- कोमल ठोंबरे
रोनाल्डोचा फोटो असलेला टी-शर्ट घालून 13 वर्षाची मानसी कदम मुंबईच्या कुपरेज फुटबॉल मैदानात कसून सराव करत होती. सिंधूदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातून मानसी पहिल्यांदाच मुंबई शहरात आली होती. सराव झाल्यानंतर एका ग्रुप फोटोसाठी मानसी मग इतर ५९ मुलांसोबत जाऊन उभी राहिली.
मानसीला फुटबॉलचं प्रचंड वेड... कोकणातल्या लाल मातीत ती तासनतास फुटबॉल खेळायची, मात्र आयुष्यात एक असा टर्न आला की ती आज टर्फवर फुटबॉल खेळायला लागलीये. मानसीला ‘राईट फॉरवर्ड’ खेळायला आवडतं. ती म्हणते,’’माझं फुटबॉलपटू बनण्याचं स्वप्न आता हळूहळू पूर्ण होताना दिसत आहे. इथले आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल प्रशिक्षक आम्हा 60 जणांना तयार करत आहेत.’’
मानसी त्या ६० युवा फुटबॉलपटूंच्या पथकाची एक सदस्य आहे, ज्यांना महाराष्ट्राच्या 35 जिल्ह्यांतून निवडण्यात आलयं. 13 वर्षांखालील फुटबॉलपटूंचा शोध घेण्याचे ‘मिशन’ सध्या महाराष्ट्र सरकार राबवत असून हा त्याचाच एक भाग आहे. कुपरेज फुटबॉल मैदानावर खेळणाऱ्या त्या 60 मुलींच्या आयुष्याने आता वेगळं वळणं घेतलं आहे. त्या आता महाराष्ट्र सरकारच्या ‘प्रोजेक्ट महादेवा’चा भाग बनल्या आहेत.
एक काळ होता, जेव्हा भारत फक्त आशियाई फुटबॉलमध्ये फक्त खेळतच नव्हता, तर भारती फुटबॉल संघ तिथे मैदान गाजवत होता. 1962 मध्ये भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत फुटबॉलमध्ये सुवर्णपदक जिंकताना जपान आणि दक्षिण कोरियासारख्या संघांना हरवल. आजच्या फुटबॉलप्रेमी जनरेशनला हे जवळजवळ एका दंतकथेसारखं वाटू शकेल. कारण आज हेच जपान आणि दक्षिण कोरियाचे खेळाडू जगातील मोठ्या युरोपियन क्लबमध्ये खेळत आहेत. या देशांच्या प्रशिक्षण संस्था जगभरात अभ्यासल्या जातात आणि त्यांची फुटबॉल रचना जगातील उत्कृष्ट रचनांपैकी एक मानली जाते. पण साठ वर्षांपूर्वी भारताने त्यांना आत्मविश्वासाने हरवले होते. तो केवळ योगायोग नव्हता, ती वेळच अशी होती, जेव्हा भारतीय फुटबॉलला जगभरातून सन्मान मिळत होता आणि प्रतिस्पर्धी आपली आक्रमक खेळण्याची शैली आणि तग धरण्याची क्षमता यामुळे भारताला घाबरत होते.
सध्याच्या काळात तरुण भारतीय फुटबॉलप्रेमींना मेस्सी काय खातो हे माहीत आहे, प्रीमियर लीगच्या सामन्यांवर ते जोरदार चर्चा करतात, अगदी रात्री दोन वाजेपर्यंत युरोपियन लीगचे सामने पाहण्यासाठी जागे राहतात, पण याच तरुणांना जर पाच भारतीय फुटबॉलपटूंची नावे विचारली तर मात्र ती अडखळतात. आपल्या देशात फुटबॉल आवडतो, पण ही आवड जास्त करून परदेशातून आली आहे. लोकांना परदेशातील स्टेडियम आपल्या परिसरातील मैदानांपेक्षा जास्त जवळची वाटतात. देशात उत्साह आणि कल्पकता आहे, पण हा उत्साह खऱ्या कामगिरीत बदलण्याची व्यवस्था गेल्या अनेक वर्षांपासून नाही. महत्त्वाचं म्हणजे, भारतातील फुटबॉलमध्ये लपलेल्या आणि अजून वापरल्या न गेलेल्या प्रतिभेची दीर्घकाळाची तसेच, निराशाजनक कथा बदलण्याचा प्रयत्न 'प्रोजेक्ट महादेवा'द्वारे महाराष्ट्र करत आहे.
'प्रोजेक्ट महादेवा' नेमका काय प्रकार आहे?
'प्रोजेक्ट महादेवा' नेमका काय प्रकार आहे, यासंदर्भात बोलताना 'मित्रा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्यमंत्री, महाराष्ट्र यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह प्रतापसिंग परदेशी म्हणतात की, सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे हा उपक्रम फक्त सुंदर प्रेझेंटेशन करून समितीच्या बैठकीत संपवलेले नाही तर, थेट गावापासून सुरुवात करून चालू केलेला आहे. गेल्या काही महिन्यांत वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने (विफा) महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये, ज्यात अगदी गडचिरोली, यवतमाळसारख्या महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये जाऊन राज्यातील एक सर्वांत मोठी टॅलेंट हंट आयोजित केली होती.
