(भागा वरखडे)
शत्रूशी लढताना आलेले वीरमरण वेगळे आणि अपघातात जीव जाणे वेगळे. गुजरातममधील जामनगर जिल्ह्यात हवाई दलाचे जग्वार हे विमान कोसळून त्यात सिद्धार्थ यादव या पायलटचा झालेला मृत्यू काळजाला घर पाडणारा आहे. नुकताच त्यांचा साखरपुडा झाला होता. वैवाहिक जीवनाचे स्वप्न रंगवत असताना त्यांच्यावर हुतात्मा होण्याची वेळ यावी, यासारखी दुर्दैवी घटना नाही.
सिद्धार्थ यांच्या कुटुंबात लष्करी परंपरा आहे. त्यांना मुलगा देशासाठी अर्पण केल्याचा अभिमान असला, तरी एका आईवडीलांसाठी विमानातील तांत्रिक बिघाडाने बळी जाण्याचे दुःख असणारच. फक्त ते त्यांना व्यक्त करता येत नाही, इतकेच. सिद्धार्थ यांचे वडील भारतीय वायुसेनेतून निवृत्त झाले होते. आजोबा भारतीय सैन्यात कार्यरत होते.
संरक्षण कुटुंबातून आलेल्या सिद्धार्थ यांच्यासाठी हवाई दलालाही खूप महत्त्व आहे. अभ्यासात हुशार आणि कुशाग्र बुद्धीच्या सिद्धार्थ यांनी आठ वर्षातच आपल्या कुटुंबाची मान उंचावेल, अशी कामगिरी केली. नागरी भागात जग्वार विमान कोसळले असते, तर मोठी जीवितहानी झाली असती. त्यामुळे त्यांनी विमान निर्जन भागात नेले आणि तिथे अपघात झाला.
पॅराशूटच्या मदतीने उडी मारूनही त्यांना जीव वाचवता आला नाही. त्यांचा सहवैमानिक जखमी झाला; परंतु सिद्धार्थ यांना हौतात्म्य आले.
सिद्धार्थ यादव या पायलटचा झालेला मृत्यू काळजाला घर पाडणारा...
दोन तारखेला रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास विमानात तांत्रिक बिघाड झाला, याची जाणीव दोन्ही वैमानिकांना झाली. ‘आता मला माझ्या जीवाची काळजी नव्हती; पण विमान निवासी भागात कोसळू नये याची मला जास्त काळजी वाटत होती,’ असे सांगत सिद्धार्थ यादव यांनी मनाची तयारी करून विमान एका मोकळ्या मैदानात आणले, हा सुवार्डा गावाचा परिसर होता.
हवाई दलाचे जग्वार विमान तिथेच कोसळले, दोन्ही पायलट वेळेत बाहेर पडले, एक बचावला आणि सिद्धार्थ यादव हुतात्मा झाले. इतरांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव पणाला लावला. जामनगरमध्ये लष्कराचे जग्वार विमान कोसळले. त्यातील पायलट सिद्धार्थ यांचे वडील सुशील यांना आपल्या मुलाचा अभिमान आहे. स्वत: भारतीय लष्करात सेवा बजावलेले वडील सुशील कुमार यांना त्यांच्या मुलाचे हे बलिदान चांगलेच समजते. त्यांचे डोळेही ओले आहेत; पण आपल्या मुलाने देशासाठी बलिदान दिले आहे याचा अभिमानही आहे.
सिद्धार्थ यांच्या यांचा 23 मार्च रोजी साखरपुडा झाला होता. लग्नाची शहनाई अजून वाजायची होती; पण नशिबाने काहीतरी वेगळेच ठरवले होते. सिद्धार्थ या जगाचा निरोप घेऊन इहलोकीच्या प्रवासाला निघून गेले. लढाऊ विमानाच्या अपघाताने भारतीय वायुसेनेची कामगिरी आणि लढाऊ विमानांना झालेल्या अपघातांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘जशास तसे’ कर धोरणामुळे गेला आठवडाभर जग वेगळ्याच चिंतेत आहे. खुद्द अमेरिकेतही जनता रस्त्यावर उतरली आहे. बाजार कोसळत आहेत. जगात मंदीचे ढग दाटून आले असताना दुसरीकडे भारतात लढाऊ विमाने कोसळण्याच्या घटना काही थांबायला तयार नाहीत. जगात चौथ्या क्रमांकाचे हवाई दल असलेल्या भारतीय वायूसेनेच्या लढाऊ विमानांना दर काही दिवसांनी अपघात होतात आणि त्यात आपले लढाऊ पायलट हुतात्मा होतात.
