‘’सट्टा वा जुगाराचा उद्देश न ठेवता निव्वळ मनोरंजनासाठी पत्ते खेळणे म्हणजे नैतिक अध:पतन नव्हे. पत्ते खेळण्याचे अनेक प्रकार आहेत. पत्ते खेळण्याचा प्रत्येक प्रकार हा नैतिक अवमूल्यन या प्रकारात मोडतो, असे म्हणणे कठीण आहे. विशेषत: मनोरंजन म्हणून पत्ते खेळले जातात, तेव्हा ते नैतिक अध:पतन कसे असू शकते? उलटपक्षी सट्टेबाजी किंवा जुगार यांचा लवलेशही नसलेला पत्त्यांच्या खेळाचा प्रकार आपल्या देशात अनेक ठिकाणी गरिबांच्या मनोरंजनाचा स्रोत म्हणून ओळखला जातो.’’
हे कुणा पत्त्यांचं व्यसन असणाऱ्याचं म्हणणं नसून थेट सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. दोन दिवसांपूर्वी पत्ते खेळण्यावरून एका सोसायटीच्या सेक्रेटरीला पदमुक्त करण्यात यावं अशी याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे सुनावणीसाठी आली होती. त्यावेळी न्यायमूर्ती सुर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने हे नमूद केलं.
याच पार्श्वभूमीवर आपण एकंदरीत पत्त्यांच्या रंजक विश्वाची मांडणी करणार आहोत. कोणी आणि कसा डिझाइन केला असेल हा पत्त्यांचा कॅट? पत्त्यांचा इतिहास पाहायला गेलं तर फारच रंजक आहे.
पत्ते…पत्त्यांचा खेळ, जागा, वेळ, वय किंवा आर्थिक स्तर असे कसलेही बंधन नसलेला विश्वव्यापी खेळ आहे. तो आजोबा आणि नातू यांच्या निरागस ‘भिकार-सावकार’ खेळापासून ते थेट लाखो रुपयांची हारजीत करणाऱ्या जुगारापर्यंत फिरतो. ‘पत्त्यांचा बंगला’ सतत कोसळत असूनही पुन्हा पुन्हा बांधण्याचा प्रयत्न अनेकांनी लहानपणी केलेला असतो. पत्त्यांच्या खेळाने मराठी साहित्याला अनेक नवीन शब्द दिले. जीवनात येणारी परिस्थिती आणि हातात येणारे पत्ते हे आपल्या इच्छेनुसार येत नसल्यामुळे, पत्त्यांची उपमा आध्यात्मिक पातळीवरही पोचते. अनेकांनी पत्त्यांच्या आधाराने सांगितले जाणारे भविष्यही जाणून घेतले असेल.
गंजिफा पासून पत्त्यांपर्यंत…
पत्त्यांचा सर्वात जुना उल्लेख चीनमध्ये नवव्या शतकात आढळतो. तेव्हा पत्ते बत्तीस होते. नंतर ते तेराव्या शतकात मंगोल आक्रमकांनी ‘सिल्क रोड’मार्गे पर्शियात (इराण) नेले. पर्शियन भाषेत त्याला गंजीफेह म्हणत. पत्ते मोगल मंडळींनी भारतात सोळाव्या शतकात आणले. भारतात ‘गंजिफा’ या पत्त्यांनी गोल आकार धारण केला. पत्त्यांची संख्या ही विष्णूचे दहा अवतार, राशी, नवग्रह यांच्या आधारे एकशेवीसवर पोचली. मुस्लिम राजवटीतील गंजीफांना ‘चंगकंचन’ म्हणत असत.
तो शब्द चंग आणि कंचन या पर्शियन व संस्कृत शब्दांमधून बनला असून त्यामध्ये शहाण्णव पत्ते असत. तसा उल्लेख ‘बाबरनामा’ ग्रंथात आहे. तो हिंदू खेळ असल्याचा उल्लेख ‘आयन- ए-अकबरी’ या ग्रंथात आहे. त्यात हा खेळ एकशेचव्वेचाळीस पानांचा आणि बारा जणांमध्ये विभागून खेळण्याचा असा उल्लेख आहे. गंजिफा हे चौकोनी, आयताकृती, षटकोनी आकाराचेही होते. ते हस्तिदंतापासूनही तयार केले जात असत.
