मुंग्यांचा काय तो जीव, काय ते जग आणि किती ते जगणे ? पायाचा अंगठा अलगद ठेवला तरीही क्षणात सगळा खेळ खतम. त्यामुळे एक मुंगी असो वा शेकडो मुंग्या, त्या राहिल्या काय न मेल्या काय मोठा फरक पडणार आहे? काय मोठी आपल्या आणि जगाच्या ज्ञानात भर पडणार आहे?... अर्थात, हा झाला सर्वसामान्यांच्या डोक्यात येणारा विचार. परंतु वैज्ञानिक असा सर्वसामान्य विचार करीत नाहीत.
सजीव तिळाच्या दाण्याएवढा असो वा हत्तीएवढा, त्यांना त्यांच्या जगण्याचे मोलही ठाऊक असते आणि महत्त्वही. म्हणूनच वैज्ञानिकांच्या जगात मुंगी किंवा मुंग्या हा सखोल संशोधनाचा विषय असतो. मुंग्यांची जीवनशैली, अस्तित्व टिकून राहण्याच्या धडपडीतून रुळलेली कार्यशैली, या कार्यशैलीला बळ देणारी बुद्धिमत्ता याचा उत्क्रांतीशी असलेला संबंध आणि एकूणच जीवसृष्टीतल्या गूढरम्यतेची उकल त्यांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्वाची असते.
त्या ओळखल्या जातात, फ्लोरिडा कारपेंटर अँट (Florida carpenter ants) म्हणजे, अमेरिकेतल्या फ्लोरिडा राज्यात आढळणाऱ्या सुतार मुंग्या. त्यांचा जीव केवढा तर, जेमतेम अर्ध्या इंचाचा. आहे काय नि नाय काय, असा हा मामला... या फ्लोरिडावासी मुंग्या असतात, भूप्रदेशीय. म्हणजे, विशिष्ट भागांपुरतीच यांची सद्दी वा दादागिरी. त्याच्याबाहेर यांचे नामोनिशाण नाही. परंतु या मुंग्यांच्या जगण्याची भानगड ही असते, की शत्रू वसाहतीतल्या मुंग्यांशी यांच्या या ना त्या कारणांवरून सतत हिंसक झडपी होत राहतात.

शत्रूंच्या एरियात जाऊन मारामाऱ्या करणाऱ्या फ्लोरिडाच्या सुतार मुंग्या…
या हिंसक झटापटी कधीकधी इतक्या भयानक असतात की अनेक मुंग्यांचे पाय त्यात जखमी होतात. मग पुढे काय ? अर्ध्या इंचाची मुंगी पायाने जखमी झाली की काही क्षणांत म्हणा किंवा काळाने त्यांचे या पृथ्वीतलावरचे अवतार कार्य आटोपले असे समजायचे का? नाही. सदा चौकस नि चतुरस्र बुद्धीच्या वैज्ञानिकांना संशोधनातून अलीकडेच असे लक्षात आले आहे की, हिंसक हल्ल्यांनंतर या मुंग्यांनी अत्यंत प्रभावी असा जखमेवरचा उपाय शोधून काढलाय. किंवा उपायात प्रावीण्य मिळवलेय असेही म्हणा.
काय आहे तो उपाय ? इंग्लिशमध्ये अॅम्प्युटेशन. मराठीत अवयव विलगीकरण. म्हणजे माणूस जसे एखाद्या अपघातानंतर जीव जाऊ नये यासाठी पाय शस्त्रक्रिया करून काढून टाकण्याचा उपाय योजतो, तसाच हा प्रकार. सारेच अद्भूत. म्हणजे याचा अर्थ, जे ज्ञान माणसाला झाले, तसेच ज्ञान या फ्लोरिडावासी मारकुट्या मुंग्यांनाही झाले की हो म्हणायचे.
