ज्योति यादव
तो मुंबईच्या अनेक पॉश बंगल्यात जातो, त्यांच्या किचनमध्ये जाऊन भाज्या चिरतो, जेवण बनवतो… दुसऱ्या दिवशी तो बॉलिवूडच्या नट-नट्यांसोबत मस्तपैकी फोटो काढतो. मात्र 1990 च्या दशकात अशी परिस्थिती नव्हती. त्यावेळी तो फक्त सोळा वर्षांचा, बिहारच्या एका छोट्या खेड्यातला मुलगा होता. वडिलांनी त्याच्या हातात केवळ 250 रुपये ठेवले, यासाठी की एका बाजूच्या ट्रेनचे तिकीट काढून तो मोठ्या शहरात मजुरी करू शकेल. दोन दशकांनी तोच मुलगा, आता 42 वर्षांचा झालायं, ज्याचं नाव आहे दिलीप मुखिया… बिहारच्या दरभंग्यातल्या आपल्या मल्लाह टोला वस्तीमध्ये तो इतक्या वर्षांनी परत आला, ज्याला गावकऱ्यांनी आतापर्यंत फक्त मोबाइलच्या स्क्रीनवरच पाहिलं होतं… फराह खानचा कुक आणि सध्याचा इंटरनेटचा स्टार, दिलीप मुखिया…
हा तोच दिलीप, ज्याला श्रुती हासन “द रिअल स्टार” म्हणते. जॅकी श्रॉफ त्याला प्रेमाने “बीडू” म्हणतो,. इतकचं काय तर राजस्थानचे राजे-महाराजेही त्याला पाहून उत्साहाने भेटतात. फराह खान तर त्याला सतत चिडवते, म्हणते आता इतका फेमस झालाय की ‘ऑरी’लाही ओळखत नाही.”
फराह खानचा कुक ते सोशल मीडियाचा स्टार…
ब्रँड्सनी तर दिलीपची दखल लगेच घेतली. फक्त एका वर्षात दिलीप न्यून Myntra, Amazon, Urban Company, Flipkart, स्किनकेअर ब्रँड्स, वॉशिंग मशीन, प्रेशर कुकर, ऑर्गेनिक फूड अशा कित्येक जाहिरातींमध्ये दिसू लागला. शाहरुख खानसोबत एका जाहिरातीमध्ये कॅमिओही केला. तो YouTube फॅनफेस्टच्या स्टेजवर चालत गेला, राजवाड्यांमध्ये शूट केले, इन्फ्लुएन्सर्ससोबत फोटो काढले आणि परदेशापर्यंत पोहोचला.
दिलीपचा संघर्ष तोच होता जो बिहारच्या प्रत्येक तरुणाचा असतो. दरवर्षी लाखो बिहारी पुरुष शहरांच्या दिशेला रवाना होतात. घरकाम, मजुरी, शेती-काम किंवा फॅक्टरीत मिसळून जाणारी जीवनशैली हा बिहारी तरुणांचा स्वभाव. परतीचा प्रवास त्यांना माहीत नसतो आणि यातले लाखो स्थलांतरित तरुण शहरात येऊन अदृष्यच राहतात. दिलीपची कहाणी “स्वप्न घेऊन मुंबई गाठणाऱ्या बिहारी मुलाची” नाही, ती साधी ब्लू-कॉलर इन्फ्लुएन्सरची सक्सेस स्टोरीदेखील नाही, ती जातीचे चटके सहन करणाऱ्या ‘तथाकथित’ खालच्या जातीच्या तरुणाचीही नाहीये. त्याची गोष्ट म्हणजे सगळ्या ठराविक चौकट मोडून आपली स्वतःचं चौकट तयार करणाऱ्या तरुणाची कथा आहे. त्याचं आयुष्य नशिबावर नाही, तर नशिब, अचूक वेळ आणि “करून टाकू” अशा बिनधास्त वृत्तीवर उभं आहे.
