Skip to main content

‘बाईमाणूस’चा इम्पॅक्ट! वीर जिवाजी महालेंच्या वंशजांना अखेर न्याय; एकनाथ शिंदे परिवाराकडून स्मारकाची घोषणा

Article in Marathi
Vitthal Sable
27 May 2026
140 views
‘बाईमाणूस’चा इम्पॅक्ट! वीर जिवाजी महालेंच्या वंशजांना अखेर न्याय; एकनाथ शिंदे परिवाराकडून स्मारकाची घोषणा

विठ्ठल साबळे 


  • वीर जिवा महालेंच्या १४ व्या पिढीच्या नशिबी आलेला वनवास 'बाईमाणूस'ने एका विशेष ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून समोर आणला होता. 


  • या बातमीची अवघ्या 3 दिवसातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या पिता-पुत्रांनी दखल घेतली. 


  • 'बाईमाणूस'च्या या हाकेला साद देत शिंदे परिवाराने संवेदनशीलतेचा परिचय दिला आणि वीर जिवा महालेंचे मूळ गावी कोंडवली येथे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली तसेच सपकाळ कुटुंबियांना आर्थिक मदत देखील केली.  


होता जिवा म्हणून वाचला शिवा... हा इतिहास आता फक्त पुस्तकातच राहिला असून प्रत्यक्ष इतिहास घडवणाऱ्या वीर जिवा महालेंच्या १४ व्या पिढीच्या नशिबी आलेला वनवास 'बाईमाणूस'ने एका विशेष ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून समोर आणला होता. या बातमीची अवघ्या 3 दिवसातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या पिता-पुत्रांनी दखल घेतली. 'बाईमाणूस'च्या या हाकेला साद देत शिंदे परिवाराने संवेदनशीलतेचा परिचय दिला आणि वीर जिवा महालेंचे मूळ गावी कोंडवली येथे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा देखील केली.


काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झालेल्या 'बाईमाणूस'च्या रिपोर्टमध्ये वीर जिवा महालेंचे १४ वे वंशज प्रकाश सपकाळ हे गेल्या ११ वर्षांपासून अर्धांगवायूने खाटेवर खिळलेले असून, त्यांची पत्नी जयश्री सपकाळ शेतमजुरी करत असल्याचे आणि मुलगा प्रतीक सलूनमध्ये केस कापण्याचे काम करत असल्याचे विदारक वास्तव मांडले होते. त्यानंतर ही बातमी सर्व महाराष्ट्रभर पसरली. 


हे वृत्त समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तात्काळ उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना आदेश दिले. तातडीने सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील दुर्गम कोंडवली गावात पोहोचा, सपकाळ कुटुंबाची परिस्थिती प्रत्यक्ष समजून घ्या आणि त्यांना आपल्यामार्फत व फाउंडेशनतर्फे सर्वतोपरी मदत करा, असे निर्देश शिंदे पिता-पुत्रांनी चिवटे यांना दिले.


या आदेशानंतर मंगेश चिवटे यांनी आपल्या टीमसह थेट कोंडवली गाव गाठले. तिथे हलाखीच्या परिस्थितीत राहणाऱ्या सपकाळ कुटुंबाची त्यांनी भेट घेतली आणि उपमुख्यमंत्री व खासदार श्रीकांत शिंदे यांचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवला.


User Image(जीवा महाले यांचे 14 वंशज प्रकाश सपकाळ (Photo Credit - Abhijeet Tangade))


स्मारकासाठी ५ लाखांचा धनादेश आणि पूर्ण जबाबदारी


'बाईमाणूस'शी बोलताना वीर जिवा महालेंच्या वंशज जयश्री सपकाळ यांनी गावात एक भव्य स्मारक व्हावे,अशी  इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या मागणीला मान देत, खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने गावात वीर जिवा महालेंचे पहिले भव्य स्मारक उभारण्याची संपूर्ण जबाबदारी घेण्यात आली आहे. यासाठी फाउंडेशनतर्फे ५ लाख रुपयांचा धनादेश सपकाळ कुटुंबाकडे आणि ग्रामस्थांकडे सुपुर्द करण्यात आला. कोंडवली गावाच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील हे वीर जिवा महालेंचे पहिले अधिकृत स्मारक ठरणार आहे.


सविस्तर बातमी वाचा:


‘बाईमाणूस’चा इम्पॅक्ट! वीर जिवाजी महालेंच्या वंशजांना अखेर न्याय; एकनाथ शिंदे परिवाराकडून स्मारकाची घोषणा


उपचारांचा संपूर्ण खर्च आणि १ लाख रुपयांची मदत


गेल्या ११ वर्षांपासून अंथरुणाला खिळलेल्या प्रकाश सपकाळ यांच्या वैद्यकीय उपचारांची मोठी चिंता या कुटुंबाला सतावत होती. पैशांअभावी त्यांचे उपचार रखडले होते. यावर तोडगा काढत, प्रकाश सपकाळ यांच्या पॅरालिसिसच्या उपचारांचा आणि औषध गोळ्यांचा सर्व खर्च श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने केला जाईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. याशिवाय, कुटुंबाला तातडीचा प्रपंच चालवण्यासाठी आणि दिलासा म्हणून १ लाख रुपयांची रोकड  थेट जयश्री सपकाळ यांच्या स्वाधीन करण्यात आली.