खेळाची सुरुवात सुमारे 800 ते 1000 वर्षांपूर्वी चीनमध्ये
या खेळाची सुरुवात सुमारे 800 ते 1000 वर्षांपूर्वी चीनमध्ये झाली. पहिल्यांदा कागदी चलन आणलं तेही चिनी सत्तांनी. मुळात हा धनिक दरबारी आणि व्यापारी मंडळींचा पैशांचाच खेळ असावा. पण खरे पैसे बाळगणं जिकिरीचं असल्यानं त्याचं रूपांतर पत्त्यांच्या संचात झालं. त्या काळी जगभर समुद्री व्यापार चांगलाच विकसित झालेला होता. व्यापारी मालवाहतुकीबरोबर सांस्कृतिक देवाण-घेवाणसुद्धा साहजिकपणे होते. अशाच एका व्यापारी दौर्यात 40 पत्त्यांचा संच चीनमधून मध्य-पूर्वेत, पर्शिया, अरेबिया आणि इजिप्तपर्यंत येऊन पोहोचला आणि तिथल्या संस्कृतीत मिसळला.
पर्शियाई लोकांनी प्रत्येक गटात राजा आणि वजीर असे 2 नवे पत्ते घालून 48 पत्त्यांचा संच तयार केला. हा संच पुढे युरोपात गेला. तिथे राजाच्या जोडीला दोन दरबारी आले. पहिल्यांदाच पत्त्यांवर राजा आणि दरबारी मंडळींची चित्र काढण्यात आली. हळूहळू पत्ते दरबारातून सामान्य घरांपर्यंतही पोहोचू लागले. फ्रान्समध्ये मात्र वजिराची जागा राणीनं घेतली आणि त्यात सैनिकाचा पत्ता वाढविण्यात आला. पुढे याच सैनिकाचा, जॅक म्हणजे गुलाम झाला.
इस्पिक, बदाम, किलवर आणि चौकट कसे आले?
इस्पिक, बदाम, किलवर आणि चौकट असं पत्त्यांचं वर्गीकरण झालं. हे चारही राजे फ्रान्समधल्या ऐतिहासिक व्यक्तींवर आधारित होते. बायबलमधला डेव्हिड इस्पीकचा राजा, अलेक्झांडर किलवरचा, शार्लमे बदामचा आणि जुलियस सीझर हा चौकट राजा झाला. 52 पत्त्यांचा हा फ्रेंच कॅट जगभरात प्रमाणित झाला. आजही आपण हेच पत्ते खेळतो. अजून एक गंमत म्हणजे अठराव्या शतकापर्यंत एक्का नव्हताच. 1 मूल्यांकन असलेला सगळ्यात कमी महत्त्वाचा तो पत्ता होता. अठराव्या शतकात फ्रेंच क्रांती झाली.
सामान्य जनतेनं राजाला उलथवून लावलं. तेव्हा पत्त्यातल्या राजाचीसुद्धा किंमत सर्वाधिक असून चालणार नव्हतं. यातूनच राजापेक्षा वरचढ असा एक्का जन्माला आला. पत्त्यांची घडणसुद्धा खूप प्रगत होत गेली. खेळण्याच्या सोयीसाठी पत्त्यांचा आकार आधीसारखा लांबुळका न ठेवता हातात मावेल या हिशोबानं कमी करण्यात आला. बरेच पत्ते हातात धरताना त्याचा पंखा करावा लागतो. त्यामुळे पत्त्यांचा बहुतांश पृष्ठभाग झाकला जातो. तेव्हा प्रत्येक पत्त्याचं मूल्य दर्शवणारे आकडे आणि अक्षरं समासात छापण्यात आले. राजा-राणीचे पत्ते उलट-सुलट धरले तरीही एकसारखे दिसावेत असे डिझाइन करण्यात आले.
