(संजना खंडारे)
भारताची भू-राजकीय रचना ब्रिटिशकाळापासूनच कमालीची गुंतागुंतीची राहिलेली आहे. म्हणजे, देशाच्या सीमांवरचा जो भाग निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे, तोच भाग लष्करीदृष्ट्या संवेदनशीलही राहिलेला आहे. त्यामुळे निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांची पावले वळली तरीही, सीमेवरच्या सततच्या तणावाच्या स्थितीमुळे या भागांमध्ये अस्थिरतेचेही सावट आजवर कायम राहिले आहे. काश्मीर हे त्याचे ठळक उदाहरण…
भारत आणि पाकिस्तानमध्ये 776 किमीची सीमा आहे, जिथे नेहमी गोळीबार सुरू राहतो.सदैव मृत्यूच्या छायेत जगत असताना विशेषतः पुंछ, राजौरी, सुचितगड या ठिकाणी कधी तोफगोळ्यांचा मारा सुरू होईल आणि कधी काय घडेल याचा नेम नसतो. पण तसे असूनही हे लोक तिथे टिकाव धरून असतात. 2003 साली शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली. पण 2013 पासून मात्र वारंवार या शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं आहे. या कालावधीत पाच हजारहून अधिक वेळा पाकिस्तानने शस्त्रसंधीचा भंग केला आहे. यावरून येथील जनता मृत्यूच्या छायेत कशी जगत असेल, याचा आपल्याला सहज अंदाज लावता येतो.
युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली की, अवघा देश ढवळून निघतो. राजकीय पातळीवर कधी सबुरीची, कधी आक्रमणाची भाषा होते. त्याचा परिणाम म्हणून जनतेची देशभक्ती उफाळून येते. परंतु, प्रत्यक्ष युद्धाचे ढग ज्या गावावर दाटलेले असतात, तो गाव कोणकोणत्या प्रसंगांतून जात असतो, त्याची त्या काळातली मानसिक-भावनिक स्थिती काय असते, सीमेवरचा युद्धाच्या छायेतला गाव असण्याचे दीर्घकालीन परिणाम काय असतात...
अलीकडेच जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रण रेषेसह सीमावर्ती भागात पाकिस्तानी सेन्याकडून बुधवारी मनमानी गोळीबार करण्यात आला. ज्यामध्ये 15 भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले आणि 43 जण गंभीर जखमी झाले. पहलगाम आतंकवादी हमल्याचा बदला घेण्यासाठी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. त्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानने गोळीबार केला आणि त्या गोळीबारात जम्मू-काश्मीरच्या पूंछ सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांचा मृत्यू झाला. 
हे असे पहिल्यांदाच घडलेलं नाही. जेव्हा जेव्हा देशातील सीमावर्ती भागात अचानक गोळीबार होतो, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा सीमावर्ती भागातील गावात राहणाऱ्या लोकांचा जीव सैनिकांइतकाच धोक्यात असतो. कधी अचानक हल्ला होईल, कधी गोळीबार होईल याची त्यांना माहिती नसते. कधी अचानकच काही तासात गावं खाली करा अशा सूचना त्यांना दिल्या जातात. तेव्हा लेकराबाळांना घेऊन जीव मुठीत ठेवून घरं सोडावी लागतात, अनेक दिवस बंकरमध्ये रहाव लागतं. जो पर्यंत तणावपूर्ण वातावरण शांत होत नाही तो पर्यंत त्या गावातील मुलांचं शिक्षण बंद असतं. युद्धजन्य परिस्थितीत सैनिक तर मरण पावतातच मात्र सगळ्यात जास्त होरपळला जातो तो सीमावर्ती भागात राहणारे रहिवासी.