“बात ई है कि अपना बिहारी मेहनती है और कमा लेता है.”
एका शूटच्या ब्रेकमध्ये, नुकत्याच फराह खानसोबत न्यूझीलंडहून परत आल्यावर दिलीपने ‘द प्रिंट’शी बोलताना फोनवर सांगितलं, “बात ई है कि अपना बिहारी मेहनती है और कमा लेता है.” फोनवर बोलताना त्याची मुम्बईया शैली निवळून गेली, आवाजात मऊपणा आला, आणि परत एकदा बिहारची मैथिली मिसळली. जणू त्याचं आयुष्य दोन भाषांमध्ये, दोन जगांमध्ये अडकून राहिलं आहे.
मायानगरी मुंबई गेल्या अनेक वर्षांपासून यूपी-बिहारच्या कष्टावर चालते. कुक, क्लिनर, ड्रायव्हर, मजूर… पण लोकांच्या नजरेत ते गरीब, दमलेले, दुर्लक्षित लोक म्हणूनच दिसतात. दिलीप मात्र हे चित्र उलटे करून टाकतो. तो एक असा दुर्मिळ व्यक्ती आहे, ज्याला मुंबईच्या सेलिब्रिटी वर्तुळातसुद्धा “बिहारी माइग्रेंट” असल्याचा अभिमान वाटतो. तो एकाच बिहारी विस्थापित तरुणदेखील आहे आणि तरीही त्याची स्वत:ची एक कहाणी आहे. एक कोटीपेक्षा अधिक बिहारी राज्याबाहेर मजुरी करतात. बिरारच्या पालीसारख्या गावांतील 80 टक्के पुरुष कामासाठी शहरात जातात. दिलीपसारखे बरेच जण वर्षातून एकदाच घरी येतात. अशा गावात दिलीपचे परतणे म्हणजे एखाद्या चित्रपटाचा प्रसंगच.
फराह खानसोबतचं नातं
दिलीपचा इंटरनेटशी पहिला सामना गेल्या वर्षी झाला, जेव्हा तो फराह खानच्या “वर्ल्ड फेमस” यखनी पुलाव व्हिडिओमध्ये दिसला. फराहने तिच्या खास शैलीत चाकू खाली ठेवून म्हटलं, “मी का कापू? दिलीप करेल.” मग चिडवाचिडवी सुरू झाली, “एक्टिंग नाही ना येत? पगार घेतेवेळीच एक्टिंग करतोस!” मटनऐवजी चिकन आणल्यावर फराह त्याला “फायर” करते, आणि आठवड्यानंतर पूर्ण नाट्यपूर्ण पद्धतीने परत कामावर ठेवते.
लोकांना फराह खान आणि दिलीप ही जोडी लगेच भावली. कमेंट्स यायला लागले. यानंतर दिलीपच्या भोवती तयार झालं एक वेगळे विश्व. पगार कपतीचे विनोद, महागड्या मुंबईतील घरांवर टोमणे, कुठेही स्विमिंग पूल दिसला की त्यात पोहण्याची इच्छा, आणि फराहचं म्हणणं की दिलीपच्या स्टारडमने “चॅनल हायजॅक” केलं आहे. फराहने दिलीपला फक्त नोकरी दिली नाही, तर त्याला कुटुंबासारखं वागवलं. दिलीप सेलिब्रिटीजच्या घरी फराहसोबत जातात, शूटिंगला सहभागी होतात आणि मजेदार अंदाजात गप्पा मारतात. फराह गंमतीत म्हणते, "मी एक मॉन्स्टर तयार केलंय" आणि दिलीपही हसत उत्तर देतात, "मी अजूनही मॅडमला शिकवत आहे."
