रात्रीस खेळ चाले, 400 वर्षांपूर्वीच्या बाहुल्यांचा…

आदिम काळात मनोरंजनाची ज्यावेळी साधनेच नव्हती, त्यावेळी कल्पनेला भरा-या देत तळकोकणात एक संपन्न कला बहरली होती. या कलेचा प्रणेता असलेल्या ठाकर लोककलेची संस्कृती तेवढीच अनोखी आहे. आज माहिती व तंत्रज्ञानाच्या जाळयात ही कला इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. जग ई-दुनियेत भिरभिरत आहे; परंतु 400 वर्षापूर्वी हुंका-या, कुका-यांवर चालणारी भाषा महत्त्वाची होती. या सांकेतिक भाषेची आजही उत्सुकता आहे. आपली पारंपरिक कला जोपासताना चारशे वर्षापूर्वीच्या बाहुल्याच नव्हे तर चित्रकथी आणि ऐतिहासिक साहित्याचा ठेवा सिंधुदुर्गात पिंगुळीत ठाकर बांधव जपत आहे.या गावातील प्रत्येक ठाकर कलावंत आपली संस्कृती जपण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे.

  • किशोर राणे

तळकोकणाच्या संस्कृतीत ठाकर कलेचा एक समृद्ध ठेवा आहे. तो पाहण्यासाठी वा अनुभवण्यासाठी आलेला पर्यटक ही ठाकर कला पाहून अचंबित होतो. आजही ही कला जिवंत ठेवण्यासाठी ठाकर समाजातील कलावंत कसोशीने प्रयत्न करत आहेत. ही ठाकर कला आणि संस्कृती एकाच ठिकाणी पाहायला मिळावी यासाठी पिंगुळीत (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) परशुराम गंगावणे यांनी आर्ट गॅलरी तयार केली आहे. या आर्ट गॅलरीत अनेक देशविदेशातील पर्यटकांची वर्दळ चालूच असते. मुंबई-गोवा महामार्गावर जात असताना कुडाळ तालुक्यात पिंगुळी येथे ठाकर आदिवासी कला आंगण हा फलक लक्ष वेधून घेतो. मनोरंजनाची परंपरा जोपासणा-या ठाकर लोककलेचा इतिहास येथे न्याहाळता येतो. परंपरा समजून घेता येतात.

परशुराम गंगावणे आणि इतर ठाकर बांधव यासाठी मोठी मेहनत घेत आहेत. हजारो वर्षापूर्वीचे चित्र आणि साहित्य येथे पाहायला मिळते. या मंडळींकडे लिखित प्राचीन दस्तावेज नाही. मात्र पिढ्यानपिढ्या सांगत आलेल्या कथांमुळे या समाजातील प्रत्येकांच्या ओठावर ठाकरी शैलीतील रामायण, महाभारत ऐकायला मिळते. कळसूत्री बाहुल्यांच्या साथीने या अनेक लोककथांचे सादरीकरण पाहणे म्हणजे एक अपूर्व अनुभव असतो. येथील कळसूत्री बाहुल्यांवर राजस्थानी शैलीचा प्रभाव जाणवतो. कपडयाच्या मखरामध्ये दोन फूट मोकळा भाग असतो. हा उघडा भाग म्हणजे कळसूत्रीचा रंगमंच. या रंगमंचाचे पडद्याने दोन भाग केले जातात. मागे सूत्रधार उभा राहतो. सूत्रधार बाहुल्यांचे दौर आपल्या बोटात अडकवून नाचवतो आणि कथाही सांगतो. दोन हातांनी चार बाहुल्या नाचवत असताना बोटांची कसब आणि कथा ऐकण्याची मजा काही वेगळीच असते. सिंधुदुर्गातील अनेक भागात या कळसूत्री बाहुल्यांचा खेळ पाहायला मिळतो.