पत्ते खेळताना सर्वाधिक हाताळले जातात ते त्यांचे कोपरे. ते मोडले जाऊ नये म्हणून गोलाकार करण्यात आले. पिसण्याच्या सोयीसाठी पत्त्यांचे पृष्ठ गुळगुळीत करण्यात आले.
पत्त्यांमध्ये जोकर कसा आला?
जोकरची पानं या पत्त्यांच्या संचात नव्हती. साधारण 1860च्या सुमारास पत्त्याच्या संचामध्ये जोकरचे प्रथम आगमन झाले. या नवीन पत्त्याची संकल्पना युक्रे या लोकप्रिय ट्रिक-टेकिंग पत्त्याच्या खेळावर आधारित होती. १९ व्या शतकाच्या मध्यवर्ती काळात अमेरिकन युक्रे खेळाडूंनी काही नवीन नियम करुन पत्त्याच्या खेळाचे स्वरूप बदलून टाकले. या नवीन नियमांसह खेळ खेळण्यासाठी 'ट्रम्प कार्ड'(हुकूम) म्हणून एका अतिरिक्त पत्त्याची गरज होती. त्यावेळी या नवीन कार्डाचे आगमन झाले. या नव्या पत्त्याचे नाव होते 'बेस्ट बोवर'.
युक्रे खेळाच्या लोकप्रियतेमुळे अमेरिकेतील पत्ते छापणाऱ्यांनी लगेच या बदलत्या प्रवाहात उड्या मारल्या व हे जादा 'ट्रम्प कार्ड' असणाऱ्या पत्त्याच्या संचाची निर्मिती करायला सुरुवात केली. त्याचे नाव त्यांनी 'जाँली जोकर' असे ठेवले. कारण या पत्याचा वापर करून एखादाला धक्का देऊ किंवा आश्चर्यचकित करू शकतो. काही काळातच जागतिक पातळीवर 'जोकर' नाव स्वीकारले गेले. त्यावर असलेली विदुषकाची रचनाही खूप लोकप्रिय झाली.
सावंतवाडीच्या राजांनी कारागिरांना गंजिफा बनवण्यास उत्तेजन दिले
महाराष्ट्रात सावंतवाडीच्या राजांनी, त्यांच्या कारागिरांची कला टिकवण्यासाठी त्यांना लाकडी खेळण्यांबरोबर खास प्रकारच्या कागदाचे गंजिफा बनवण्यास उत्तेजन दिले. तेथे राजवाड्यात खास गंजिफा बनवून विकले जात. तेथे प्रत्येक पत्ता हाताने रंगवला जातो. त्यातील बारकाव्याने रंगवलेली चित्रे विदेशात लोकप्रिय आहेत. त्या संचांचे खोकेही आकर्षक चित्रांनी आणि विविध रंगांमध्ये रंगवलेले असतात.
त्यांची चेहेरेपट्टी आणि वस्त्रांवरील चित्रे अस्सल मराठी धाटणीची असतात. त्यांतील राजा, राणी आणि गुलाम हे सर्व मराठी वेशभूषेत आहेत. राजाच्या कमरेला तलवार आणि हातात फूल आहे. कपाळाला गंध आहे. राणीसाहेबांच्या डोईवर पदर आणि नाकात नथ आहे. हातात तलवार घेऊन सज्ज असलेल्या गुलामाच्या पाठीवर ढाल आणि कपाळी गंध आहे. त्या संचाचा लाकडी डबा उत्तम रंगसंगतीतील छान चित्रांनी रंगवलेला आहे. माझ्याकडील ओरिसा येथील गंजिफा संच हा पातळ कागदापासून बनवलेला आहे. अन्य दोन गंजिफा संच हे सावंतवाडीचे असून त्यांचे डबेही आकर्षक आहेत.
