- टीम बाईमाणूस
- "आम्हाला कारखान्यात कैद्यांसारखं ठेवलं होतं. मोबाइल काढून घेतले, आधार कार्ड जाळून टाकलं आणि पळून जाऊ नये म्हणून बाहेर पिटबुल कुत्र्याचा पहारा ठेवला होता."
- उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील पेपर प्लेट कारखान्यातून १२ वेठबिगार मजुरांची सुटका झाल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या या व्यथा आधुनिक काळातील गुलामगिरीचं भयावह चित्र उभं करतात.
- लोखंडी रॉड आणि बेल्टने मारहाण, कोंड्याच्या भाकऱ्यांवर जगणं आणि महिनोनमहिने कुटुंबापासून तोडून ठेवण्याचा हा अमानुष प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली असून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.
‘’आम्हाला कारखान्यात कैद्यांसारखं ठेवलं होतं. गेटच्या बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. आमचे मोबाइल काढून घेतले होते आणि आधार कार्डही जाळून टाकले होते. लोखंडी रॉडने मारहाण केली जात असत, खायला फक्त जाड कोंड्याची भाकरी देत होते."
‘’दिवसातून केवळ तीन-चार भाकऱ्या दिल्या जात होत्या. त्या जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोंड्यापासून बनविलेल्या असत. त्याच्याबरोबर फक्त मीठ आणि तिखट दिले जात असे. भाजी किंवा डाळ महिनोनमहिने पाहायलाही मिळाली नाही. झोप येऊ लागल्यास पट्टयाने मारहाण केली जात होती."
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एका पेपर प्लेट कारखान्यात अमानुष छळ झालेल्या १२ वेठबिगार मजुरांपैकी काही मजुरांच्या या ‘दर्दनाक’ प्रतिक्रिया…
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली. 12 मजुरांना वेठबिगारीवर ठेऊन त्यांचा अमानुष छळ केला जात होता. प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे या मजुरांची अमानवी छळातून सुटका झाली आहे. मुझफ्फरनगर जिल्ह्यात हा प्रकार घडला.
जिल्ह्यातील मांडी गावात पानांपासून बनवल्या जाणाऱ्या पत्रावळी, द्रोण बनवणाऱ्या एका कारखान्यातून या 12 जणांची वेठबिगारीतून सुटका करण्यात आली आहे.त्यांच्या कथनातून धक्कादायक अत्याचार उघडकीस आले आहेत. त्यांच्या अंगावर मारहाणीच्या आणि छळाच्या स्पष्ट खुणा आढळल्या. मजुरांना वेतन न देता, कारखान्यात डांबून ठेवून सक्तीने काम करून घेतल्याचा आरोप आहे.

मजुरांच्या म्हणण्यानुसार, कारखान्याभोवती उंच भिंती, अनेक कुलूपबंद दरवाजे, सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे आणि पिटबुल कुत्रे तैनात होते. काही मजुरांनी भाल्याने भोसकणे, चाबकाने मारहाण करणे आणि गोळीबाराची भीती दाखवून दहशत निर्माण केल्याचाही आरोप केला आहे. दरम्यान, सर्व १२ मजुरांवर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. मानसोपचार तज्ज्ञांमार्फत समुपदेशनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत चार मजुरांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट झाली आहे.
पोलीस आणि कामगार (श्रम) विभागाने ही संयुक्त मोहीम राबवली होती. या कारवाईमुळे मुक्त झालेल्या या मजुरांनी सांगितलं की, त्यांना कैद्यांसारखं ठेवलं जात होतं. त्यांचे मोबाइल काढून घेतले होते, ओळखपत्रं जाळण्यात आली होती आणि त्यांना बाहेर जाण्यासही मनाई करण्यात आली होती.
सुटका करण्यात आलेल्या मजुरांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, छत्तीसगड, हरियाणा, राजस्थान आणि अगदी नेपाळमधील लोकांचाही समावेश आहे. मुझफ्फरनगरचे एसएसपी संजय वर्मा यांनी सांगितलं की, काही मजुरांच्या बरगड्या तुटल्या आहेत.
