टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष अद्याप ओसरला नसतानाच क्रिकेट जगतातील आणखी एक बातमी समोर आली आले आहे ज्यामुळे तमाम भारतीयांना अभिमान वाटायला लागला आहे. ही बातमी आहे भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या स्नेह राणा या गोलंदाजाची… टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा घास हिरावून घेत T20 विश्वचषकावर आपले नाव कोरले, त्याच दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाला चेन्नईत सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात स्नेहा राणाने आपल्या गोलंदाजीवर अक्षरश: नाचवले आहे. स्नेह आता पुन्हा एकदा चर्चेत आलीय. भारताकडून स्नेह राणा एकटीनेच एका डावात तब्बल 8 विकेट्स घेतल्या असून तसा पराक्रम करणारी स्नेह ही दुसरी भारतीय गोलंदाज ठरली आहे.
या स्नेह राणाचा क्रिकेट खेळण्यापासून ते भारतीय महिला संघात समावेश होण्यापर्यंतचा प्रवास अतिशय खडतर आणि तितकाच रोमहर्षक राहिलेला आहे. भारतीय महिला संघात जेव्हा स्नेहची निवड झाली, त्याच्या काही दिवस आधीच तिच्या वडिलांचे निधन झाले होते. पदार्पणाच्या सामन्यातच अष्टपैलू कामगिरी करून तिने दिवंगत वडिलांना एक प्रकारे आदरांजली वाहिली. पहिल्या डावात इंग्लंडच्या चौघींना बाद केल्यानंतर दुसऱ्या डावात तिने 154 चेंडूंत नाबाद 80 धावा करून कसोटी अनिर्णित राखण्यात मोलाचा वाटा उचलला. यामुळे इंग्लंडला घरच्या भूमीत कसोटी विजय मिळविता आला नाही. कसोटी पदार्पणात चार बळी आणि अर्धशतक ठोकणारी स्नेह पहिली भारतीय आणि एकूण चौथी महिला क्रिकेटपटू ठरली होती. 
हे तिचे यश काही एका रात्रीतील नाही. यासाठी तिच्यासह तिच्या वडिलांनीही तिची कारकीर्द घडविण्यासाठी कठोर मेहनत घेतली. स्नेह मूळची डेहराडूनपासून वीस किलोमीटर अंतरावरील सिनोला या गावाची. नवव्या वर्षापासून ती क्रिकेट खेळू लागली. स्नेहच्या वडिलांचं 2021 साली निधन झालं. त्यामुळे तिच्या घरी केवळ आईच असते. मोठ्या बहिणीचं लग्न झालंय, पण स्नेह बाहेर क्रिकेट सामन्यांसाठी जाते, तेव्हा तिची मोठी बहीण आईची काळजी घेते.
‘बीबीसी’शी बोलताना स्नेहची आई विमला राणा सांगतात, "आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पोहोचणं स्नेहसाठी सोपं नव्हतं. मला दोन मुली आहेत. आम्ही मुलींवर कधीच बंधनं घातली नाहीत. पण शेजारचे आणि नातेवाईक मात्र तेव्हा कुजबूज करायचे. पण तेच लोक आता तिचं कौतुक करताना दिसतायत.”
त्या पुढं सांगतात, "स्नेह लहान होती तेव्हा गावात फक्त मुलंच क्रिकेट खेळत. मुली क्रिकेट खेळताना दिसत नव्हत्या. पण स्नेह एवढं चांगलं क्रिकेट खेळायची की मुले स्वत:तून तिला आपल्या टीममध्ये घ्यायचे. एकदा गावात झालेल्या स्पर्धेत ती इतकी चांगली खेळली की, त्यावेळचे क्रिकेट कोच किरण शाह यांनी तिला योग्य ट्रेनिंग द्यायचं ठरवलं.”