भारताकडे जगातील चौथ्या क्रमांकाचे हवाई दल
आठ ऑक्टोबर 1932 रोजी स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय वायुसेनेची स्थापना झाली, तेव्हापासून वायूदलाची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. जगातील पहिल्या चार हवाई दलांमध्ये भारतीय वायूसेनेचा समावेश होतो. सुखोई एसयू 30 एमकेआय, राफेल, मिराज 2000, मिग -20, तेजस, मिग -21 यासारखी विमाने आणि अपाचे एएच-64ई, सीएच-47 चिनूक, ध्रुव, चेतक, चिताह, एमआय-8, एमआय-17, रुद्रा, एमआय-26, एमआय-25/35 या हेलिकॉप्टर्ससह कितीतरी क्षेपणास्त्रांनी भारतीय वायुसेना सुसज्ज आहे.
400 पेक्षा जास्त अपघात आणि 200 हून अधिक पायलट गमावले
वायुसेनेच्या बळावर आपण आतापर्यंत शत्रूंना सडेतोड उत्तरे दिली आहेत; मात्र गेल्या काही वर्षांपासून विमानांच्या आणि हेलिकॉप्टर्सच्या अपघातांमुळे वायुसेनेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या भीषण अपघातात भारताने आपले पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ बिपीन रावत यांना गमावले. या अपघाताला एक महिनाही होत नाही, तोच पुन्हा राजस्थानमध्ये एका मिग-21चा अपघात झाला होता.
24 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानातील जैसलमेरमध्ये भारतीय हवाई दलाचे ‘मिग-21 बायसन’ हे लढाऊ विमान कोसळले. या अपघातामध्ये लखनऊचे रहिवासी असलेले विंग कमांडर हर्षित सिन्हा हुतात्मा झाले. मिग-21चा हा वर्षातील पाचवा अपघात ठरला. जेव्हापासून ‘मिग 21’ हे विमान भारतीय हवाई दलामध्ये सामील केले गेले, तेव्हापासून आतापर्यंत त्याचे 400 पेक्षा जास्त अपघात झाले.
या अपघातांमध्ये आपण 200 हून अधिक पायलट गमावले आहेत. आतापर्यंत सर्वात जास्त अपघातग्रस्त विमान म्हणून ‘मिग 21’कडे पाहिले जाते. सेवेत दाखल होऊन 60 वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटूनही अद्याप त्याला निवृत्त का केले नाही, त्याचे वारंवार अपघात होत असताना ते वापरण्यासाठी अट्टहास का, असे अनेक प्रश्न ‘मिग 21’च्या बाबतीत उपस्थित केले जात आहेत; मात्र त्याची ठोस उत्तरे अद्याप कुणाकडेही नाहीत.
‘मिग 21’या विमानाची ‘नाटो’च्या रेकॉर्डमध्ये ‘फिशबेड’ अशी नोंद आहे. पूर्वीच्या सोव्हिएत युनियनमधील ‘मिग डिझाईन ब्यूरो’ने या सुपरसॉनिक जेट इंटरसेप्टर विमानाची निर्मिती केलेली होती. 1959 ते 1985 या काळात या विमानांचे उत्पादन चालले. त्यानंतर भारतासह अनेक देशांनी या विमानात अद्ययावत बदल करण्यात आले. 16 जून 1955 रोजी ‘मिग 21’ने पहिले उड्डाण केले होते. वैमानिकी इतिहासाचा विचार केल्यास हे विमान इतिहासातील सर्वाधिक उत्पादित सुपरसॉनिक जेट आहे. पहिले सिंगल इंजिन ‘मिग-21’ विमान 1963 साली भारतीय हवाई दलात आले, तेव्हापासून आतापर्यंत विविध प्रकारांतील एकूण 874 विमाने हवाई दलामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.
‘मिग 21’ ला अनेक देशांनी निवृत्त केले असतानाही भारताला इतकं प्रेम का?
‘मिग 21’ लढाऊ विमानांच्या मोठ्या प्रमाणात अपघात होण्याचे एक कारण म्हणजे हवाई दलात दीर्घकाळ इतर लढाऊ विमानांची अनुपस्थिती. कित्येक वर्षे हवाई दलात नवीन लढाऊ विमानांचा समावेश केला गेला नव्हता. त्यामुळे संपूर्ण भार ‘मिग-21’ वर राहिला. याशिवाय 1980, 90 आणि 2000 दशकांच्या सुरुवातीला पायलट प्रशिक्षणासाठी फक्त सुपरसॉनिक ‘मिग 21’ लढाऊ विमाने वापरली जात होती.