अनेकांनी त्यांच्या गंभीर जखमा दाखवल्या आहेत. तसेच, छळामुळे काही जणांचा मृत्यू झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे, तर कारखान्याचा मालक अंकित बालियानचा पोलीस शोध घेत आहेत.
नेमकं काय प्रकरण आहे?
पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार, या लोकांना जबरदस्तीने द्रोण बनवणाऱ्या एका कारखान्यात डांबून ठेवण्यात आलं होतं. कारखान्यात मजुरांना अतिशय अमानूष वागणूक दिली जात होती. त्यांना तापवलेल्या लोखंडी रॉड, बेल्ट आणि काठ्यांनी मारहाण केली जात होती.
अनेक मजुरांच्या शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्यामध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचे सांगितलं जात आहे. हे सर्व मजूर बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, हरियाणा आणि राजस्थानसह विविध राज्यांतील रहिवासी आहेत.
मुझफ्फरनगरचे एसएसपी संजय कुमार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की,
"आम्हाला माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि कामगार विभागाने संयुक्तपणे कारखान्यावर छापा टाकला. तेथून 12 मजुरांची सुटका करण्यात आली. सर्वांवर अत्याचार करण्यात आले होते. काही जणांच्या कानाला दुखापत झाली होती, काहींच्या कंबरेवर गंभीर जखमा होत्या, तर एका मजुराच्या बरगड्याही मोडल्या होत्या. यापैकी काही जणांना दोन वर्षांपासून, तर काहींना अनेक महिन्यांपासून डांबून ठेवण्यात आलं होतं."
ते म्हणाले की,
"आरोपींनी केलेल्या अत्याचारामुळे काही जणांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे. त्यापैकी एका व्यक्तीची ओळख पटली असून पुढील कारवाई सुरू आहे. या प्रकरणात शिवा त्यागी (बुढाना, मुझफ्फरनगर) आणि प्रदीप बालियान (तितावी, मुझफ्फरनगर) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर याच गावातील रहिवासी असलेला अंकित बालियान फरार आहे."
या प्रकरणात आरोपींविरुद्ध बालमजूर (प्रतिबंध व नियमन) कायदा, 1986; बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा, 2015 मधील कलम 75 व 79; आणि वेठबिगारी पद्धती (उच्चाटन) कायदा, 1976 मधील कलम 16, 17 व 18 यांसह विविध तरतुदींनुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
आधार कार्ड जाळून टाकले, मोबाईल काढून घेतले
सुटका झालेल्या मजुरांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची माहिती दिली. उत्तराखंडमधील नैनिताल येथे राहणाऱ्या रामूने म्हटलं की,
"आम्हाला कारखान्यात कैद्यांसारखं ठेवलं होतं. गेटच्या बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. आमचे मोबाइल काढून घेतले होते आणि आधार कार्डही जाळून टाकले होते. लोखंडी रॉडने मारहाण केली जात असत, खायला फक्त जाड कोंड्याची भाकरी देत होते. आमच्याकडून अनेक तास सलग काम करून घेतलं जात होतं. झोपूही दिलं जात नव्हतं. कारखान्याचा मालक अंकितने आम्हाला येथे आणलं होतं. पोलिसांमुळे आम्हाला नवीन जीवन मिळालं आहे."
20 वर्षीय रामूचे आई-वडील हयात नाहीत. साधारण अडीच महिन्यांपूर्वी त्याला मजुरीचे काम देण्याचं आमिष दाखवून अंबाला रोडवेज स्थानकावरून मुझफ्फरनगर येथे आणण्यात आलं होतं. त्याला तीन भाऊ-बहिणी आहेत.
