(दृष्टि चौधरी)
हवामानाची माहिती देण्यापासून केळ्याच्या सालींच्या औषधीय उपयोगांची यादी बनवण्यापर्यंत तसेच दागिस्तान मधल्या दहशतवादी हल्ल्यांची माहिती देणं असो, भारतात आर्टीफिशियल इंटलिजेंस (एआय) म्हणजेच कृत्रिम प्रज्ञेच्या न्यूज अँकर्सची संख्या वाढत आहे.
मार्च 2023 मध्ये इंडिया टुडे ग्रुपने देशातील पहिली एआय अँकर ‘सना’ आणल्यानंतर अनेक प्रादेशिक आणि राष्ट्रीय न्यूज चॅनेल्सने आपले एआय न्यूज अँकर उतरवले आहेत. मे 2024 मध्ये दूरदर्शननेही डीडी किसानसाठी दोन एआय अँकर आणले. 24 तास वर्षाचे 365 दिवस न थकता काम करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे आता सारेच चॅनेल्स एआयकडे वळू शकतात. 
न्यूज अँकरला 60-70 हजार पगार देण्यापेक्षा 7-8 हजारात एआय अँकर परवडते
बिग टीव्हीने जुलै 2023 मध्ये तेलुगू एआय अँकर ‘माया’ आणली होती. बिग टीव्हीचे सीईओ अजय रेड्डी कोंडा म्हणतात की, एआय न्यूज अँकर आणणं मानवी न्यूज अँकरच्या तुलनेत फारच स्वस्त पडतं. मला एका मानवी न्यूज अँकरसाठी महिन्याला 70-80 हजार रुपये मोजावे लागतात, तर एआय अँकरवर मला फक्त 7-8 हजार रुपये खर्च येतो.”
पर्सोनेटचे सह-संस्थापक ऋषभ शर्मा यांनी सांगितलं की, एआय न्यूज अँकर तयार करण्यासाठी जो खर्च येतो तो माध्यमांना फारच स्वस्त पडतो. पर्सोनेटने इंडिया टुडे व डीडी किसानसाठी एआय अँकर विकसीत केले आहे. पण माणसांप्रमाणेच हे एआय अँकर देखील चुका करतात.
|
संबंधित लेख वाचा: |
एआय अँकरकडून बातम्या सांगताना अनेक चुका
पर्सोनेटने जे अँकर विकसित केले आहे त्यांच्या निर्मितीत प्रत्येक स्तरावर मानवी हस्तक्षेप होत असतो. त्यामुळे त्यांचा कंटेंट विश्वसनीय असत नाही. एआय अँकरला भ्रम होऊ शकतात आणि न घडलेल्या घटनांचीही ते माहिती तयार करू शकतात, असं शर्मा कबुल करतात. ते सांगतात की, न्यूजरुम मध्ये कंटेट रायटर व संपादक एक स्क्रिप्ट तयार करतात आणि मग ती एआय प्लॅटफॉर्मवर अपलोड करून त्याचा ऑडियो केला जातो व जो एआय अँकरसोबत लिप-सिंक केला जातो.
कोंडा सांगतात की, ते त्यांच्या एआय अँकरसाठी पाच मिनिटांचे बुलेटिन तयार करतात. ज्याच्या तयारीला दोन-तीन तास लागतात. अनेकांचं म्हणणं आहे की प्रत्येक स्तरावर मानवी हस्तक्षेप असल्यानं एआय न्यूज अँकर असण्याला काही अर्थ उरत नाही.
इलेट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एआय संबंधीत ‘पहल-इंडिया एआय’चे संशोधक निवाश जीवनानंदमा विचारतात की, जर माणूसच स्क्रिप्ट लिहून एआय अँकरला देत असेल तर याला काय अर्थ आहे? ती केवळ एक बाहुली आहे जी फक्त लिहीलेली माहिती वाचून काढतेय. जिथे एआय अँकर बुलेटिन तयार करतात तिथेही संपादकांची एक टीम त्यांची समीक्षा करतेच. 
ओडिया चॅनेलचे व्यावसायिक सहयोगी लितीशा मंगत पांडा सांगतात की, ओडिशा टिव्हीची ‘लिसा’, बुलेटिनसाठी ड्राफ्ट तयार करते. रियल-टाईम अपडेटवर आधारीत असल्यानं याची निर्मिती वेगानं व काळजीनं केली जाते. पण यात चुकीची माहिती नाही यासाठी ‘फॅक्ट चेकींग’ होते. विशेषकरून संवेदनशील गोष्टींची जास्त काळजी घेतली जाते. पांडा सांगतात की, संपादक प्रत्येक एआय-जनरेटेड माहिती प्रसारणापूर्वी दोनदा तपासून घेतात. एआय अँकर्सच्या माहितीत चुका असतातच पण त्याशिवाय ते अजूनही उत्कृष्टतेपासून फारच दूर आहेत. कोंडा मान्य करतात की, एआय अँकरचे बुलेटिन निरस असतात आणि त्यांच्यात माणसांमध्ये असेलल्या भावनांचा अभाव असतो.