'करंट बायोलॉजी' नामे संशोधन पत्रिका संशोधकांत नावाजली जाते. या पत्रिकेच्या जुलैच्या (2024) अंकात हा भन्नाट शोध नोंदवण्यात आला आहे. वैज्ञानिकांनी असे निरीक्षण मांडले आहे की, जेव्हा फ्लोरिडावासीय मुंग्यांशी एवढ्यातेवढ्यावरून शत्रू मुंग्यांशी हाणामारी होते, त्यात ज्या मुंग्यांच्या तंगड्या जखमी होतात, तेव्हा शरीरात होणारा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी आपल्यासोबत वारुळ-वस्तीत घरोबा असलेल्या मुंग्यांचे जखमी पाय कटाक चावा घेऊन तोडले जातात.

…परंतू या मुंग्या चक्क इतर मुंग्यांवर शस्त्रक्रिया करतात
एरवी, मुंग्यांच्या राज्यात अशा प्रसंगात काय घडते, तर एक मुंगी दुसऱ्या मुंगीची जखम झालेली जागा लाळेने साफ करते. जेणेकरून संसर्ग होऊ नये, जीव वाचावा. परंतु, फ्लोरिडावासीय मुंग्यांनी जे काही अवयव विलगीकरणाचे माणसाच्या शस्त्रक्रिया तंत्राशी मिळतेजुळते तंत्र उपयोगात आणले आहे, त्याने मुंग्यांच्या उत्क्रांत झालेल्या जगावर नव्याने प्रकाशझोत पडला आहे.
यात पुन्हा गंमत अशी आहे की, मुंग्यांशी काही विशिष्ट प्रकारातल्या जखमा झालेल्या पायांवरच अवयव विलगीकरण शस्त्रक्रिया केलेली आहे. याचा वैज्ञानिकांना लागलेला अर्थ असा आहे की, या मुंग्यांनी निष्णात तज्ज्ञ डॉक्टरप्रमाणेच आपली स्वतःची शस्त्रक्रिया पद्धती विकसित केलेली आहे. हासुद्धा एक बौद्धिक चमत्कारच आहे. कारण सजीव सृष्टीत मानवाव्यतिरिक्त आजवर असे ज्ञान इतर कोणा सजीवांमध्ये आहे, असे संशोधकांना आढळलेले नाही.
या नजरेत पडणाऱ्या वर्तनव्यवहाराचा एक अर्थ, फ्लोरिडावासीय मुंग्या बुद्धिमान आहेत; हा आहेच, परंतु त्यांची वेदना सहन करण्याची क्षमता कमी झालेली आहे की काय, असाही थोडा संशयी प्रश्न संशोधकांच्या मनात या निमित्ताने आलेला आहे.
जर्मनीच्या डानी बुफा याच्या नव्या संशोधनामुळे जगभरात आश्चर्य
जर्मनीमध्ये बुनिव्हर्सिटी ऑफ वूत्झबर्ग आहे. तिथला पदवीचे शिक्षण घेणारा एक विद्यार्थी. त्याचे नाव डानी बुफा. हा डानी बुफा फ्लोरिडावासीय मुंग्यांवर अत्यंत संयम राखत संशोधन करतो आहे. 2020 सालाच्या प्रारंभाला संशोधक विद्यार्थी बुफाला मुंग्याच्या राज्यात काहीतरी चित्रविचित्र प्रकार घडल्याचे दिसले. त्याने काय पाहिले तर एक मुंगी चावा घेऊन दुसऱ्या मुंगीचा पाय तोडते आहे.
मुंग्यांच्या जीवनदर्शनातला हा म्हटला तर नवाच अध्याय होता. जो बुफाने प्रत्यक्ष अनुभवला आणि इथूनच खऱ्या अर्थाने मुंग्यांच्या बुद्धितेजाची शलाका जगाच्या परिचयाची झाली. बुफा आता स्वित्झर्लंडमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ लुसान इथे जैववैज्ञानिक आहे. त्यानेच या संशोधनावर लेखन केले आहे. पण गंमत अशी होती, जे त्याचे वृत्झबर्ग विद्यापीठातले मार्गदर्शक सल्लागार होते, त्यांचा बुफाला लागलेल्या शोधावर अजिबात विश्वास नव्हता. कारण, मुंग्यांच्या या 'यःकश्चित' जगात यापूर्वी असे काही घडल्याची विज्ञानदरबारी नोंदच नव्हती.