User Image(मंगेश चिवटे यांनी वीर जिवा महालेंचे १४ वे वंशज प्रकाश सपकाळ यांची भेट घेतली.)


मंगेश चिवटे यांनी मानले ‘बाईमाणूस’चे आभार 


याप्रसंगी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी 'बाईमाणूस'च्या पत्रकारितेचे कौतुक करतांना म्हटले की, 


“बाईमाणूस'ने दाखवलेला हा व्हिडिओ आणि वृत्त स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अत्यंत गांभीर्याने पाहिला. त्यांनी मला तात्काळ या गावामध्ये जाऊन सपकाळ कुटुंबाला मदत करण्याच्या कडक सूचना दिल्या. त्यानुसार आम्ही आज इथे आलो असून, वीर जिवा महालेंच्या भारतातील पहिलं स्मारकाची पूर्ण जबाबदारी, कुटुंबाला १ लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत आणि आजारी प्रकाश सपकाळ यांच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी श्रीकांत शिंदे फाउंडेशनने स्वीकारली आहे. समाजातील अशा उपेक्षित घटकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवल्याबद्दल आम्ही 'बाईमाणूस' टीमचे विशेष आभार मानतो.”


कुटुंबाला मिळालेल्या मदतीनंतर भावूक झालेल्या जयश्री सपकाळ यांनी 'बाईमाणूस'शी बोलताना म्हणल्या, 


"माझ्या पूर्वजांचा हा गौरव व्हावा, ही माझी आजवरची सर्वात मोठी इच्छा होती. आज मला आमचा आणि आमच्या इतिहासाचा खूप गर्व वाटतोय. माझी ही इच्छा 'बाईमाणूस'मुळे आज प्रत्यक्ष पूर्ण झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आमची हाक ऐकली, याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानते. आमच्यावर आलेलं संकट दूर झाल्यामुळे आज माझ्याकडे आनंद व्यक्त करायला शब्दच उरलेले नाहीत.”


User Image(Photo Credit - Abhijeet Tangade)


कोंडवली गावकऱ्यांनी मानले 'बाईमाणूस'चे आभार


या अभूतपूर्व मदतीनंतर कोंढवली गावात आनंदाचे आणि भारावून टाकणारे वातावरण निर्माण झाले आहे. वर्षानुवर्षे ज्या उपेक्षित कुटुंबाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते, त्यांना न्याय मिळाल्याने सपकाळ कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. यावेळी गावाचे सरपंच बाळू जगताप आणि ग्रामस्थ जितेंद्र आंबळे यांच्यासह संपूर्ण कोंडवली गावकऱ्यांनी 'बाईमाणूस' डिजिटल मीडियाचे रिपोर्टर विठ्ठल साबळे आणि कॅमेरापर्सन अभिजीत तांगडे यांचे आभार मानले. जर बाईमाणूसने आमच्या गावात येऊन हा ग्राउंड रिपोर्ट केला नसता, तर हा जिवंत इतिहास अंधारातच राहिला असता. एका खऱ्या पत्रकारितेची ताकद काय असते, हे बाईमाणूसने दाखवून दिले आहे. त्यांच्यामुळेच आज राज्याच्या उपमुख्यमंत्र्यापर्यंत आमचा आवाज पोहोचला आणि वीर जिवा महालेंच्या स्मारकाचे स्वप्न पूर्ण होत आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.



बाईमाणूसचा इम्पॅक्ट


छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवणारे वीर जिवा महाले यांचे १४ वे वंशज प्रकाश सपकाळ आणि त्यांचे कुटुंब साताऱ्यातील कोंडवली गावात अत्यंत हलाखीचे आणि दारिद्र्याचे जीवन जगत असल्याचा विदारक ग्राउंड रिपोर्ट 'बाईमाणूस'ने नुकताच समोर आणला होता. ११ वर्षांपासून अर्धांगवायूने अंथरुणाला खिळलेले प्रकाश सपकाळ, मजुरी करणारी त्यांची पत्नी आणि नाईलाजाने शिक्षण सोडून सलूनमध्ये काम करणारा त्यांचा तरुण मुलगा यांची ही वेदनादायी कहाणी 'बाईमाणूस'ने मांडताच संपूर्ण महाराष्ट्र ही बातमी वेगाने पसरली.


User Image


या बातमीचा इतका मोठा आणि थेट इम्पॅक्ट झाला की, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना याची तातडीने दखल घ्यावी लागली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना थेट गावात पाठवून प्रकाश सपकाळ यांच्या वैद्यकीय उपचारांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. यासोबतच कुटुंबाला १ लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत आणि गावात वीर जिवा महालेंच्या पहिल्या भव्य स्मारकासाठी ५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. 'बाईमाणूस'च्या या अत्यंत प्रभावी पत्रकारितेमुळे आणि एका हाकेमुळे वर्षानुवर्षे उपेक्षित राहिलेल्या एका ऐतिहासिक कुटुंबाला खऱ्या अर्थाने मोठा न्याय मिळाला आहे. 


Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...