच्याच पद्धतीने डावपेच खेळून पकडावे लागेल, असं नियोजन कॅप्टन सेक्सपिअरने केलं.
‘इंग्रज अधिकाऱ्यांना ज्यांनी मारलं त्यांना जो कुणी पकडून देईल, त्याला बहुमानाची उपाधी आणि घोट, अडपल्ली, मोलमपल्ली येथील जमीनदारी बहाल करण्यात येईल.’ असं जाहीर आवाहन करण्यात आलं. अहेरीच्या राणी लक्ष्मीबाईकडेही खलीता पाठवण्यात आला. मात्र त्याचा जंगोम सेनेवर कुठलाही परिणाम झाला नाही आणि पुन्हा युद्ध झाले. यात काही सैनिकांना वीरगती मिळाली असली तरी वीर बाबूराव व घोटचे महाराजा व्यंकटराव इंग्रजांच्या हाती लागले नाही. घोटच्या युद्धानंतर जंगोम सेनेत फितूरीचे प्रमाण वाढले. यात सहकाऱ्यांच्या मालमत्ता जप्त झाल्या. राजे व्यंकटरावांनी जंगलाचा आश्रय घेतला, त्यामुळे वीर बाबुराव एकटे पडले.
आपल्याच माणसांचा दगाफटका आणि वीर बाबुरावांना अटक
राणी लक्ष्मीबाईंना कॅप्टन सेक्सपिअरने आमीषे दाखविल्याने यात त्या बळी पडल्या आणि वीर बाबुरावांना पकडण्यासाठी इंग्रजांना सहकार्य करु लागल्या. लक्ष्मीबाईकडून बाबूरावांना पकडण्यासाठी रोहिल्यांची सेना पाठवण्यात आली. वीर बाबुराव भोपाल पटनम येथे काही लोकांच्या आग्रहाखातर थांबले असल्याने मध्यरात्री झोपले असताना रोहिल्यांच्या सेनेनी त्यांना पकडले. बाबुरावांनी त्यांना कुठलाही विरोध न करता उलट इंग्रजांविरुद्ध लढण्याचा उपदेश केला. ‘मी माझ्या मातृभूमीसाठी लढतो आहे, मला इंग्रजांच्या स्वाधीन करुन तुम्ही स्वातंत्र्य व्हाल का?’ या उलट प्रश्नाने रोहिल्यांच्या सेनेत मतपरिवर्तन झालं आणि एकदा वीर बाबुराव २४ जून १८५८ रोजी इंग्रजांच्या तावडीतून पसार झाले.
(शहीद भूमी स्मारक)
वीर बाबुराव निसटल्याची वार्ता चांदाचे जिल्हाधिकारी कॅप्टन कटन व सेक्सपिअर यांना कळताच त्यांचे डोके भडकले आणि पुन्हा त्यांनी उलटा डाव खेळला. इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी राणी लक्ष्मीबाईला प्रोत्सोहन देत वीर बाबुराव शेडमाके यांना पाठिंबा देण्यास भाग पाडून आपले सैन्य त्यांच्यात मिसळवले. वीर बाबुरावांची सर्व खबर राणी लक्ष्मीबाई इंग्रजांना देत असत. १८ ऑक्टोबर १८५८ रोजी राणी लक्ष्मीबाईने वीर बाबुरावांना जेवणाचे आमंत्रण दिले. आपल्या नातलगावर विश्वास ठेवून वीर बाबुराव शेडमाके जेवणासाठी आले. जेवण करतांनाच कॅप्टन सेक्सपिअर यांनी वीर बांबुरावांना पकडले. आपल्याच नातलगांनी दगा फटका दिल्याने इंग्रजांना वीर बाबुरावांना अटक करण्यात यश आलं.
