(सौम्या पिल्लई)
काही दिवसांपूर्वीची ही घटना…आधी एक विस्फोट झाला आणि नंतर बीडच्या एका शांत गावात आभाळातून काही दगड वेगानं पडू लागले. खळवट निमगावमध्ये राहणाऱ्या सुनिता विजयनाथ कोरडे सांगतात की, स्फोटाच्या आवाजानंतर लगेच एक दगड पडला आणि त्यानंतर आणखी दोन दगड पडले. 
(ज्या ठिकाणी उल्कापिंड झाले ती जागा दाखवताना खलळ निमगावचे विनायक अंबुरे.)
आकाशातून दगड नाही पडले तर ते उल्कापिंड होते…
हे दगड उल्कापिंड असल्याचं सिद्ध झालं आणि गाव एकदम प्रसिद्धीच्या झोतात आलं. वैज्ञानिकांसाठी अशा उल्का विश्वाचा गूढ संदेश घेऊन येत असतात. बीडच्या खळवट निमगावमध्ये पडलेल्या या उल्का आता कोलकाताच्या जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया (जीएसआय) इथं विश्लेषणासाठी नेण्यात आल्या आहेत. पण त्यांच्या पडण्यानं ज्या गावकऱ्यांच्या घरांचं नुकसान झालं त्यांच्यासाठी ती लॉटरीही असू शकते.
या उल्कांना खासगी संग्राहकांकडून काही लाख रुपये मिळू शकतात. फक्त त्यासाठी त्यांना सरकारला दिलेले दोन दगड परत मिळवावे लागतील आणि तिसरा बेपत्ता दगड शोधावा लागेल. पण हातात बसणारे हे लहानसे दगड शोधणं तसं अवघडच आहे. पहिला दगड अंबुरे कुटुंबाच्या आंगणात टीनाचा पत्रा भेदून पडला व फरशीत रुतला. दुसरा दगड छपरावरून रस्त्यावर फेकला गेला. तिसरा दगड शेतात पडला.
(सुनीता विजयनाथ कोराडे यांच्या घराच्या छतातून दगड स्वयंपाक घरात पडला होता.)
आमच्या घारत, शेतात पडलयं, आम्हाला ते उल्कापिंड परत करा…
एका रात्रीतून हे साधारण गाव सगळ्यांच्या नजरेत आलं. वैज्ञानिक, जिल्हा अधिकारी, माध्यमांचे प्रतिनिधी तिथं पोहोचले. ही एक दुर्मिळ घटना होती. भारतात आजवर केवळ 117 उल्का गोळा करण्यात आल्या आहेत, त्यातल्या काही 1700 च्या दशकातल्या आहेत. एमजीएम एपीजे अब्दुल कलाम एस्ट्रोस्पेस सायंस सेंटर अँड क्लब, छत्रपती संभाजीनगर इथले संचालक श्रीनिवास औंधकर सांगतात की, तपासणीनंतर हे उल्कापिंडाचे तुकडे असल्याचं सिद्ध झालं आहे. निमगावच्या सरपंचांनी 3 मार्चच्या रात्रीच त्यांना फोन करून याची माहिती दिली.
सर्व तुकडे एकाच उल्केचे आहेत. निमगावच नाही तर वडवणी तालुक्यात लोक आता तिसऱ्या बेपत्ता दगडाचा शोध घेत आहेत. यात अंबुरे कुटुंबियही आहे, ज्यांना कोणीतरी सांगितलं की या दगडासाठी त्यांना 15 लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते. 38 वर्षीय शेतकरी रामदास भिकाजी अंबुरे सांगतात की काही वैज्ञानिकांनी त्यांना सांगितलं की आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 15 लाख पर्यंत असू शकते. रामदास हे 8 लोकांच्या कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य आहेत. त्यांच्यासाठी ही लॉटरीच होती. 