स्नेह राणाचा आजवरचा प्रवास हा अनेक खाचखळग्यांनी भरलेला आहे. राणा मूळची उत्तराखंडच्या देहरादूनची. देहरादूनमधल्या सिनौला या छोट्याशा गावात एका सर्वसामान्य कुटुंबात तिचा जन्म झाला. पण वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षीपासूनच तिची आणि क्रिकेटची गट्टी जमली. लहानपणी मुलांसोबत क्रिकेट खेळणाऱ्या राणानं हळूहळू या खेळात प्रावीण्य मिळवलं. राणा दहा वर्षांची असताना क्रिकेट प्रशिक्षक नरेंद्र शाह एकदा सिनौला या गावी पोहोचले. तिथे त्यांना ‘एक मुलगी छान क्रिकेट खेळते’ असं कुणीतरी सांगितलं. पण नरेंद्र शाह तिला भेटायला गेले त्यावेळी घाबरली आणि लपून राहिली होती. पण शाह यांनी समजूत घातली आणि तिला मैदानात नेलं. तिचा खेळ पाहून शाह यांनी राणाच्या पालकांना तिला देहरादूनमधील अकादमीत पाठवण्याचा सल्ला दिला. घरापासून 12 किमी दूर असलेल्या क्रिकेट अकादमीत ती आपल्या वडिलांसोबत जाऊ लागली. आणि हळूहळू तिचा खेळ बहरु लागला.
माती सारून क्रिकेटचं पिच तयार केलं
स्नेह राणापेक्षा सहा वर्षांनी मोठी असलेली बहीण रुची राणा नेगी यांनी बीबीसीला सांगितलं, "पूर्वी लोक फक्त मुलांचे सामने पाहायचे. आता मुलींचे सामनेही बघितले जातात. क्रिकेट हे आता पुरुषांचे जग राहिलेले नाही. आता फक्त बॅट्समन नाहीत तर बॅट्सवुमनही आहेत आणि त्या अफलातून खेळतायत. स्नेह घरी आली की लोक त्यांच्या मुलींना तिला भेटायला आणतात आणि त्यांना कसे खेळायचे ते विचारतात."
देहरादूनमध्ये क्रिकेटचा सराव करणाऱ्या मुलींनाही स्नेह राणाप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत पोहोचायचे आहे, असं रुची सांगतात. उत्तराखंडच्या चमोली येथून क्रिकेट शिकण्यासाठी देहरादूनला आलेली मानसी नेगी सांगते, "स्नेह दीदी इथं येते तेव्हा ती सांगते की, आमच्या काळात आम्ही ढेकळं आणि दगड बाजूला सारून क्रिकेट खेळण्यासाठी मैदान तयार करायचो. आता इथं एक चांगले मैदान आहे. यात तुम्हाला मेहनत घ्यायची आहे आणि यश मिळवायचं आहे.”
2014 मध्ये स्नेहला भारतीय महिला संघात एक दिवसीय सामन्यासाठी, तसेच टी-ट्वेंटीसाठी स्थान मिळाले. तंदुरुस्तीचा अभाव, खराब फॉर्म, गुडघ्याची दुखापत यांमुळे ती संघातून 2016 मध्ये बाहेर फेकली गेली. मात्र, तिने हार मानली नाही. जिद्दीने ती सराव करीत राहिली. सातत्य आणि फिटनेस या दोन्ही गोष्टींवर तिने भर दिला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि नेटमध्ये दाखवलेल्या चकमदार कामगिरीच्या जोरावर तिची कसोटी सामन्यासाठी निवड झाली. अष्टपैलू असणे ही तिची जमेची बाजू ठरली. संघात दीप्ती शर्मा ही ऑफ-स्पिनर असतानाही स्नेह राणाला संधी मिळाली. निवड समितीचा विश्वास स्नेह राणाने सार्थ ठरविला. पाच वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटविण्याची ही संधी तिने सोडली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिचे पुनरागमन अनेक जणींसाठी प्रेरणादायी आहे. कधीही हार न मानण्याची वृत्ती खेळातूनच येत असते, हे तिने दाखवून दिले.