एआय न्यूज अँकर लैंगिक पूर्वग्रहही दाखवत आहेत. भारतातील बहुसंख्य एआय अँकर स्त्रिया आहेत. इंडिया टुडेकडे सहापैकी पाच अँकर स्त्रिया आहेत. यातील नैना भोजपूरी बातम्या देते, तिला इंडिया टुडेच्या न्यूज बुलेटिनमध्ये ‘भोजपूरी भाभी’ म्हणून संबोधलं जातं. न्यूज18ची अँकर कौर, ओडिशा टीव्हीची लिसा, पॉवर टीव्हीची सौंदर्या, बिग टीव्हीची माया याचीच उदाहरणं आहेत.
सगळ्या एआय अँकर्स महिलाच कशासाठी?
तज्ञांचं म्हणणं आहे की एआय अँकर तेच लैंगिक पूर्वग्रह दाखवतात जे आधीच भारतीय मीडियामध्ये पसरलेले आहेत आणि यांच्यामुळे त्यांना आणखी बळ मिळतंय. पत्रकार व माध्यम विश्लेषक अम्मू जोसेफ सांगतात की, पारंपरिक टीव्ही न्यूजमध्येही स्त्रियांना पत्रकाराऐवजी अँकर म्हणून आणलं जातं. एआय अँकरमध्येही हेच केलं जात आहे.
कोंडा देखील जोसेफ यांच्या गोष्टीला दुजोरा देत म्हणतात की, अँकर्स स्त्रियाच असतात व आमच्या बिग टीव्हीतही 14 पैकी 12 महिला अँकर्स आहेत आणि फक्त 2 पुरुष आहेत. लोकांना बायकांनी बातम्या वाचलेलं आवडतं. त्यांना बघणं त्यांना जास्त आकर्षक वाटतं असं ते सांगतात. पांडा म्हणतात की, ओडिशा टीव्हीच्या लिसाला मुद्दाम एका तरुण भारतीय स्त्रीच्या रुपात दाखवलं आहे. ज्यामुळे ती ‘आपलीशी’ वाटेल. एका स्त्रीचं व्यक्तिमत्त्व सुंदर, सहज, आकर्षक व विश्वासार्ह समजलं जातं, असं पांडा म्हणतात.
पण तज्ञांचं म्हणणं आहे की, असे निर्णय हे भारतीय प्रेक्षकांच्या तथाकथित विचारांपेक्षा, लैंगिक रुढींवर आधारलेले असतात. ‘युट्रेक्ट युनिव्हर्सिटी’च्या समावेशक एआय संस्कृतीच्या प्राध्यापिका पायल अरोडा सांगतात की, यातून एक सामाजिक धारणा दिसून येते जी सांगते की स्त्रिया अधिक मनमिळावू व समर्पित असतात. अरोडा या ‘फेम-लॅब’च्या सह-संस्थापिकाही आहेत. इथं स्त्रीवादी नजरेतून तंत्रज्ञानातील विकासावर संशोधन केलं जातं. अरोडा सांगतात की एआय अँकर्स स्त्रिया आहेत कारण एआय तंत्रज्ञान हे ऐतिहासिकदृष्ट्या पुरुष वापरकर्त्यांना पुढे ठेवून डिझाईन केलं गेलंय.
एआय अँकर्स आणि सौंदर्याचे मापदंड
अनेक तज्ञ सौंदर्याच्या पारंपरिक मापदंडांविषयी बोलतात. कारण स्त्री एआय अँकर्स यावरूनच डिझाईन केली गेली आहे. जोसेफ म्हणतात की एआय अँकर्स पत्रकारीता कौशल्यांपेक्षा सौंदर्याच्या पारंपरिक निकषांना धरून तयार करण्यात येत आहे.
पत्रकार व संशोधक पामेला फिलिपोस या जोसेफ यांच्या मताला दुजोरा देता म्हणतात, “आमच्याकडे हुशार अँकर्स असले पण ते जर पारंपरिक सौंदर्याच्या निकषावर बसत नसले तर त्यांच्याकडे पूर्वग्रहातून पाहिलं जातं. एआय न्यूज अँकर्स , एक स्त्री अँकर कशी दिसायला पाहिजे याची पारंपरिक विचारसरणी लक्षात घेऊन तयार केली जाते जी सुंदर, सडपातळ, गोरी आणि आकर्षक असेल.” तंत्रज्ञानाला समाजाला पुढे घेऊन जायचं असतं, मागे नाही यावर त्या सांगतात, “जर पत्रकारीतेत एआयचा प्रयोग केवळ सुंदर दिसणं आणि पारंपरिक लैंगिक धारणांना प्राधान्य देणंच असेल, तर ते अशा पूर्वग्रहांना आव्हान देण्याऐवजी त्यांना बळकटीच देत राहतील.”
(सौजन्य - न्यूज लॉँड्री)
अनुवाद - प्रतिक पुरी