गंजिफा उपलब्ध असले, तरी ते खेळायचे कसे? त्याचे नियम काय? तो खेळ महाराष्ट्र, ओरिसा, दिल्ली, बंगाल, दक्षिण भारतात खेळला जात असे. प्रत्येक ठिकाणी वापरले जाणारे संच, पत्त्यांची संख्या, नियमांमध्ये असलेला फरक, खेळण्याची पद्धत, खेळाचा प्राचीनपणा, स्थानिक वैशिष्ट्य यांमुळे नियमांमध्ये एकवाक्यता नाही. त्या खेळाची माहिती ‘श्रीतत्त्वनिधी’ आणि ‘कौतुकनिधी’ या ग्रंथांमध्ये आहे. ते ग्रंथ मिळणे दुरापास्त झाले आहे.
गंजिफा कसा खेळायचा याची माहिती ‘श्रीतत्त्वनिधी’ आणि ‘कौतुकनिधी’ या ग्रंथांमध्ये
विष्णूच्या दहा अवतारांच्या एकशेवीस पत्त्यांच्या संचामध्ये प्रत्येक अवताराचे चित्र असलेला एकेक पत्ता म्हणजे राजा, दुसरा साधारणतः संबंधित चित्र असलेला एकेक पत्ता म्हणजे मीर/प्रधान (वजीर) असतो. नंतर एक्का ते दश्शी असे दहा/ दहा पत्ते असे प्रत्येक अवताराचे बारा पत्ते आणि दहा अवतारांचे एकूण एकशेवीस पत्ते असतात. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह आणि वामन या पहिल्या पाच अवतारांमधील पत्त्यांची किंमत म्हणजे अवतार पत्ता सर्वात श्रेष्ठ; नंतर वजीर, एक्का, दुर्री असे करत करत दश्शी सर्वात कमी किंमतीची असते. परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कलंकी या अवताराच्या पत्त्यांमध्ये अवताराचा पत्ता सर्वात श्रेष्ठ; नंतर वजीर, नंतर दश्शी, नश्शी असे करत करत एक्का सर्वात कमी किंमतीचा असतो.
पत्ते पिसण्यासाठी ते धोतरासारख्या पातळ वस्त्रामध्ये पसरून हाताने गोल गोल फिरवून मग वाटले जातात. तो खेळ तीन खेळाडू खेळतात. त्यामुळे प्रत्येकाला चाळीस/ चाळीस पाने येतात. खेळ जर दिवसा खेळला जात असेल, तर ज्याच्याकडे रामाचा पत्ता आला असेल त्याने पहिली उतारी करायची आणि रात्री खेळला जात असेल तर ज्याच्याकडे कृष्णाचा पत्ता आला असेल त्याने पहिली उतारी करायची असते.
खेळ सुरू करणाऱ्याला ‘सुरू करतो’ म्हणून सुरूक्या किंवा सुरक्या म्हणतात. रामाचा पत्ता खेळल्यावर त्याने रामाच्याच अवतारातील आणखी एक हलका पत्ता खेळायचा आणि इतर दोन खेळाडूंनी दोन/दोन पत्ते खेळायचे. उतरलेले ते सर्व सहा पत्ते सुरक्याचा हात म्हणून त्याच्या मालकीचे होतात. ज्याच्याकडे पत्ते जास्त जमा होतात त्याला दुसऱ्यांचे पत्ते ओढण्याचा हक्क मिळतो. त्या खेळामध्ये पैसे लावणे किंवा जमीन, राज्य असे काही पणाला लावणे वगैरे होत नाही. येथपर्यंत सर्व भाग हा खूप मनोरंजक आहे. त्या खेळासाठी जबरदस्त स्मरणशक्ती लागते, वेळ लागतो. खेळाचे पुढील नियम किचकट आणि गुंतागुंतीचे आहेत.
संदर्भ - थिंक महाराष्ट्र - मकरंद करंदीकर