kalsutri bahuli - baimanus

ज्या गावात कळसूत्री बाहुल्या नाचवायच्या आहेत. तेथे सकाळी ठाकर मंडळी लवाजम्यासह पोहोचत असत. ते त्या गावातल्या नदीवर जायचे, मासे मारायचे. पकडलेले मासे प्रत्येक घरा-घरात पोहोच केले जायचे. बाहुलेकारांकडून मासे आले म्हणजे गावात कार्यक्रम आहे असे समजले जायचे. मासे देऊन दवंडी पिटविण्याची प्रथा अगदी काल-परवापर्यंत जिल्ह्यात चालू होती. आता अशी कलावंत मंडळी नाहीत, ठाकर कलावंताना नदीकडे जाण्यासही वेळ नाही आणि गावागावातल्या नद्यांमध्ये मासेही नाहीत. मासे दिले म्हणजे त्या दिवशीच्याच भोजनात ते पोहोचतात. मग घरातील कर्त्यां पुरुषांकडून मासे कुणी दिले याची विचारपूस होते. आपसूकच बाहुलेकार गावात पोहोचल्याची चर्चा होते.ठरलेल्या ठिकाणी खेळ सुरू होतो. या खेळात हजेरी लावतानाच गावातील मंडळी भात, तांदूळ, सोले (कोकम) सरबत, कुणी मसाल्याचे पदार्थ भेट म्हणून या मंडळींना देत. बाहुल्यांचा खेळ पाहणे एक मजा असायची आणि बाहुलेकारांना मिळणारा शिधा म्हणजे मोठी बेगमी असायची. या कळसूत्री बाहुल्यांची कला यावेळी कशी होती याची झलक आणि त्याकाळातल्या बाहुल्या आजही पिंगुळीत पाहायला मिळतात.

kalsutri bahuli - baimanus

ऐतिहासिक काळात ठाकर आदिवासी लोक कठपुतळी, पपेट, चित्रकथीसारख्या मनोरंजनातून प्रबोधनात्मक कार्य करत जवळ जवळ 11 कलांचे सादरीकरण ठाकर लोक करतात. इतिहास काळात असेच मनोरंजनाचे कार्यक्रम करताना चित्रकथी, पपेटवर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजांची मेहेरनजर पडली आणि या कलेला खरी ऊर्जितावस्था मिळून राजाश्रय लाभला.

संबंधित वृत्त :

आदिवासी उत्कृष्ट कला सादर करणा-या कलाकारांच्या अंगावर व्यवस्थित कपडेही नसत. पण पानाच्या रसापासून झाडांच्या फुलांपासून मनमोहक रंग तयार करत चित्रे रेखाटण्यासाठी त्यांची धडपड असायची. या मनस्वी कलावंताच्या कलेची दखल घेत असतानाच हाताबोटांची कसरत करून कौशल्याने पपेट (बाहुल्या) नाचवण्याचे त्यांचे कौशल्य पाहून चक्क शिवाजीराजेसुद्धा भारावून गेले होते. त्यांच्या पश्चात या कलेला संभाजी राजेंनीदेखील हातभार लावला. त्यांनी प्रथम आदिवासींना सुव्यवस्थित कपडे घालायला दिले, शिकविले. राजांनी कठपुतळी, कळसूत्री, पपेटचे सादरीकरण करण्यासाठी काही ठरावीक मंदिरात जागा उपलब्ध करून दिली. आणि रोजी-रोटीचा प्रश्नही सोडविला. त्याकाळी हातावर मोजण्याइतका आदिवासी ठाकर समाज होता. त्यामुळे प्रत्येकाला कुडाळ येथील केळबाई, साळगाव येथील वेताळ, झारापमधील भावई मंदिर अशी बरीच मंदिरे ठाकरांना आपली कला सादर करण्यासाठी दिली गेली. या बदल्यात गावातील प्रत्येक घराने ग्रामदेवतेसमोर केलेल्या खेळासाठी एकशेर भात तसेच भात कापणी झाली की मानक-याने शेतातील भाताचे एक ‘पेंडूक’ ठाकराच्या डोकीवर त्याला जमेल तेवढे मोठे चढवायचे. ठाकराने संबंधित शेतमालकांच्या शेतीची हद्द ओलांडायची की ते पेंडूक ठाकराचे असा शिवकाळात नियम होता. गेली 500 वर्षे ही परंपरा आजमितीपर्यंत अविरत चालू आहे.

kalsutri bahuli - baimanus

आज दृकश्राव्य माध्यमात मोठे बदल झाले आहेत. याचा परिणाम म्हणजे चित्रकथी, कळसूत्रीकडे लोकांनी पाठ फिरविल्यामुळे अनेक कला इतिहास जमा होताहेत. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत 14 व्या अध्यायात जो ‘वल्ली’ हा शब्द आहे तो ठाकर समाजाशी निगडित आहे. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गाव सोडल्यास महाराष्ट्रात ‘वल्ली’ कुठेही नाही. यावरून ही कला ज्ञानेश्वरांच्या कार्यकालात अस्तित्वात होती, याचे पुरावे मिळतात.