पण संशोधनावर शिक्कामोर्तब झाले, तसे बुफा आणि त्याच्या सल्लागारांनी अवयव विलगीकरण झालेल्या मुंगी रुग्णांच्या तगून राहण्याचा दराची नोंद घेणे सुरू केले. आणि काय चमत्कार ज्या मुंग्याचे अवयव विलगीकरण झाले होते, त्यातल्या 90 टक्के मुंग्या व्यवस्थित जगल्या होत्या. याही पेक्षा चमत्कार हा होता की, अवयव विलगीकरण प्रक्रियेत एका पायाचा चावा घेणारी मुंगी आणि जखमी मुंगीमध्ये परस्पर सहमती असल्याचेही संशोधकांना आढळले होते.
त्या परस्पर सहमतीच्या क्षणांचे वर्णन असे होते- हाणामारीत पाय जखमी झालेली मुंगी बिळात घरोबा असलेल्या मुंगीसमोर येते. आपला जखमी पाय पुढे करून जराही खळखळ न करता, त्रागा न करता शांतपणे बसून राहते. मग तितक्यात शांतपणे 'डॉक्टर मुंगी रुग्ण मुंगीचा जीव वाचावा, या इराद्याने एका झटक्यात जखमी पायाचा चावा घेऊन तो शरीरापासून विलग करते.

इथे काम फत्ते होते. पण अर्धच. कारण, जसा विलगीकरण झाल्यानंतर रुग्ण मुंगीचा पाय गळून पडतो, तसे रुग्ण मुंगी विलगीकरणानंतरची जखम झालेली जागा डॉक्टर मुंगीच्या पुढ्यात ठेवते. तसे सहाय्यक डॉक्टर म्हणून इतका वेळ सोबत असलेली दुसरी मुंगी, रुग्ण मुंगीची जखम झालेली जागा सटासट साफ करून टाकते. म्हणजे आपल्या भाषेत, मलमपट्टी आणि ड्रेसिंग करते.
मुंग्या बुद्धिमान आहेत, हे तर एवढ्याने सिद्ध होतेच. पण यातही पुन्हा बुद्धिमत्तेचा वरचा स्तर संशोधकांच्या ध्यानी आला. तो असा की, जेव्हा डझनावारी अवयव विलगीकरणाच्या शस्त्रक्रिया संशोधकांनी निरीक्षिल्या, तेव्हा असेही ध्यानात आले, या शस्त्रक्रिया केवळ आणि केवळ वारुळमित्र वा मैत्रिणीवरच झालेल्या आहेत आणि केवळ ज्यांना मांड्यांना जखमा झाल्यात, त्यांच्यावरच झालेल्या आहेत.
म्हणजे, उपचार कोणाला देणे, कसे देणे आणि कोणत्या अवस्थेतल्या रुग्णाला देणे यातही फ्लोरिडावासीय सुतार मुंग्यांची स्वतःची अशी काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. मापदंड आहेत. असे नाही की आओ जाओ घर तुम्हारा. पण असे का? हा प्रश्नही संशोधकांना पडणे स्वाभाविक. त्यामुळे असे ठरले की, डॉक्टर मुंगीच्या नकळत जखमी मुंग्यांना वेगळे काढायचे आणि त्यातल्या पायाच्या खालच्या भागावर जखमा झाल्यात अशा मुंग्याचे अवयव विलगीकरण आपणच करायचे.
ठरले तसे केले गेले. पण मग निष्कर्ष काय निघाले, तर ज्यांच्यावर अवयव विलगीकरणाची शस्त्रक्रिया केली, त्यातल्या केवळ 20 टक्केच मुंग्या तग धरू शकल्या. उरलेल्या 80 टक्क्यांनी क्रमाक्रमाने माना टाकल्या.