याच काळात या लढाऊ विमानाचे अनेक अपघात झाले आहेत. आतादेखील प्रशिक्षणासाठी ‘मिग 21’ चा वापर जास्त केला केला जातो. गेल्या पाच वर्षांत 57 विमान अपघात झाले आहेत. त्यात भारतीय वायू दल, नौदल, सीमा सुरक्ष दल आणि लष्करी अपघातांचा समावेश आहे. त्यापैकी ‘मिग 21बायसन’चे सहा तर मिगच्या इतर व्हेरियंटचे 11 अपघात झाले आहेत. आतापर्यंत ‘मिग 21’चे सर्वात जास्त अपघात झालेले आहेत.
असे असूनही आजही पायलट त्याला सर्वोत्तम फायटर जेट मानतात. 1971 आणि 1999 सालच्या भारत-पाक युद्धात ‘मिग 21’ ने पाकिस्तानचा पराभव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय हवाई दलाकडे ‘मिग 21’ विमानांचे 4 स्क्वॉड्रन्स आहेत. स्क्वॉड्रन्समधील लढाऊ विमानांची एकूण संख्या 16 ते 18 पर्यंत असते. या अंदाजानुसार, हवाई दलाकडे 64 मिग-21 विमाने उपलब्ध आहेत.
‘मिग 21’ हे एकमेव विमान आहे, ज्याचा वापर जगातील 60 हून अधिक देशांनी केला आहे. या विमानाचे आतापर्यंत 11 हजार 496 युनिट्स बनवण्यात आले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 1985 मध्ये रशियाने या विमानाचे उत्पादन थांबवले असून त्याला निवृत्तीदेखील देण्यात आली आहे. रशियासह असे अनेक देशांनी ‘मिग 21’ सैन्यातून निवृत्त केले असले, तरी भारतात मात्र आजही त्यांचा वापर केला जात आहे. 1991 मध्ये ‘मिग 21’ला निवृत्ती देण्याचे निश्चित करण्यात आले होते; परंतु आजपर्यंत ते अपग्रेड करून चालवले जात आहे. अपग्रेड होऊनही त्याच्या अपघातांची संख्या घटलेली नाही.
मानवी त्रुटी ते तांत्रिक दोष हेच लढाऊ विमानांच्या अपघाताचे कारण
2006 मध्ये रिलीज झालेला आमिर खानचा ‘रंग दे बसंती’ हा ब्लॉकबस्टर चित्रपट, ‘मिग 21’ अपघातात आपला जीव गमावलेल्या हवाई दलाच्या पायलटच्या गोष्टीभोवती फिरतो, तेव्हापासून तर ‘मिग 21’ अपघातांचा मुद्दा जास्तच प्रकर्षाने समोर आला आहे. 2000 ते 2020 दरम्यान, भारताने 200 विमाने गमावली आहेत. यामध्ये अनेक लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक विमानांचा समावेश आहे.
स्थायी समितीच्या अहवालानुसार 2017 ते 2022 या कालावधीत भारतीय हवाई दलाने 34 विमाने गमावली. भारतीय हवाई दलाने अनेक विमाने गमावली असून, त्याची अनेक कारणेही समोर आली आहेत. त्यात मानवी त्रुटी ते तांत्रिक दोष हे मुख्य कारण मानले जातात. 2017 ते 2022 दरम्यान भारतात अशा प्रकारच्या अपघातांची कारणे काय आहेत, हे स्थायी समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अपघातांचे कारण मानवी त्रुटी 19 तांत्रिक बिघाड 9 अशी कारणे दिली आहेत.
भारतीय हवाई दल सध्या अनेक आव्हानांनी वेढलेले आहे. एकीकडे निधीची कमतरता स्पष्टपणे दिसून येत आहे, तर दुसरीकडे मिळालेल्या निधीचाही पुरेपूर वापर झालेला नाही. याशिवाय, भारतात खरेदी प्रक्रिया अजूनही इतकी संथ आहे, की वाढत्या गरजा वेळेत पूर्ण होत नाहीत. गेल्या दोन दशकांत हवाई दलाने आपल्या ताफ्यात फार कमी नवीन विमाने समाविष्ट केली आहेत. सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेत असलेले विमान तेजस भारतात तयार केले जाणार आहे; परंतु त्यात सतत विलंब होत आहे. कारण अमेरिकेतून आलेल्या ‘जीई-404’ इंजिनचा तुटवडा आहे, त्यामुळे संपूर्ण जागतिक साखळी प्रभावित झाली आहे. अशा परिस्थितीत भारतीय हवाई दलाचीही प्रतीक्षा वाढत आहे.






