(बिस्मी टासकिन)
पंजाबच्या हबीबवाला गावात रोज रात्री 75 वर्षांचे शेर सिंग हातात मेगाफोन घेऊन घोषणा देत फिरतात… घोषणा ऐवजी आपण त्याला दवंडी म्हणू शकतो. त्यांच्या दवंडी पिटण्याच्या वेळाही ठरलेल्या आहेत. पहिली दवंडी संध्याकाळी लाईट बंद करा असं सांगण्यासाठी, दुसरी चुलीवर जेवळ बनवल्यानंतर चुलीचा जाळ विझवण्यासाठी आणि तिसरी ‘ब्लॅकआऊट होत आहे’ हे सांगण्यासाठी…पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तीव्र संघर्षामुळे शेर सिंगची जबाबदारी अधिकच वाढलीये. आकाशात ड्रोन दिसले रे दिसले की शेर सिंग लगेचच सावध होतात आणि गावातल्या प्रत्येकाला पटापट फोन करून सगळं काही आलबेल आहे की नाही याची खबरदारी घेतात.
पाकिस्तानच्या सीमेपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या हबीबवाला गावातील आपल्या छोट्याशा घरात सध्या शेर सिंग रात्रभर डोळ्यात तेल घालून जागेच असतात. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात या शेर सिंगने ‘होमगार्ड’ची सेवा बजावली होती.
पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यात साधारण चार हजाराच्या आसपास असलेल्या लोकसंख्येचे एक शांत आणि समृद्ध गाव म्हणजे हबीबवाला… सीमेपलीकडून होत असलेल्या पाकिस्तानच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हे गाव आता सैन्याच्या ताब्यात आहे. गावातील अधिकांश नागरिक केंद्राने तयार करून दिलेल्या वस्तीत राहायला गेले असले तरी गावातील अनेक लोकं इतक्या तणावग्रस्त स्थितीतही शेतातल्या घरातच राहात आहेत. अत्यंत सुपीक आणि हिरवाईने नटलेला हा सगळा भाग. शेतात अरबी, सिमला मिरची, गाजर, मुळा यांची पिकं दूरवर पार आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत पसरलेली. सुरक्षा रक्षकांनी आखून दिलेल्या नियमावलींचे पालन करून हबीबवाला गावाचे शेतकरी पार सीमेपर्यंत जातात. 
लहान मुलं, सुना यांना दिलं पाठवून आणि वयस्कर मंडळी मात्र ‘ऑन ड्युटी’वर
पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशात जसजसा तणाव वाढत गेला तसा हबीबवाला आणि शेजारच्या जलालवाला गावांतील लोकांनी एक निर्णय घेतला. त्यांनी त्यांची मुलं, सुना, नातवंड यांना गावामध्ये तयार केलेल्या सरकारी वस्त्यांमध्ये पाठवून दिलं आणि वयोवृद्ध मात्र तिथेच थांबले. शेती करण्यासाठी, सुरक्षा दलाला मदत करण्यासाठी आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी…
65 वर्षांचे पुरन सिंग सांगतात,’’आमचा वंश पुढे कायम राखण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलाय. जर समजा परिस्थिती खूपच बिघडली आणि ही जागाच पाकिस्तानच्या हल्ल्यात नष्ट झाली तर किमान आमचा वंश तरी पुढे राहिला पाहिजे… शेतजमीन हे आमचे पहिले प्रेम आहे, त्यामुळे आमच्या गावाचे युवक, आम्ही वयस्कर मंडळी इथेच थांबलो आहोत. दिवसभर शेती करतो आणि अंधार झाला की लष्कराला मदत करतो, बंकरमध्ये असलेल्या लोकांची काळजी घेतो.’’
संबंधित लेख वाचा: 1) कारगिल युद्धाच्या वेळी प्रसारमाध्यमांनी जे केले त्याचाच ‘पार्ट 2’ आता सुरू झालाय… |
‘’आम्ही म्हातारे झालो असलो तरी अजूनही आमच्यात लढण्याची हिंमत आहे…’’
ते पुढे म्हणतात,’आम्हाला सीमेवर लढणाऱ्या जवानांना साथ द्यायची आहे, मरणाला आम्ही घाबरत नाही. हे काही आमच्यासाठी पहिलेच युद्ध नाहीये. आमच्या पूर्वजांनी 1947 अनुभवलं आहे, माझ्या बहिणींनी 1965 बघितलयं. जर आम्ही इथून पळ काढला तर इतरांचे मनोधैर्य कोण उंचावेल? आम्ही म्हातारे झालो असलो तरी अजूनही आमच्यात लढण्याची हिंमत आहे…’’
‘’घाबरू नका आणि सैन्याला साथ द्या…’’
पुरन सिंगच्या बाजूलाच उभी असलेली त्यांची पत्नी बंतो साई आपल्या नवऱ्याच्या या प्रतिक्रियेवर मान डोलावत होती. जेव्हा त्यांना विचारलं की, घाबरलात का…? तर त्या त्वरित उत्तरल्या, एका सेकंदासाठीही नाही… मी माझ्या मुलांना आणि नातवंडांना घाबरले म्हणून गाव सोडायला नाही सांगितलंय. माझे वडील नेहमी मला सांगायचे की, युद्धादरम्यान काहीही करा, पण घाबरू नका आणि सैन्याला साथ द्या…’’
‘’जर सैनिक इथे थांबत असतील तर मग आम्ही का नाही?