जखमी होणं, मालमत्ता नुकसान, संचारबंदी, शाळा, रुग्णालयं बंद
भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. त्याचवेळी नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू आहे. त्यापासून वाचण्यासाठी सीमेलगत असलेल्या भारताच्या बाजूचे लोक आपली घरं सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करत आहेत. यामुळं नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या नागरिकांसाठी संघर्षाच्या दिवसांतील नेहमीची कठीण परिस्थिती पुन्हा आली आहे, जसं जखमी होणं, मालमत्ता आणि जनावरांचं नुकसान, संचारबंदी, शाळा, रुग्णालयं आणि बाजारपेठा बंद होणं.
‘बीबीसी’शी बोलताना स्थानिक रहिवासी सोबिया यांनी सांगितलं की, "मी स्फोटाचा एक मोठा आवाज ऐकला आणि एक महिन्याच्या बाळाला घेऊन मी तेथून पळाले. मी खूप घाबरले होते."
संबंधित लेख वाचा: 1) ‘’त्यांनी आमचं कुटुंब उध्वस्त केलं…’’ वाघा बॉर्डरवरचे पाकिस्तानी नागरिक दहशतवाद्यांना देत आहेत शिव्या-शाप |
आणखी एक स्थानिक रहिवासी सफरीन अख्तर यांनी सांगितलं की, त्यांच्या घरासमोर एक शेल पडल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबासह घर सोडलं. "मला एकही कार मिळाली नाही आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी मला अनेक मैल चालावं लागलं. सगळीकडे गोळीबाराचे आवाज येत होते," असं त्या म्हणाल्या.
सुरनकोटचे रहिवासी मोहम्मद आलम मलिक म्हणाले, "माझ्या घरात 25 लोक थांबले आहेत. काही लोक पायी चालत इथं आले आहेत. घाईघाईत काही लोक त्यांच्या घराला कुलूपही लावू शकले नाहीत."
येथून 80 लोक आपली घरं सोडून गेले आहेत, असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे.
पाकिस्तानच्या हल्ल्यात जुळ्या चिमुकल्यांचा अंत
या घटनेदरम्यान, पुंछ शहरातील 12 वर्षीय जुळ्या भाऊ-बहीण झोया आणि झेन यांचा गोळीबाराच्या घटनेत मृत्यू झाला. पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी गोळीबारात 13 नागरिकांचा मृत्यू झाला आणि 59 जण जखमी झाले होते. या गोळीबारात या दोन जुळ्या चिमुकल्यांचाही मृत्यू झालाय. झोया आणि झेन दोघेही एकत्र जन्मले, एकत्र वाढले आणि एकत्रच हे जग सोडून गेले. चिमुकल्यांच्या जाण्यानं त्यांची आईची रडून रडून वाईट अवस्था झाली.
झोया आणि झेनचे पालक त्यांच्या मूळ गाव कलानी चकथरू येथून पुंछ शहरात राहण्यासाठी आले होते. मुलांचं शिक्षण शहरात करता येईल तसंच नोकरी निमित्तानं हे कुटुंब गाव सोडून शहरी भागात राहायला आलं होतं. सर्वकाही सुरळित सुरू होतं. हसत खेळत हे कुटुंब जगत होतं. मात्र, डरपोक पाकिस्तानच्या गोळीबाराच्या कचाट्यात हे कुटुंब आलं आणि त्यांच्या आयुष्याचा बेरंग झाला.
आपली दोन जुळी लेकरं हिरावून गेल्यानं आईच्या वेदना न समजू शकणाऱ्याआहेत. हे दु:ख एकीकडं असताना दुसरीकडं तिच पतीही या गोळीबारात गंभीर जखमी झालाय. तिचा जीवनसाथी पती रमीझ खान (वय - 50) याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजौरी येथील सरकारी वैद्यकीय रुग्णालयात (जीएमसी) जीवनमरणाशी तो झुंज देत आहे. त्याला बी-निगेटिव्ह रक्ताची गरज होती. याबाबतचा मेसेज सोशल मीडियावर पाठवण्यात आला होता. त्यानंतर अनेकांनी फोन करून या कुटुंबाला मदत करण्याची भावना व्यक्त केली.
भारत-पाकिस्तान सीमेवरील रहिवाशी कायमच भीतीच्या छायेखाली...
जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील सीमारेषेवर वसलेली काही गावे भारतीय लष्कर आणि पाकिस्तानी सैन्याच्या संघर्षांमध्ये नेहमीच अडकली जातात. यापैकीच एक गाव म्हणजे खेतान मोहल्ला… या गावातून बाहेर जाण्यासाठी लष्कराची परवानगी आवश्यक असते. गावकऱ्यांना विशेष आयडी कार्ड वापरावे लागतात आणि त्यांना ठराविक वेळेतच गावाच्या बाहेर जाता येते. 2020 मध्ये पूंछमधील याच गावातील पाच तरुणांवर झालेल्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासन आणि लष्कराकडून थोडीफार मदत त्यांना मिळते, मात्र त्यांच्या दीर्घकालीन सुरक्षेचं काय हा प्रश्न कायम राहतो...
खेतान मोहल्ला हे गाव एखाद्या लष्करी छावणीसारखं वाटतं. गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरून तीन-स्तरीय कुंपण व्यवस्था, म्हणजेच Anti Infiltration Obstacle System म्हणजेच घुसखोरी रोखण्यासाठीच्या उपाययोजना असल्यामुळे गाव पूर्णपणे लष्करी नियंत्रणात आहे. हे गाव लाइन ऑफ कंट्रोल (LoC) भारत-प्रशासित काश्मीर आणि पाकिस्तान-प्रशासित काश्मीर यामधील नियंत्रण रेषेवर उंच सखल भूभागात वसलेलं आहे. एका बाजूला AIOS आणि दुसऱ्या बाजूला ठिकठिकाणी जमिनीखाली पेरलेले सुरुंग अशी सॅन्डविचसारखी गावातील लोकांची अवस्था आहे.
'कारवां' मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, "खेतान मोहल्लाच्या लोकांना गावाबाहेर जाणं म्हणजे परदेशात जाण्यासारखं आहे, असं स्थानिक लोक सांगतात. प्रत्येकवेळी त्यांना AIOSच्या पहिल्या गेटवर लष्कराच्या कडेकोट तपासणीला सामोरं जावं लागतं. त्यांना कुंपणाच्या शेवटच्या गेटपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे तीन किलोमीटर अंतर कापावं लागतं. गावकरी सांगतात की, AIOSच्या पलीकडे जाण्यासाठी त्यांना लष्कराने जारी केलेली स्मार्ट ओळखपत्रे आणि स्मार्टफोन तपासणी चौकीवर जमा करावी लागतात.
"इथे सगळेच घाबरलेले आहेत. आम्ही कायम दहशतीत असतो," असं खेतान मोहल्लाचे याकुब सांगतात. ते सध्या एका निर्वासितांच्या शिबिरात राहतात. सीमेवरच्या पाच गावातल्या रहिवाशांना गाव सोडून एका अशा गावात आश्रय घेण्यास सांगितलं आहे, ज्याला तिन्ही बाजूंनी सीमेनं वेढलेलं आहे. या संघर्षाचा सगळ्यांत जास्त फटका याच गावाला बसला आहे, जवळजवळ 7000 लोक त्यामुळे प्रभावित असल्याची माहिती याकुब देतात.
60 गावातील एक लाख लोक कुंपणाच्या पलीकडे अडकली आहेत...
2005 च्या माहिती अधिकार कायद्यानुसार आणि पंचायती राज संस्थांच्या स्थानिक प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, AIOS यंत्रणा नियंत्रण रेषेपासून काही किलोमीटर भारताच्या आतील बाजूला उभारल्यामुळे राजौरी, पूंछ, बारामुल्ला, कुपवाडा आणि बांदीपोरा या डोंगराळ जिल्ह्यांतील सुमारे 60 गावे कुंपणाच्या पलीकडे अडकली आहेत. या भागांमध्ये सुमारे एक लाख लोक अडकले आहेत. ही गावं जरी भारताच्या हद्दीत असली तरी येथील रहिवासी जणू 'नो मॅन्स लँड' मध्ये राहत असल्यासारखे जीवन जगतात. त्यांचे दैनंदिन आयुष्य सीमापार होणाऱ्या नियमित गोळीबारांमध्ये अडकलेले आहे. या भागातील अनेक गावांमध्ये, आजूबाजूच्या उंच टेकड्यांवर पाकिस्तानी लष्कराचे वर्चस्व आहे. उर्वरित गावांची परिस्थिती देखील फारशी वेगळी नाही; कारण गेल्या दशकभरात युद्धबंदीच्या उल्लंघनांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे.