हजारो मुले मुली या कार्यक्रमात सहभागी झाली. काही जण खूप दूरवरचा प्रवास करत आले, तर काही अनवाणी आले आणि त्यातील अनेकांची स्वप्ने ही त्यांनी खेळलेल्या मैदानांपेक्षा खूप मोठी होती. या मोठ्या टॅलेंट हंटमधून आलेल्या 13 वर्षांखालील 30 मुले आणि 30 मुलींची निवड करण्यात आली आहे, ज्यांना सखोल प्रशिक्षण कार्यक्रमात सामील केले आहे. सध्या हे खेळाडू मुंबईतील कुपरेज फुटबॉल ग्राउंड व नवी मुंबईतील सिडको फुटबॉल ग्राउंड येथे प्रशिक्षण घेत आहेत. खेळाडूंना सुसंगत कोचिंग, स्पोर्ट्स सायन्सवर आधारित फिटनेस प्रशिक्षण, पोषण आहार, तसेच नियमित स्पर्धात्मक सामने खेळण्याची संधी मिळत आहे.
मेस्सी देणार फुटबॉलचे धडे
राज्याच्या कानोकोपऱ्यातून आलेले हे खेळाडू लवकरच जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला भेटणार आहेत. 'गोट दूर' अंतर्गत मेस्सी भारतात येणार असून जेव्हा तो मुंबईच्या दौऱ्यावर असेल तेव्हा त्याला भेटण्याची संधी आणि त्याच्याकडून प्रशिक्षण घेण्याची संधी या खेळाडूंना मिळणार आहे. लिओनेल मेस्सीचा बहुचर्चित भारत दौरा निश्चित झाला आहे. त्याच्या या दौऱ्यास १२ डिसेंबरला सुरुवात होईल. मेस्सी प्रत्येक शहरात लहान नवोदित फुटबॉलपटूंना मौलिक सूचनाही देणार आहे. मेस्सीसह त्याचे इंटर मियामी संघातील सहकारी रॉद्रिगो डे पॉल, लुईस सुआरेझ, जॉर्डी अल्बा, सर्जिओ बस्क्वेट्स हेही येण्याची शक्यता आहे. मुंबईत तो वानखेडे स्टेडियमवर GOAT Cup खेळणार आहे. त्यावेळी सचिन तेंडुलकरही मेस्सीबरोबर गेणार आहे. दिल्लीतील कार्यक्रमासाठी विराट कोहली, शुभमन गिल खास निमंत्रित असण्याची शक्यता आहे.
‘’मेस्सीला भेटण्याची संधी मला मिळणार आहे, हे ऐकूनच माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे, माझं अख्खं शरीर कापतयं, अशी प्रतिक्रिया मानसीने व्यक्त केली.
तयारी २०३४ च्या फिफा वर्ल्ड कपची…
क्षितीज देसाई हे भारताचे माजी फुटबॉलपटू आणि ‘मित्रा’चे रिसर्चर ऑफिसर आहेत. ‘प्रोजेक्ट महादेवा’ या राज्याच्या मिशनमध्ये मित्रा (Maharashtra Institution for Transformation) आणि विफा (Western India Football Association) यांची मोठी मदत मिळत आहे. माजी फुटबॉलपटू क्षितीज देसाई सांगतात की, फुटबॉलच्या इको सिस्टिममध्ये एक कणखर फळी तयार करण्याचे आमचे उद्दीष्ट्य आहे. 2034 साली होणाऱ्या फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेची पात्रता फेरी भारताने पार करावी यासाठी ‘प्रोजेक्ट महादेवा’ सुरू केले असून महाराष्ट्राचे किमान पाच खेळाडू तरी भारतीय संघाचा भाग बनलेच पाहिजेत यासाठी आम्ही युद्धपातळीवर हा प्रोजेक्ट सुरू केला आहे.
प्रितम तपनपाल या मुलाची गरडचिरोलीमधून निवड झालीये. हिंदी आणि बंगालीमध्ये तो संवाद साधतो. तो म्हणतो, टटमाझे आईवडील शेतकरी आहेत. फुटबॉलसाठी बुट घेण्याइतपत पैसेही आमच्याकडे नाहीत. पण आता या संधीचं सोनं करूनच दाखवेन’’
प्रवीणसिंह प्रतापसिंग परदेशी पुढे सांगतात की, आपल्याकडे युरोपियन क्लब्सचे सामने लाखो वेळा पाहिले जातात, आंतरराष्ट्रीय संघांच्या जर्सीवर आपण उत्साहाने पैसे खर्च करतो आणि चॅम्पियन्स लीगच्या तंत्रावर जोरदार चर्चा करतो. पण जेव्हा आपले स्वतःचे फुटबॉलपटू घडवायचे असतात, तेव्हा हा उत्साह कुठेतरी हरवतो. आपली मुले प्ले स्टेशनवर तासंतास ड्रिब्लिग करू शकतात, पण त्यांच्या शहरात योग्य आणि सहज उपलब्ध फुटबॉल मैदान शोधणे त्यांच्यासाठी कठीण असते. 'फिफा विश्वचषक स्पर्धा आता 48 संघांपर्यंत वाढली आहे. त्यामुळे विश्वचषकासाठी पात्रतेचा मार्ग कठीण आहे, पण भारतासाठी तो अशक्य असणार नाही.






