(सिद्धार्थ सराठे)
17 जुलै 2023 रोजी मध्यप्रदेशातील उज्जैन इथे राहणारे अदनान जेव्हा सोड्याचं दुकान बंद करून आपल्या घरी जात होते तेव्हा त्यांनी विचारही केला नाही की एक अफवा त्यांचं जगणं कायमचं बदलून टाकेल. अदनान आपला लहान भाऊ आणि ओळखीच्या दोन मुलांसोबत शेजारच्या घराच्या बाल्कनीत होते, ज्यावेळी खालून रस्त्यावर ‘महाकाल सवारी’ यात्रा जात होती. यावेळी काही लोकांनी अदनान आणि त्यांच्या मित्रांचा एक व्हिडीयो बनवला, ज्याबद्दल अदनान यांना काही माहिती नव्हती. संध्याकाळी जवळच्या खाराकुआँ पोलिस ठाण्यातून पोलिस आले आणि त्यांनी अदनानला अटक केली.
अदनानवर महाकाल यात्रेवर थुंकण्याचा आरोप
अदनान आणि त्याच्या कुटुंबाला तेव्हा समजतं की त्याच्यावर महाकाल यात्रेवर थुंकल्याचा आरोप आहे. व्हिडीओत अदनान थुकताना दिसतात का? तर नाही… इतर कोणता पुरावा आहे जो हे सिद्ध करतो? नाही… मग अटक कशाच्या आधारावर झाली? फक्त यावर की व्हिडीओ तयार करणाऱ्यानं अदनानला थुंकताना पाहिलं होतं म्हणून.
पोलिसांची कृती इथेच थांबत नाही. दुसऱ्या दिवशी प्रशासन चक्क डीजे आणि ढोल-नगाडे घेऊन अदनानच्या घरी जातात आणि बुलडोजरने त्याचे घर पाडतात. अदनान सांगतात, “मी तुरुंगात होतो आणि घर पाडलं गेलंय याची मला माहितीच नव्हती. मला आणखी त्रास होऊ नये म्हणून घरच्यांनीही मला याविषयी काही सांगितलं नाही. दोन महिन्यांनी मला समजलं की घर पाडलं गेलंय.”
(Photo Credit : The Quint)
ढोल ताशांच्या गजरात बुलडोजरने अदनानचे घर पाडले
‘द क्विंट’ची फॅक्ट चेकींग टीम ‘वेबकुफ’ आपल्या ‘एक अफवाह की किमत’ या मालिकेत त्या गोष्टी प्रेक्षकांसमोर आणतात ज्यात अफवांमुळे लोकांच्या आयुष्यावर काय परिणाम घडतोय हे दाखवण्यात येतं. ‘द क्विंट’च्या टीमने अदनान प्रकरणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. जो व्हिडीओ व्हायरल झाला होता त्याचं खरं व्हर्जन अदनानच्या घरच्यांनी आम्हाला दाखवला. त्यात अदनान काहीही करताना दिसत नाही. मग पोलिसांनी अदनान यांना अटक का केली?
उभ्या असलेल्या लोकांमध्ये अदनान हेच वयस्क असल्यामुळे त्यांनाच मुख्य आरोपी करण्यात आलं असं त्यांचे वडील अशरफ सांगतात. ज्या व्हिडीओच्या आधारावर एफआयआर झाली त्यात स्पष्ट दिसतंय की अदनान सोबतच्या दुसऱ्या मुलानं च्युईंग गम फेकला होता, जो रस्त्यावर नाही तर खिडकीवर पडला. पण पोलिसांनी चौकशी न करता हे कसं म्हटलं की मुलगा यात्रेवर थुंकला होता म्हणून?
व्हीडियोत कोणीच थुंकताना दिसत नाहीये, तरीही…?
आरोप करणारे आणि सरकारी वकील यांनी जो व्हिडीओ दाखवला आहे त्यात कोणीही थुंकताना दिसत नाही. अदनानचे वकील देवेंद्र सैंगर सांगतात की, ज्या मुलानं च्युईंग गम फेकले ते ही खिडकीवर पडताना दिसत आहे. तक्रार भाजप नेता मासूम जायसवाल यानं केली होती. जो यात साक्षीदारही आहे. तो घटनास्थळापासून 50 किमी दूर इंदौरला राहतो.
जायसवालला विचारल्यावर तो आम्हाला आणखी एक व्हिडीओ दाखवतो ज्यात एक मुलगा बाल्कनीत पाण्याची बॉटल घेऊन उभा आहे. जायसवालचा दावा आहे की तो गुळण्या करत होता. व्हिडीओत असं काही दिसत नाही.
जायसवालकडे असा कोणताही पुरावा नाही की ज्यानं सिद्ध होईल की कोणी महाकाल सवारी यात्रेवर थुंकला आहे. अशरफ आणखी एक गोष्ट सांगतात की, ज्या बाल्कनीचा व्हिडीयो व्हायरल झाला त्याच्या शेजारीच एक सरकारी सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला होता जो यात्रेच्या रेकॉर्डींगसाठी होता. पण जेव्हा अशरफ यांनी याचं फुटेज आरटीआय अंतर्गत मागितलं तेव्हा सांगण्यात आलं की तो कॅमेरा तेव्हा बंद होता.
सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज लपवले
न्यायालयात तक्रार करणारा सावन लोट यानं म्हटलं की, तो महाकाल यात्रेच्या वेळी अदनान यांच्या घराजवळ नव्हता. याच आधारावर अदनान यांना जामीन मिळाला. पण जोवर महाकाल यात्रेवर थुंकल्याच्या अफवेतलं सत्य बाहेर आलं तोवर अदनान यांनी तुरुंगात १५१ दिवस काढले होते. पण सावन लोट नंतर मीडियात सांगतो की त्यानं दबावाखाली येऊन तक्रार वापस घेतली.
अदनान यांचे वकील सैंगर सांगतात की ज्या लोकांनी लोट याला पुढे करून तक्रार दाखल केली होती त्यांनीच त्याच्यावर दबाव आणला होता. पण त्यानं याचा वेगळा अर्थ लावून मीडियात वेगळंच सांगितलं की दबावाखाली त्यानं तक्रार मागे घेतली. पण याचा न्यायालयात त्यानं दिलेल्या साक्षीशी काही संबंध नसल्याचं सैंगर सांगतात.
काही अनुत्तरित प्रश्न…
अदनान यांना आता जामीन मिळाला आहे आणि ते पुन्हा जगण्याचा प्रयत्न करत आहेत पण काही प्रश्न अजूनही बाकी आहेत. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी न करताच बुलडोजर एक्शन कशी काय घेतली? मुख्य तक्रारकर्त्यानं आपली साक्ष मागे घेतली होती. आता तोडलेल्या घरासाठी प्रशासन अदनानच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देणार आहेत का? जो कॅमेरा यात्रेच्या रेकॉर्डिंगसाठीच लावलेला होता, तो बंद कसा पडला, त्याचे फुटेज कुठे गेली?
(सौजन्य - द क्विंट)






