- नूतन
"आता तो पृथ्वी सोडतोय... पण त्याच्यासाठी मी जेव्हाही प्रार्थना करते तेव्हा त्याने त्याचा माझ्या हातात घट्ट धरून ठेवलाय असाच मला सतत भास होतो."
लखनऊच्या एका छोट्याशा घरात, दररोज एका ठराविक वेळी फोन वाजतो. दूरवरून… दूरवरून म्हणजे कुठून तर अगदी अंतराळाच्या उंबरठ्यावरून… एक मुलगा आपल्या आईला विचारतो: “आई, कशी आहेस? लखनऊत काय चाललंय?” आई म्हणते, "सारं काही ठीक आहे बाळा..." पण तिच्या हृदयात मात्र दरवेळी एक लाट उसळते… गर्वाची, काळजीची, आणि अतूट प्रेमाची.
11 जून 2025 — हा दिवस केवळ भारतासाठी नव्हे, तर लखनऊच्या त्रिवेणी नगरातील एका साध्या घरासाठीही ऐतिहासिक ठरणार आहे. भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला लवकरच देशातील दुसरे अंतराळवीर बनणार आहेत. या दिवशी, भारतीय वायुदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला ‘Axiom-4’ मोहिमेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर झेपावणार आहेत. भारताचे प्रतिनिधित्व करणारे ते पहिले अंतराळवीर ISS वर पोहोचणार आहेत.
त्यांची आई, आशा शुक्ला, सध्या विज्ञानाचा एक 'क्रॅश कोर्स' करतेय. अंतराळात झोप कशी लागते? प्रेशर सूटमधून श्वास कसा घेतात? आणि त्यांना तिथे पोचायला किती वेळ लागणार? हे सगळं तिला समजून घ्यायचंय. तिच्या मुलाचं अंतराळात जाणं हे केवळ एक मिशन नाही, तिचं स्वप्न झालंय.
तिच्या ड्रॉईंग रूममध्ये, शुभांशुच्या वायुसेनेतील वर्दीतील मोठ्या कटआउटखाली बसून ती हसते आणि म्हणते, "तो १६व्या वर्षी घर सोडून गेला होता… आणि आता तो पृथ्वी सोडतोय." डोळ्यांत पाणी असलं तरी आवाजात अभिमान भरलेला असतो.
एक स्वप्न, एक मिशन आणि संपूर्ण देशाची आशा
शुभांशु शुक्ला हे नासाच्या सहकार्याने होणाऱ्या स्पेसएक्स-एक्सिओम मिशनमध्ये पायलट म्हणून सहभागी आहेत. शुक्लांसह एकूण चार वैज्ञानिक ही मोहीम कारणार आहेत. या मिशनचे नेतृत्व अुभवी अंतराळवीर पैगी व्हिटसन करतेय. फ्लोरिडा येथील केनडी स्पेस सेंटरमधून ही मोहीम लॉन्च होणार आहे. खरं म्हणजे त्यासाठी 10 जून ही तारीख ठरली होती परंतू खराब हवामानामुळे आता ही मोहीम एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. आणि हो, गगनयानसाठीही शुभांशु शुक्ला यांची निवड झालेली आहे, जे 2027 साली उडणार आहे.
लखनऊ शहरात सध्या वेगळंच वातावरण आहे. शुभांशुचे कटआउट्स रस्त्यांवर उभे आहेत, गल्ल्यांमध्ये झळकतायत पोस्टर्स – “शहराचा मुलगा, देशाचा अभिमान.” लोक त्यांच्या आईवडिलांकडून आशीर्वाद मागायला येत आहेत. एका महिला सांगतात, "माझ्या मुलांनी हे पाहिलं पाहिजे, कदाचित उद्या त्यांच्याही पोस्टर्स असतील!"
एका स्वाभाविक प्रवासाची असाधारण कहाणी
शुभांशु यांनी वायुसेनेत जाण्याचा निर्णय कधीच घेतला नव्हता. तो एका मित्रामुळे 'संयोगाने' घडलेला टर्निंग पॉईंट होता. वडील शंभूदयाल शुक्ला यांनी सांगितलं की, जेव्हा त्यांचा मुलगा सैन्यात भरती होण्याची तयारी करत होता, तेव्हा त्यांना त्यांच्या मुलाच्या स्वप्नाची माहिती नव्हती. खरंतर, शंभूदयाल यांना शुभांशु IAS व्हावे असं वाटत होतं. पण शुभांशु यांनी आपल्या करिअरची वाट स्वतः निवडली आणि ते NDA मध्ये गेले.
ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे उत्तर प्रदेशातील लखनौचे रहिवासी आहेत. त्यांच्या घरी त्यांचे पालक आणि दोन मोठ्या बहिणी राहतात. त्यांची एक बहीण लखनौमध्ये शिक्षिका आहे आणि दुसरी दिल्लीमध्ये राहते. शुभांशु शुक्ला यांनी लखनौमधील सिटी मॉन्टेसरी स्कूलच्या अलीगंज शाखेतून 12वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. शुभांशु शुक्लांचे वडील म्हणाले, "त्याने एनडीएचा फॉर्म भरल्याचं आम्हाला माहिती नव्हतं. एके दिवशी त्याच्या मित्राने फोन केला, त्यावेळी आमच्या घरी लँडलाइन फोन होता. मी फोन उचलला तेव्हा त्याच्या मित्राला कळले नाही की नेमका फोन कोणी उचलला आहे. त्यानंतर तो मित्र म्हणाला की अभिनंदन तुझी एनडीएमध्ये निवड झाली आहे."
शुभांशु शुक्ला यांचा एनडीएमधला प्रवास सांगताना ते भावुक झाले होते. ते म्हणाले, "त्यानंतर एसएसबी आणि प्रशिक्षण झालं. मी त्याच्यासोबत कुठेही गेलो नाही. जेव्हा तो प्रशिक्षणासाठी जात होता, तेव्हा मी त्याला चारबाग स्टेशनवरून ट्रेनमध्ये बसवलं."
शुभांशु अशा अंतराळ मोहिमेवर जातील असं त्यांच्या कुटुंबातील कुणालाही वाटलं नव्हतं. त्यांची मोठी बहीण शुची मिश्रा म्हणतात, "आम्हाला फक्त असं वाटलं होतं की तो एअर चीफ मार्शल होईल."
''तो लहानपणापासूनच खूप मेहनती होता’’
ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला 39 वर्षांचे असून उत्तर प्रदेशातील लखनौचे रहिवासी आहेत. शुभांशु शुक्ला हे भारतीय वायुसेनेत फायटर पायलट आहेत. 2006 मध्ये ते भारतीय वायुसेनेत कार्यरत झाले होते. त्यांना 2000 तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे. भारतीय वायुसेनेत असणाऱ्या सुखोई-30 एमकेआय, मिग-21एस, मिग-29 एस, जॅग्वार, हॉक्स डोर्नियर्स आणि एन-32 सारखी लढाऊ विमानं चालवण्याचा अनुभव शुक्लांच्या गाठीशी आहे. ग्रुप कॅप्टन शुक्ला यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि अमेरिकन अंतराळ संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) यांच्या संयुक्त मोहिमेसाठी निवड झाली आहे.
शुभांशु यांच्या आई आशा शुक्ला म्हणाल्या, '' तो लहानपणापासूनच खूप मेहनती होता. त्याने कधीही काहीही मागितले नाही. घरी जे बनवलं जायचं ते तो खायचा आणि त्याला जे मिळेल त्यात समाधानी असायचा.'
राकेश शर्मा यांच्यानंतरचे दुसरे अंतराळवीर
ग्रुप कॅप्टन शुक्ला या मोहिमेअंतर्गत अंतराळात गेले तर गेल्या 40 वर्षांत ही कामगिरी करणारे ते दुसरे भारतीय अंतराळवीर ठरतील. याआधी 1984 मध्ये राकेश शर्मा सोव्हिएत युनियनच्या अंतराळ मोहिमेअंतर्गत अंतराळात गेले होते. एक्सिओम या अंतराळ कंपनीची ही चौथी अंतराळ मोहीम आहेत. तिचं नाव 'एक्सिओम-4' असं आहे. 2016 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी अमेरिकन आहे. ही कंपनी व्यावसायिकदृष्ट्या अंतराळ प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी काम करते. ही कंपनी सरकारी आणि खाजगी अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्याचे काम करते.
आता शुभांशु अंतराळात झेपावणार आहेत. त्यांचा मुलगा कियाश, त्यांचाच छोटा सुपरहीरो, अमेरिकेत त्यांची वाट पाहतोय. त्यांच्या पत्नी कामना, एक खंबीर साथीदार म्हणून सोबत आहेत. आणि आई आशा, तिच्या मनात एकच प्रार्थना आहे: “परत येतोस ना?”
पण तिने आता काळजी बाजूला ठेवली आहे. कारण ती म्हणते, "जर सुनीता विलियम्स अंतराळात जाऊ शकते, तर माझा शुभांशु का नाही?"
आज लखनऊमधील एका गल्लीतून अंतराळापर्यंत झेपावलेला एक मुलगा, संपूर्ण देशासाठी प्रेरणा ठरतोय. ही फक्त एक अंतराळमोहिम नाही. हे एका कुटुंबाचं स्वप्न, एका आईचं धैर्य, एका शहराचं अभिमान आणि एका देशाचं प्रतिनिधित्व आहे. शुभांशु शुक्ला आकाशात झेपावणार आहेत, पण त्यांच्या पावलांवर इथल्या हजारो मुलांचं भविष्य उभं राहणार आहे.






