भारतीय स्वातंत्र्याच्या प्रदीर्घ चाललेल्या लढ्यांमध्ये आदिवासी भटक्या-गुन्हेगार ठरवलेल्या जमातींचे काही योगदान आहे का? कारण पाठ्यपुस्तकातल्या इतिहासात, वक्त्यांच्या भाषणात, शाळेतल्या शिकवणीत आदिवासी शूरवीरांच्या आंदोलनातली नावे कधीच वाचली वा ऐकली गेलेली नाहीत. मौखिक परंपरेतून आलेल्या आदिवासींच्या शौर्यकथा एकीकडे आणि इतिहासाच्या पुस्तकात मात्र त्याबाबतीत अर्धसत्य… स्वातंत्र्यावर बोलत असताना आदिवासी वंचितांच्या इतिहासाबाबत लेखण्या मौन बाळगून होत्या. फारशा उजागर होत नव्हत्या. बहुधा करून त्यांचे उल्लेख टाळले जात होते. आणि जे काही क्वचित ठिकाणी भाष्य नोंदवले गेले होते ते चोर, डाकू, दरोडेखोर म्हणूनच…
आदिवासींचे लढे आणि राष्ट्रीय आंदोलनाचा आरंभ या मुद्द्यांना घेऊन इतिहासकारांमध्ये मतभेद असले तरी आदिवासी हे इंग्रजांविरुद्ध, त्यांचे मांडलिक जमीनदार, सरंजामदार आणि महाजनांविरुद्ध आपल्या स्थानिक भूमीसाठी, आपले स्वातंत्र्य अबाधित राहावे यासाठीच लढलेत. गुजरातच्या डांग पासून बंगालच्या चौबीस परगना ते थेट ‘सेवन सिस्टर्स’पर्यंत स्थानिक सेठ सावकारांना हाताशी घेऊन इंग्रजांनी सत्ता हस्तगत करून हळूहळू आपले पाय पसरायला नि रोवायला सुरुवात केली, तेव्हा आदिवासी वनअधिकाऱ्यांना नाकारून जंगल, जमिनीचे कायदे केल्याने आदिवासी आंदोलनाचा देशभर भडका उठला. त्यांचे हे विद्रोह म्हणजे त्यांची सामूहिक मालकीच्या जमिनी, जंगल हिरावल्याची भावना होती. त्यामुळे त्यांच्या मनात असंतोष उफाळून आला नि तो सामूहिक उठावांमध्ये परावर्तीत झाला.
ज्या 1857 च्या संस्थानिकांच्या उठावाला इतिहासकार राष्ट्रीय आंदोलनाचा पाया म्हणतात, त्याच्याही तब्बल 90 वर्षांआधीपासून इंग्रजांविरुद्ध क्रांतीचे बिगुल वाजले होते. उलगुलानचा नारा दिला गेला होता, हे अव्हेरता येणार नाही. ब्रिटिश सत्तास्थापनेनंतर येथील आदिवासींसोबत अनेक सशस्त्र लढे झाले, ज्याचे मुख्य कारण इंग्रजांद्वारा सामाजिक, आर्थिक आणि भूसांस्कृतिक जीवनात केलेला हस्तक्षेप हे होते. ब्रिटिशांनी वनांना सरकारी संपत्ती घोषित करून टाकले. सावकार, जमीनदार, वतनदार, महाजन इंग्रजांशी मिळून आदिवासींचे शोषण करीत. याचे परिणामरूप आदिवासी लोकसमूह आणि ब्रिटिशांमध्ये संपूर्ण देशात संघर्षाची ठिणगी पडली होती.
