पालक की मालक?
शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले भाऊसाहेब चासकर आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितात,
NEET परीक्षेच्या तयारीसाठी बापाने पोरीला क्लास लावला. क्लासमध्ये झालेल्या सराव परीक्षेत लेकीला अपेक्षित मार्क्स मिळाले नाहीत याचा मुख्याध्यापक असलेल्या बापाला भलता राग आला. लेकीच्या शिक्षणावर बाप पैसे खर्च करत होता त्या बदल्यात त्याला घसघशीत मार्क्सच्या रूपाने रिटर्न्स हवे होते.
बापाचं टाकून बोलणं असह्य झाल्यानं "तुम्ही अभ्यास केला होतात. तुम्ही कुठे कलेक्टर झाला. शिक्षक झालात ना?" पोरगी उलटून बोलल्याने बापाचा पारा चढला. त्याने जात्याच्या खुट्याने, लाथा बुक्क्यांनी पोरीला जबर मारहाण केली. एकदा नव्हे तर अनेकदा बापाने अमानुषपणे मारहाण केली. जबर मारहाण झाल्याने अर्धमेली झालेली पोरगी रात्रभर निपचित पडून राहिली. दयामाया नसलेल्या पाषाणहृदयी बापाने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. निर्दयी बाप शनिवारी सकाळी खुशाल शाळेत निघून गेला. 
घरी आल्यावर मुलगी बेशुद्ध असल्याचं आईने सांगितल्यावर पोरीला दवाखान्यात नेण्यासाठी धावपळ सुरू झाली. तोपर्यंत वेळ फितूर झाली होती. त्या अभागी लेकराच्या शरीरातून प्राण निघून गेला होता. ही घटना वाचून मन सुन्न झालं. एकाएकी उदास वाटू लागलं. काही काळ तर काय बोलावं, काय लिहावं कसं व्यक्त व्हावं.... अशी विमनस्क मन:स्थिती झाली होती.
भारताच्या संदर्भाने विचार करतो तेव्हा मुलांना जन्मताच पीसी म्हणजे पेरेंटल कस्टडी मिळाल्याचे माझे मत आहे. मुलांना काय वाटतं? त्यांना कोणत्या शाळेत जायचं आहे? त्यांच्या आवडीनिवडी कोणत्या? यांचा साकल्याने विचार न करता मुलांच्या आयुष्याचं सगळं काही जणू आपल्याला कळतं, अशा मस्तीत गुर्मीत असलेले पालक मुलांच्या आयुष्याचे जवळपास सगळे निर्णय पालक मुलांच्या परस्पर घेतात. मुलांच्या आवडीनिवडी काय आहेत? हे अनेक पालकांच्या गावी नसते. मुलांचं करिअर निवडताना पालक प्रचंड गोंधळलेले आहेत. संभ्रमात आहेत. ते इतरांचे कोणाचे तरी अनुकरण करताना दिसतात. यातून मुलांचे त्रास आणखी वाढत आहेत.
पालकांकडे पैसे आहेत म्हणून नीट किंवा जेईईसारख्या परीक्षांच्या तयारीसाठी शिकवणी लावली जाते. दहावीत मिळालेले भरमसाट मार्क्स अकरावी-बारावी विज्ञान आणि त्यापुढील प्रवेश परीक्षेत फारसे कामाला येत नाहीत. आपली मुलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा आयआयटीमध्ये जाण्याची स्वप्नं यांनी उराशी बाळगलेली असतात. आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आकांक्षा मुलांकडून पूर्ण करून घेण्याच्या उद्देशाने महागडे क्लास लावले जातात. गुंतवणूक आणि परतावा अशी मार्केटची भाषा पालक मुलांसाठी वापरताना दिसतात. पैसे खर्च केले तर मार्क्स मिळायला हवे असा आग्रह असतो.
संबंधित लेख वाचा: 1) ‘CBSE’चाच पॅटर्न राज्य शालेय शिक्षण मंडळाला का राबवायचाय? आता पुढे कसा असेल शिक्षणाचा फॉर्म्युला? |
अनेक मुलांना गुंतागुंतीचे किचकट प्रश्न सोडवता येत नाहीत. संकल्पना स्पष्ट नसतात. शिकवलेलं समजलेलं नसलं तरी परीक्षा कठोर वातावरणात होतात. अशा वेळी मुलांच्या नाकी नऊ येतात. तीव्र स्पर्धा. आई-बाबांनी पैसे खर्च केलेले आहेत. अपेक्षित मार्क्स मिळत नाहीयेत. आई-वडिलांना मार्क्स पाहिजेत. मौनातला आकांत मुलांना असह्य होतो आहे. अभ्यासात मन लागत नाही. तीव्र चिंता सतावत असते. मनात भीती घर करून बसलेली असते. आतल्या आत प्रचंड खळबळ सुरू असते. रेसच्या घोड्यावर लावतात तसे पालकांनी मुलांवर पैसे लावलेले असतात! त्यांना केवळ यश हवं असतं! मूल म्हणजे मार्क्स मशीन नाहीयेत याचं भान हरपून गेले आहे.