(उल्कापिंडाचे संग्रहित छायाचित्र)
दोन दगड सरकार घेऊन गेले, तिसरा शोधण्यासाठी गावकऱ्यांची पळापळ
रामदास त्यादिवशी गावातील मंदिरात पूजा करत होते. त्यांच्या बायकोनं घाबरून त्यांना फोन केला. त्यांचा 9 वर्षांचा मुलगा अथर्व जखमी झाला होता. सिमेंटची चुल फुटली होती. फरशीत मोठा खड्डा पडला होता. आधी त्यांना वाटलं की कोणा खोडसाळ पोरानं दगडं फेकली असतील. पण त्याची तीव्रता बघून त्यांनी अंदाज बांधला की ही वेगळी गोष्ट आहे. रामदास सांगतात, “आम्हाला सांगण्यात आलं की हे दगड अवकाशातून आले आहेत. मला वाटलं की ही दैवी शक्ती असावी किंवा जादू असावी.
तुम्हाला ‘कोई मिल गया’ माहीत आहे ना? ऋतिक रोशनलाही अवकाशातून शक्ती मिळाली होती.” पण या दैवी दगडानं त्यांना फक्त एक तोडलेलं घर आणि हॉस्पिटलचं बिलच दिलं. लाखो रुपयांचं त्यांचं स्वप्न स्वप्नच राहिलं आहे. कारण लोकांच्या गर्दीत तिसरा दगड कुठेतरी बेपत्ता झाला. तो मिळाला नाही तेव्हा ते जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी दिलेले दोन दगड परत मागायला गेले. पण त्यांची मागणी नाकारण्यात आली. “मी तिसरा दगड तोडला होता, तो आतून कसा दिसतो हे बघण्यासाठी. त्यामुळे तो सरकारला दिला नाही. लोक जेव्हा आमच्याकडे दगड पाहण्यासाठी आले तेव्हा तो कुठेतरी बेपत्ता झाला,” रामदास निराश होऊन सांगतात.
श्रीनिवास औंधकर यांना जेव्हा या दगडांची माहिती मिळाली तेव्हा ते लगेच तिथं जायला निघाले. प्रवासात असतानाच त्यांनी हा दगड कसा सांभाळायचा याची माहिती गावकऱ्यांना दिली होती. आपल्या आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी उल्कावर्षाची फक्त माहितीच वाचली-ऐकली होती. प्रयोगशाळेत त्यांनी उल्का पाहिल्या होत्या. पण स्वतः त्यांना कधी अशी उल्का मिळाली नव्हती त्यामुळे हा त्यांच्या कामातील महत्त्वाचा क्षण होता. 
(एमजीएम एपीजे अब्दुल कलाम एस्ट्रोस्पेस साइंस सेंटरचे प्रमुख श्रीनिवास औंधकर यांनी गावाला भेट देऊन उल्कापिंड असल्याचा निष्कर्ष काढला.)
उल्कापिंडाचे स्वरूप नेमके कसे होते?
औंधकर सांगतात, “गावाचे सरपंच हौशी खगोलशास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या लक्षात आलं की हा अवकाशातून आलेला दगड असू शकतो. तेव्हाच त्यांनी माझ्याशी संपर्क केला.” दोन दगड प्लास्टिक बॅगेत भरून एमजीएम सायन्स सेंटरला नेण्यात आले. त्यानंतर सरकारी भूवैज्ञानिकांनी त्यांची तपासणी केली व नंतर ते कोलकात्याला पाठवण्यात आले. हे दगड षटकोनी व भूऱ्या रंगाचे आहेत. 7.8 सेंमी लांब व 4.9 सेंमी रुंद या दगडांचं वजन 282 ग्रॅम्स आहे. आतून त्यांचा चकाकता पांढरा रंग आहे, असं औंधकर सांगतात. यात चांदीसारखे सूक्ष्म कण आहेत. सोबतच सोनं व तांब्यासारखेही कण आहेत. यात निकेल व लोह खनिज असण्याची शक्यता जास्त आहे.