'करो या मरो, अंग्रेजों हमारी माटी छोड़ो'।
त्यापैकीच एक आंदोलन म्हणजे हुल क्रांती… संथालांचा ‘हुल विद्रोह’‘... 30जून 1855 रोजी झारखंड राज्यातील साहिबगंज भोगनाडीह येथे ब्रिटिशांविरुद्ध लढलेल्या आदिवासींच्या वीर गाथा आणि बलिदानाचे स्मरण म्हणजे संथालांचा ‘हुल विद्रोह’. संथाली भाषेत हुल म्हणजे क्रांती. आदिवासी हा दिवस त्यांचा संघर्ष आणि इंग्रजांनी मारलेल्या त्यांच्या 20,000 लोकांच्या स्मरणार्थ साजरा करतात. ब्रिटिशांच्या अत्याचारातून मुक्त होण्यासाठी स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासींची संघर्षगाथा सांगणारा, बलिदानाची आठवण करून देणारा हा दिन हल क्रांती दिन म्हणून ओळखला जातो.
आजचे संथाल परगणा क्षेत्र तेव्हा बंगाल प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत डोंगर आणि जंगलांनी व्यापलेले क्षेत्र होते. या भागात राहणारे पहाडीया, संथाल व इतर आदिवासी शेती करून आपला उदरनिर्वाह चालवत असत. त्यांनी जमिनीचा महसूल कोणालाही दिला नाही. त्या काळात ईस्ट इंडिया कंपनीने महसूल वाढवण्यासाठी जमीनदारांची फौज तयार केली होती. त्यांनी पहाडी, संथाल आणि इतर रहिवाशांअत्याचारालाही ते कंकडून जबरदस्तीने कर वसूल करण्यास सुरुवात केली. कर भरण्यासाठी स्थानिक लोकांना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत होते. सावकारांच्या वाढत्या टाळले होता. त्यामुळे लोकांमध्ये असंतोषाची भावना वाढली. सिद्धू, कान्हू, चांद आणि भैरव असे चार भाऊ होते. लोकांच्या असंतोषाचे त्यांनी चळवळीत रूपांतर केले.
तो दिवस होता 30 जून 1855. चारशे गावांतील सुमारे 50 हजार आदिवासी भागनाडीह गावात पोहोचले. येथून आंदोलनाला सुरुवात झाली. याच बैठकीत यापुढे कर भरणार नसल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर इंग्रजांनी सिद्धू, कान्हू, चांद आणि भैरव या चार भावांना अटक करण्याचे आदेश दिले. चार भावांना अटक करण्यासाठी तेथे पाठवलेल्या इन्स्पेक्टरची संथालांनी गळा चिरून हत्या केली. या वेळी सरकारी अधिकाऱ्यांमध्येही या आंदोलनाबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
जोपर्यंत ढोल वाजत होते तोपर्यंत आदिवासी लढत होता
चळवळ चिरडण्यासाठी इंग्रजांनी या भागात सैन्य पाठवले होते. आदिवासींना झपाट्याने अटक करण्यात आली. बंडखोरांवर गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्शल लॉ लागू करण्यात आला. ब्रिटिश सरकारने आंदोलकांच्या अटकेसाठी बक्षीसही जाहीर केले होते. बहराइचमध्ये ब्रिटीश आणि आंदोलक यांच्यातील लढाईत चंद आणि भैरव शहीद झाले. प्रसिद्ध ब्रिटीश इतिहासकार हंटर यांनी त्यांच्या 'ॲनल्स ऑफ रुलर बंगाल' या पुस्तकात लिहिले आहे की, 'संथालांना आत्मसमर्पणाची जाणीव नव्हती. यामुळे एकीकडे जोपर्यंत ढोल वाजत राहतील तोपर्यंत लढतच रहायचे असे या शूर आदिवासींनी ठरवले होते.जोपर्यंत शेवटचा आदिवासी जिवंत होता तोही शेवटपर्यंत लढतच राहिला. या युद्धात सुमारे 20 हजार आदिवासींनी बलिदान दिले.