परिणामी मुलं त्रासात आहेत ताणात आहेत. त्यांची विचित्र कोंडी झाली आहे. सांगता येत नाही आणि सहनही होत नाही अशी मनोवस्था मुलं अनुभवत आहेत... वरवर पाहता सगळं काही ठीक चाललं आहे असं वाटत असतं तरी पालकांना मुलांच्या अंतरंगातला कल्लोळ आणि त्रास यांचा अंदाज येत नाही. प्रेशर कुकरला शिटी असते. मुलांच्या डोक्याला तशी सोय नाहीये... न झेपणाऱ्या विचारांची कोंडलेली वाफ धडका देत असते याची पुसटशी जाणीव पालकांना असते का...?
सांगलीत मुख्याध्यापक असलेल्या बापाला लेकीपेक्षा तिच्या शिक्षणावर खर्च केलेले पैसे महत्त्वाचे वाटत होते! गुंतवणूक करूनही अपेक्षित रिटर्न्स मिळाले नाहीत म्हणजे आपलं नुकसान झाल्यासारखं पालकांना वाटत असेल तर हा आजार किती गंभीर स्वरूपाचा आहे याचा आपल्याला अंदाज येतो. हा बाप माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होता. अशा मानसिकतेचा मुख्याध्यापक म्हणजे तिथल्या मुलांचीदेखील चिंता वाटते...
आपण इतका खर्च करतो तर मुलांनी टॉपर म्हणून मार्क मिळवत राहावे, असे पालकांना वाटते. इतकं सोपं असतं का खरेच हे सगळं? आपल्या मुलांची क्षमता किती आहे? याचा विचार मागे पडलेला आहे. गोष्टी लादल्या गेल्याने त्यातला आनंद संपलेला असतो. मुलं दुबळी आणि पालक सबळ असतात. निमूटपणे सहन करण्याशिवाय मुलांपुढे अन्य पर्याय नसतो. गुमान गप्प बसून बिचारी मुलं सगळं काही सहन करतात. आतली खळबळ न सांगता. अनेकदा या मानसिक ताणतणावातून मुलं नैराश्याच्या फेऱ्यात सापडतात.
NEET आणि जेइइ या परीक्षांच्या तयारीसाठी राजस्थानमधल्या कोटा येथे गेलेल्या मुलांपैकी अनेक मुलं कमी मार्क्स घेऊन येतात तेव्हा त्यांना पालकांचे जणू गुन्हेगार आहोत असा अपराधगंड छळत असतो. तिकडं मुलांच्या होणाऱ्या आत्महत्या हा गंभीर चिंतेचा विषय असूनही अनेक मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय पालक मुलांना या चरकात ढकलतात. त्यातल्या अनेक मुलांमधला जीवनरस संपून त्यांचं पार चिपाड होऊन जातं. दिवसेंदिवस ही समस्या आणखीन उग्ररूप धारण करते आहे.
मातापित्यांच्या लैंगिक सुखाच्या प्रेरणेतून, नैसर्गिक गरजेतून मुलांचा जन्म होतो. पालकत्वाची जबाबदारी कोणी नीट समजून सांगितलेली नसते. पालकत्वाचे कोणतेही शिक्षण नाही. पहिल्या वर्गात प्रवेश घेताना शाळा आणि माध्यम निवडण्यापासून करिअरच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचेपर्यंत पालकांच्या मनातला गोंधळ, संभ्रम नजरेस पडत राहतो. मुलांच्या भविष्याची प्रामाणिक काळजी पालकांना वाटते हे वास्तव नजरेआड करता येत नाही. आपल्या मुलांचं काय होईल? अशी असुरक्षितता पालकांच्या मनात असते. ती स्वाभाविक आहे. मात्र या गोंधळाचे याचे थेट परिणाम मुलांवर होत आहेत. याबाबत समाजात जाणीवजागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
शासकीय पातळीवर काही होईल अशा अपेक्षा करणे गैर आहे. वाढत चाललेला स्क्रीन टाईम, अकॅडमीक ओव्हरलोड, आकर्षणातून निर्माण होणाऱ्या लैंगिक समस्या, हिंसा आणि व्यसनांचे आकर्षण अशा अनेक गोष्टी आहेत. मुलं ताणात आणि त्रासात आहेत. प्रत्येक माध्यमिक शाळेत आणि महाविद्यालयात समुपदेशकाची नेमणूक करण्याची मागणी करूनही सरकार दुर्लक्ष करत आले आहे. कारण अकरावी बारावीचे वर्ग ओस पडलेले आहेत आणि क्लासेस ओसंडून वाहत आहेत. प्रवेश परीक्षांना सामोरे जाताना मुलांच्या मनावर मेंदूवर किती ताण येतो, त्यांची मनःस्थिती कशी असते? याबाबत एखादा अभ्यास केल्यास यातलं भीषण वास्तव समोर येईल.