या प्रदेशातील बहुतांश भागांत नागरी जनतेसाठी नियमित दूरसंचार व्यवस्था उपलब्ध नाही. सुरक्षा व्यवस्थेच्या वाढत्या दबावामुळे आणि सततच्या गोळीबारांमुळे स्थानिक शेती, चारा गोळा करणे आणि व्यापार पूर्णपणे कोलमडला आहे. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण इथे कायमच जास्त प्रमाणात असते.
योजना कागदावरच....
या सीमावर्ती गावांसाठी आखण्यात आलेल्या बहुतांश कल्याणकारी योजना केवळ कागदावरच अस्तित्वात आहेत. अनेकदा या योजनांची अंमलबजावणी
करण्यासाठीची यंत्रणा प्रभावीपणे आखलेली नसते. नुकत्याच निघालेल्या एका अधिसूचनेत आंतरराष्ट्रीय सीमेवरील गावांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण जाहीर करण्यात आले, मात्र त्यात अशा वसाहतींचा समावेश होता ज्या प्रत्यक्षात सीमा रेषेपासून सुमारे सहा किलोमीटर आत असून त्यांना खेतान मोहल्ल्यासारख्या गावांना भोगाव्या लागणाऱ्या कोणत्याही धोक्यांचा सामना करावा लागत नाही. तेथील रहिवासी नूर यांनी म्हटले आहे की, “जोपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत आमच्या मनातली मृत्यूची भीती कधीच संपणार नाही."
सीमेवरच्या गावांसाठी ‘मोदी बंकर’… मात्र संख्या अपुरी
भारत-पाकिस्तान यांच्यात वाढत्या तणावाच्या भीतीने नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या काही नागरिकांनी भूमिगत बंकर तयार करण्यास सुरुवात केली आहे. ते या बंकरमध्ये साफसफाई आणि आवश्यक वस्तूंची साठवणूक करीत आहेत. या बंकरचा उल्लेख ते मोदी बंकर म्हणून करीत आहेत. सुरक्षेसाठी म्हणून स्थानिक नागरिकांकडून हे बंकर तयार केले जात असल्याची माहिती आहे. ‘एएनआय’च्या वृत्तानुसार, जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील सालोत्री व करमारा येथील ग्रामस्थ खबरदारी म्हणून त्यांनी तयार केलेले जुने बंकर साफ करीत आहेत आणि आवश्यक वस्तूंची साठवणूक करीत आहेत. ही गावे पाकिस्तानच्या लष्करी चौक्यांपासून जवळ आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या गावांचे स्थान पाकिस्तानी लष्करी चौक्यांपासून जवळ असल्याने तेथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडीओंमध्ये गावकरी बंकरमध्ये गादी आणि ब्लँकेट ठेवताना दिसत आहेत. ” लोकांनी आतापर्यंत या बंकरकडे दुर्लक्ष केले होते. परंतु, आता पुन्हा त्या बंकरची स्वच्छता केली जात आहे. लोकांमध्ये भीतीचे आहे. परंतु आम्हाला आशा आहे की, खोऱ्यात शांतता कायम राहील,” असे सीमेवरच्या करमारा गावातील एका रहिवाशाने ‘एएनआय’ला सांगितले.