सिद्धू आणि कान्हू यांच्या निकटवर्तीयांनाही पैशाचे आमिष दाखवून अटक करण्यात आली होती. त्यानंतर 26 जुलै रोजी भगनाडीह गावात दोन्ही भावांना खुलेआम झाडाला लटकवून फाशीची शिक्षा देण्यात आली. अशा प्रकारे सिद्धू, कान्हू, चांद आणि भैरव या चार भावांनी भारतीय इतिहासात आपले अमिट स्थान कायमचे बनवले.
1855 मध्ये या दिवशी भोगनाडीह गावातील सिद्धू-कान्हू यांच्या नेतृत्वाखाली झारखंडच्या आदिवासींनी इंग्रजांविरुद्ध बंड केले. तेथे ४०० गावांतील 50,000 हून अधिक लोक पोहोचले आणि त्यांनी युद्धाची घोषणा केली. आदिवासींनी पारंपरिक शस्त्रांच्या सहाय्याने या बंडात भाग घेतला. या बंडानंतर ब्रिटीश सैन्य खूप घाबरले आणि त्यांनी आदिवासींना रोखण्यास सुरुवात केली.
बंडखोरीचे कारण
बंडाचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येईल की, देशात महाजनांचे वर्चस्व होते आणि ते इंग्रजांच्या अगदी जवळ होते. संथालांचा लढा महाजनांविरुद्ध होता पण इंग्रजांशी जवळीक असल्यामुळे संथालांनी दोघांविरुद्ध बंड केले. हे बंड रोखण्यासाठी इंग्रजांनी 1856 मध्ये एके रात्री मार्टिलो टॉवर बांधला आणि त्यात लहान छिद्रे पाडली जेणेकरून संथालांना गुप्तपणे बंदुकींनी लक्ष्य करता येईल. पण, आदिवासींच्या पराक्रमापुढे इमारत कशी टिकणार होती. संथालांच्या शौर्यापुढे इंग्रजांना नतमस्तक व्हावे लागले.
एकंदरीतच आदिवासी आंदोलनांनी लोकांमध्ये मातृभूमीप्रती जागृती निर्माण करण्याचेच काम केले आहे. ही गोष्ट निश्चितच सर्वमान्य आहे की, आदिवासींची आंदोलने स्थानिक परिस्थितीनुसार स्थानिक पातळ्यांवर लढली गेली. संपूर्ण भारतभर ती लढली गेली, पण संपूर्ण भारत हे त्यांचे लक्ष्य नव्हते आणि साहजिकच ते नसणारही! कारण तत्कालीन परिस्थितीत 565 संस्थाने अर्थात स्वतंत्र देशच होते. संघराज्याची संकल्पनाच अस्तित्व पावलेली नव्हती. अनेक समूहातल्या आदिवासींसमोर आम्ही जिथे जन्मलो, आमच्या पूर्वजांसह आम्ही जिथे जगलो, वाढलो ती भूमी आमची मातृभूमी, अशी भावना जर या सर्व लढ्यांच्या पाठीमागे असेल तर ते खचितच मातृभूमीसाठी, तिला स्वतंत्र करण्यासाठीच होते. देशभरातील या सर्व आंदोलनांमधून प्रदेशाच्या सार्वभौमत्वाचा दावा करण्यात आला होता. खरे तर ते राष्ट्रपूर्व राष्ट्रवादच होते, हे नि:संकोचपणे स्वीकारावे लागते. भारतीय स्वातंत्र्याच्या बीजारोपणाला, पायाभरणीला याच आंदोलनांमधून आरंभ झाला आहे. हा इतिहास आम्ही येणाऱ्या भारतीय पिढ्यांसमोर एकांगी, अपूर्ण स्वरूपाचा न ठेवता व्यापक स्वरूपात लिहायला सांगितला पाहिजे तर भारताच्या इंच इंच भूमीसाठी लढणाऱ्या प्रत्येकाचे बलिदानही कामास येईलआणि भारतीय जनामनात एकतेची-संघीय भावनेची भक्कम बांधणी व्हायला नक्कीच मदत होईल.