चंद्रपूरच्या कारागृहात फाशी मात्र इतिहासाची पाने अजूनही कोरीच
चंद्रपूर येथील कारागृहातील हेच पिंपळाचे झाड, जिथे वीर बाबुराव शेडमाके यांना फाशी देण्यात आली होती. आता येथे त्यांचे स्मारक तयार करण्यात आले आहे. वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांना फितुरीने पकडण्यात इंग्रजांना यश आल्याने त्यांच्या हातापायाला लोखंडी बेड्या लावण्यात आल्या. त्यांना चांदाचे म्हणजे आताचे चंद्रपूरचे कारागृहात आणण्यात आलं. त्यांना शिक्षा देण्यासाठी विशेष न्यायालयाची व्यवस्था कारागृहातच करण्यात आली.
यावेळी त्यांच्याकडून बयान देणारा कोणीही वकील नव्हता. भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हा माझा लढा असल्याची साक्ष न्यायालयात वीर बाबुरावांनी दिली. यावेळी त्यांना बघण्यासाठी कारागृहात जनसमुदायांची अफाट गर्दी झाली होती. २१ ऑक्टोबर १८५८ रोजी चांदाचे कारागृहासमोरील पिंपळाच्या झाडावर त्यांना फाशी देण्याची व्यवस्था करण्यात आली. जेलर त्यांच्या चेह-यावर काळा पडदा टाकण्यास पुढे आले तेव्हा त्यांनी मनाई केली आणि हसत हसत देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर चढले.
वीर बाबुराव शेडमाके यांच्याबद्दल एक आश्चर्यकारक घटना नेहमी सांगितली जाते की, त्यांनी एकदा ताडोबाच्या जंगलात 'ताडवा' नावाचे बांबूचे फळ खाल्ले. हे फळ अत्यंत विषारी असून खाणाऱ्या व्यक्तीचे शरीर वज्रदेही होते. वीर बाबुरावांनी ते फळ खाल्ल्याने बेशुद्ध झाले पण काही वेळानेच शुद्धीवर आले. त्यानंतर त्यांच्या शरीरावर कोणताही धक्का न लागल्याने एक अद्भुत शक्ती निर्माण झाली.
तुरुंगात फासावर लटकले तेव्हा त्याचे शरीर दगडासारखे होते आणि मानही ताठ झाली होती, त्यामुळे फाशीची दोरी सैल झाली. त्यांना पुन्हा फाशी देण्यात आली पण पुन्हा दोरी सैल झाली. चारदा असे झाल्यानंतर पाचव्यांदा फाशी देऊन त्यांना मृत घोषित केले. मात्र इंग्रजांना बाबुरावांची इतकी भीती वाटली की त्यांनी यांचा मृतदेह उकळत्या चुना भट्टीत टाकला. या घटनेचा महाराष्ट्राच्या चांदा जिल्हा गॅझेटिअर्समध्येही उल्लेख आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे,
““This rising in Chandrapur was spontaneous. It practically speared towards the end of the great Revolt. Though un-successful it stands out as a brilliant attempt of the Raj Gond Zamindars to regain their freedom. Many folk tales and songs are current in the Chandrapur area extolling the heroic exploits of the two Gond leaders. Baburao the Zamindar of Molampalli. According to one story had consumed tadava, and as a result of its extraordinary powers, when hanged, managed to break the noose four times. He was finally immersed in quick lime, and killed.”
‘शहीद वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके हे केवळ २५ वर्षे जगले. या क्रांतियोद्ध्याने इंग्रजांना घाम फोडून स्वातंत्र्यासाठी रणसंग्राम पेटवला. पण चंद्रपूर-गडचिरोलीतील या शहीद वीर भुमीपुत्र बाबुरावांच्या स्वातंत्र्याच्या क्रांतीलढ्याचा इतिहास इतिहासाच्या पानात अजूनही धूसरच आहे,’ अशी खंत गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थेचे अध्यक्ष सुधाकर कन्नाके यांनी व्यक्त केली.
(वीर बाबुराव शेडमाके यांच्यावर भारतीय डाक विभागाने १२ मार्च २००९ रोजी त्यांच्या जयंती दिनी भारतीय पोस्ट तिकीट जाहीर केले होते.)