आणखी एका ग्रामस्थाने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि सरकारला पाठिंबा दिला. “पूर्वी या भागात गोळीबाराच्या घटना घडायच्या. आमचे गाव नियंत्रण रेषेजवळ आहे. गोळीबारासारख्या घटनांदरम्यान आम्हाला व आमच्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी हलवता यावे म्हणून आम्ही बंकर साफ करीत आहोत. आम्हाला असे बंकर पुरवल्याबद्दल आम्ही केंद्र सरकारचे आभारी आहोत,” असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरून या भूमिगत बंकरांना ‘मोदी बंकर’ असे नाव देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय सीमा (आयबी) आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानशी वाढत्या तणावादरम्यान सीमेजवळ राहणाऱ्या रहिवाशांना गोळीबारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी हे बंकर तयार करण्यात आले आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, यापैकी बरेच बंकर पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात बांधले गेले होते.
केंद्र सरकारने संघर्षप्रवण सीमाभागांजवळ राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितठेवण्याची हमी म्हणून हे बंकर तयार केले होते. जम्मूमधील पूंछ आणि राजौरी यांसारख्या सीमारेषेजवळील संवेदनशील भागात बंकर बांधण्यासाठी सरकारने यापूर्वी निधी आणि तांत्रिक साह्य प्रदान केले होते. 2021 मध्ये जम्मूमधील नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागात सुमारे 8,000 भूमिगत बंकर बांधण्यात आले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कुपवाडा जिल्ह्यातील तीतवाल-कर्नाह ब्लॉकच्या ब्लॉक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या अध्यक्षा निशादा परवीन आहेत. 32 वर्षीय निशादा यांनी सांगितले, “माझ्या ब्लॉकमध्ये 15 पंचायती आहेत आणि एकूण लोकसंख्या 30,000 पेक्षा जास्त आहे, परंतु सरकारने फक्त 120 सुरक्षा बंकर बांधले आहेत आणि अतिरिक्त 300 मंजूर केले आहेत.”
मात्र दुसरीकडे स्थानिकांची मागणी सुरक्षीत जमीन मिळण्याबाबतचीदेखील आहे. सतत जीव धोक्यात असल्यामुळे सीमेवरच्या गावांची दीर्घकाळापासून मुख्य मागणी आहे ती म्हणजे सुरक्षित ठिकाणी जमीन मिळणे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने सीमेवर राहणाऱ्या कुटुंबासाठी सुरक्षित ठिकाणी 6,806 चौरस फूट जमीन देण्याचे आश्वासन दिले होते. एका वर्षानंतर केंद्राने आपला विचार बदलला आणि त्याऐवजी त्याच गावांमध्ये बंकर बांधण्याचा निर्णय घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार गृह मंत्रालय "सीमावर्ती जिल्ह्यांमधील बंकर बांधण्यासाठी जमीन देण्याऐवजी निधी देईल, कारण लोकसंख्या स्थलांतरित केल्याने राष्ट्रीय हिताला धक्का बसेल."
डिसेंबर 2017 मध्ये, केंद्राने पाच जिल्ह्यांमध्ये नियंत्रण रेषेवरील आणि आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरील गावांसाठी 14,460 वैयक्तिक आणि सामुदायिक बंकर बांधण्यास मंजुरी दिली. गृह मंत्रालयाच्या २०१८ च्या वार्षिक अहवालानुसार, केंद्राने सुरक्षा बंकरच्या बांधकाम आणि देखभालीसाठी 415.73 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार ,सप्टेंबर 2020 पर्यंत, पाच जिल्ह्यांमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर एकूण 9,900 बंकर बांधण्यात आले होते.
उध्वस्त झालेल्या कुटुंबाच्या कहाण्या....