सेलिब्रिटींच्या किचनमध्ये जेव्हा दिलीप जातो तेव्हा त्याला आपल्या सारखीच माणसं भेटतात. बिहारच्या मधुबनी, सीतामढी, नेपाळ सीमेजवळच्या गावांतून कुक असणारे त्याचे मातीतले साथीदार. दिलीप त्यांच्याशी त्याच भाषेत संवाद साधतो आणि आपल्या कामाला लागतो.
“दिलीप दिसला की आम्हाला हसू येतं !”
इंटरनेटवर प्रचंड लोकप्रिय असलेल्या दिलीपच्या घरची परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी आहे. दरभंगातील त्याच्या मल्लाह टोला वस्तीमध्ये एकमेकांना खेटून घरं आहेत. दिलीपच्या अर्धवट बांधकाम असलेल्या घरातल्या अंगणात, भूसा ठेवलेल्या ढिगाजवळ काही स्त्रिया बसून गप्पा मारत होत्या. त्या सगळ्या दिलीपच्या चाहत्या. प्रमिला देवी, त्यांची वहिनी, म्हणाल्या, “दिलीप दिसला की आम्हाला हसू येतं !” आणि सगळ्या बायका एखाद्या व्हिडिओमधल्या संवादाची नक्कल करून हसत सुटल्या. जिल्ह्याच्या बाहेर आजपर्यंत पाय न ठेवलेल्या या बायकांना आता “शूट”, “व्यूज”, “मिलियन”, “बॉलिवूड”, असे शब्द सवयीचे झाले आहेत.
दिलीपची वाटचाल म्हणजे उत्तरी बिहारातून बाहेर पडणाऱ्या लाखो तरुणांची प्रतिकृतीच. ट्रेनचं एकबाजूचे तिकीट आणि खाण्यात 50 रुपये खर्च करून उरलेले 200 रुपये त्याने घरी मनीऑर्डरने पाठवले होते. वडीलं मजुरी करायचे, आई पाच मुलांना वाढवत होती. त्याला ती दारिद्र्याची दुनिया सहन होत नव्हती म्हणून त्याने आई-वडिलांसाठी बैल व नांगर घेतला, तरी ते पुन्हा मजुरीलाच गेले. वडिलांना तीच दुनिया ठाऊक होती.
मुंबईत कसा आला?
गाव सोडल्यानंतर दिल्लीच्या शाहदरा ते राजौरी गार्डन या भागात दिलीपने दहा वर्षे झाडू, पुसणे, स्वयंपाक, भाजी चिरणे अशी कामे केली. महिन्याला 300 रुपये मिळायचे. तेवढेही तो पूर्ण घरी पाठवायचा. बिहारमधील स्थलांतर आता ही एक जीवनव्यवस्था झाली आहे. बहुतेक पुरुष बाहेर कमावतात; मल्लाह जातीतले लोक पारंपरिक मासेमारी सोडून देत आहेत कारण खर्च वाढले आणि काम टिकाऊ राहिले नाही. बायका शेतकामात दिवसाला 150-200 रुपये मिळवतात.
दिलीपही याच प्रवाहात वाहत होता, मात्र अचानक त्याच्या आयुष्याने वळण घेतलं. दिल्लीत काही वर्ष काम केल्यानंतर तो मुंबईत आला. श्रीमंत घरांमध्ये कधी कायमस्वरुपी तर कधी तात्पुरता कुक म्हणून त्याने काम केले. ड्रायव्हिंगही शिकलाच होता “बॅकअप प्लॅन” म्हणून.