‘भारतातील आदिवासींनी १७७५ पासून ब्रिटिश वसाहतवादाविरूद्ध संघर्ष सुरू केल्याचे पुरावे आहेत. कार्ल मार्क्सला देखील या लढ्याचे अप्रूप वाटले होते. त्यांचा लढा केवळ ब्रिटिश विरोधी नव्हे, तर स्वदेशातील शोषकांविरूद्धही होता. अनेक इतिहासकारांनी 'ब्रिटिश विरोध' एवढाच संदर्भ घेऊन आदिवासी क्रांतिकारकांची अर्धी-कच्ची चरित्रे लिहिली. यामध्ये सांस्कृतिक वर्चस्ववादाचा आपमतलबीपणा आहे. शहीद बाबुराव शेडमाके यांच्याबाबही असाच दुष्टावा करण्यात आला. वर्गजाती प्रभुत्वातून मुक्त होऊन शेडमाके यांचे साक्षेपी चरित्र लोकांसमोर मांडण्याची खरी गरज आहे. कारण, सभोवतीचे वास्तव लक्षात घेतल्यास आदिवासींच्या लढ्याची प्रासंगिकता आज आणखी वाढली आहे.’ असे मत पत्रकार व आदिवासी साहित्याचे अभ्यासक राजेश मडावी यांनी व्यक्त केलं.
लोकगीतातील उल्लेखावरून वीर बाबुरावांची समाधीस्थळ शोधल्याचा दावा
वीर बाबुराव शेडमाके यांना फाशी दिल्यानंतर यांच्या पार्थिवाचे काय झाले? याची स्पष्ट नोंद कुठेही सापडत नाही. लेखक पुरुषोत्तम सेडमाके यांनी वीर बाबूरावांचा मृतदेह कुणाकडेही न देता गोंडी समुदायाच्या रीती रिवाजानुसार कारागृहाच्या परिसरात पुरले असल्याची माहिती पुस्तकात दिली आहे. पण ऐतिहासिक वारसा संवर्धन समितीने वीर बाबुराव शेडमाके यांची समाधीस्थळ शोधल्याचा दावा केला केलाय. चपराळा, जि.गडचिरोली येथे वीर बाबुराव शेडमाके यांचे समाधीस्थळ असल्याचा दावा करण्यात येतो. तेलंगणा, आंध्र प्रदेशातील भिक्षुक घरोघरी जाऊन लोकगीत सादर करतात आणि भिक्षा मागतात. अशाच एक भिक्षेकऱ्याच्या तोंडून ऐतिहासिक वारसा संवर्धन समितीचे अध्यक्ष अरुण झगडकर, अभ्यासक निलेश झाडे यांनी लोकगीत ऐकलं. त्या लोकगीताच्या ओळी होत्या "चंपलहेटी दौर्रा गारू वीर बाबुराव".
यातील चंपलहेटी हे गावाचे नाव असून दौर्रा या तेलुगु शब्दाचा अर्थ राजा, पाटील, जमीनदार, साहेब असा होतो. गारू शब्दांचा अर्थ राया किंवा जी असा होतो. अतिशय प्रिय असलेल्या व्यक्तीच्या नावासमोर "गारू" हा शब्दप्रयोग तेलगूत केला जातो. वरील शब्दांचा अर्थ चंपल हेटी येथील राजा वीर बाबुराव असा आहे. चंपलहेटी हे गाव म्हणजे आजचे चपराळा असल्याचा दावा झगडकर यांनी केला आहे.
वीर बाबुराव शेडमाके यांना फासावर लटकवलेला दिवस ‘शहीद दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी चपराळा येथील या समाधीवर माता टेकायला लोक दूरवरून येत असतात. वीर बाबुराव शेडमाके यांचे काही वंशज देखील चपराळा येथे असून ते देखील याचे पुरावे देतात, असे त्यांचे म्हणणे आहे. वीर बाबुराव शेडमाके यांच्यावर भारतीय डाक विभागाने १२ मार्च २००९ रोजी त्यांच्या जयंती दिनी भारतीय पोस्ट तिकीट जाहीर करून होते.