खलिल जिब्रान म्हणतो "तुमची मुलं तुमच्या पोटी जन्माला आलेली असली तरी ती काळ प्रवाहाची अपत्ये आहेत. तुमचे विचार तुमच्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत." वास्तविक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून मुलांचा आदर पालकांनी करायला हवा. मात्र अलीकडे पालक मुलांचे मालक झाल्यासारखे वागताना दिसतात.
मुलांचा जीव घेऊन प्रश्न सुटणार आहे का?
लेखक आणि सामाजिक विषयांवरचे भाष्यकार पी. विठ्ठल आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितात,
- घटना एक: मुख्याध्यापक असलेल्या एका पालकाने आपल्या मुलीला NEET परीक्षेत कमी मार्क्स मिळाले म्हणून लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या मुलीला दवाखान्यात घेऊन जाण्याऐवजी हा माणूस सकाळी योगदिनाच्या कार्यक्रमाला शाळेत निघून गेला. घरी येऊन दवाखान्यात नेईपर्यंत अखेर बेशुद्ध मुलीचा मृत्यू झाला. ही घटना सांगली जिल्ह्यातील आहे. 
- घटना दोन: नीट परीक्षेत 'त्या' विद्यार्थ्याला प्रत्यक्षात 170 मार्क्स मिळाले होते. पण आई-वडिलांना, नातेवाईक आणि समाजाला काय वाटेल, म्हणून त्याने 545 गुणांची बनावट गुणपत्रिका तयार करून घेतली. मात्र त्याच्या चाणाक्ष मित्रांनी QR कोड स्कॅन केल्यानंतर त्याचे बिंग फुटले. आपण केलेली चूक त्याच्या लक्षात आली आणि अपमानित होऊन त्याने आत्महत्या केली. ही घटना लातूर येथील आहे.
- दोन्ही घटना भयंकर दुःखद आणि दुर्दैवी आहेत. जेमतेम सतरा-अठरा वर्ष वय असलेल्या कोवळ्या मुलांचा असा अकाली मृत्यू पाहून मन हेलावून गेले. साक्षात बापानेच आपल्या मुलीची कमी मार्क्स मिळाले म्हणून हत्या करावी किंवा आई-वडिलांचा स्वप्नभंग केल्याचा अपराधभाव मनात निर्माण होऊन एका मुलाने आत्महत्या करावी, या दोन्ही घटना प्रचंड वेदनादायी आहेत.अजून आयुष्यही जेमतेम न कळलेल्या या मुलांच्या अकाली मृत्यूला कोण जबाबदार आहे? आपली शिक्षणव्यवस्था? की पालकांची प्रचंड महत्त्वाकांक्षा? की आणखी काही? याचे उत्तर ज्याने-त्याने शोधायला हवे. आपणच जन्माला घातलेल्या मुलांची मानसिक, बौद्धिक क्षमता किंवा त्यांच्या आवडीचा नैसर्गिक कल आपल्याला समजत नसेल तर आपण पालक म्हणून आपण 'अपूर्ण' आणि बेजबाबदार आहोत.
- प्रत्येक पालकाच्या आपल्या पाल्यांकडून अपेक्षा असतातच. त्या असण्यात गैर काहीही नाही. पण कधीतरी मुलांचे 'हळवे भावविश्व' समजून घ्यायला काय हरकत आहे? केवळ महागडे क्लासेस लावून दिले किंवा सर्व उत्तम सुविधा दिल्या- म्हणजे आपला मुलगा आता अपेक्षित यश मिळवणारच या भ्रमातून आपण कधी बाहेर पडणार आहोत? मुलाला स्मार्टफोन, बाईक किंवा तत्सम भौतिक गोष्टी दिल्या म्हणजे आपली जबाबदारी संपते का? मुलांच्या ताण-तणावाचं, आवडीनिवडीचं व्यवस्थापनही पालक म्हणून आपल्याला करता यायला हवे. कधी त्याच्याशी आत्मीयतेने गप्पागोष्टी करून त्याच्या अंतरंगात शिरायला हवे. त्याच्या मनातली गोष्ट जाणून न घेताच त्याला 'अमुक तमुक' बनवायचे आपण स्वप्न पाहतो. त्यात अपयश आले तर त्याला दोषी ठरवतो. शेवटी आई-वडिलांचे आणि समाजाचे टोमणे असह्य झाले की, मुलं स्वतःचा 'आत्मघात' करून घेतात. पालक म्हणून अशावेळी हळहळण्याशिवाय आपल्या हातात काहीही उरत नाही.