जेव्हा जखमा मुख्य शरीरापासून (डोके, मान, घड) दूरच्या भागावर झालेल्या असतात, तेव्हा अवयव विलगीकरणाचा पाहिजे तेवढा उपयोग होत नाही. पण जेव्हा जखमा मुख्य शरीराच्या जवळच्या भागावर होतात, तेव्हा अवयव विलगीकरणानंतर जिवंत राहण्याचे प्रमाण वाढलेले असते. हे लक्षात आले फ्रैंक नावाच्या संशोधकाला. फ्रैंक आणि त्याच्या टीमने अवयव विलगीकरण झालेल्या मुंग्यांचे मायक्रो-सीटी स्कॅन केले. त्यातून ज्ञान झाले ते हे मुंग्यांच्या शरीरात वेगवेगळ्या भागांत स्नायू असतात.
हे स्नायू हिमोलिम्फ (मुंग्यांच्या रक्ताचा प्रकार) पुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम करत असतात. या विषयाच्या उत्सवमूर्ती असलेल्या ज्या फ्लोरिडावासीय सुतार मुंग्या आहेत, ज्यांच्या मांड्यांच्या भागात असे अनेक हिमोलिम्फ वाहक स्नायू एकवटले असतात. धुमश्चक्रीत जेव्हा काही मुंग्यांच्या मांड्या जखमी होतात, तेव्हा हिमोलिम्फचा प्रवाह उणावतो. अशाने जखमी जागेपासून विषाणूंना शरीरात प्रवेश करणे अवघड होऊन बसते. अशा केसमध्ये ताबडतोबीने पूर्ण पाय शरीरापासून तोडण्यात आला, तर संसर्गाची शक्यतासुद्धा कमी होते.
अशा वेळी असेही ध्यानात आले की, जेव्हा फ्लोरिडावासीय सुतार मुंग्यांच्या पायाच्या खालच्या भागाला जखमा झाल्या, तेव्हा विषाणूंना शरीरभर पसरण्यात अधिकचा वाव मिळाला. संसर्ग शरीरभर पसरला. परिणामी, अवयव विलगीकरण यशस्वी होण्याची शक्यताही कमी झाली आणि प्रयत्नांना यश हवे तसे मिळाले नाही. आता हा झाला अनुभवांती ज्ञानाचा प्रकार. पण, तो सुतार मुंग्यांनी व्यवस्थित आत्मसात केल्याचे संशोधक फ्रैंकने जाहीर केले.
'ज्ञानसंपदेचा हा सारा प्रवास किंवा ही प्रक्रिया म्हटले तर विलक्षण गुंतागुंतीची आहे. तीदेखील या अर्ध्या इंची मुंग्यांमध्ये घडून येते आहे, असा विचार करणे हाच वेडेपणा ठरेल नाही का? पण वास्तव आहे हे. कोणी सांगावे, कदाचित इतरही मुंग्यांच्या जमातींमध्ये अशी प्रगत जमात असेल. तशी असेल तर मला त्याचे अजिबात आश्चर्य वाटणार नाही. न्यूयॉर्क इथल्या रॉकफेलर युनिव्हर्सिटीतले असोसिएट प्रोफेसर डॅनिअल क्रोनर खूप कौतुकाने असे म्हणाले. क्रोनर हे मुंगी आणि इतर सामाजिक प्राण्यांमध्ये मोडणाऱ्या जीवजंतूंचे अभ्यासक आहेत.
पण ते फ्लोरिडावासीय सुतार मुंग्यांशी संबंधित संशोधनात सामील नाहीत. ते अधिकच्या कौतुकाने असेही म्हणाले, असे हे प्रगत अवयव विलगीकरण मुंग्यांच्या संबंध वारुळ-वस्तीला लाभदायक आहे. कारण, यातून मोलाचा जीव तर वाचतोच आहे, याशिवाय वसाहतीत रोगजन्य जीवाणू-विषाणूंचा फैलावही रोखला जातो आहे.
आता एवढी सगळी मुंग्यांच्या बौद्धिक नि वैद्यकीय उपचार प्रगतीची रोमहर्षक कहाणी वाचल्यानंतर कोण प्रश्न विचारेल, मुंग्यांचा काय तो जीव, काय ते जग आणि किती ते जगणे?
(साभार - समतावादी मुक्त संवाद, ऑगस्ट 2024)