आघाडीची दिग्दर्शिका आणि कोरियोग्राफर फराह खानकडे कामाला जाणं हा एक योगायोग होता. एका ओळखीच्या महिलेने दिलीपला फराहचं नाव सुचवलं.दिलीपला राहण्यासाठी वेगळी जागा हवी होती म्हणून 20,000 रुपयांवर त्याने काम सुरू केलं आणि आज 13 वर्षांनंतरही तो तिथेच आहे. फराह खान YouTube चॅनेल सुरू करणार आहेत हे त्याला ठाऊक नव्हतं. तिने सहज विचारलं, “व्हिडिओमध्ये येशील?” त्याने हो म्हटलं आणि त्याच्याही आयुष्यात कॅमेऱ्याने नवा अध्याय उघडला. ती सेलिब्रिटींच्या घरी जाऊन विविध पदार्थ बनवते. तिच्यासोबत दिलीपही असतात. दिलीपच्या बोलण्याचा अंदाज, त्यांचे विनोदी संवाद आणि बिनधास्त उत्तरं देण्याची शैली प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. "मॅडमला शिकवू नका, मला येतं" सारखे डायलॉग्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.
बिहारमध्ये बांधतोय सहा खोल्यांचा बंगला
दिलीपने आपल्या गावात तीन मजली, सहा खोल्यांचं मोठं घर बांधायला सुरूवात केलीये. अजून बांधकाम पूर्ण झालेलं नाही , स्विमिंग पूल बनवायचं बाकी आहे. गावात फक्क घर बांधण्याचं काम त्याने व्यवस्थित पैसे कमवण्याच्या येण्याआधीच सुरू केलं होतं. आधी जी जागा गवताळ आणि प्लास्टिकच्या छपराची झोपडीसारखी होती, तिथे आता अद्याप प्लास्टर न झालेलं तीन मजली घर उभं आहे. घरावर साधारण तीन लाख खर्च झाले. भाचीच्या लग्नाचाही सगळा खर्च त्यानेच केला. जुन्या आठवणींचे एकाही फोटो घरात नाहीत. आर्थिक अडचणीमुळे त्याला लवकर शिक्षण सोडावं लागलं होतं. पाच रुपये किमतीची वही वर्षभर चालवायची. पन्नास पैशांचा पेन. पाचवीत प्रथमच सेकंड-हँड पुस्तकं घेतली.
आपल्या मुलांना हे सहन करावं लागू नये म्हणून त्याने त्याच्या दोन मुलांना इंग्लिश मीडियममध्ये टाकलं. फी 1400 रुपये, ट्युशन आणि वाहन मिळून जेमतेम 800–600 रुपये. “चांगलं शिक्षण नाही तर स्वप्न कसं बघणार?” तो म्हणतो. पण मोठा मुलगा चंदन दहावीनंतर शाळा सोडून मुंबईला त्याच्यासोबत काम करतोय. फराह खानने त्याच्या कुकिंग कोर्ससाठी मदत केली. दुसरा मुलगाही आता शिकत नाही. सर्वात लहान आठ वर्षांचा अजून शाळेत आहे. आई अभिमानाने सांगते की तो A-Z म्हणतो.
बिहारमध्ये शाळा सोडण्याची दर खूपच जास्त आहे. त्यामुळे मुलांना झटपट कमाई जवळची वाटते. दिलीपची पत्नी अनीता कधी मुंबईला गेली नाही. पाटण्यातही नाही. तिला जास्त हालचाल करता होत नाही; पाच किमी जरी प्रवास केला तर तिला लगेच उलटी होते. दिलीप म्हणतो, “ती शहरात कशी राहील? घरची राणी आहे, घरीच राहील.” तिची स्वप्नं साधी आहेत. चांगले बाथरूम, कधीतरी टाइल्स आणि मोठ्या मुलाच्या लग्नात फराह खान येणार ही आशा.
बाथरूमला दार नाही, खिडकी नाही, मातीची जमिन, पण ती हसून म्हणते, “छत तरी आहे ना.” दिलीप आणखी पैसे जमवेल तेव्हा तेही बनेल. लोक त्याच्या कमाईबद्दल चर्चा करतात. त्यावर तो सरळ म्हणतो, “लाखो कमावलं असतं तर हे घर अजून कच्चं असतं का?” आणि मग हसून म्हणतो, “जे आहे त्यात खुश आहोत.”
(सौजन्य - द प्रिंट)