- वरील घटनेत मुख्याध्यापक असलेल्या बापानेच मुलीची क्रूर हत्या करावी, ही घटना काय अधोरेखित करते? पालक म्हणून आपण एवढे हिंसक कसे काय बनू शकतो? मुलं म्हणजे यंत्र आहेत का? एखादी 'कमांड' दिली की त्याचा 'आउटपुट' त्यांनी आपल्याला द्यावा. अशी विकृत मनोवृत्तीची माणसे समाजासाठी कायमच धोकादायक असतात. 
- एक घटना आठवते: काही वर्षांपूर्वी नीट परीक्षेत प्रचंड यश मिळवलेल्या अठरा वर्षीय तरुणाचा दिल्लीच्या एम्समध्ये नंबर लागला. त्याच्या यशाचे फ्लेक्स शहरभर झळकलेले मी पाहिले. खाजगी इंग्रजी शाळा आणि कोचिंग क्लासेसवाल्यांनी, त्याच्या यशाला स्वत:शी जोडून भयंकर मार्केटिंग करून घेतले. त्यानंतर जेमतेम वर्षभरानंतर तो मुलगा तिथे ड्रगच्या अधीन झाला (म्हणे!) प्रचंड हुशार आणि लाडक्या मुलाची व्यसनाधीनता पालकांच्या लक्षात येईपर्यंत बराच उशीर झाला होता. मुलाला परीक्षेत यश मिळाले खरे; पण होस्टेल किंवा कॉलेजला मित्रांची चांगली संगत मिळाली नाही. आठ-दहा वर्ष घर आणि क्लासेसमध्ये बंदित असलेली मुलं बाहेरच्या जगात पडली की बेफाम सुटतात. आणि ती त्यांच्याही नकळत मोहमयी आणि 'आभासी' जगात गुरफटून जातात. पालकांना एकाचवेळी अनेक पातळ्यांवर काम करावे लागते. सर्व प्रश्न पैशाने सुटत नाहीत. 'प्रेम', 'जिव्हाळा' आणि 'मित्रत्व' नावाची एक गोष्टही आयुष्यात असायला हवी.
- मुद्दा एवढाच आहे: पालक म्हणून आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादू नका. त्याला त्याच्या आवडीप्रमाणे शिकू द्या. जगू द्या. नापास झालेली सगळी मुलं आयुष्यात पराभूत होत नसतात. (कधीकधी) हीच मुलं 'इतिहास' घडवतात. आज स्पर्धेचे युग आहे हे खरे आहे; पण आपली मुलं म्हणजे रेसचे घोडे नाहीत. आपण त्यांना किती पळवणार आहोत? त्यांच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक क्षमतांचा विचार जर आपण करणार नसू तर अशा अनेक कोवळ्या मुलांचे अपमृत्यू आपल्याला पाहावे लागतील. मुलांना टॉर्चर करून काही साध्य होत नाही. उलट ती मानसिकदृष्टया विकलांग बनतात.
- आजचे एकूणच शैक्षणिक वातावरण अत्यंत निराशाजनक आहे. अशा वातावरणाशी जुळवून घेऊन अध्ययन करणे, हेच आजच्या विद्यार्थ्यांपुढे खूप मोठे आव्हान आहे. कोचिंग क्लासेसच्या आणि खाजगी महागड्या विद्यापीठांच्या किंवा शिक्षणसंस्थांच्या फसव्या जाहिरातीला बळी पडून मुलांचे आयुष्य 'पणाला' लावू नका. जगण्यासाठी हजार क्षेत्रे उपलब्ध आहेत. एकात यश मिळाले नाही तर मुले दुसऱ्यात नशीब आजमावतील(च). पण पालक म्हणून आपण त्यांच्यावर थोडा 'विश्वास' ठेवायला हवा. अपयश आले तर धीर द्यायला हवा. मुलं कधीही आपल्या पालकांचा अपेक्षाभंग करणार नाहीत. त्यांना रागवा जरूर, पण त्यांचा जीव घेऊ नका. तूर्तास एवढेच!