- जुलै 2019 मध्ये पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील करमारा गावातील २५ वर्षीय रहिवासी मोहम्मद फारूक यांनी त्यांच्या घराच्या अंगणात मोर्टार शेल फुटल्याने त्यांनी कुटुंबातील तीन सदस्यांना गमावले. त्यांचे 55 वर्षीय वडील मोहम्मद रफिक, त्यांची 45 वर्षीय सावत्र आई रफिया बी आणि 13 वर्षीय भाऊ इरफान. फारूक सांगतो, "बंकरमध्ये शिरायला कोणाला वेळ मिळतो?" या गावांमध्ये अनेकदा असेच घडत होते. हे मृत्यू त्याच्या कुटुंबातील एकमेव दुःख नसून 2001 मध्ये जेव्हा फारूक सहा वर्षांचा होता, तेव्हा त्यांच्या घराबाहेर झालेल्या शेल स्फोटात त्याची 35 वर्षीय आई मुनीरा बी यांचाही मृत्यू झाला होता.
- कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमधील आयबी येथील लोंडी या गावातील एका उद्ध्वस्त कुटुंबाचीही अशीच कहाणी होती. शेजाऱ्याच्या घरी एका सुरक्षित बंकरमध्ये रात्र घालवल्यानंतर, ते रस्त्याच्या पलीकडे घरी पोहोचले असतानाच 23 मे 2018 रोजी सकाळी त्यांच्या अंगणात एक स्फोट झाला. कुटुंबाचा एकमेव कमावता 48 वर्षीय रामपाल शर्मा यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी सुदेश कुमारी यांनाही जखमा झाल्या. या स्फोटात दोन दूध देणाऱ्या जनावरांसह चार गुरे मृत्युमुखी पडली. या घटनेनंतर, ग्रामीण विकास विभागाने त्यांच्या जीर्ण घरासमोर कुटुंबासाठी एक बंकर बांधला.
शर्मा यांचा मुलगा, 20 वर्षीय प्रीतम चंद म्हणतो, “घटनेच्या वेळी, बरेच राजकारणी आमच्या घरी आले होते. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मला आजपर्यंत सरकारकडून नोकरी किंवा आर्थिक मदत मिळालेली नाही.”
प्रीतम लष्करात सहभागी होण्याचा विचारही करू शकत नाही कारण, त्याला त्याच्या दोन बहिणींना आणि आईला सांभाळायचे आहे. 
सीमेवरचे रहिवासी दहशतवाद्यांना मदत करतात का?
‘बाईमाणूस’ने पूंछमध्ये सेवा बजावणाऱ्या निवृत्त सैनिक प्रवीण घुले यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी 20 वर्षे देशाची सेवा केली आहे. घुले यांनी सांगितले की, "जेव्हा मी सुरंगकोट पूंछ मध्ये होतो तेव्हा सुरंगकोटला मिनी पाकिस्तानच म्हंटल जायचं. हा भाग जास्त डोंगराळ असल्याकारणाने याभागातून अनेकदा घुसखोरी व्हायची. तेथील घुसखोरी कमी न होण्याचं आणि दहशतवाद अजूनही शिल्लक असल्याचं कारण हेच आहे की तिथे अजूनही काही स्थानिक लोक त्यांना मदत करतात.
स्थानिक लोकांच्या सुरक्षेबद्दल प्रवीण घुले पुढे सांगतात, "सीमावर्ती भागातील लोकांच्या घराची रचनाच अश्या पद्धतीची असते की त्यांच्या जीवाला धोका झाला नाही पाहिजे. सैन्यापेक्षा कुठे बॉम्ब पडल्यावर कुठे लपायच हे त्यांना माहिती असतं."
काश्मीरमध्ये पोस्टिंग असलेला अजय पुंडगे हा भारतीय सैन्याचा जवान सध्या वैयक्तिक कारणामुळे सुट्टीवर आहे. त्याच्याशी बाईमाणूसने संपर्क साधला असता अजय म्हणतो की, शश्त्रसंधीचे उल्लंघन झाले किंवा गावातील लोकांना धोका निर्माण होऊ शकतो याची चाहूल लागताच सीमेवरचे गावे आम्ही खाली करतो. आमच्यासाठी गावातील लोकांची सुरक्षा त्यांचा जीव महत्वाचा असतो. जो पर्यंत स्थिती नियंत्रणात येत नाही तो पर्यंत त्या भागातील शाळा ही बंद करण्याच्या सूचना दिल्या जातात."