उत्तर प्रदेशातील औरैयाचा रहिवासी असलेला 26 वर्षीय शिवम कुमारचीही या मोहिमेत सुटका करण्यात आली. तो विवाहित असून त्याला एक मुलगी आहे. त्याच्या कुटुंबात दोन बहिणी आहेत. गेल्या 6 महिन्यांपासून त्याला कारखान्यात जबरदस्तीने ठेवण्यात आलं होतं. त्याने प्रसारमाध्यमांना आपल्या कंबरेवरील आणि छातीवरील गंभीर जखमांच्या खुणा दाखवल्या.
उत्तर प्रदेशमधील सीतापूरचे रहिवासी असलेले 50 वर्षीय जगदीश यांना आपबिती सांगताना अश्रू अनावर झाले होते. ते म्हणाले, "आम्हाला येथे येऊन 11 महिने झाले आहेत. घरी जायचं आहे किंवा येथे मन लागत नाही असं म्हटलं की, आम्हाला बेदम मारहाण केली जात असत."

छत्तीसगडमधील बिलासपूरचे रहिवासी नाराय कारखान्यातून सुटका झाल्यानंतर खूप आनंदी दिसत होते. ते वारंवार पोलिसांचे आभार मानत होते. ते म्हणाले, "माझ्या घरात दोन भाऊ आणि दोन मुले आहेत. मजुरीचे काम देण्याचे सांगून मला जुन्या दिल्ली रेल्वे स्थानकावरून मुझफ्फरनगर येथे आणलं होतं. मी येथे सुमारे 4 महिन्यांपासून होतो. मला माझ्या कुटुंबीयांची खूप आठवण यायची."
या वेठबिगारी मजुरांमध्ये नेपाळच्या पाल्पा जिल्ह्यातील सत्यवती गावचे रहिवासी दानबहादूर थापा यांचाही समावेश आहे. दानबहादूर यांनी सांगितलं की, त्यांना सुमारे दोन वर्षांपासून या कारखान्यात डांबून ठेवण्यात आलं होतं. या काळात त्यांना एकदाही कुटुंबीयांशी बोलता आलं नाही.
आमच्याकडून सतत शारीरिक कष्टाची कामं करून घेतली जात होती. खायला फक्त कोंड्याच्या पिठाची भाकरी, सोबत मीठ आणि लाल तिखट दिले जायचे. चहामध्ये साखरही नसायची."
'मजूर पळून जाऊ नयेत म्हणून पिटबुल कुत्र्याचा पहारा'
पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, आरोपी मजुरांना रेल्वे आणि बस स्थानकांवरून कामाचं आमिष दाखवून आणत असत. त्यांना दरमहा 10 ते 12 हजार रुपये पगार, तसेच राहण्याची आणि जेवणाची सोय करण्याचे आश्वासन दिले जात. परंतु, कारखान्यावर पोहोचल्यानंतर त्यांना ना पगार दिला जात, ना चांगलं अन्न.
मुझफ्फरनगरमधील ज्या कारखान्यातून मजुरांची सुटका करण्यात आली, तेथून पोलिसांनी पिटबुल जातीचा एक कुत्राही जप्त केला आहे. मजूर पळून जाऊ नयेत म्हणून हा कुत्रा बाहेर पहारा देण्यासाठी ठेवण्यात आला होता.

आरोपींनी मजुरांचे मोबाइल काढून घेतले होते. त्यामुळे या मजुरांचा अनेक महिन्यांपासून आपल्या कुटबीयांशी संपर्क झाला नव्हता, हे पोलीस तपासातून समोर आलं.
तितावी पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रमोद कुमार यांनी बीबीसीला सांगितलं की, "सध्या मजुरांची सुटका करण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जात आहे. काहींचे नातेवाईक आधीच पोहोचले आहेत, तर अनेक जण अजून यायचे आहेत."
ते पुढे म्हणाले, "मजुरांना कारखान्यात डांबून ठेवलं होतं आणि त्यांचे मोबाइलही काढून घेतले होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधता आला नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये केली होती की नाही, याची आता चौकशी केली जात आहे."