आतापर्यंत भारतात फक्त तीनवेळा उल्कापात
या दगडांविषयी गावकऱ्यांचं मत वेगवेगळं आहे. अंबुरे कुटुंबिय सांगतात की त्यांना सापडलेले दगड बर्फासारखे थंड होते तर शेतातील मुलं सांगतात की त्यांना सापडलेला दगड जळत असलेला होता. यावर अद्याप विश्वास ठेवता येणार नाही, आपल्याला वैज्ञानिक निष्कर्षाची वाट बघावी लागेल असं औंधकर सांगतात. पृथ्वीच्या वातावरणात उल्कापिंडाचं येणं तशी दुर्मिळ घटना असते. बहुतांश उल्का घर्षणामुळे जळून नष्ट होतात. पण ज्यांचा वेग 40 किमी प्रती सेकंड पेक्षा जास्त असतो आणि आकारही मोठा असतो, शिवाय वातावरणात येताना ज्यांचा विशिष्ट कोन बनतो त्या पृथ्वीच्या वातावरणात शिरतात. 
(छ. संभाजीनगर येथील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम एस्ट्रोस्पेस साइंस सेंटर. याच सेंटरमध्ये आता उल्कापिंडावर संशोधन सुरू आहे.)
भारतात उल्कापातामुळे तीन मोठे खड्डे पडले आहेत. धाला (मध्य प्रदेश), रामगढ (राजस्थान) आणि लोणार (महाराष्ट्र) जे बीडपासून 200 किमी दूर आहे जिथं सध्याचा उल्कापात झाला होता. औंधकर यांना या दगडांवर अधिक संशोधन करायचं होतं पण सरकारी नियमांनुसार त्यांना हे दगड याचे अधिकृत मालकी असलेल्या जीएसआय संस्थेला द्यावे लागले. ते निराशेनं सांगतात, “आमच्या सुरूवातीच्या अहवालात आम्ही असं म्हटलं होतं की आम्हाला यावर आणखी संशोधन करायचं आहे. जीएसआय त्याची परवानगी देईल की नाही माहिती नाही. हे प्रत्येक वैज्ञानिकाचं स्वप्न असतं.”
या उल्कापातामुळे लोकांची गगनयान, चांद्रयान इत्यादी अभियानात रुची वाढली आहे. जोवर हे दगड जीएसआयला देण्यात आले नाही तोवर एमजीएम सेंटरमध्ये जिज्ञासेनं भरलेले शाळकरी विद्यार्थी या उल्का बघायला उत्साहानं येत होते. गावकऱ्यांच्या बोलण्यातही हाच विषय होता. शहरात याची माहिती पसरताच लोकांचे फोन येऊ लागले, त्यांच्या भेटी वाढल्या. देशभरातून वैज्ञानिकांचे फोन येऊ लागले. सर्वांनाच या उल्का बघायच्या होत्या. सेंटरच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की इतके फोनकॉल्स त्यांनी आधी कधीच आले नव्हते. आम्हाला शेवटी फोन घेणं बंद करावं लागलं कारण आम्ही थकलो होतो. पण लोकांच्या या उत्सुकतेमुळे सेंटरचाही उत्साह वाढला होता. त्यांनी ठरवलं की उल्का व्यवस्थितपणे सांभाळून त्या सर्वांना दाखवायच्या.
गुजरात, मध्य प्रदेश इथूनही विद्यार्थी उल्का बघायला आले होते. दोन दिवस विद्यार्थ्यांनी उल्का पाहिल्या, शिवाय लहान सत्रांमध्ये भागही घेतला जिथं त्यांना सांगण्यात आलं की उल्का पृथ्वीच्या वातावरणात कशा शिरतात आणि विश्वाचं कोणतं रहस्य ते सोबत घेऊन येतात. मुलं अगदी उत्साहानं प्रश्न विचारत होते. औंधकरांसाठी हा मोठा हर्षाचा क्षण होता. ते सांगतात, “मला माहिती नाही की भविष्यात या उल्कापिंडावर काम करण्याची संधी आम्हाला मिळेल की नाही ते. पण मला आनंद आहे की मला यांच्याविषयी जे काही माहिती होतं ते मी या मुलांना सांगू शकलो. त्यांचं कुतुहल शमवणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती.”
(सौजन्य - द प्रिंट)
अनुवाद - प्रतिक पुरी