63 वर्षांची बंतो साई एका सैनिकाची कन्या आहे ज्यांनी 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात कर्तव्य बजावले होते. बंतोचे घर सीमेपासून अवघ्या 500 मीटर अंतरावर आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, आम्ही पाकिस्तानच्या निशाण्यावर आहोत. टार्गेट झोनमध्ये… इथेच लष्कराचा तळ आहे. लोकांनी आम्हाला इथून पळ काढायला सांगितला. पण आम्ही त्यांना म्हणालो, जर सैनिक इथे थांबत असतील तर मग आम्ही का नाही? जर कोणी जखमी झाला, किंवा सैनिकांना मदतीची गरज लागली तर आम्ही आहोतच इथे देखभाल करायला. मजबूत बनण्याशिवाय आमच्याकडे दुसरा काही पर्याय नाही…’’
75 वर्षीय शेर सिंग यांची ड्रोन ड्युटी
शेर सिंग यांनी गेल्या काही दिवसांपासून अशा अनेक रात्री जागवल्या आहेत. युद्धाच्या अगोदरही त्यांनी परिसरात ड्रोन उडताना पाहिलेले आहेत. ते सांगतात, युद्धाच्या बरोबर एक आठवड्यापूर्वी अरबी पिकाच्या शेतात ड्रोन पडताना मी पाहिलं. ताबडतोब मी त्या दिशेने गेलो आणि माझ्या लक्षात आलं की ड्रोनने ‘हिरोईन’ हे अंमली पदार्थाचे एक पाकिट टाकलं होतं. मी लगेचच स्थानिक पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं…मी रात्रभर पहारा दिला, गावातले लोकं माझ्यावर भरोसा ठेवतात. झोप आणि वय हे शब्द माझ्या डिक्शनरीत नाहीयेत’’
शेर सिंग म्हणतात, 1971 चे युद्ध वेगळं होतं. आता आम्हाला हे देखील कळत नाही की हल्ला कोणत्या दिशेने होणार आहे. सगळं काही टेक्नोलॉजीनुसार सुरू आहे. ड्रोनला शोधणं कठीण आहे. आम्हाला फक्त इतकाच प्रोटोकॉल माहितीये की त्याच्या जवळ जाऊ नये आणि त्याला हात लावू नये.
गावातील महिला दररोज जवानांना देतात पोळी-भाजी
जलालवाला गावात इकरा बाई आणि काही इतर महिलांचा गट दररोज भाजी-पोळी बनवण्याचं काम करतात आणि आजूबाजूला तैनात असलेल्या सैनिकांना आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना टिफीन बनवून देतात.
45 वर्षांच्या इकरा बाई सांगतात, एका रात्री आमची गरोदर असलेली पाळीव कुत्री खूप रडत होती, तिला बघायला मी बाहेर आली तेव्हा आकाशात अचानक काहीतरी चमकू लागलं. मी लगेच घरात गेली आणि इतर महिलांना बोलावून घेतलं. आम्ही लगेचच आमच्या सगळ्या जनावरांना घरात घेतलं, त्यादिवशी आमच्या कुत्रीने पाच पिल्लांना जन्म दिला.’’
एका दिवसांत गावकऱ्यांनी चार बंकर तयार केले
पुरन सिंगचा मुलगा बगीचा सिंग हा हबीबवाला गावाचा सरपंच आहे. त्याने आजूबाजूच्या गावातील सरपंचांशी संपर्क साधून एक योजना तयार केली. सध्या हल्ले फक्त रात्रीच होत नसून दिवसाढवळ्याही होतात, त्यामुळे बंकर का नाही तयार करायचे…?
लगेचच गावातील सगळ्या महिला कुदळ-फावडे घेऊन आल्यादेखील आणि गावातील महिला-पुरुषांनी एका दिवसात बंकर बनवले देखील. गावकऱ्यांनी एकूण चार बंकर बनवले, ज्याला लोखंडी शटर लावून मजबूत केले. आराम करण्यासाठी आत गाद्यांची व्यवस्था केली. पाकिस्तानी सैन्याचा मुकाबला करण्यासाठी महिला हातात हथोडा, चाकू आणि लाठ्या-काठ्यांनी सज्ज राहिल्या.
गावाील दुर्गा बाई म्हणतात, जेव्हा महिला शेतात काम करत होत्या तेव्हा पुरुषांनी बंकर खोदले आणि जेव्हा पुरुष शेतात असायचे तेव्हा महिलांनी बंकर खोदण्याचे काम केले. बंकर तयार झाल्यावर आम्ही ते वाळू आणि पानांनी झाकले जेणेकरून आजूबाजूच्या बागेमध्ये ते लपून जातील.
हे सांगत असताना तिचा नऊ वर्षांचा मुलगा एका बीएसएफ जवानाला टिफिन देत म्हणत होता, ‘’मला तुमच्यासारखं बनायचं आहे…’’
(सौजन्य - द प्रिंट)