जन्मत: वडील विश्राम, आजोबा आत्माराम यांच्या पावलावर पाऊल ठेवून आदिवासी कलेचा वारसा पुढे चालू राहावा यासाठी झटणा-या परशुराम गंगावणेंनी गुरांसाठी बांधकाम केलेला गोठा गुरे विकून त्याचे छोटेखानी आर्ट गॅलरी म्युझियम बनवले. गेल्या 9 वर्षापूर्वी विश्राम ठाकर आदिवासी कलाआंगण चॅरिटेबल ट्रस्ट नावाने नोंदणी करून त्यात पपेट, चित्रकथी, कळसूत्रीची अगदी शिस्तबद्ध मांडणी केलेली आहे.

kalsutri bahuli - baimanus

म्युझियमच्या आजूबाजूच्या माड, पोफळींच्या झाडांच्या खोडावरसुद्धा राजे महाराजे द्वारपाल स्वागत करणा-या पुरातन स्त्रियांची चित्रे विविध रंगात रंगविलेली आहेत. आंगणात प्रवेश करायचे प्रवेशद्वार, कमानसुद्धा बांबूच्या डहाळयांपासून तयार करून त्यावर हरण, फुलेसारखी चित्र तर प्रवेशद्वाराच्या एका बाजूस हातात ढोलकी तर सोबतीला नंदीबैल असे सिमेंट प्लास्टरपासून बनवलेली प्रतिकृती त्यासमोरील छोटयाशा झोपडीत (खोपीत) घरगडी त्याची शेतात राबणारी कारभारीण त्या सभोवर जाते.शेवगा, रवळी, बुडकुले, डहाळी, कांबळे, टोपली (हडगी), घिरट, जू, नांगर, मासेमारी करायची शेंडी, बांबू-काठयांपासून बनवलेला बाक, सोरकूल, शिंका, एवढंच नव्हे तर रॉकेल कंदील, शेणाने सारवलेल्या भिंती त्यावर शेडने काढलेली भिंतीवरील ठिपका फुले, भिंतीवर रेखाटलेला नागोबा, झोपडीचे कौलारू छप्पर मातीच्या भिंती लक्ष वेधून घेतात. आपली जुनी असलेली लोककला जपण्यासाठी गंगावणे संपूर्ण देश फिरले. चित्रकथीबद्दल माहिती जमविली. बडोदा, गुजरात, मुंबई, पुणे, औरंगाबाद, चेन्नई, मध्य प्रदेश, कुरूक्षेत्र, दिल्ली, बेंगलोर, म्हैसूर, राजस्थान, कलकत्ता येथून जाऊन पपेट शो केले. त्यांची दोन्ही मुले एकनाथ व चेतन शोसाठी गाणे गाऊन तबला वाजवून बाहुल्या नाचवून हरत-हेची मदत करतात.

kalsutri bahuli - baimanus

हजारो वर्षापूर्वीची कलानिर्मिती तत्कालीन देखाव्याने सुरू असलेले मनोरंजन, जनजागृती यांचे संशोधन करण्यासाठी अनेक जिज्ञासू येथे येत असतात. त्यात फ्रान्सचे इयॉन लींच, लंडनचे टॉम, सायमन, ऑस्ट्रेलियाची जेनीफर, अ‍ॅलेक्समोरा, कॅम्ब्रीज युकेची उमा फोस्टीस, जर्मनी-तुवाइलायन कॅरीयसवायन, डॉ. सुयी लारनिंग, हॉलंड-मरिना अशा सुप्रसिद्ध विदेशी फोटोग्राफर किम मॅक्सीको येथील डायगो दिहानीने तर या कला पॅरिस वेरनिक पोल्स आंगणमध्ये पाच दिवस थांबून ठाकर कलेबद्दल परिपूर्ण माहिती घेतली. तो या दुर्मीळ कलेवर रिसर्च करतो.

100 जुनी पपेट, 50 चित्रकथीचे सेट, त्यातील सुमारे 300 चित्रे ही हवामानाचा परिणाम होऊन जीर्ण झालेली असून त्यांचे नूतनीकरण करण्यासाठी लाखो रुपयांच्या मदतीची आवश्यकता आहे. सरकारकडूनही या लोककलेचा वारसा जपण्यासाठी राजाश्रय मिळायला हवा अशी अपेक्षा परशुराम गंगावणे यांनी व्यक्त केली. पिंगुळीत ठाकर लोककलेचा ठेवा जपला गेला आहे.येथे येणारे चिकित्सक प्राचीन दस्तावेज खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. चामडयाच्या बाहुल्यांनाही मोठी मागणी आहे. पारंपरिक चित्रकथी आपल्याकडे असाव्यात असे अनेकांना वाटते. यासाठी ठाकरी शैलीतील शिकून घेण्यासाठी अनेक कलाकार येथे येत असतात. या कलावंताना कला आंगणच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. चित्रकथीचा वारसा पिढयान् पिढया जोपासला जावा असा प्रयत्न सुरू आहे.

  • आपण हा व्हिडिओ पाहिलात का?

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here